संतमहिमा - अभंग २१ ते ३०

संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे!


२१
जयाचेनि तीर्था आलें तीर्थपण । केली सांठवण ह्रदयीं ती ॥१॥
नवल महिमा हरिदासां जीवीं । तीर्थें उपजवी त्यांचे कुसीं ॥२॥
वाराणसी प्राणी मरे अंतीं कोणी । तया चक्रपाणि नामें तारी ॥३॥
नामा म्हणे तीर्थे तया येती भेटी । वोळंगती दृष्टी त्रिभुवना ॥४॥

२२
सत्वसमाधानी कर्मनिष्ठ जाण । अखंडित ध्यान रामकृष्ण ॥१॥
सत्संग सर्वदा साक्ष सर्व देहीं । सर्वांभूतीं पाही अंशमात्रें ॥२॥
आपणासमान सर्वत्र पाहाती । अन्य सर्वांभूतीं रामविष्णू ॥३॥
नामा म्हणे ऐसें सकळिकें संमत । नामीं सदोदित भक्तिमार्ग ॥४॥

२३
गौतम वसिष्ठ आणि विश्वामित्र । भारद्वाज अत्रि कश्यपादि ॥१॥
बळी हनुमंत बिभीषण नळ । दुष्ट अजामिळ वाल्हा श्रेष्ठ ॥२॥
उद्धव अर्जुन अंगद अगस्ति । सर्वांभूतीं भक्तिभाव ऐक्य ॥३॥
नामा म्हणे सदा साधु संत जन । जनीं जनार्दन आत्मा एक ॥४॥

२४
तोचि पुराणिक जो होय कृतार्थ । विषयीं विरक्त विधि पाळी ॥१॥
मानी तो हरिदास ज्या नामीं विश्वास । सर्वस्वें उदास देहभावो ॥२॥
नामा म्हणे ऐसे संत भेटावे गा देवा । त्यालागी केशवा ह्रदय फुटे ॥३॥

२५
पत्रावली काढी वैकुंठनायक । धांवुनिया शुक आला तेथें ॥१॥
दाटी पाहुनि द्वारीं मानसीं विचारी । जावया भीतरीं काय काज ॥२॥
हा वाहे प्रसाद स्वहस्तें अनंत । वेचोनियां शीत घाली मुखीं ॥३॥
घंटानाद वाजे लक्ष द्विजपंक्ती । अक्षयीं वाजयी वेळोवेळां ॥४॥
ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव । पुसे धर्मराव देवाजीसी ॥५॥
सांगतसे खुण वैकुंठनायक । ब्रह्मनिष्ठ एक आला तेथें ॥६॥
येथुनी उठले धर्म नारायण । बाहेर येऊन पाहताती ॥७॥
शुकाचिया मिषें व्यासाचा नंदन । सांगतसे खूण जगदीश ॥८॥
धरुनियां करीम नेला तो भीतरीं । नामा म्हणे करी पूजा त्याची ॥९॥

२६
नित्य सर्वकाळ पुण्याचिया राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी ।
नित्य तपानुष्ठानाच्या राशी । कोटि यज्ञासी लाभ जाला ॥१॥
धन्य धन्य त्यांचा वंश । जे जे रतले नामास ।
रामनामीं नित्य सौरस । ते विष्णुदास पवित्र जाणा ॥२॥
पवित्र ते स्वधर्मीं । ज्यासीं सर्वकाळ नेम नामीं ।
तयाचें नाम पूर्णकामीं । मनोरथ पुरतील ॥३॥
नामा जपे नाम हरीचें । सार्थक केलें संसाराचें ।
ओझें फेडिलें पूर्वजन्मींचे । हरि स्मरण केलिया ॥४॥

२७
एक भानू अवघा सृष्टीच सोहळा । व्यापूनि सकळा आकाशासी ॥१॥
पवनसिंधुवरी मन वेगें पांखरी । मार्गु षटचक्रीं वैकुंठासी ॥२॥
तोचि भोगी सुख चिदानंदी वासू । संतसंगें प्रकाशु सफळ मग ॥३॥
नामा म्हणे यासी गुरुकृपा पाहिजे । संतसंगें पाविजे केशवचरण ॥४॥

२८
धन्य नरदेहीं संतसंग करी । त्रैलोक्य उद्धरी हेळामात्रें ॥१॥
नेणे सुख दुःख शरीराचें भान । अखंड भजन केशवाचें ॥२॥
कर्म करुनियां होय शुचिष्मंत । नामामृतीं प्रीत सर्वकाळ ॥३॥
नामा म्हणे ऐसे वर्ते देहभावीं । मूढजनां दावी भक्तिमार्ग ॥४॥

२९
धन्य तोचि देश जेथें संतवास । तापत्रयदोष जाती सत्य ॥१॥
धन्य मातापिता उभयकुळशुद्धता । तोचि भजे संतां निर्धारेंसी ॥२॥
तीर्थरुपी जळ विलंबे करी निर्मळ । संतदर्शनें तत्काळ शुद्ध होती ॥३॥
धातुमय मूर्ति चिरकाळें फळती । संतांचे संगतीं निजस्वार्थ ॥४॥
नामा म्हणे मुक्ति जे नर इच्छिती । संतांचे संगतीं धरती भाव ॥५॥

३०
कपटाचें कुपथ्य जालें तुझें पोटीं । स्मरावा जगजेठी कृपाळु तो ॥१॥
नाम औषध घ्यावें नाम औषध घ्यावें । संतांचे लागावें समागमीं ॥२॥
त्यापाशीं औषध आहे नानाविध । रामकृष्ण गोविंद म्हणती वाचे ॥३॥
पुत्रस्नेहें कैसा अजामेळ स्मरला । तेणें तो उद्धरला क्षणमात्रें ॥४॥
राम राम म्हणतां तारिली कुंटिणी । वैकुंठभुवनीं तये वासु ॥५॥
तेंचि हें औषध प्रल्हादें घेतलें । तें तूं घे उगलें म्हणे नामा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP