जून ११ - परमार्थ

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल . दु : खाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे . प्रपंचात काही न्यूनता पडली की दु : ख होते . श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदु : खात तसा फरक तो कोणता ? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे , परंतु मूलबाळ नाही , म्हणून तो दु : खी असतो ; तर दुसर्‍याला संतती आहे पण पैसा नाही , म्हणून तो कष्टी होतो . तिसर्‍याला संतती , संपत्ती वगैरे सर्व आहे , परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे . एकंदरीत , सुखदु : खे कोणालाही सुटली नाहीत . जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानेसुद्धा आणल्या , तरी पण न्यूनता काही सरत नाही . दु : खावर आपण वरवर उपाय करतो , परंतु आपल्या दु : खाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत . खरोखर , सुखदु : ख हे वस्तूत नसून आपल्या मन : स्थितीवरच अवलंबून आहे . वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत , आनंदात होता ; पण जागे झाल्यावर , वस्तू गेल्याचे समजल्यावर दु : खी झाला . म्हणजे दु : खी होते ते मन . तेव्हा , औषध द्यायचे ते मनाला द्या . संतांनी मनाला शिकवण दिली . आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले , आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला . सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले .

ज्याचा सहवास झाला , त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले . विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो , म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो . ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी . आपण विषयाचे बी पेरतो , आणि विषयाची फळे दु : खदायक आहेत म्हणून मग शोक करतो , याला काय करावे ? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे , माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे . जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो , तितकी भगवंताकरिता करावी . प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे . परमार्थ हा परिस्थितीवर , श्रीमंती - गरिबीवर , रोगी - निरोगीपणावर , वगैरे कशावरही अवलंबून नाही . मनाची स्वस्थता , अंत : शुद्धता , आचरणाची पवित्रता , यांवर तो अवलंबून आहे . प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात . आपण रस्त्यातून चाललो असताना , एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय , रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात . प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही , आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदु : ख देतो . ही आसक्ती काढणे , याचेच नाव परमार्थ होय .

N/A

References : N/A
Last Updated : July 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP