अध्याय बावीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


असो ब्रह्मपत्र मागें वाचिलें ॥ तें विरिंचीनें होतें लिहिलें ॥ हनुमंतें लंकादहन केलें ॥ परी नगर झालें सुवर्णाचें ॥१॥

ते ऐकोनियां मात ॥ आश्र्चर्य करी कौसल्यासुत ॥ मग जांबुवंतासी पुसत ॥ हा वृत्तांत कैसा असे ॥२॥

तूं बहुकाळाचा पुरुष ॥ देखिलें ऐकिलें बहुवस ॥ तो ब्रह्मयाचा अंश ॥ अयोध्याधीश म्हणोनि पुसे ॥३॥

वयें गुण तपें बहुत ॥ वडील असे जांबुवंत ॥ सांगे पूर्वीचा वृत्तांत ॥ जैं लंका नगर वसत पैं ॥४॥

जें केलें गजेंद्रोद्धारण ॥ वेगें परतला रमारमण ॥ तों कर जोडूनि सुपर्ण ॥ क्षुधेनें बहु व्यापिला ॥५॥

मग बोले श्रीकरधर ॥ गजेंद्रनक्रांची कलेवरें थोर ॥ तीं भक्षून येई सत्वर ॥ ऐकोनि पक्षींद्र उडाला ॥६॥

नक्रगजेंद्रांचीं कलेवरें दोनी ॥ उरगारि घेऊन उडे गगनीं ॥ तों भृभंग पक्षी येऊनी ॥ विभाग मागे खगेंद्रा ॥७॥

गरुडें न लागतां एक क्षण भृभंगाचा घेतला प्राण ॥ जंबूवृक्षाची शाखा पाहून ॥ वैनतेय बैसला ॥८॥

तों साठिसहस्र वालखिल्यें ॥ तिहीं त्या शाखेसि टांगून घेतलें ॥ अरुणानुजें बळ तुळिलें ॥ तों शाखा विशाळ मोडली ॥९॥

शतयोजनें शाखा थोर ॥ पडतां मृत्यु पावतील विप्र ॥ शाखा हातीं मुखीं गजनक्र ॥ कश्यपसुत उडाला ॥११०॥

मग बोले विष्णुवहन ॥ म्हणे मी कोणास जाऊं शरण ॥ शाखा सोडितां ब्राह्मण ॥ साठ सहस्र मरतील ॥११॥

कश्यप बैसला अनुष्ठानीं ॥ त्यावरी पक्षें छाया धरिली गगनीं ॥ तों वरुतें पाहे विलोकुनी ॥ तंव सुत संकटीं पडियेला ॥१२॥

तेव्हां कश्यप ऋषीनें प्रार्थून ॥ खालीं उतरविले ब्राह्मण ॥ मग कश्यप म्हणे पुत्रालागून ॥ शाखा येथें न ठेवीं ॥१३॥

या शाखेकारणें पूर्ण ॥ मानव घेतील एकमेकांचा प्राण ॥ मग विहंगोत्तमें शाखा उचलून ॥ लंकागिरी वरी आला ॥१४॥

तिवडा पाय त्याचा रुतला ॥ तोच हा त्रिकूटाचल जाहला ॥ गरुडें आहार तेथें घेतला ॥ टाकूनि गेला शाखा तेथें ॥१५॥

त्यावरी मग लंका वसिन्नली ॥ ते सुवर्ण शाखा असे तळीं ॥ हनुमंतें लंका जाळिली ॥ मूस ओतली शाखेसी ॥१६॥

यालागीं सुवर्णाची लंका ॥ जाहली जाण अयोध्यानायका ॥ तों अर्कज म्हणे मुहूर्त निका ॥ ये समयीं असे पैं ॥१७॥

विजयादशमी नक्षत्र श्रवण ॥ ते दिवशीं निघाला रघुनंदन ॥ पूर्वी रघूनें हाचि मुहूर्त पाहून ॥ दिग्विजयासी गेला होता ॥१८॥

सर्व शुभ योग ते क्षणीं ॥ जयातिथि माळ घेऊनि ॥ दशकंठरिपूचे चरणीं ॥ मिठी घाली तेधवां ॥१९॥

साह्य सुग्रीव किष्किंधेश्र्वर ॥ उठले अठरा पद्में वानर ॥ बहात्तर कोटी रीस वीर ॥ त्यांचा नृपवर जांबुवंत ॥१२०॥

छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥ भुभुःकार देती एकचि वेळ ॥ दणाणिलें उर्वीमंडळ ॥ धाकें निराळ कांपतसे ॥२१॥

काद्रवेयकुळभूषण तेव्हां ॥ सरसावित खालतीं ग्रीवा ॥ यज्ञवराहें दंत बरवा ॥ दृढ धरिला उचलोनी ॥२२॥

कूर्म पृष्ठी सरसावित ॥ दिग्गज जाहले भयभीत ॥ मंगळजननी कांपत ॥ भुभुःकार कानीं ऐकतां ॥२३॥

वनचर आणि खेचर ॥ भयभीत जाहले थोर ॥ धडके वाद्यांचा गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥२४॥

रथारूढ जैसा सहस्रकर ॥ कीं सौपर्ण श्रीकरधर ॥ हनुमंतस्कंधीं रघुवीर ॥ तैसा शोभला ते काळीं ॥२५॥

नंदीवरी बैसे कर्पूरगौर ॥ कीं ऐरावतारूढ सहस्रनेत्र ॥ अंगदस्कंधावरी सौमित्र ॥ त्याचपरी शोभला ॥२६॥

किरणचक्रीं विराजे तमारी ॥ कीं कुळाचळांमाजी कनकाद्री ॥ कीं निजगणांमाजी स्मरारी ॥ तैसा वानरीं राम वेष्ठिला ॥२७॥

कीं मंथावया क्षीरसागर ॥ मिळोनि निघाले सुरासुर ॥ तैसेच गर्जत वानर ॥ दक्षिणपंथें चालिले ॥२८॥

विशाळ वृक्ष उपडिती ॥ छत्र रामावरी धरिती ॥ वृक्ष पल्लव घेऊन हातीं ॥ चवरें विराजती रामावरी ॥२९॥

दशयोजन रुंद सेना जातां ॥ मार्गीं वानर म्हणती रघुनाथा ॥ आजी रावणा घालूं पालथा ॥ जनकदुहिता भेटवूं तुम्हां ॥१३०॥

एक बोले वानर वीर ॥ मी जाऊन मारीन दशवक्र ॥ एक वेद न लागतां क्षणमात्र ॥ मोट बांधून आणीन ॥३१॥

एक म्हणे स्वामी रघुनंदना ॥ ऐसें वाटतेंं माझिया मना ॥ रावणाच्या नासिकां कर्णां ॥ छेदून येईन झडकरी ॥३२॥

एक म्हणे एकलाचि जाईन ॥ लंका पालथी घालीन ॥ एकोनि सुखावे रघुनंदन ॥ म्हणे हे सुरगण अवतरले ॥३३॥

दक्षिणपंथे भार जात ॥ मार्गी कपि उचलिती पर्वत ॥ कंदुका ऐसे झेलित ॥ धांवताती आवेशें ॥३४॥

समुद्रतीरास आले भार ॥ भुभुःकार देती वानर ॥ तेणें भयभीत नदीश्र्वर ॥ जाहला परम ते काळीं ॥३५॥

जैसा वेद बोलत गेला अद्भत ॥ स्वरूप देखोनि जाहला तटस्थ ॥ तैसे वानरवीर समस्त ॥ समुद्रतीरीं स्थिरावले ॥३६॥

कीं राजहंसांच्या येऊन हारी ॥ स्थिरावती मानससरोवरीं ॥ तैसे ते समुद्रतीरीं ॥ कपि-केसरी तटस्थ ॥३७॥

दशयोजनें अद्भुत ॥ सेना उतरली ओतप्रोत ॥ असो लंकेमाजी वृत्तांत ॥ वर्तला तोचि परिसावा ॥३८॥

कपिसहित अयोध्याविहारी ॥ पातला सागराचे पैल तीरीं ॥ ऐसी ध्वनी लंकेमाझारी ॥ राक्षसेंद्रें आकर्णिली ॥३९॥

शक्रजितादि सकळ कुमर ॥ प्रहस्तादि प्रधान थोर थोर ॥ त्यांसहित विंशतिनेत्र ॥ बैसे विचार करावया ॥१४०॥

परम सचिंत द्विपंचवदन ॥ म्हणे शत्रु दंदशूक कृशान ॥ हे सर्वथा न म्हणावे लहान ॥ न लागतां क्षण विघ्न करिती ॥४१॥

तरी सहपरिवारें येऊन ॥ परतीरीं उतरला रघुनंदन ॥ हा आकळे ऐसा मंत्र कोण ॥ विचारूनि सांगा आतां ॥४२॥

एकला येऊन वानर ॥ जाळून गेला लंकानगर ॥ शुद्धि सांगोनि रामचंद्र ॥ घेऊन आला वेगेंसी ॥४३॥

ऐसें बोलतां द्विपंचवदन ॥ सकळ कुमर आणि प्रधान ॥ जाहले परम क्रोधायमान ॥ शस्त्रें तुळोनि बोलती ॥४४॥

ते नर वानर आणि ऋक्ष ॥ सहज आले आमुचे भक्ष ॥ कृपाळु आम्हांवरी विरूपाक्ष ॥ तेणेंच धाडोनि दीधले ॥४५॥

तुम्हीं चिंता न करावी साचार ॥ तुमचे शत्रूचा करूं संहार ॥ आम्ही येऊं न लागतां क्षणमात्र ॥ म्हणोनि शस्त्रें झाडिती ॥४६॥

शक्रजित अतिकायादि कुमर ॥ देवांतक नरांतक महोदर ॥ धूमा्रक्ष वज्रदंष्ट्री असुर ॥ म्हणती नर वानर क्षणें जिंकूं ॥४७॥

दूर असतां मृगनायक ॥ मागें निंदा जल्पती जंबुक ॥ कीं मिळोनि बहुत मंडूक ॥ वासुकीसी जिंकूं म्हणती ॥४८॥

तंव ते सभेमाजी बिभीषण ॥ येता झाला सभा देखोन ॥ जैसा वायस सभेंत येऊन ॥ राजहंस बैसला ॥४९॥

जो विवेकरत्नांचा किरीट ॥ कीं सद्रुणगंगेचा लोट ॥ कीं भाववैरागरींचा सुभट ॥ दिव्य हिरा प्रकाशला ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP