भागीरथीबाई - अभंग संग्रह ९१ ते १००

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद ९१

चाल -त्यजि भक्तासाठी लाज०

आरुढ होउनि आरुढ पद पाव ।

रिद्धिसिद्धीचे सोडुनि नांव ॥ध्रृ०॥

निश्चलपदी आरुढस्वामी गार ।

अखंड स्थितीवरती स्वार ॥

जन उद्धरावयाची धांव ।

येथे कांही न चले उपाय ॥१॥

भोळा असे जनसमुदाव ।

धरुनी नानापरींची हांव ॥

अगणित करिती भाव ।

करि भक्तीची बहु भाव ॥२॥

करि स्थूल देही अपार सेवा ।

चौभवती मंडप ऊभा ॥

चुलीभांड्यांची जिथेतिथे शोभा ।

द्रव्याचि असे बहु येवा ॥३॥

जन हो ऐसा आला मोका ।

त्यासी तुम्ही दवडूं नका ॥

चुकविण्या चौर्‍यायशींच्या खेपा ।

हिर्‍यापासून हिरा पारखून घ्यावा ॥४॥

भागिरथी जोडुनी कर ।

विनवी मातपिता बंधुजन ॥

पर परते लक्ष तुम्ही लावा ॥५॥

अभंग ९२

अहो बाई म्हणतां आम्ही ब्राह्मण कैसे ॥

वर्म कैसे ठावे करुनी घ्यावे ॥१॥

ब्राह्मणाची पत्नी आम्ही ऐसे म्हणतां ॥

शिवूं नका म्हणतां तुच्छ करिती ॥२॥

ब्राह्मणांची पत्नी आम्ही ऐसे म्हणतां ॥

कर्माचा उलगडा उकलेना की ॥३॥

कर्म कोणकोणते कैसे समजावे ॥

कैसे आचरावे कोण्या रीती ॥४॥

याचा तो विचार सद्गुरुंशी पुसूं ॥

मग क्रीया करुं स्वानुभावे ॥५॥

सद्गुरु बलभीम बोलती अभेद ॥

करीती निर्मूळ संशय तो ॥६॥

ठकू म्हणे बहिणी सद्गुरु दयाळू ॥

आहे तो कृपाळू मुमुक्षांवरी ॥७॥

अभंग ९३

सद्गुरु म्हणती ब्राह्मणपण शोधा ।

गृहाशी पाहूं या साम्यता करुनी ॥१॥

इतरांची गृहे ब्राह्मणासारीखी ।

नाही तेथे वार्ता ब्राह्मणपणाची ॥२॥

काळागोरा वर्ण ब्राह्मणां लावीतां ।

अठरा जातींतही तो दिसतसे ॥३॥

वर्णांमध्ये वर्ण न दिसे ब्राह्मणपण ।

म्हणाल गौर वर्ण जरी ब्राह्मणा ॥४॥

यहुदि मुसलमान काश्मिरी पारशी ।

युरोपिअन फार गौर दिसती ॥५॥

केस पाहूं जातां सारखे असती ।

अवयवी श्रेष्ठता वसे कोठे ॥६॥

ब्राह्मणपणाची खूण नखाबोटां आगळी ।

इंद्रिया वेगळे ब्राह्मणपण ॥७॥

ठकु म्हणे बाई ब्राह्मणाची क्रिया पाही ।

बलभिमवचनी राही विश्वासोनी ॥८॥

अभंग ९४

ईश्वरी हे सूत्र जानवे जरी असते ।

तेथोनि ब्रह्मगांठ आली असती ॥१॥

सूत -कापसाचा वळोनिया दोरा ।

त्रिसुते करुनी गांठ देती ॥२॥

गळां घालोनीया म्हणती आम्ही द्वीज ।

घेवोनी अहंकार फिरती जगी ॥३॥

गारगोटे पुजुनी म्हणती आम्ही ब्राह्मण ।

अठराही वर्ण करिती पूजा ॥४॥

तुळशीवृंदावने असती ज्यांचे द्वारी ।

त्यासीच ब्राह्मण म्हणती जन ॥५॥

चांभाराचे घरी तुळशीवृंदावने ।

तरी काय चांभार ब्राह्मण होती ॥६॥

ठकु म्हणे यासी न म्हणो ब्राह्मण ।

याचे वर्म जाण वेगळेची ॥७॥

अभंग ९५

जानव्यासह मनुष्यासी जरी म्हणतां ब्राह्मण ।

तरी परिणाम विपरीत ॥१॥

बाप मरुनी गेला जानव्यासह जाळीला ।

पुत्रासि ब्रह्महत्या लागेलची ॥२॥

येणे रीती ब्रह्महत्या लागतसे ।

न जळितां होय धर्महानि ॥३॥

धर्म आणि ब्रह्म नसती एकदेशी ।

ऐशा रीती जगी नासावया ॥४॥

ठकु म्हणे ऐशी ब्राह्मीक्रिया नोहे ।

ब्राह्मणाचे वर्म वेगळेची ॥५॥

अभंग ९६

पांच तत्त्वांपासोनि झाले चराचर ।

ब्राह्मणपण त्याहुनी वेगळेची ॥१॥

पंचतत्त्वे मिळुनी झाले तीन देह ।

ब्रह्मा , विष्णु , शिव अभिमानी ॥२॥

जागृती अवस्था ब्रह्मा अभिमानी ।

नेत्रस्थानी क्रिया करवीतसे ॥३॥

जागृती अवस्था कर्दम मिळोनी ।

कैसेनी म्हणावे तेथे ब्राह्मणपण ॥४॥

ठकू म्हणे माई ब्राह्मण्य पहावे ।

चिद चिद ग्रंथी सोडोनिया ॥५॥

अभंग ९७

सतरा तत्त्वांचा लिंग देह झाला ।

आकस हा बनला विराटाचा ॥१॥

त्याचे स्थान कंठ स्वप्न ही अवस्था ।

विष्णू अभिमानी मध्यमा वाचा ॥२॥

अंतःकरण चतुष्ट्य आणि पंचप्राण ।

जीव हा कूटस्थ नांदे तेथे ॥३॥

हिरण्यगर्भ कल्पना तैजस अभिमानी ।

विकार तेथोनि उठताती ॥४॥

ठकु म्हणे येथे ब्राह्मणपण नाही ।

ब्रह्मरुप सदा निर्विकार ॥५॥

अभंग ९८

माया व कारण मिळोनी सुषुप्ती ।

प्राज्ञ शंकर तेथे अभिमानी ॥१॥

पश्यंति हे वाचा हृदय हे स्थान ।

याहूनी ब्राह्मणपण वेगळेची ॥२॥

ऋगयुजः साम वेद येथुनी झाले ।

तीन गुणे जग झाले असे ॥३॥

रक्त , श्वेत , शाम पडदे आले तीन ।

अविद्येने जाण गोंधळ केला ॥४॥

ठकु म्हणे अक्का धोका खाऊं नका ।

यासी ब्राह्मण म्हणतां चांभार व्हाल ॥५॥

अभंग ९९

मूळ माया तूर्या मिळोनि नाभिस्थान ।

परावाचा जाण अथर्व वेद ॥१॥

तूर्येपासोनिया झाल्या सर्व विद्या ।

कलाकौशल्यता साधुसंत ॥२॥

प्रणवाचा धागा त्रिपदा गायत्री ।

प्रवृत्ती निवृत्ती अविद्या ती ॥३॥

जीव शीव कूटस्थ नांवे आली तीन ।

ब्राह्मण नाही जाण कोणी तेथे ॥४॥

ठकु म्हणे यासी न म्हणो ब्राह्मण ।

ब्राह्मणाची खूण वेगळीच ॥५॥

अभंग १००

ताई म्हणे ब्राह्मण कोणासी म्हणावे ।

चारी वर्ण देवा समजवावे ॥१॥

चारी वर्ण कोणते सांगते मी आतां ।

द्विज , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र ॥२॥

ठकू म्हणे ताई आइकावे कानी ।

ब्राह्मणाचे वर्म सांगते मी ॥३॥

ब्रह्म ते शाश्वत निर्मळ निश्चळ ।

नसे ते चंचल कदा काळी ॥४॥

ठकू म्हणे ब्रह्म नाही एक देशी ।

सर्वत्र परिपूर्ण भरले असे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP