श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग ११ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११
भक्तांचें तें साह्या करणें पांडुरंगा । म्हणोनि तीर्थगंगाअ उगविलें ॥१॥
जान्हवी मंदाकिनी भोगावती मिळुनी । दुजी हे त्रिवेणी या भूमीसी ॥२॥
निर्झर जीवन वाहती निरंतर । तेथें वटेश्वर उतरले ॥३॥
दुरोनि हें स्थळ दिसे मनोहर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे स्थळ आदि हें अनादि । येथेंची समाधी सोपानासी ॥५॥

१२
उतरिलीं विमानें स्वर्गीचें राऊळ । पताका रानोमाळ मिरविताती ॥१॥
सोपान मुक्ताई सद्‌‍गुरु निवृत्ति । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥२॥
टाळ मृदंग वाजताती विणे । नारद गायन करीतसे ॥३॥
नामा  पुंडलिख चालती आवडीनें । संत साधूजन मिरवती ॥४॥
लहान थोर संत चालती मिळोन । करिती बोळवण नामा म्हणे ॥५॥

१३
भोगावती तीरीं दिधला मंडप । साधू आपरूप पांडूरंग ॥१॥
रखुमाई राही वैसल्या अनेक । सखा पांडुरंग उतरला ॥२॥
वद्य मार्गशीर्ष दशमी जागर । हरिदिनीं गजर कीर्तनाचा ॥३॥
क्षेत्रप्रदक्षिणा केली असे संतीं । आले भोगावती अवघेजन ॥४॥
निवृत्ति मुक्ताई दुश्चित्त अंतःकरण । साहित्य नारायण करीतसे ॥५॥
नामा म्हणे देवा आधीं नेमा स्थळ । मग हें सकळ साहित्य करूं ॥६॥

१४
वटेश्वरें वृत्तान्त सांगितला सकळ । पूर्वीं आमुचें स्थळ याच क्षेत्रीं ॥१॥
येथूनियां वाट जातसे पाताळा । उघडिली शिळा समाधीची ॥२॥
आसन मनोहर मृगछालावर । पहाती ऋषीश्वर आनंदानें ॥३॥
सोपान वटेश्वर करिती एकांत । कळलें मनोगत नामा म्हणे ॥४॥

१५
सोपान वटेश्वर पातले समोर । केला नमस्कार निवृत्तीसी ॥१॥
म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसें नारायणें बुझाविलें ॥२॥
गरुड हनुमंता परिसा भागवता । मग साधुसंता श्रुत केलें ॥३॥
गंधर्वा आणि देवा कळला वृत्तान्त । जाती उभयतां समाधीसी ॥४॥
नामा म्हणे यांनीं आरंभिलें हित । करितो स्वहित पांडुरंग ॥५॥

१६
सोपान वठेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता वाहियेल्या सहज । देव निवृत्तिराज पूजियेले ॥२॥
धूप आणि दीप आणिलें संपूर्ण । पूजिलें गगन सोपानानें ॥३॥
दाही दिशा द्दष्टि अवलोकिली सारी । गगन अंकुरीं डवरिलें ॥४॥
चक्र सर्पाकार विजा लखलखती । ज्योति प्रकाशति रानोमाळ ॥५॥
नामा म्हणे देवा उदय जाला सकळ । सोपानदेवें मूळ दाखविलें ॥६॥

१७
शेंदूर पारवे नीळवर्ण ठसे । जनीं वनीं दिसे परब्रह्म ॥१॥
मुक्ताफळ  भरित सबाह्य कोंदलें । रूप हें चांगलें विठोबाचें ॥२॥
श्वेत पीतवर्ण आंत तारांगण । अंकुरलें गगन नानारूपें ॥३॥
ज्योतिर्मय ब्रह्म एकांतीचें पहाणें । समाधि नारायणें उदय केली ॥४॥
संत स्वरूप अवघें अवलोकिलें मनें । नमन नामा म्हणे आरंभिलें ॥५॥

१८
निवृत्ति म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखळा । मार्ग हा मोकळा आम्हां जाला ॥१॥
पांडुरंग पाश आवरिला आपला । म्हणोनि फुटला मार्ग आम्हां ॥२॥
आवरिली माया पुरातन आपुली । म्हणोनि आम्हां जाली बुद्धि ऐसी ॥३॥
नामदेवें मस्तक ठेवियलें पायीं । आतां खेड कांहीं करूं नका  ॥४॥

१९
जाती ब्रह्मादिक जाती चराचर । मायिक व्यवहार ऐशा परी ॥१॥
प्रकृति पुरुषाचा मांडियेला खेळ । जाईल सकळ नाशिवंत ॥२॥
चंद्र सूर्य जाईल जाईल मृगजळ । जाती तिन्ही ताळ शून्यापोटीं ॥३॥
होईल निरामय अवघे चराचर । ब्रह्मींचा विस्तार होईल ब्रह्मीं ॥४॥
नामा म्हणे स्वामी जाताती सकळ । ब्रह्मीं माया मूळ जाली कैसी ॥५॥

२०
धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें । साहित्य स्वआंगें करितसे ॥१॥
नाशिवंत देह जाईल कीं अंतीं । नीचाची संगति कोण काज ॥२॥
पाहिला गे माय ब्रह्मींचा आवर्तु । जीव आणि जंतु विस्तारिले ॥३॥
निवृत्ति मुक्ताई केलासे विवेक । आपपरा लोक दुजें नाहीं ॥४॥
नामा म्हणे चित्त केलें स्थिर । देव ऋषीश्वर उठावले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP