माधवहंसाख्यान - इंदूरमठ

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सज्जनगडनिवासी । समर्थ जगदुद्धार करावा मानसी । धरुनि आले जनस्थानासी । उद्धव हंसासी भेटेलें ॥१॥

माधवहंसा जवळी घेऊन । पाहिलें कीं बाणलें समाधान । मग उधवहंसांसी म्हणती करूं गमन । या बाळकासी स्थापावया ॥२॥

मग समर्थ आणि उद्धवस्वामी । माधवहंसा घेऊन समागमीं । पातले तया इंदूरग्रामी । सर्व ग्रामस्थां भेटले ॥३॥

तयांप्रति समर्थ म्हणती । हा मीच पाहिला कीं दुजिये व्यक्ति । याची सेवा करुन तुम्हीं निश्चिती । असावें सुखरुप ॥४॥

उद्धवासी म्हणती सखया ऐकावें । कांहीं काल त्वा मुलापाशी रहावें । नंतर टाकळीप्रति जावें । यासि येथें ठेऊनी ॥५॥

आम्ही जातों गडाकडे । ऐसें बोलुनी निवाडे । ग्रामवासियांहि पुसोनि कोडें । गेले कृष्णातीरीं ॥६॥

मग उद्धवस्वामी माधवहंस । तया मठी करिती वास । ग्रामस्थही अनुकूल सेवेस । ऐसें वर्ष एक लोटलें ॥७॥

परी उद्धवस्वामीं माधव हातीं । अधिकारियां निरूपण करविती । साबडियांसी उपदेश देवविती । मंत्रविधिविधान ॥८॥

सर्वत्रांसी मार्ग लागावा । यास्तव पूजाविधानादि भजनभावा । स्वयें करून जनां शिकवावा । या रीती करी माधवहंस ॥९॥

जनां सीहि आनंद थोर । म्हणती अपुल्या भाग्यें आले हे ईश्वर । सर्वही दिननिशी असती तत्पर । भजन पुजनसेवेसी ॥१०॥

तेथें काहीं मुर्तीचें स्थापन । न करी उद्धवहंस आपण । येथुन अल्पकाळी भोंग होय निर्माण । तो स्थापणा करील रामाची ॥११॥

तो उपदेश घेईल माधवाचा । सर्व परामर्श करील मठाचा । सर्व थाट चालेला परमार्थाचा । महोत्साहादि ॥१२॥

ऐसें जाणून उद्धवहंस । बोलते झाले माधवहंसासा । आतां जाहले बहुत दिवस । टाकळीहून आलिया ॥१३॥

तेथें वाट पाहत असतील अवघे । तरी आम्हीं जात असों स्वभावें । तुवां येथें परमार्था वाढवावें । या सर्व जनांसहित ॥१४॥

ऐसं ऐकतां स्वामींचें उत्तर । माधवहंसा आला गहिंवर । अहा प्रारब्धा करणे संयोग वियोग । असो सद्‌गुरुकृपें न व्हावा भंग । कदाही समाधाना ॥१५॥

आत्मस्वी अखंड असतां संयोग । परी देहासी सदा संयोग वियोग । असो सद्‌गुरुकृपें न व्हावा भांग । कदाही समाधाना ॥१६॥

गुरुआज्ञा हेचि प्रमाण । गुरुसेवारूपचि देहाचें वर्तण । हें समाधान असो संशयाविण । देऊन आशीर्वचन जावें ॥१७॥

मग सद्‌गद होऊन स्वामीं बोलती । तैसीच असो तुझी अभंग स्थिति । दर्शनही होईल पुढतपुढती । आतां राहें तूं निवांत ॥१८॥

तेथील जन कांही समागमीं । घेऊन निघाले उद्धवस्वामी । पावते जाले टाकळी ग्रामी । तेथें सर्वत्रां भेटले ॥१९॥

इकडे माधवहंस सद्‌गुरु । इंदुरी राहिले शिष्य परिवारु । करिते जाले जगदुद्धारू । अधिकारा ऐसा ॥२०॥

कवणा भजन कवणा पूजन । कवणा पुरश्चरण जपध्यान । कवणा मानसपूजा शमादिसाधन । एका अभ्यास सांगती ॥२१॥

अधिकारियां श्रवणमनन । कैसें तें सांगतीं निदिध्यासन । साक्षात्कार अपरोक्षज्ञान । कैसें तें उपदेशिती ॥२२॥

ऐसें उदंड जन परमार्था लागले । कितेक ज्ञानसंपन्नही जाले । परी उपदेशमात्रें गुरुत्व पावले । रुद्रहंसस्वामी ॥२३॥

ते तरी माधवहंसस्वामीची । प्रतिव्यक्ति असे साची । तेचि कथा रुद्रहंसाची चतुर्थाष्टकीं ॥२४॥

असो भोंग आडनांवी ब्राह्मण । त्याकडे मुलुख जाला संपूर्ण । करित असे प्रजापालन । तेणें उपदेश घेतला ॥२५॥

इंदुरी मठीं तेणें राममूर्ति । स्थापिली असे स्वहस्तीं । आणि अर्पिली असे संपत्ति । राजभारा ऐसी ॥२६॥

तेथें विहीर बांधोनि बाग केला । तेणें फार शोभा आली स्थळाला । तें स्थळ पाहतां सर्वांच्या मनाला । आनंद होय ॥२७॥

असो माधवहंसांची वर्तणुक । होय ते अवघी जगदुद्धारक । सदाचार जैसा मान्य लौकिक । कर्मनिष्ठांसही ॥२८॥

कर्मियां वाटे कर्मशीळ । भजकांसी वाटे भजनशीळ । अर्चकांसि वाटे अर्चनशीळ । दयाळू अनाथां ॥२९॥

याचकांसी वाटे महादाता । लेकूरां वाटे मातापिता । मित्रांसि वाटे परममित्रता । भाविक म्हणती देव ॥३०॥

मुमुक्षु म्हणती हा मोक्षप्रद । साधक पाहती ब्रह्मानंद । मुख्य ज्ञानी तो असती अभेद । अखंडैकरस ॥३१॥

एवं परिपूर्ण ज्ञान असंग । निःसंशय सदृढ अभंग । नामरूपाचा कदा न घडे संग । वैराग्य ऐसें ॥३२॥

कदा नव्हेचि यथेष्टाचरण । आग्रहही गेला मनापासून । तेथें ओढवती सर्वही जन । भजनपूजन सांग जेथें ॥३३॥

ऐसें हें माधवस्वामीचें आख्यान । सद्गुरु हंसाचि बोलतसे आपण । नाम मात्र घातलें बाळ चिमण । करित असे म्हणुनी ॥३४॥

इति श्रीमद्धंसगुरूपद्धति । ग्रुंथरूपे ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणी ॥८॥

एकदंर ओ .स . ३१६ .

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP