नागनाथहंसाख्यान - अंजनगांवीं वास्तव्य

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

सावधानत्त्वें असावें श्रोतीं । एके दिनीं दामोदरभारती । विनवी सदगुरुहंसांप्रति । वर्तमान शिखरींचे ॥१॥

कामेश्वरभारती गुरु आमुचे । वेडियापरी भाषण पडे त्यांचें । समाधान करावें जी साचें जावोनि ते स्थानीं ॥२॥

बहु बरें म्हणोनि निघाले । अचळनाथांसी गजीं बैसविलें । तिघेहि पालखींत आरुढले । वेगीं चालिले मातापुरा ॥३॥

गुरुहंसांमागें दामोदरभारती । त्यामागें सदाशिवपंत चालती । सर्वांपुढें अचळनाथ शोभती । आले शिखरा समीप ॥४॥

कामेश्वरें महंतां आडवें पाठवून । सर्वांसि नेले सत्त्कार करुन । भोजनादि सारिती प्रतिदिन । सदा एकांत चर्चा ॥५॥

नागनाथहंसें कामेश्वरांचे । बोधें समाधान केलें त्याचें । पुन्हां द्वैत नव्हे बोलणें वेडेपणाचें । त्यागिलें सर्व ॥६॥

एके दिनीं कामेश्वरभारती । महाराजांसी बोले प्रीती । दामोदर राहिला काचा अति । तंव बोलती सदगुरु ॥७॥

त्याचेंही समाधान जालें । आपण बोलवून पाहिजे जाणिलें । दामोदरभारतीसी खुणाविलें । की बोले समाधान ॥८॥

मग त्रिवर्गांसी नमस्कारुन । बोलता जाला निज समाधान । कामेश्वरभारतीनें तें पाहून । आलिंगिलें प्रीती ॥९॥

धन्य धन्य म्हणती दामोदरा । तूं सत्शिष्य अससी खराखुरा । आपणही तरोनि मजला त्त्वरा । समाधान देवविलें ॥१०॥

ऐसें मास एक तेथें राहिले । पुढें दामोदरभारतीसहित निघाले । अरणीपर्यंत जो येऊन उतरले । नदींत तों वर्तलें अपूर्व ॥११॥

श्रीदत्तात्रय आपुलिये चित्तीं । कामेश्वरा पूर्णत्त्व दिधलें म्हणती । तरी आपण भेटून नागनाथांप्रति । प्रसाद द्यावा ॥१२॥

म्हणोनि अरणीचें सन्निधान । टेकडीतळ एक निंबवृक्ष विस्तीर्ण । तेथें बैसले फकीर होऊन । हें कळलें नागनाथा ॥१३॥

शौचासी जावें ऐसें म्हणतां । दामोदर तांब्यासी होय घेता । येरु बोलतीं जें तुझें काम नाहीं तत्त्वतां । आम्हां एकटचि जाणें ॥१४॥

तैसेंचि निघोनि टेंकडी आड । गेले दर्शनाची अति आवड । इकडे दामोदराचे चित्तीं चरफड । कीं आजीचें नवल काय होतें ॥१५॥

म्हणोनि मागें मागें लपत लपत । दुरोनि देखतसे होऊन संकोचित । इकडे फकीररुपें म्हणती श्रीदत्त । यावें यावें नागनाथा ॥१६॥

तंव नागनाथें केलें नमन । फकीरें स्कंधी हात घालून । विडा घातिला मुखीं मुखांतून । थापटिली पाठी ॥१७॥

आतां जाई करी जगदुद्वार । मग करोनि निघाले नमस्कार । भारती पाहतसे दामोदर । तंव मुखीं विडा चाविती ॥१८॥

असो तेथून निघाले पुढें । वडगांवा पातले सर्वही कोडें । तेथें नवल जालें एक उघडें । अल्पसें बोलूं ॥१९॥

तेथें एक विवरामाझारीं । तीन शतें वर्षाचा नखीपुरी । राहिला वायु काडित निर्धारी । आणि सिध्दि -सामर्थ्य असे ॥२०॥

केव्हां केव्हां बाहेरी निघोनी । बोलावी बैसोनि धेनुलागोनी । तंव त्या चाटिताती अंगासी येउनी । आणि वाघही येताती ॥२१॥

दोन्ही एकत्र करोनि खेळावें । मागुती सर्वांसी जा म्हणावें । ते गेलिया आपणही जावें । विवरामाजीं ॥२२॥

प्रतिदिनीं करित असतां ऐसा । हें ठावे जालें नागनाथहंसा । उभे राहिले तेथें सहसा । कीं भेटघ्यावी ॥२३॥

हाही अंतरीं नखीपुरीसी । समाचार कळतां बाहेर ये त्त्वरेसी । नमस्कार केला नागनाथांसी । तंव बोलती हंस ॥२४॥

अहो तुम्हीं जुनाट पुरुष । मी तों कालीचे बाळ नि :शेष । नमस्कार करणें योग्य विशेष । नव्हे तुम्हांसी ॥२५॥

नखीपुरी म्हणे तूंचि सर्वांचा । वडिल अससी कर्तृत्त्वाचा । मग उभयतां आलिंगुनी अचळनाथांचा । चरणीं असे लागत ॥२६॥

नखीपुरी बोलतसे तेव्हां । उभयतांनी माझा हेत पुरवावा । अखंड समागम मजसी द्यावा । तंव बोलती चला चिकणी ॥२७॥

मग तया घेउन चिकणीसी । येते जाले अति गजरेसी । राहती सदा गुंफेसी । चर्चा करिति ॥२८॥

परी नखीपुरनें सर्वदा जावें । विवरीं जावोनि बैसावें । केव्हां केव्हां बाहेरी असावें । केव्हां केव्हां अंतरी ॥२९॥

एके दिनीं अचळनागनाथप्रति । नागनाथ आदरें म्हणताती । हा नखीपुरी उपवांसीच असोनि प्रीती । भोकांत जाऊन बैसतो ॥३०॥

तरी तुम्ही विवरांत जाऊन । तया क्षुधितासी घाला भोजन । बळें काढा बाहेर ओढुन । येरु म्हणती अवश्य ॥३१॥

बहु प्रकारें बोध करिती । बाहेरिही घेऊन येती । परी तयाची न फिटेचि भ्रांति । दडून बैसावयाची ॥३२॥

ऐसाचि एक हनुमंतपुरी आला । या सर्वत्रांसी भेटया जाहला । तोही समाजींच राहे वहिला । योगही जाणतसे ॥३३॥

ऐसा सिध्दांचा तो समुदाय मिळाला । कीं ब्रह्मसत्र घातिलें त्या स्थळाला । तो ब्रह्मानंद न वजाय वर्णिला । मुखेकडोनी ॥३४॥

सदाशिवपंताचा पुत्र लक्षुमण । तोही उपदेश घेतसे सेवुन । तयासिहि निवेदिलें ब्रह्मज्ञान । पाहोनि अधिकारी ॥३५॥

तोहि दिननिशीं सेवा करित । एकदां यवनराजासी जावोनि भेटत । पत्र करोनि आणिलें विख्यात । तया भंडारीचे ॥३६॥

आणिकही उदंड संप्रदायी जाले । उत्साहही बहुत होऊं लागले । कितेक याचक तेथेंचि राहिले । भोजनाकरितां ॥३७॥

एके दिनीं हंसरायें पाहिली । म्हणती संपत्ति बहुत वाढली । ते ब्राह्मणाहातीं सर्व लुटविली । आपण बाहेर बैसोनी ॥३८॥

मागुती आले वाडिया आंत । स्वत : भिक्षेलागी निघत । तयाचा पाक करोनि भोजनें सारित । सहित यात्रा ॥३९॥

मागुती संपत्ति उदंड मिळतां । लुटवित असती तत्त्वतां । उत्साहही होती कीर्तीची वार्ता । दिगंतरीं फांकली ॥४०॥

धनाबाई जाली गरोदर प्रसवली असे प्रथम पुत्र । परी तो निमाला असे सत्त्वर । पुढें एक कन्या जाली ॥४१॥

तेही पावली मरणासी । पुढें तीस पुत्र जाला आनंद सर्वांसी । रामकृष्ण नाम ठेविलें तयासी । सर्व सिध्द खेळविती त्या ॥४२॥

असो एक वेश्या होती । वैराग्य जालें तिजसी अति । तिणें सर्व लुटवुनिया संपत्ति । उपदेश घेती जाली ॥४३॥

कृष्णाबाई तिचें अभिधान । तेही ज्ञानाधिकारी जाली पूर्ण । असो पुढें जालें जें वर्तमान । सावध ऐका ॥४४॥

नागपुरीं दिवाण भोसल्याचा । सुभेदार विठ्ठलपंत नामाचा । तेणें हेतु धरोनि उपदेशाचा । भेटीसी आला सत्त्वर ॥४५॥

पांच सहस्त्र सेनाहि संगें । येता जाला लागवेगें । महागांवीं उतरला अंगें । परिवारासह ॥४६॥

हें नागनाथहंसांसी कळलें । अंतरीं म्हणती उगें विघ्न आलें । सर्वांसी सांगती भोजनें सारा वहिले । तंव जालीं भोजनें ॥४७॥

विडेही पुरतें नाहीं घेतले । आणि कवणासी नाहीं पुसिलें । एकटचि महाराज निघून गेले । सर्व जाले विस्मित ॥४८॥

तंव विठ्ठलपंत सुभेदार । पातला असे अति सत्त्वर । भेटीसी आला मठीं साचार । तंव सदगुरु नाढळती ॥४९॥

सर्वांसी पुसे महाराज कोठें गेलें । तंव ते म्हणती आम्हांसी न जाय कळलें । येरीं धनाबाईसी येऊनि वंदिलें । तंव बोले जननी ॥५०॥

अरे कासया व्यर्थ कष्टसी । हंसराज गेले दूर देशीं । तंव तो वंदोनि म्हणे भेटवा मजसी । मी दासानुदास असे ॥५१॥

तंव बोलतसे धनाबाई । आवडी असे जरी तुझें ह्रदयीं । तरी अंजनगांवाप्रति जाई । भेटी होईल तुझी ॥५२॥

परी महाराज उपदेश न देती । कवणाही हातीं करविती । हस्त मात्र मस्तकीं ठेविती । होशील कृतार्थ ॥५३॥

ऐकुनि इतुकें निघाला त्त्वरित । अंजनगांवा सेनेसहित जात । अचळनाथादिही तिघे बोलत । म्हणती आपणहि जाऊं ॥५४॥

दामोदरभारती शिखरावरी । गेला होता सहपरिवारी । अचळनाथ हनुमंत नखीपुरी । हे तिघे गेले भेटीसी ॥५५॥

सवेंचि कृष्णाबाईही गेली । इकडे कथा कैसी वर्तली । नागनाथमाउली जाउनी बैसली । अंजनगांवाचें रानीं ॥५६॥

तेथें एक विवर होत । तेथें जावोनि बैसले निवांत । तंव अचळनाथादि पातले समस्त । आणि कृष्णाबाई ॥५७॥

इकडुन विठ्ठलपंत सुभेदार । येउन घाली नमस्कार । तयासी म्हणती आहे जों दूर । अरे तूं राजा मी भिकारी ॥५८॥

आमुचा उपदेश तुज न घडे । येरु विनवी पदरांत घ्या कोडें । मागुती बोलती तुज जरी आवडे । तरी उपदेश घेई कृष्णेचा ॥५९॥

तंव बोलती अचळनाथ । कीं आपण भिकारी कृष्णा काय समर्थ । तथें त्याचा पुरे कैसा मनोरथ । विश्वास होवोनी ॥६०॥

तंव नागनाथ प्रतिज्ञा करितीं । मी उपदेश करवीन कृष्णेहातीं । मग तयेसि घेवोनि विवरी जाती । तटस्थ बैसती सर्व ॥६१॥

तयेसी बोधें पूर्णत्त्व दिधलें । तीन दिवस विवरीं राहिले । नंतर बाहेर घेवोनि आले । तें देखिलें विठलपंतें ॥६२॥

एकाएकीं कृष्णमूर्ति । चतुर्भुज देखे पडिली दीप्ति । मग नमस्कारोनि उभयांप्रति । हस्त जोडोनि राहे ॥६३॥

मग कृष्णेनें सर्वां देखतां । उपदेशिलें विठ्ठलपंता । कृष्णमंत्र देवोनि तत्त्वतां । ब्रह्मात्मज्ञान बोधिलें ॥६४॥

हंसरायेंही प्रसन्न होवोनि । मस्तकीं ठेंविलासे सुपाणि । तेणें द्वैताची जाली धुळधाणी । वैराग्यही दृढ जालें ॥६५॥

मग म्हणती अगा विठ्ठलपंता । उगाचि फकीराचा जालासि उपदेश घेता । तुझी राज्यलक्ष्मी हरेल समस्ता । अल्पचि काळें ॥६६॥

ऐकतां सुभेदार करी विनंति । मज सर्वथा नको राज्यसंपत्ति । माझिये ऐश्वर्या नव्हेचि गणती । ब्रह्मादिकांसी ॥६७॥

मग यजमाना सांगोनि धाडित । सेनाही पाठविली समस्त । संपत्ति वांटिली नुरतां किंचित । कौपीनही घातिली ॥६८॥

या समाजामाजीं तो राहिला । पुढें वृत्तांत कैसा वर्तला । दुर्बळ ब्राह्मण एक असे राहिला । अंजनगांवीं ॥६९॥

पांडुरंग वर्‍या नाम तयाचें । कुटुंबी परी खावया न वचे । कन्या कुटुंब तोडिती साचें । माताही तैसीची ॥७०॥

एके दिनीं कांहीं साहित्य मिळालें । तेव्हां पांडुरंगासी मनीं वाटलें । कांहीं कुळधर्मे असती राहिले । ते करोनि घ्यावें ॥७१॥

म्हणोनि तितुकाही पाक केला । एक दोन ब्राह्मणही सांगितला । हा वृत्तांत अंतरीं कळला । महाराजांसी ॥७२॥

अचळनाथासहित सर्वा । बोलते जाले निज स्वभावा । मुमुक्षु असे या अंजनगांवा । तेथें आजी भोजना जाणें ॥७३॥

ग्रामस्थ सांगती जे पांडुरंगा घरीं । अन्नाचें दुर्भिक्ष्य असे सुदामापरी । इतुकी मंडळी तृप्ति पावे तरी । कैसी जावोनी ॥७४॥

महाराज म्हणती वांटून खाऊं । परी आजी अगत्य तेथें जाऊं । तयासाठी सोडिला चिकणी गांवु । येथें आलों आम्ही ॥७५॥

मग तैसेंचि उठोनि मंडळीसहित । पातले सदनासन्निध समस्त । प्रेमें पांडुरंगा हांका मारित । स्वमुखें हंसराज ॥७६॥

हांक ऐकतां तया क्षणीं । पांडुरंग आला धावोनि अंगणीं । साष्टांग घालोनि हात जोडोनी । राहिला उभा ॥७७॥

महाराज म्हणती अगा बाळा । आम्ही भोजना आलो कीं स्वलीळा । तरी भोजन देई गा आम्हां सकळां । येरु आनंदोनि टाळी पिटी ॥७८॥

मग पात्रें मांडिली सत्त्वर । ग्रामवासीही बोलाविले विप्र । जितुकें सिध्दान्न विभागून यथाप्रकार । भोजन सर्व सारिती ॥७९॥

पांडुरंग म्हणे जी महाराजा । मनोरथ पुरविला सर्व माझा । आतां उपदेश मज द्यावा सहजा । ऐकोनि मंत्र दिधला ॥८०॥

कांहीं शेष होतें तें घरमंडळीनें । एकेक ग्रास खाऊन तृप्त होणें । विवराकडे जाती सर्व जणे । महाराजासहित ॥८१॥

तया विवरद्वारी एकमासप्रर्यंत । राहिले असती मंडळीसहित । दामोदर भारती आणि सदाशिवपंत । तेही आले असती ॥८२॥

नित्य अयाचित येतसे । तेथेंचि पाकनिष्पत्ति होतसे । याचकही येताती अपैसे । तयासहित भोजनें सारिती ॥८३॥

सदाशिवपंत दामोदरभारती । महाराजाप्रति विनविती । जी चलावें आतां चिकणीप्रति । तंव बोलती आतां न येवो ॥८४॥

आम्ही येथेंचि राहूं आतां । तंव संकट पडलें सदाशिवपंता । मज कां अव्हेरिलें जी पतिता । तंव बोलती हंसगुरु ॥८५॥

बापा तुज नाहीं उपेक्षिलें । बहुत दिवस तेथें कंठिले । आतां येथेंचि रहावें आम्हा वाटलें । तरी तूं जाई ग्रामासी ॥८६॥

उत्साह करी गोकुळ अष्टमी । तैसीच करीत जा जन्मनवमी । उध्दवप्रतिपदा माघ वद्य नवमी । हे चालवी कुळधर्म ॥८७॥

सत्वरचि त्त्वां आतां जावें । आमुचे आज्ञेसी नुल्लंघावें । वारंवार भेटीसी येत जावें । तथास्तु म्हणोनि तो गेला ॥८८॥

पुढें अंजनगांविचा अधिकारी । महिमाजी नामें असे चौधरी । तो विनवीतसे येवोनि अंतरीं । होऊ नि मुमुक्षु ॥८९॥

म्हणे मज उपदेश देवोनी । रहावें येवोनि माझे सदनीं । तंव म्हणती उपदेश तुजलागोनी । होय कामेश्वरभारतीचा ॥९०॥

मग दामोदरभारतीसी म्हणती । तुवां नेवोनि यासी शिखरावरुती । उपदेश देववोनि सत्त्वरगति । मागुती यावें ॥९१॥

तंव तो म्हणे आपणा सोडोनि वनीं । मी न जाय आतां येथुनी । मग महिमाजीसि बोलती वाणी । कीं तुवांचि जावें शिखरा ॥९२॥

माझा निरोप कामेश्वरमहंता । सांगावा जावोनि तत्त्वतां । आज्ञा वंदोनि शिखरावरुता । जाता जाला चौधरी ॥९३॥

वंदोनि महंतांसि प्रीती । जी नागनाथहंसें पाठविलें मजप्रति । आज्ञा वंदोनि उपदेशिती । आणि सांगती तया ॥९४॥

मिया उपदेश असे दिधला । परी एक सांगत असे तुजला । हंसाची सेवा करी एकभावें वहिला । नागनाथहंसाची ॥९५॥

सेवेंत जरी अंतर पडिलें । तरी नाश पावसी आमुच्या बोलें । तथास्तु म्हणून चरण वंदिले । मग आज्ञा घेवोनि निघाला ॥९६॥

इकडे विवरद्वारीं सर्वांसह असतां । हनुमंतपुरी आला अवचिता । तोही यया भेटूनि समस्ता । राहिला समाजांत ॥९७॥

धनाबाईही चिकणीहुनी । रामकृष्णबाळासी घेउनी । येती जाली तया वनीं । भेटूनि राहती सर्व ॥९८॥

तों महिमाजीहि वेगें पातला । साष्टांग घालून वृत्तांत सांगितला । बहु विनवुन म्हणे जी आतां ग्रामीं चला । मज सेवा द्यावी दासासी ॥९९॥

तंव नागनाथ म्हणती आतां पुरें । वनींच राहणें आम्हांस बरें । तैसेंचे विनविताही दामोदरें । म्हणती परता जोग द्या ॥१००॥

हें पाहोनि अचलनाथ । बोलती काय जी हा परमार्थ । विनविती दीन होउनी अनाथ । त्यांची उपेक्षा करावी ॥१०१॥

ऐसें अचळनाथाचें वचन ऐकोनी । चला म्हणती ग्रामीं राहूं जावोनी । परी न राहे कवणाचिये सदनीं । इतुकें बोलोनि उठिले ॥१०२॥

सर्वांसहित मारुतीपासीं । येवोनि राहिले संतोष मानसीं । तेथें मठ करिता जाला वेगेसी । महिमा चौधरी ॥१०३॥

पाकशाळा धर्मशाळा । बैसावयाच्या दिव्य पडशाळा । करिता जाला भोजनशाळा । आणि शयनाचीं स्थानें ॥१०४॥

तेथें जावोनि सर्व राहती । अयाचित येतसे प्रतिदिनाप्रति । याचकांसहित भोजनादि होती । आनंदती सर्व जन ॥१०५॥

अंजनगांवीचा ठाणेदार । श्रीमंताकडोनि होता निर्धार । तयापासीं एक पेशकार । लक्षुमणपंत होते ॥१०६॥

तेणेंही उपदेश येवोनि घेतला । दिननिशीं तत्त्पर असे सेवेला । दिवाणजी सर्व म्हणती तयाला । महाराजांसहित ॥१०७॥

हे कोण म्हणाल जरी अंतरीं । तरी अमुचे परम गुरु निर्धारी । हे कथा सहाविये अष्टकामाझारीं । असे ते परिसोत श्रोते ॥१०८॥

आणीकही पुढें एक नवल जालें । तेंही श्रोतीं पाहिजे ऐकिलें । पानमलबोवाही एक आले । हिंदुस्थानांतुनी ॥१०९॥

अचळनाथ नखीपुरी । पानमलबावा हनुमंतपुरी । पांचवे महाराज निर्धारी । हे इतुकेही गुप्त जाले ॥११०॥

कोणीकडे गेले कळेना । शोक जाला सर्वही जनां । तैसीच खंती करी माता धना । ह्मणे मज त्यागोनि गेले ॥१११॥

रामकृष्णासी लोटोनि दिधलें । खोलींत जावोनि आसन घातिलें । कपाटेंही आंतून दृढ दिधलें । वायु चढविला ॥११२॥

योगसामर्थ्याचिया बळें । दुजा देह धरिला तात्काळे । जावोनि पांचा जनांचिये मेळे । सहवासें राहिली ॥११३॥

इकडें लेंकरु सान रडत असे । तणें सर्वत्रां दु :ख होतसे । मग दिवाणजीनें आपुले सहवासें । लळा देवोनि रक्षिलें ॥११४॥

परी महाराज जोंवरी नाहीं आले । तोंवरी दिवाणजीने अन्न त्यागिलें । गोमुत्रपान करुं लागले । षण्मासावरी ॥११५॥

तैसाचि दामोदरभारती त्यागोनि आहार । कष्टें जातसे शिखरावर । आणीक कोणी कोणी निराहार । कोणी सारिती भोजनें ॥११६॥

कोणी करिती अनुष्ठान कोणी करिती पुरश्चरण । कोणी मारुतीपुढें करिती भजन । कोणा उगाचि विरह ॥११७॥

असो सहामास लोटलियावरी । सहाही आले मिळोनि ऋषिशृंगगिरीं । अनसिंगनामें एक नगरीं । तेथें तीर्थावरी बैसती ॥११८॥

हें दामोदरभारतीसी कळलें । तेणें जावोनि सहांसी आणिले । अंजनगांवाप्रति पातले । आनंदले सकळिक ॥११९॥

हे पांच येवोनि बाहेर बैसतां । खोलीतून आली धनामाता । असो पुढील ऐकिजे जी वृत्तांता । चिमणें बाळ बोलेल ॥१२०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । सप्तम प्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP