श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग ३१ ते ३९

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३१
उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला ॥१॥
कळवळिले संत वैष्णवांचे भार । आणिक योगेश्वर स्फुंदताती ॥२॥
गरुडा हनुमंत विसोबा खेचर । लावितो पदर डोळियासी ॥३॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेवासहित । परसा भागवत शोक करी ॥४॥
नामा म्हणे देवा खेद सिंधू लोटा । उठा आतां भेटा सोपानासी ॥५॥

३२
सोपानदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥
सवें मुक्ताबाई सद्‌गुरु निवृत्ति । लक्ष्मीचा पति घेतलिया ॥२॥
जयजयकार ध्वनि होताती अपार । जाती योगेश्वर समाधीसी ॥३॥
राही रखुमाई निळकंठ जवळी । समाधिच्या पाळी अवघे जण ॥४॥
समाधि पायरीवरी वटेश्वर सोपान । मागितला मान पांडूरंगा ॥५॥
प्रतिवर्षी भेटी देऊं उभयतां । आळंकापुरीं जातां उत्सवासी ॥६॥
नामा म्हणे देवा कृपा केली फार । दिधला कीं वर भक्तराज ॥७॥

३३
निवृत्ति मुक्ताईनें धरियेलें मौन । वटेश्वर सोपान त्यागियेला ॥१॥
समाधि पताकांची पडली सावली । उतरले खालीं योगीराज ॥२॥
पांडुरंगासंगें गेले ऋषीश्वर । सोपान वटेश्वरीं बैसविले ॥३॥
शिवाचा अवतार सद्‌गुरु निवृत्ति । मुक्ताबाई सखी तुम्हांपाशीं ॥४॥
अंतरीचें जाणतां वा पंढरीनाथ । आले अश्रुपात सोपानासी ॥५॥
सोपानाची बोळवण करितसे हरी । दीर्घा ध्वनी करी नामदेव ॥६॥

३४
धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । तेव्हां ओसंडती अवघे जन ॥१॥
सोपान वटेश्वरें केला नमस्कार । उतरले पार भवसिंधू ॥२॥
घेतियेलें तीर्थ तंव झालें विकळ । झांकियेले डोळे ब्रह्मबोधें ॥३॥
निवृत्ति मुक्ताई राहिलिं बाहेरी । आतां तुम्ही हरि सांभाळावें ॥४॥
देव ऋषीश्वर निघाले बाहेर । केला नमस्कार नामदेवें ॥५॥

३५
जयजयकारें टाळी पिटली सकळां । घातियेली शिळा समाधिसी ॥१॥
निवृत्तिमुक्ताईनें घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग ॥२॥
सोपान वटेश्वर सुखधामीं शेजा । करिताती पूजा समाधीची ॥३॥
खेद दुःख जालें अवघ्या साधूजनाम । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥४॥
निवृत्तिमुक्ताईनें वंदिली समाधि । देहभान शुद्धि हारपली ॥५॥
नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करूं आचमन भोगावतीं ॥६॥

३६
वैष्णवांनीं केली समाधि प्रदक्षिणा । गेले आचमना भोगावतीं ॥१॥
सारी रात्र कीर्तन केलें त्रयोदशीं । चतुर्दशी दिवशीं भोजनें केलीं ॥२॥
अमावास्ये जागरण केलें परिपूर्ण । प्रतिपदे गमन वैष्णवांचें ॥३॥
निवृत्ति मुक्ताई जाली उदासी । आतां ह्रषिकेशी बोळवावें ॥४॥
चांगा म्हणे माझी करा बोळावण । घेऊनि नारायण समागमें ॥५॥
नामा म्हणे देवा माघ मास नेमा । चांगदेवा प्रेमा समाधि देऊं ॥६॥
३७
सव्य हातें नगर घेती ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी ॥१॥
परतले देव आणि सुरगण । चाललीं विमानें वैष्णवांचीं ॥२॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेव संगें । रुक्मिणी पांडुरंग समुदायेंसी ॥३॥
नामा म्हणे देव गंधर्व ऋषिमुनी । जाती उत्तरायणीं निवृत्तिराज ॥४॥

३८
निवृत्तिदेवासंगें देव ऋषीश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
प्रतिपदीं देव निघाले बाहेर । केला नमस्कार समाधीसी ॥२॥
अवघियांसहित वैष्णव मंडळी । सवें वनमाळी चालताती ॥३॥
गोदातीरा जाया निवृत्ति उद्देशी । सह समुदायेंशी उठावले ॥४॥
नामा म्हणे घेतला नारायण संगें । चालिले अनेगें भक्तराज ॥५॥
३९
सद्‌गुरु सागरा दीनबंधु । अनाथनाथा सुरैकसिंधु ।
चातकातें कृषाबिंदु । प्रसाद द्यावा ॥१॥
गुरु आणि गणपति पुरातन । सिद्धांत वेदांत जुनाट जुना ।
दयाळा पातकहरणा । रक्षीं रक्षीं स्वामिया ॥२॥
तूं अंतरीचें जाणतां । तूं इच्छेचा दाता ।
तूं ह्रदयीं प्रेरक होता । कमळालया ॥३॥
दृश्यादृश्य करितां पार । चौर्‍यांशीं लक्ष योनी दुर्धर ।
चुकवूनि उतरसी पार । संकटीं स्वामिया ॥४॥
निवृत्ति प्रवृत्ति दोन्ही थडी । मधीं माया नदी उघडी ।
बोधभावें घालिसी सांगडी । पार उतरिसी सवामिया ॥५॥
सोपाना आपला अंकित । पद्महस्तें करावें मुक्त ।
जो मनें इच्छिला अर्थ । सिद्धि  न्यावा स्वामिया ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP