अध्याय बावीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


हनुमंत विचारी मनीं ॥ म्यां खुण आणिली सीतेचा मणी ॥ यालागीं कोदंडपाणी ॥ आनंदला अत्यंत ॥५१॥

मज थोर चुकी घडली तेथें ॥ जरी सीताचि आणितों येथें ॥ तरी आनंदें श्रावणारिसुतें ॥ भरलें असतें ब्रह्मांड ॥५२॥

मग मनीं विचारी सीताशोकहरण ॥ आतां काय झालें बळ क्षीण ॥ न लोटतां यामार्ध पूर्ण ॥ घेऊन येईन पद्माक्षी ॥५३॥

मग म्हणे जी रघुनाथा ॥ क्षण एक धीर धरीं आतां ॥ घेऊन येतों जनकदुहिता ॥ सकळ राक्षसां निवटोनी ॥५४॥

हनुमंत करी उड्डाण ॥ सावध जाहला सीतारमण ॥ म्हणे हनुमंता न करीं गमन ॥ आहे कारण बहु पुढें ॥५५॥

आवेशें निघाला मारुती ॥ नाटोपेच तो कवणाप्रती ॥ मग स्वयें धांवूनि रघुपती ॥ आवरीत हनुमंता ॥५६॥

उचलोनियां रघुनाथ ॥ निजस्कंधीं वाहे हनुमंत ॥ म्हणे लंकेसी नेतों त्वरित ॥ रावणासी वधावया ॥५७॥

तों उर्मिलापति आणि अर्कसुत ॥ धांविन्नले अंगद जांबुवंत ॥ चौघे हनुमंतासी आवरित ॥ परी तो सर्वथा नाटोपे ॥५८॥

चौघांसही उचलून ॥ उडों पाहे सीताशोकहरण ॥ म्हणे इतुकेची लंकेसी जाऊन ॥ असुर मर्दून येऊं आतां ॥५९॥

वरकड न्यावे जरी वानर ॥ तरी ते कैसे तरतील सागर ॥ यालागीं निवडक थोर थोर ॥ पांचजण नेऊं हे ॥६०॥

पांचजणांसी उचलून ॥ स्कंधीं वाहे वायुनंदन ॥ कीं तो पंचश़ृंगांचा पूर्ण ॥ नगोत्तमचि शोभला ॥६१॥

कीं पंच फळें लागलीं वृक्षासी ॥ तीं जड कदा न होती तयासी ॥ कीं उदयाद्रीवरी तेजोराशी ॥ पंच सूर्य उगवले ॥६२॥

असो घेऊनि पांचजण ॥ हनुमंत करूं पाहे गमन ॥ यावरी मंगळभगिनीचा रमण ॥ हनुमंतासी विनवीतसे ॥६३॥

मारुति ऐकें प्राणसखया ॥ विचाराविणें भलती क्रिया ॥ न करावी हे कदा चर्या ॥ श्रेष्ठांची असे पूर्वीहून ॥६४॥

ऐसें विनवितां रघुनंदन ॥ मग उतरले पांचही जण ॥ जनकजापतीचे चरण ॥ सप्रेमें धरिले हनुमंतें ॥६५॥

सुग्रीव जांबुवंत नळ नीळ ॥ वर्णिती अनिळात्मजाचें बळ ॥ यावरी तो तमालनीळ ॥ सभा करूनी बैसला ॥६६॥

श्रीराम पुसे मारुतीप्रती ॥ कैसी असे लंकेसी गती ॥ राक्षस वर्तती कोणें रीतीं ॥ काय आचरती पुण्यक्रिया ॥६७॥

यावरी चार्तुयरत्नाकर ॥ बोले लोकप्राणेशकुमर ॥ जैसा शक्र आणि अंगिराकुमर ॥ करिती विचार एकांतीं ॥६८॥

तीनशें गांव लांब लंका ॥ रेखोनि दाविली रघुनायका ॥ सकळ सदनांचीं करून संख्या ॥ ठायीं ठायीं दाखविली ॥६९॥

जे कां मर्गज पाषाण ॥ त्यांचीं पांच लक्ष गृहें जाण ॥ सात लक्ष दैदीप्यमान ॥ विटबंदी मंदिरें ॥७०॥

ताम्र आणि कांसें निखिळ ॥ तयांची पांच कोटी सदनें निर्मळ ॥ सुवर्णांची अत्यंत सबळ ॥ सात कोटी राघवेंद्रा ॥७१॥

हेमरत्नीं अलंकृत ॥ नवकोटी शिवालयें तेथ ॥ रुद्राभिषेक नैवेद्य बहुत ॥ त्रिकाळ चालविती राक्षस ॥७२॥

असुरांच्या गृहीं पूर्ण ॥ अग्निहोत्र वेदाध्ययन ॥ रुद्राक्षमाळा भूषण ॥ विभूति चर्चन करिती पैं ॥७३॥

मुख्य रावणें सुबुद्धीपूर्ण ॥ टाकिलीं वेदांचीं खंडें करून ॥ तप आचरती दारुण ॥ ठायीं ठायीं राक्षस ॥७४॥

ऐसें बोलतां वायुनंदन ॥ रघुनाथ झाला उदिग्न ॥ ऐसी लंका पुण्यपरायण ॥ ते मज सर्वथा नाटोपे ॥७५॥

ऐसें जेथें सत्कर्माचरण ॥ तेथें नांदे यश कीर्ति कल्याण ॥ तरी तें होता नये लंकाभुवन ॥ बहु यत्न करितांही ॥७६॥

तेव्हां क्षण एक रघुनाथ ॥ निवांत न बोले चिंताक्रांत ॥ भोंवते वानर तटस्थ ॥ पाहूं लागले ते काळीं ॥७७॥

मग श्रीराम म्हणे मारुती ॥ तुवां सांगितली राक्षसांची स्थिती ॥ परी दया क्षमा उपरती ॥ शांति विरक्ति मुख्य जया ॥७८॥

शौच आणि धर्मदान ॥ असुर करिती कीं अनुदिन ॥ यावरी सीतासंतापहरण ॥ काय वचन बोलिला ॥७९॥

क्षमा दया शुद्ध अंतर ॥ शौच दान धर्म पवित्र ॥ हें लंकेमाजीं अणुमात्र ॥ सर्वथाही नसेचि ॥८०॥

परम अधर्मी निर्दय असुर ॥ कापट्यचर्या तपें क्रूर ॥ अत्यंत खळ दुराचार ॥ मद्यप्राशक उन्मत्त ते ॥८१॥

मारुती वचन ऐकुनी ॥ हास्यमुख होय चापपाणी ॥ तरी लंका घेईन ये क्षणीं ॥ पापखाणी वसती तेथें ॥८२॥

अंतरीं दया क्षमा नाहीं ॥ मग व्रतें तपें जाळिसी काई ॥ तो जरी पढला शास्त्रें साही ॥ व्यर्थ काय ते वटवट ॥८३॥

नटांमाजील कामिन ॥ कीं कोलाटियाचें शूरत्व पूर्ण ॥ कीं भ्रष्टाचें तत्वज्ञान ॥ कीं शांति पूर्ण सर्पाची ॥८४॥

कीं विधवेचें नवयौवन ॥ कीं ग्रामथिल्लरींचें जीवन ॥ कीं अनामिकाचें रम्य सदन ॥ कीं मुखमंडन वेश्येचें ॥८५॥

कीं गर्भांधाचे विशाळ नयन ॥ कीं बधिराचे शोभायमान कर्ण ॥ कीं अजाकंठींचें स्तन ॥ कीं आचरण जाराचें ॥८६॥

कीं सावचोराचे गोड बोल ॥ कीं मैंदाची शांति खोल ॥ वाटपाडे निर्मळ ॥ निरंजनीं बैसले ॥८७॥

कीं दाट लागलें कंटकवन ॥ कीं दंभिकांचें व्यर्थ भजन ॥ तैसें भूतदयेवांचून ॥ ज्ञान ध्यान व्यर्थची ॥८८॥

त्याचा एकांत व्यर्थ देख ॥ जैसे बिळीं बैसले मूषक ॥ शांति त्याची जैसा बक ॥ मत्स्यहरणार्थ बैसला ॥८९॥

भस्म अंगीं चर्चित साचार ॥ जैसा उकिरडां लोळे खर ॥ कीं अरण्यांत वसती निरंतर ॥ वृक व्याघ्र जैसे कां ॥९०॥

तेणें तीर्थीं केला वास ॥ तरी काय थोडे आहे वायस ॥ तीर्थजळीं मंडूक विशेष ॥ वटवटती विशेषें ॥९१॥

तेणें पाहिल्या चौसष्ट कळा ॥ परी तितुक्या जाणाव्या विकळा ॥ दया क्षमेचा नसतां जिव्हाळा ॥

कळा त्या विकळा ॥ दया क्षमेचा नसतां जिव्हाळा ॥ कळा त्या विकळा जाणिजे ॥९२॥

तेणें केलें वेदाध्ययन ॥ जैसा खरावरी वाहिला चंदन ॥ षड्रसपाकीं दर्वीं पूर्ण ॥ व्यर्थ जैसी फिरूनियां ॥९३॥

त्याचे वरिवरि कीर्तन ॥ कीं गोरियाचें गायन ॥ कीं मद्यपियाचें भाषण ॥ शब्दज्ञान तेसें त्याचें ॥९४॥

जैसें वृंदावनफळ ॥ वरिवरि दिसे निर्मळ ॥ कीं धोत्राफळ रसाळ ॥ फणसासम दिसे पैं ॥९५॥

अवघा वेळ चुना मथितां ॥ परी नवनीत नये हाता ॥ सिकताहरळ शिजवतां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥९६॥

तुंबिनीचें अत्यंत कडू फळ ॥ शर्करेंत ठेविल्या सर्वकाळ ॥ परी तें अंतरीं गोड होईल ॥ हें कल्पांतीं घडेना ॥९७॥

चुना माखोनि वायस ॥ बळेंचि जाहला राजहंस ॥ परी जाय विष्ठा शोधावयास ॥ व्यर्थ वेष कासया ॥९८॥

यालागीं ऐक हनुमंता ॥ दया क्षमा हृदयीं नसतां ॥ जप तप ध्यान तत्वतां ॥ व्यर्थ गेलें निर्धारें ॥९९॥

तरी ते लंकावासी असुर ॥ करीन अवघ्यांचा संहार ॥ ऐकतां आनंदले वानर ॥ देती भुभुःकार एकदांचि ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP