भागीरथीबाई - अभंग संग्रह ३१ ते ४०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद ३१

चाल -श्रीमंत पतीची राणी०

सोडविला विषयाचा पेला ॥ झाले राजयोग्याची मी बाला ॥धृ०॥

गुरुराये लाभ मज दीला । तो न ये बोलतां वाचेला ॥

जन्ममरण फेरा चुकवीला ॥१॥

बहु होते भय यमाचे । येविषयी मन होते कच्चे ॥

समूळ फांसा तोडियेला ॥२॥

अमृताचे पान करवीले । अमरांहुनि अमरचि झाले ॥

पावले मी आनंदाला ॥३॥

सद्गुरु देव पाहीला । सद्भक्त एक राहीला ॥

सख्यभक्ति तोचि पावला ॥४॥

गुरुनाथ सगुण पुजियेले । नयनीच भरुनि ठेवील ॥

पाहिले प्रत्यक्ष तुर्येला ॥५॥

भागिरथी जोडुनि कर । प्रभु द्यावा इतुका वर ॥

गाईन बलभीम कीर्तीला ॥६॥

 

अभंग ३२

चाल -झाला इंद्रदोष०

सद्गुरु नायक भेटेल ते आतां ।

निमाली ती चिंता वाटाड्याची ॥१॥

उपदेश देवोनि रस्ता हा दाविला ।

आनंद जो झाला वर्णवेना ॥२॥

ब्रह्मरुप झाली चिद्स्वरुपी काया ।

राहिली ना आया उद्वेगाची ॥३॥

उपदेश बहु वाटतसे सोपा ।

निभवीतां बहू कठिण आहे ॥४॥

गर्विष्ठपण ते मिरवावेसे वाटे ।

आंगी असतां ताठा कोण पुसे ॥५॥

जगामाजी लहान होउनीया राहे ।

बाळ होतां तान्हे खेळविती ॥६॥

प्रसूतवेळ जीवा असते कठीण ।

म्हणे भागिरथी फजित होय ॥७॥

ठकू बाळ धरी बलभीमचरण ।

लोळे मांडीवरी सदोदीत ॥८॥

पद ३३

चाल -आदि नमूं प्रणवरुपासी०

भवरोग झाला झाला , सुचेना कांहि हो मजला ,

कांहि हो मजला ॥धृ०॥

मला वैद्य बहूतचि मिळती । साधने अनेक सांगती ।

कोणि म्हणति जावे तीर्थाला ॥१॥

कोणि म्हणति श्वास खेचावा । कोणि लाविति धोतिपोतीला ।

कोणि लाविति खेचरि मुद्रेला ॥२॥

कोणि भयानक दावीति । कोणि तप्त मुद्रा लावीति ।

कोणि करवीति निष्कर्माला ॥३॥

यमनेम काढा घ्या म्हणती । ऋद्धिसिद्धि लालुच दाविती ।

देती न खर्‍या धर्माला ॥४॥

बलभीम सद्गुरुरायांनी । दिले पूर्ण चंद्र उदयासी ।

निजविले आनंद शेजेला ॥५॥

भवरोग हरायाला । बंधुभगिनिनो , घ्या मात्रेला ।

ठकुचा रोग गुरुपदी गेला ॥६॥

अभंग ३४

चाल -गोपाळा रे तुझे०

येईं माझ्या देवा देईं मज ज्ञान ।

घेईं अभिमान आपुला म्हणुनी ॥१॥

ज्ञान पाहूं जातां बहुवीध असे ।

सांगा आतां कोठे चित्ता ठेवूं ॥२॥

सर्वची सांगती विद्या त्या शिकाया ।

म्हणती तेरा कोटी जप करा ॥३॥

मंत्र जपोनीया मंत्ररुपि रहावे ।

वायुतत्त्वी रहावे काय आम्ही ॥४॥

परब्रह्म आम्हां सांगती ना दाविती ।

चिणचिण करिती सदैव ते ॥५॥

पंथापंथातूनी भ्रम मात्र दिसे ।

माती होत असे नरतनूची ॥६॥

नरदेह श्रेष्ठ वानीती संतजन ।

ब्रह्मप्राप्तीलाभ करुनी घ्यावा ॥७॥

म्हणति साधु जावे सद्गुरुशी शरण ।

जाईल मरण जीवित्वाचे ॥८॥

अमर होवोनी खेळे मग खेळ ।

निश्चल ब्रह्मपदी मिळुनी राहे ॥९॥

बलभीमरायाचे धरीतां चरण ।

पाजिले अमृत भागिरथीसी ॥१०॥

पद ३५

चाल -पांडुरंग मनमोहन

चिन मात्र रुप हरी । डोळे भरुनि पाऽहिन कां ॥धृ०॥

चिदानंद रुप तुझे । पूर्ण रुप पाहिन कां ॥१॥

त्वम पद , तत पद जाणुनि । असि पदिं मी राहिन कां ॥२॥

चारि मुक्ती सांडुनिया । परा सेवुनि राहिन कां ॥३॥

ज्ञानध्यान सारुनि मग । सगुण मूर्ति पाहिन कां ॥४॥

भागिरथी नाम मिटूनी । बलभीम नामी राहिन कां ॥५॥

अभंग ३६

हाचि माझा भाव सर्व मायबाप ।

त्यांचे चरणी दास भागीरथी ॥१॥

हाचि अनूभव ठसो माझे हृदयी ।

हेचि विनवणी संतांपायी ॥२॥

अवघे हे वीश्व आनंदाचे घर ।

राहे चित्त स्थीर सदोदित ॥३॥
बलभीमराया हेचि विनवणी ।

येते लोटांगणी ठकू आतां ॥४॥

पद ३७

चाल -भाव धरा रे अपु०

भाव धरा रे ॥ अपुलासा सद्गुरु करा रे ॥धृ०॥

सद्गुरु तो असावा कैसा ॥ कामी क्रोधि नसावा सर्वथा ॥

देश स्वदेश नसावी त्या वार्ता ॥ ऐशाचि शरण रिघावे ॥१॥

सद्गुरु तो असावा कैसा ॥ श्रोती , शास्त्रज्ञ , ब्रह्मनिष्ठ ऐसा ॥

त्यासि नसावी द्वैताद्वैत वार्ता ॥ ऐशाचे चरण धरा रे ॥२॥

सद्गुरु तो अष्ट देह निरसोनी ॥ बोधप्रबोधी ज्याची निर्मळ वाणी ॥

नेउनि निजपदि करि मिळणी ॥ ऐशासी भजा रे ॥३॥

सद्गुरु म्हणे ईश्वर मी स्वतःची ॥ तुजला दाविन म्हणे " मी " ची ॥

ऐशियासी माळ घाली तूंची ॥ प्रेमे वरा रे ॥४॥

प्रेमभक्ति असावी त्यापाशी ॥ आत्मधन न मागे कोणासी ॥

धैर्याचे शीड उभारी पायाशी ॥ ऐशासि मिळा रे ॥५॥

अभंग ३८

ज्ञानी पारंगत सद्गुरु नायके ॥

केली माझी चोरी वक्तृत्वाची ॥१॥

मित्र चोरी जातां सुख फार झाले ॥

कामक्रोध शत्रू गेले सवे ॥२॥

घर माझे सर्व झाले असे रीते ॥

काय ठेवूं तेथे नकळे मज ॥३॥

गुरुराये माल आपुला भरीला ॥

आनंदाने झाले घनरुप ॥४॥

माल ठेउनिया दुकान उघडी ॥

करीतसे बोली आत्मतत्त्वाची ॥५॥
आत्मस्थिति आपुली दावीतसे माल ॥

अंडपिंड म्हणे असे माझे ॥६॥

पिंड ब्रह्मांड माझा मीच होई ॥

ऐसी स्तुती करी जगामाजी ॥७॥

थोरलाची देव सर्वांचे शिखरी ॥

स्तुतीयोग्य नाही कोणी अन्य ॥८॥

मनुष्यांसी बोल काय ते लावावे ॥

परंपरे देव बोलतसे ॥९॥

अर्जुनासी देवे गीतेमाजी कथिले ॥

सर्वगत पाहे मज आतां ॥१०॥

ऐसे विचारोनी बाळवाणी बोले ॥

बलभीमचरणी भागीरथी ॥११॥

पद ३९

चाल - आकाश पूर्ण म्यां

धन्य सद्गुरुची करणी ॥ नेउनि निजविले , निज चरणी ॥धृ०॥

एक लबाड बोल बोलती ॥ सद्गुरुशी काय पुसा म्हणती ॥

आपुले आपण पहा म्हणती ॥ त्याशी म्हणे मी " खर " व्यक्ती ॥१॥

ऐसे स्वरुप दावी कोण ॥ सद्गुरु व्यक्तीही वाचोन ॥

" व्यक्ती नको " ऐसे म्हणती ॥ त्यांचे मुखी पडो माती ॥२॥

बोल बोलती अनुमानी ॥ निश्चय नसे त्यांचे मनी ॥

घनदाट उच्चारती ॥ " दावा " म्हणतां खाली पाहती ॥३॥

सद्गुरुने दाविले ठेलंठेल ॥ त्यासी लाविती दूषण ॥

ऐसे महापातकी जाण ॥ त्यांचे न पाहावे वदन ॥४॥

ऐसा प्रभू हा रक्षित ॥ साधन बहुत त्यागा म्हणत ॥

सप्तसागर साधनांसहित ॥ पार करुनी दावी हित ॥५॥

बलभीमराये ऐसे केले ॥ भागिरथीस दाखविले ॥

आतां नको कोणाची वाणी ॥ ठकू लागे प्रभूचरणी ॥६॥

 

अभंग ४०

नाम रुप फोल झाले ॥ दया धर्म ना राहिले ॥१॥

घरे दारे सोडियेली ॥ कर्माची कटकट गेली ॥२॥

दाढी काढी शेंडी काढी ॥ पैसा गाठीचा न सोडी ॥३॥

माळा घाली मुद्रा लावी ॥ नजर स्त्रियांवरि ठेवी ॥४॥

भगवी वस्त्रे लेई आंगी ॥ अंतर्कळा न पालटी ॥५॥

आश्रमधर्म होईना तो ॥ सव्य अपसव्य करितो ॥६॥

भागीरथी म्हणे ऐकाहो ॥ ऐशा संतां आम्ही नेणो ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP