(१)

करि नतिच ही स्तवनधी । प्रभुवर मौनमयचि पदिं । वचनें स्तवना क्षय ना साधी । दिव्य । वितरिसी सहज सुगुणगण गूढ मनुजहृदिं ॥धृ०॥
करावया प्रकट तया । शुभदा अघसंघा । निर्मिसि जरि वाटे खर आधीं ॥

(२)

स्वजनकृतिचे गुरु दोष झाकुनीयां
घेति गुण लव जे गोड मानुनीयां
कृतज्ञत्वें त्या नमन अष्ट अंगीं
महाराष्ट्राच्या रसिक जनांलागी ॥

(३)

कृपाचि ज्यांची कारण केवळ मम पामरवचनातें ।
वंदुनि त्या श्रीपादपदांप्रतिं याया यश कार्यातें ।
नवनाटकरचना । सादर करितों रसिकजनां ॥

(४)

करि मोहवश ना कसा । हा । नवकाव्यागम रसिकमानसा ॥धृ०॥
रमवि मुखिं न त्या वरुनि मुखरता ।
शमवि न सुरसें कवण रसरता । हृदयपिपासा ॥

(५)

कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । स्त्रीजातीप्रति झटता अंत कळत नाहीं ॥धृ०॥
रंगुनि रंगांत मधुर मधुर बोलती । हसत हसत फसवुनि हृद्‌बंध जोडिती ।
हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती । पदर पदर परि शेवटिं तुटत तुटत जाई ॥

(६)

विनति अंतिम असे ईशवर तव पदा ॥धृ०॥
भालिं मम रेखिला । अखिल सुखलेख जो ।
अंकित प्रीतिच्या चरणतलिं करि सदा ॥१॥
दुःख खरतर वितरि । प्रभुवरा मम शिरीं ।
देई इजसी परी । सकल सुख-संपदा ॥२॥

(७)

मोह नसावा । त्याग ठसावा । भावहि हृदयिं विरावा ॥धृ०॥
आशामय हें । स्वप्नचि आहे । हा भविं अनुभव यावा ॥१॥
जीव निदानीं । नयनजलांनीं । ब्रह्मार्पणचि करावा ॥२॥

(८)

रमते सहवासें प्रीते विलासीं । परि विरहें येत भरासी ॥धृ०॥
चमके रवितेजें हीरशलाका । घन तिमरीं द्युति परि अधिका ॥
तळपे किरणीं त्या कांचहि तैशी । तमिं विसरे परि तेजासी ॥
मिथ्या प्रीतीच्या चंचल जाति । विस्मरणें पावति विरति ॥

(९)

शांत मनि या । न धरि कधिं दया । न धरि कधिं माया ॥
पदिं तुझ्या विनति ही । न सखि मुख हें कधिं पाहि बाई ॥धृ०॥
ही कृतान्ताची । क्रिया ज्याची । सुता त्याची म्हणुनि याची ।
न सखि मुख हे कधिं पाहिं बाई ॥

(१०)

सुखा पारखा झाला । अभागी जो या प्याला ।
भरला का पेमाचा हा विषारी ऐसा प्याला ॥धृ०॥
नवरसलीला कोमल जाळुनियाच रस हा भीषण केला ।
हृदयदहन करि दुरुनिच हा । पळभरि अधरिं न जो ठरला ।

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP