जून २८ - परमार्थ

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला , आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली . ‘ आता राजा आपली पूजा करील ’ असे त्याच्या मनात आले . हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की , ‘ आपण एकटेच यावे . ’ त्याप्रमाणे , आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे ; तसेच सदगुरुच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे . ‘ मी कोण ’ याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच . अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ . दुसर्‍याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे . पोरांबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे . आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे , हे परमार्थाचे सूत्र आहे . भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी , आणि आनंदात राहावे . अगदी नि : स्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही . एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले , तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे . त्याचप्रमाणे , आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत , त्यांचे रक्षण करावे ; ते कर्तव्य होईल . पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदु : ख भोगणे हे मात्र पाप आहे .

संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच . त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करु लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे . जो शहाणा असेल त्याने समजून , आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने , बंधने पाळावीत . स्वत : च्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी , त्यात घोताळा असू नये . मनाने आपण खंबीर झाले पाहिजे . ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो , त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात ; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे . आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो .

नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्‍याला चव कमी ; तसे , जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी . फार वाचू नका ; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा ; आणि ते कृतीत आणा . जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो , तशी ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी . परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे . समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे . भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो .

N/A

References : N/A
Last Updated : July 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP