नागनाथहंसाख्यान - पत्नीसह गृहत्याग

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रोते ऐका सावधान । नागनाथहंसांचें आख्यान । जें ऐकतांचि उपजे विरक्ति पूर्ण । भाविकजनांसी ॥१॥

पुत्र जाहला शुकानंदासी । वर्तमान कळलें यवनराजासी । तेणेंही नेऊन दर्शनासी । जहागिरी दिधल्या ॥२॥

आणीकही सर्वजनांचे । उपायनें येती प्रजेचें । निजगृहीं प्रतिदिनीं ब्राह्मणांचे । संतर्पणें होती ॥३॥

शुकानंदाचा धाकटा बंधु । दीनानाथ नामें परम सुबुध्द । तयासीहि आनंद जाला अगाधु । फुंदापत्नीसहित ॥४॥

पुढें पांच वर्षांचा जालियावरी । पिता अतिगजरें व्रतबंध करी । तों नोवरीहि आली परमसुंदरी । तेव्हां लग्नही केलें ॥५॥

दहा वरुषांचे वय जहालें । धनाबाईसी सहावें लागलें । तंव शुकानंदासी मरण पातलें । तेव्हां पाचारिलें बंधूसी ॥६॥

अगा बापा दीनानाथा । आम्ही चालिलो मृत्युपंथा । तूंचि संरक्षी नागनाथा । हा पुत्र तुझा असे ॥७॥

धनाबाई तुझी सून । रक्षण करी कन्येसमान । मीहि आतां पावतां मरण । सहजा सती निघेल ॥८॥

इतकें बोलुनी प्राण त्यागिला । सदनीं मोठा हाहाकार जाला । सहजाबाईनें पदर टाकिला । बोलाविली देवरपत्नी ॥९॥

माझे हे पुत्र सून नव्हेती । हे फुंदाबाई तुझेचि असती । संरक्षण करी तूं अतिप्रीती । मी सहचारी पतीची ॥१०॥

मग सुवासिनी बोलावून । यथाविधि दिधलें वायन । आणि वाटिले वस्त्राभरण । सहगमन केलें ॥११॥

दीनानाथ म्हणे निजकांतेसी । संरक्षावें या पुत्रसुनेसी । संतति नाहींच कीं आपणासी । एकुलत्यावीण ॥१२॥

तथास्तु म्हणोनि ते सुंदरी । माते ऐसीच रक्षी परोपरी । दीनानाथहि न विसंबे क्षणभरी । परी होणार चुकेना ॥१३॥

एके दिनीं दीनानाथ । दरबारा गेला मागें नागनाथ । अंतर्गृहांत पातला कौतुकार्थ । तों भोजना बैसली फुंदा॥१४॥

सन्निध कोणीच दुजें नसतां । पाणी नसे तांब्या अतौता । तंव ते म्हणे गा बापा सुता । पाणी देशी तरी बरें ॥१५॥

तथास्तु म्हणोनी पाणी दिधलें । तैसेंचि निजसदनीं गमन केलें । मन कांहीसे संकोचतें जालें । म्हणे व्यर्थ राहो नये ॥१६॥

तत्क्षणीं दासीचिये हातीं । बोलाविलें धनाबाईप्रति । तंव तियेचें वय निश्चिती । साता वरुषाचें ॥१७॥

येऊन संन्निध उभी राहे । नागनाथें धरोनि बाहे । म्हणे आम्हां जाणें असे लवलाहे । परमार्थमार्गा ॥१८॥

नलगे हे गजरथादि संपत्ति । जे का मायिकाची विषयभ्रांति । तरी जाऊं आम्ही आजचि रातीं । एकट उठोनी ॥१९॥

तुवां सासुसासरियांची सेवा । आवडी करोनि रहावें स्वभावा । कांहीं उणें न पडे सदैवा । या संपत्तीमाजीं ॥२०॥

तंव ते बोलत धनाबाई । ऐसें हें बोलत असा काई । मज आपणावांचून कवणे ठायीं । गमेल कैसें ॥२१॥

मज संपत्ति काय करणें । तरी मज स्वामि समागमें नेणें । दासीलागी सोडोनि जाणें । योग्य तुम्हां नव्हे ॥२२॥

नागनाथ म्हणे वो सुंदरीं । वनीं राहणें कठीण भारी । लिंबाचा पाला खाणें पडे जरी । तरी कैसें करिसी ॥२३॥

आणि मार्गामाजी चालतां । खडें कांटें रुपती अनंता । शीतउष्ण न सोसवे तत्त्वतां । तरी सदनीं राहतां बरें ॥२४॥

ऐसें वचन ऐकतां ते समयी । रुदन करोनि बोले धनाबाई । मी तुम्हांसवें असतां कालत्रयीं । दु :खी न होय सहसा ॥२५॥

जैसा प्रसंग असेल तैसा । भोगून राहीन स्वामि -सहवासा । परी मज उपेक्षूं नका सहसा । अनाथासी ॥२६॥

तंव नागनाथ म्हणती बहु बरें । समागमें चलावें अतित्त्वरें । दोनप्रहर निशीं जालिया नंतरे । येथें यावें कोणा न कळतां ॥२७॥

तथास्तु म्हणून धनाबाई । सासूपाशी गेली ते समयीं । तंव अस्त जालिया रात्रींच्या ठायीं । भोजनादि जाहले ॥२८॥

फुंदाबाईनें पलंगावरी । निजविली धनाबाई सुंदरी । आपण शयना गेली पतिशेजारी । सर्वांसी झोपा लागल्या ॥२९॥

तेव्हां धनाबाइ उठोनी । आली पतिचिये संनिधानी । म्हणे चालावें लोटली मध्यरजनी । तंव बोलती नागनाथ ॥३०॥

हे वस्त्रें अलंकारभूषण । त्यागून हें वस्त्र करी परिधान । अंगवस्त्र दिधलें ऐसें म्हणून । अवश्य म्हणे धनाबाई ॥३१॥

तें अंगवस्त्र नेसुनिया । वस्त्रालंकार सांडी तया ठाया । तैसेंचि नागनाथेंहि त्या समया । त्यागिलीं भूषणें ॥३२॥

कौपीन एक असे घातिली । अंगीं रक्षा दिव्य लाविली । मस्तकीं जटा दृढ बांधिली । सर्वही विसर्जिली संपत्ति ॥३३॥

एक हिरा अमोलिक होता । तितुका बांधोनि घेतला तत्त्वतां । मग कांहींच नसे तयापरता । सामुग्री किंचित ॥३४॥

धनाबाईसी नागनाथ म्हणती । पाऊल न वाजतां चलावें शीघ्रगती । ऐसें बोलोनिया निघती । वाडिया बाहेरी ॥३५॥

चौकिया पहारे जागे असतां । कवणाचे दृष्टीं न पडतां । शहराबाहेरीं गेले उभयतां । मग म्हणती बरें जालें ॥३६॥

घरघाट सुटला अवचिता । बाहेरी निघालों कवणें न पाहतां । चलावें येथून नुजाडतां । बैसूं एकांतस्थानीं ॥३७॥

तेथून एका योजनावरी । पाहिली एक पर्वतदरी । उभयतां बैसले त्या माझारी । दिवस उगवलिया ॥३८॥

चारी प्रहर तेथें बैसोनी । पुढें चालिले होतां रजनी । शक्ति ऐसें चालती चरणीं । कोस दोनचार ॥३९॥

परी रात्रीमाजीं चालावें । दिवसां लपोनिया बसावें । फळमुळें खाउनी पाणी प्यावें । ऐसें प्रतिदिनी चालती ॥४०॥

इकडे प्रात :काळ जाहलिया । दीनानाथ फुंदाबाई उठोनिया । नागनाथधनाबाईसी अवलोकाया । जाती शय्यास्थानीं ॥४१॥

तंव ते दोघेही न दिसती । वस्त्रेंभूषणें पडिलें असती । पाहोनि वक्ष :स्थळ बडविती । म्हणती कोठें गेले पुत्रसून ॥४२॥

कांतेप्रति दीनानाथ म्हणे । तूं बोलिली असशील उत्तरें कठिणे । येरु म्हणे म्यां कांहीं न बोलणें । परी पाणी मागितलें ॥४३॥

मग रागे भरोनी निज कांतेसी । तुज काय नव्हत्या दासदासी । आतां पहावें कोठें पुत्रसुनेसी । आम्हां त्यागून गेले ॥४४॥

उभयतां शोक करीत बैसले । उदंड सेवक शोधा पाठविलें । ते दशदिशा पाहोनि आले । परी बातमीहि न लागे ॥४५॥

मग दीनानाथें आपुलें । सर्वहि सैन्य तयार केलें । सुताचा शोध काढीत चालिले । आणि सेवकही धुंडिती ॥४६॥

इकडे नागनाथ धनाबाई । रात्रीं चालती उभयतां पायीं । दिवसां बैसती ठायींच्या ठायीं । कवणाचे दृष्टीं न पडतां ॥४७॥

असो कांहीं एक दिनानंतरीं । पावते जाले काशीक्षेत्रीं । वर्षश्राध्द करिती ब्राह्मणा करीं । तो हिरा विकोनी ॥४८॥

असंख्य़ ब्राह्मणसंतर्पण । असंख्यात वाटिलें धन । भागीरथीतटाकीं मिळालें सर्व जन । त्यामध्यें उभयतां बैसती ॥४९॥

तंव दीनानाथ अकस्मात । पातला सर्वसेनेसहित । पाहतांचि तया उभयतां । धांवोनि कंठी मिठी घाली ॥५०॥

अरे बापा मज कां उपेक्षिलें । माझें कोणते अपराध पाहिलें । ऐसें बोलोनि शिबिरांत नेले । वाळवंटी देवोनी ॥५१॥

उभयतांसी वस्त्र अलंकार । लेववुनी आनंदला थोर । द्रव्यही वाटितसे अपार । उत्साह करितसे ॥५२॥

मागुती म्हणे नागनाथा । मज कां उपेक्षिलें अनाथा । आतां ग्रामासी चलावें सर्वथा । मी सोडुनी न जाय ॥५३॥

नागनाथ म्हणे मज कासया नेता । मज प्रपंच करणें नाहीं तत्त्वतां । राज्यकारण ना नको वित्ता । आदिकरोनि संपत्ति ॥५४॥

दीनानाथ म्हणे तुज काय करणें । तुवां बैसावें मी चालवीन कारणें । तुझें नाक मात्र म्यां चालवणें । हा सेवकधर्म माझा ॥५५॥

ऐसें बोलोनि शिबिके आंत । बैसवूनि चालविले उभयात । नागनाथ विचार करी चित्तांत । कीं आतां कैसें करावें ॥५६॥

तीन मजली गेलियावरी । एक गोसावी भेटला निर्धारी । तया सर्व सांगितली जाली परी । म्हणे आम्हां जोग आवडे ॥५७॥

जरी आम्हां उभयतांसी । न कळतां कवणा काढोनि नेसी । तरी उदंड धन देऊं तुजसी । येरु म्हणे अवश्य ॥५८॥

तो शाबरी आणि धष्टपुष्ट । कवणासीहि न कळतां स्पष्ट । रात्रीमाजीं जाउनी नीट । तया दोघां उचलिलें ॥५९॥

खांदिया दोघे बैसवून । रात्रींतून गेला दश योजन । मग उगवलिया पाहती दिन । तंव उभयतां न दिसती ॥६०॥

हाहाकार दीनानाथ करी । कोठें नाढळती धुंडितां कांतारीं । तैसें रुदन करीत गेले निजनगरीं । कांहीं उपाय न जाला ॥६१॥

इकडे नागनाथें गोसावियासी । कंठीं देऊनि तोषविलें मानसीं । आणीक होते जे अलंकार ब्राह्मणांसी । वाटून दक्षिणें चालिले ॥६२॥

अकरावें वर्ष चिमणिया बाळा । सप्तवर्षाची धना वेल्हाळा । उभयतां चालिले असती स्वलीळा । परमार्थ पंथा ॥६३॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । द्वितीय प्रकरणीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP