मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीसोपानदेवांची समाधी| अभंग २१ ते ३० श्रीसोपानदेवांची समाधी अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ३९ श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग २१ ते ३० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग २१ ते ३० Translation - भाषांतर २१ पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥१॥नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२॥परिसा भागवत चांगदेव हातें । आणिलें साहित्य समाधींचें ॥३॥तुळसी बुका बेल दर्भ आणि फुलें । उदक चांगलें भोगावतीचें ॥४॥भस्म पितांबर भगवीं तीं वस्त्रें । योगी दिगंबर समागमें ॥५॥नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वर । होईल उशीर समाधीसी ॥६॥२२ उठिले वैष्णव घेऊनि नारायणा । चालिले ते स्नाना अवघे जन ॥१॥गंधा आणि अक्षता विसोबाचे हातीं । पूजा ते करिती सोपानाची ॥२॥सोपान वटेश्वर सोंवळे जाले सांग । निवृत्ति पांडुरंग पूजियेले ॥३॥गंधर्व आणि सुरगण पूजिती सोपान । यथाविधी प्रमाण संपादिलें ॥४॥नामा म्हणे पूजा केली ह्रषिकेशी । चला पारण्याशी अवघे जन ॥५॥२३ राही रखुमाई ऋद्धिसिद्धि जेथें । पडलें पर्वत पक्वान्नांचे ॥१॥बैसल्या त्या पंक्ति भोगावती तीरीं । पात्रें टाकी हरि वैष्णवाला ॥२॥विसोबा खेचर पुंडलिक संगें । वाढी पांडुरंग वैष्णवाला ॥३॥संत्तसभेमाजीं निवृत्ति सोपान । यथाविधी प्रमाण संपादिलें ॥४॥रखुमाईला देवें सांगितली खूण । सोडितो पारणेंनामा म्हणे स्वामी जातो बोलावण । आणितो सोपान भोजनासी ॥६॥२४ चांगा वतेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर । सावंत कुंभार ऐहिक ते ॥१॥एके ठायीं मिळाले परब्रह्म गवसून । वटेश्वर सोपान मध्यभागीं ॥२॥सोपान वटेश्वर घेतले वोसंगळा । माळा घाली गळां पुंडलिक ॥३॥सोपान वटेश्वर पूजिती आवडीनें । संगतीं निधान पांडुरंग ॥४॥आनंदानें सारे बैसले एकवट । विस्तारिलें ताट रखुमाईनें ॥५॥नारा विठा गोंदा बोलाविला माहादा । नामा म्हणे पूजा अवघे जन ॥६॥२५ उठिले विष्णव आटोपलें भोजन । केलेंअ आचमन भोगावतीं ॥१॥अवघ्यांनीं घेतला सोपान वटेश्वर । गोंदा महादा साचार विडे देती ॥२॥निशिदिनीं कीर्तन केलें द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥भोगावतीं केलें अवघ्यांनीं स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥४॥नामा म्हणे देवा स्थळ मनोहर । उठावले भार वैष्णवांदे ॥५॥२६ कळवळी मन नाहीं देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे जाले ॥१॥संत साधुजन होत कासाविसी । आले सामाधीपाशीं तांतडीनें ॥२॥समाधीभोंवतें कुंकुमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥वरी मृगछाला दिसताती लाल । दर्भ आणि फुलें समर्पिलीं ॥४॥दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे । साहित्य सकळ समर्पिलें ॥५॥निवृत्ति पांडुरंग बैसले येऊन । नमन सोपान करितसे ॥६॥२७ नमो अगणित गुणा । नमो अगम्य ध्याना ।नमो कलिविध्वंसगहना । कालरूपा ॥१॥नमो शून्यादि क्षरा । अक्षरा तूं हरा ।हरिहर सर्वेश्वरा । नमो तुज ॥२॥वेदविदा विद्वदा । सहज बोधा परमानंदा ।अनादि आनंदा । गोविंदा तुज नमो ॥३॥नमो चित्त विभ्रमा । नमो वृत्ति ध्यानागमा ।नमो आगमसमा । ऐशिया परमात्मा तुज नमो ॥४॥नमो अनंता अशेषा । नमो सकळ महेशा ।जीव शिवादि विश्वेशा । नमो तुज ॥५॥देव देवोत्तमा सकळा । देवाधिदेवा वेगळा ।नमो तुज गोपाळा । चक्रचाळका हरी ॥६॥नमो विष्णु कृष्णरुपा । नमो शुद्धादिरूपा ।नमो नमो भुवनदीपा । नारायणा आदिनाथा ॥७॥नमो योगिया योगोत्तमा । नमो सर्वाचा तूं आत्मा ।नमो नमो परब्रह्मा । सर्वारामाअ आत्मया ॥८॥नमो नमो नमन । तूं जगादि जगजीवन ।जगज्जनकु जनार्दन । आनंदघन महामूर्ति ॥९॥नमो कौतुहलह्ळणा । नमो भक्त प्रेमपाळणा ।परात्पर निधाना । परादि वाचा ॥१०॥परेहि परतत्त्वा । नाहीं जेथें रजतमसत्त्व ।वेदादिका देउनी महात्त्वा । पाळण करिसी धर्माचें ॥११॥अनंत योगाधीशा । अनंत नामाधिवासा ।अनंत तपें सहसा । न जोडसी तूं स्वामी ॥१२॥ऐशिया विश्वेश्वरादि शिवा । नमो तुज महादेवा ।होय जयावरी कृपाहेलावा । तरी सर्व सुख देशी ॥१३॥भुक्ति मुक्ति विशेषा । दवडुनी मी माझी आशा ।सांडुनी रजतम दुराशा । चरणीं चित्त रमलें ॥१४॥नमो उद्धोध विशद । तया वरील जो बोध ।वरी झळके प्रसिद्ध । तो शुद्धाशुद्ध रस देई ॥१५॥निर्विकाराचा विकार । स्वस्वरूपाचा विर्धार ।सर्वरूप होऊनि विर्निकार । ग्रास न करिशी माझा ॥१६॥शमदमादि समश्रेष्ठा । आदि अनादि वरिष्ठा ।सकळा होऊनि विशिष्टा । भुवनपदा दावी ॥१७॥अनंत अनंतेश्वरा । अरुपाचाही आकारा ।ग्रास न करुनी निर्धारा । सांठवी ह्रदयीं आपुला ॥१८॥नाथ दीनानाथा दीनेशा । चित्ताचित्त समरसा ।नमो शिवादि शिवेशा । आदि प्रभु ॥१९॥नमो नमो रामा । नमो नमो भवादिश्रमा ।नमो योगादि विश्रामा । आदिपती तुज नमो ॥२०॥अवधूत महादत्ता । सकळ दृष्ट तूंचि हर्ता ।नमो सकळ कर्ता । आदिसत्ता पैं तुझी ॥२१॥नमो दशानंद परेशा । नमो तुज ऐशिया जगदिशा ।तुजविण व्यर्थ भरंवसा । आणिकां देवांचा ॥२२॥नमो नमो हरी मुकुंदा । नमो नमो पावविसी परमपदा ।ऐशिया तुज सदा । पुढती नमो नमो ॥२३॥वामदक्षिण परिपूर्णा । अधउर्ध्व शून्यपणा ।नमो तुज सर्वभरणा । समाधि देशी तुज नमो ॥२४॥वीर्य धैर्य संपन्नगुणा । निराशा आशा अवगुणा ।तुज स्मरतां पूर्णनिधाना । पावविसी परमपदा ॥२५॥चतुराचतुर शून्या । वेदशास्त्र श्रुतिमौन्याअ ।सकळजन सौजन्या । नांदसी सभराभरित ॥२६॥मंजुळ शब्दाचिया गुणा । मंजुळ नादाचिया ध्याना ।विश्वरूप अनन्या । वैकुंठीं नांदसी सदा ॥२७॥जगद्गुरु जगद्पालका । जगदादि जगन्नायका ।वेदादि विवेका । कर्ता हर्ता जगदीशा ॥२८॥नारायणा पूर्णचैतन्या । पूर्णापूर्ण सौजन्या ।श्रुतितुजमाजिं मौन्या । मौन्यरूपी नांदसी सदा ॥२९॥तूं परमेश्वर परेपरता । सकळ देहीं देहहर्ता ।सकळ रूपें हे सत्य वार्ता । वेद बोलोनी गेले ॥३०॥ऐशिया नमो हो देवा । महामूर्ति निरंजन ठेवा ।तो तूं पुंडलिक अनुभवा । रूपरेखें आलासी ॥३१॥विनट विठ्ठलमूर्ति । युगें अठ्ठावीस कीर्ति वीटे नीट लक्ष्मीपती । भक्तालागीं तिष्ठसी ॥३२॥भक्तालागीं दयाळू । दीनदयानिधि गोपाळु ।तूं द्वारकेचा भूपाळु । बाळलीला अवतरलासी ॥३३॥निराभिवरासंगम । चंद्रभागेचा उगम ।माजीं सर्वात्माराम । वृंदावनीं खेळसी ॥३४॥वैकुंठादि वैकुंठवासा । वैकुंठरूपा जगदीशा ।सर्वज्ञा ह्रषिकेशा । त्राहे त्राहे स्वामिया ॥३५॥समाधिधन देवा तूंचि । समाधी सेज तूंचि रची ।समाधि हे जिवाची । शिवाशीं मेळवी ॥३६॥अनंत जन्माचें संचित । अनंत दोष दुर्घटित ।अनंत नामाचा संकेत । हारपे तुजमाजीं ॥३७॥ऐसी सोपान स्तुति करीत । तेणें संतोषला पंढरीनाथ ।त्वां जग तारिलें समस्त । कीर्तनें करूनी ॥३८॥नामा म्हणें ऐसें स्तवन । सोपान देवें केलें संपूर्ण ।मग बोले जगज्जीवन । तयाप्रती ॥३९॥२८ आतां स्तुति पुरे पुरे सोपान । प्रेमळाचिया निधाना ।संतुष्ट जालों रे वचना । एक एका तुझिया ॥१॥तूं अवतार चतुरानन । ऐसें बोलिले जगज्जीवन ।तंव स्तवन करितां सोपान । तो मौन्यचि राहिला ॥२॥सर्वोत्तम म्हणे चतुरा । महा विचाराच्या सारा ।पवित्ररूपा परिकरा । सकळ जनासी तूंची ॥३॥मग पाचारिलीं तीर्थें । जे जे तिर्थरूप सामर्थें ।म्हणे उदक द्यावें स्नानातें । सोपानदेवासी ॥४॥गंगा जान्हवी मंदाकिनी । भोगावती भीमरथी तिन्ही ।येती जालिया माध्यान्हीं । पंचारती घेऊनियां ॥५॥योगी सिद्ध प्रसिद्ध । नाथादि नारायण नवविध ।आणि सनकादिक अगाध । नारदा तुंबर पातले ॥६॥देवीं आदरिलें स्तवन । ऋषीं वेदघोष आरंभिले पूर्ण ।सनकादिकीं भाष्य जाण । हा हा हु हु गंधर्व ॥७॥मंगळ तुरे वाजती । महावैष्णव हरिकथा करिती ।नामा म्हणे पुढतो पुढतीं । चरणा लागे सोपान ॥८॥२९ नमो ज्योतिर्मय ब्रह्मा । आनंद ईश्वर पुरातन ।नमो नारायण कमळ-कोंदणा । नमो नमो स्वामिया ॥१॥नमो सद्गुरु निवृत्ति । नमो रखुमाईच्या पति ।नमो ज्ञानमूर्ती । अगम्य पुरुषा ॥२॥नमो भक्ति मुक्ति चैतन्य माया । नमो कर्ता हर्ता काया ।नमो आदि पुरातन पाया । परब्रह्मा ॥३॥नमो विराट पुरुषा पुरातना । नमो जगज्जीवना करुणाघना ।चराचरपालका आनंदघना । अंगिकारीं नमना माझिया ॥४॥नमो ब्रह्मांडव्यापका । नमो गुणातीता मायांतका ।चुकवी जन्ममरण एका । तारी विश्वकृपेनें ॥५॥नमो जळस्थळ रक्षिता । आदी अवसानी तारिता ।नमो रोमारोम अव्यक्ता । नमो नमो दीनबंधू ॥६॥नमो विराट महद्ब्रह्मा । निष्कलंक परब्रह्मा ।योगियांच्या सुखधामा । नमो नमो दयाळा ॥७॥औट हातीं ध्वनी । नमो नमो अंतःकरणीं ।नमो नमो सत्रावी त्रिवेणी । त्रिपुटी जेथें ॥८॥नमो विटेवरी सदटा । नमो वैकुंठीचिये पीठा ।आदी अंतीं एकटा । नमो आदिपुरुषा ॥९॥आदी अंतीं शेवटीं । सहस्त्रदळीं गुह्य पिठीं ।नमो उघडी दृष्टि । स्वरूपीं तुझ्या ॥१०॥नमो पायीं पडली मिठी । नमो बांधिली ह्रदयीं गांठी ।तुझें स्वरूप ह्रदयसंपुष्टीं । धरून ठेविलें स्वामिया ॥११॥नमो गेलें आलें । नमो जालें तें जालें ।नमो सांभाळुनी तुझें । ठेवी आम्हां ॥१२॥३० नमो नमो गणपति । नमो सरस्वती ।नमो नमो रमापति । दीनबंधु ॥१॥नमो योगी दिगंतर । नमो वैष्णवांचिया भारा ।नमो गंधर्वा ऋषीश्वरा । लहान थोरां ॥२॥नमो नमो अंतरीं । नमो नमो दिशा चारी ।नमो अंतरबाहेरीं । एकत्व एक ॥३॥नमो अनंता अनंत-नामा । जानकीश जगज्जीवना ।जयजय रामारामा । तुज नमो ॥४॥नमो मत्स्य कच्छ अवतार । नमो सिंह सुकर ।नमो परशुराम फरशधर । वामना तुज नमो ॥५॥नमो रामा वेदपाळका । नमो इंद्रियेंचालका ।नमो बोधभाविका । श्रीविठ्ठला ॥६॥नमो कलंकी विनटला । पटला विठ्ठला ।सारासार नटला । तुज नमो ॥७॥निरामय निर्णय तुज । नमो नमो चतुर्भुज ।नमो सर्व जगदात्मज । अनाथनाथा ॥८॥नमो बारा ज्योतिर्लिगा । नमो पंढरी पांडुरंगा ।नमो भिवरा चंद्रभागा । नमो वैकुंठपीठा ॥९॥मी काय जाणें नामस्थिती । नमन केलें भोळे भक्ती ।नमन काय जाणें नामस्थिती । नमन केलें भोळे भक्ती ।नमन श्रीपती । मान्य जालें ॥१०॥नमन निवृत्ति ज्ञानेश्वरा । नमो सोपान वटेश्वरा ।नमन मुक्ताबाई निर्झरा । सत्रावींच्या ॥११॥नमो हंसा सुअक्षरा । नमो व्यापका चराचरा ।नमो नमो अव्यक्त विषयावरा । पांडुरंगा ॥१२॥नमन तुमचें तुम्ही केलें । नमन सहजासहज जालें ।नेणें काय आलें गेलें । सद्गुरुनाथा ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP