भागीरथीबाई - भूपाळ्या

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


१ .

जागा जागा हो मुमुक्षुजन ॥

साधकसिद्ध व्हा ना तुम्ही ॥धृ०॥

नरतनु ही पहांट झाली ॥

चौर्‍याशीची निशी आटली ॥१॥

सूर्योदय सद्गुरु आला ॥

स्वरुपाची प्रभा फांकली ॥२॥

स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ॥

चार प्रहर रात्र गेली ॥३॥

पश्चात्ताप घ्यावे पाणी ॥

द्वैतरुप मुख धुवावे ॥४॥

बलभिमरायाचे चरण धरावे ॥

काकड आरतीसी तयार व्हावे ॥५॥

ठकूं प्रार्थितसे जनां ॥

सद्गुरुसी शरण जा ना ॥६॥

 

२ .

उठि उठि पाटील जीवा ॥

सोडी बुद्धीचा कावा ॥धृ०॥

मन कारटे मोठे द्वाड ॥

पोरे गोळा केली फार ॥१॥

शब्द , स्पर्श , रुप , रस पोरे ॥

धूम करिती पहांटेच्या वेळे ॥२॥

काम क्रोध करितिल दावा ॥

घालिती जन्म -मरणाच्या फेर्‍या ॥३॥

आशा -तृष्णा दोघी बहिणी ॥

ह्या करितिल तुझा हेवा ॥४॥

बलभीमचरण धरी ॥

चुकवी जन्म -मरणाची वारी ॥५॥

पदे

१ .

चाल - लागली बत्ती०

खुण पटली खुण पटली । ती कैशी सांगूं बोली ॥धृ०॥

सांगू जातां विभक्त होतो । अंगे असता द्वैत भासतो ।

मूळ स्थितिला भ्रमे विसरतो । ऐसी गती जाहली ॥ ती कैशी० ॥१॥

गुरुबोधाची आठवण धरितां । त्रिपुटी परतां झालो तत्त्वता ।

’ नेतिनेति ’ विचार करितां । अंगेची बाणली ॥२॥

’ नेतिनेति ’ विचार ऐसा । लय साक्षी पाहे तत्त्वतां ।

उर्वरित मग अंगे होतां । स्फूर्ति लीन झाली ॥३॥

गुरुवाक्याला गिरविणे । गिरवित गिरवित एकरस होणे ।

तयासीच ही खूण लाधणे । गुरुकृपा फळली ॥४॥

अनुभव सांगे बलभीमदास । बोल बोलला होय उदास ।

सद्गुरुपायी करितां वास । वृत्ती समरस झाली ॥५॥

२ .

चला गडे जाऊं , आज संत -समाजी सुख घेऊं ॥धृ०॥

कोणी युवती त्या अबला । कोणी होउनि सरला विमला ॥

कोणी कुमारी रत गुरु -पद -कमला । कोणी सु -मने जाती समाजाला कौतुक ते पाहूं ॥१॥

कोणी सुमन -पुष्पे गुंफिती । कोणी देह चंदनापरि झिजविती ।

कोणी सोऽहं धूप जाळिती । कोणी आत्मनैवेद्य अर्पिती ।

ऐसी संत -अर्चना पाहूं ॥२॥

संतसमाज तीर्थराज । संगम भक्ति -ज्ञान -वैराग्य ।

तीन सरितांचा हा वोघ । ऐसा हा प्रयागराजतीर्थे न्हाऊं ॥३॥

प्रवाह तो भागिरथी आला । चिदाकाशी वाहुं लागला ।

गोविंद तटाकी रमला । विश्वनाथ मस्तकी धरिला ।

भावे दर्शन घेऊं ॥४॥

सद्गुरु बलभीमाची गरिमा । नकळे आगमा निगमा ।

अज्ञ जीवांची लघिमा । गोविंद जाणे त्याचा महिमा ॥

सुख सागरी पोहूं ॥५॥

३ .

सुदिन उदेला मला राम भेटला ॥ मला राम भेटला ॥धृ०॥

चिज्जड पडली गाठी । गुरुराज उकलूनि अटी ।

नेऊनि मज मूळ दिठी । उभा ठाकला ॥१॥

कार्तिकेचा पूर्ण चंद्र । पौर्णिमा नाम दिन ।

चिदाकाशी होऊनि उदित । भ्रम -तमास नेला ॥२॥

पहातां पाहणे नष्ट झाले । दृष्टीमध्ये मुरुनि नेले ।

मीच मी होऊनि ठेले । आनंद जाहला ॥३॥

गुरु बलभीम माय । दास गोविंद वंदुनि पाय ।

तच्चरणी देऊनी ठाव । अंतरी निवाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP