अध्याय बावीसावा - श्लोक १५१ ते २२०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


विवेकभूमीचें निधान ॥ कीं भक्तिसमुद्राचें भरतें पूर्ण ॥ कीं ते परमार्थवनींचें सुमन ॥ अम्लान सुंदर विकासलें ॥५१॥

असो ऐसा बिभीषण थोर ॥ न्यायसिंधु सत्यसमुद्र ॥ सकळ खळांसी प्रत्युत्तर ॥ देता जाहला ते वेळे ॥५२॥

म्हणे वाचाळ तुम्ही परम दुर्जन ॥ महाकपटी अंतरमलिन ॥ दशमुखाभोंवतें मिळोन ॥ नानाकुतर्क करीतसां ॥५३॥

यश धैर्य सकळ सद्रुण ॥ सभाग्याची करणी ऐकोन ॥ परम खेद मानिती दुर्जन ॥ नसतें दूषण लाविती ॥५४॥

परम कुमति जो बळहीन ॥ मागें निंदा जल्पे रात्रंदिन ॥ समरभूमीसी पळे उठोन ॥ हे तों लक्ष्मण श्र्वानाचें ॥५५॥

सकळ दळासमवेत ॥ जिंकू म्हणतां अयोध्यानाथ ॥ तरी येथें एकलाचि हनुमंत ॥ आला होता निजबळें ॥५६॥

जैसें करतळींचें आचमन ॥ कीं गोवत्सपदींचें जीवन ॥ तैसा ज्याचे दृष्टी समुद्र पूर्ण ॥ लंघोनि क्षणें आला तो ॥५७॥

तेणें विध्वंसिलें सकळ नगर ॥ रावणसभा नागविली समग्र ॥ कोट्यानकोटी निशाचर । अशोकवनीं संहारिले ॥५८॥

राजसुत मारिले समस्त ॥ विवरीं कोंडिला शक्रजित ॥ लंका जाळून अद्भुत ॥ पुरुषार्थ तेणें दाविला ॥५९॥

ते वेळे तुमचें बळ ॥ काय जाहले होतें विकळ ॥ आतां रावणाभोंवते सकळ ॥ पुरुषार्थ सांगतां ॥१६०॥

नाना पाखंडी दुर्जन यवन ॥ इहीं वेदांसी ठेविलें दूषण ॥ परी वंदिती कीं विद्वज्जन ॥ ज्ञानसंपन्न धर्मात्मे ॥६१॥

कमळासी निंदिती दर्दुर ॥ परी सहसा न विटेचि भ्रमर ॥ चंद्रासी निंदिती तस्कर ॥ परी ते चकोर आनंदती ॥६२॥

खळ ते निंदती पंडित ॥ परी कुशल वंदिती समस्त ॥ वायस मुक्तें वोसंडित ॥ परी मराळ न वीटती ॥६३॥

मूढासी न कळे कस्तुरी ॥ पंक म्हणोनि टाकिती दूरी ॥ परी श्रीमंत अहोरात्री ॥ हृदयीं शिरी धरिताती ॥६४॥

दिवाभीता नावडे अर्क ॥ परी आनंदती चक्रवाक ॥ अंधें टाकिलें रत्न ॥ सुरेख ॥ परी परिक्षक संरक्षिती ॥६५॥

तैसा जगद्वंद्य रघुवीर ॥ जयासी हृदयीं ध्याय उमावर ॥ कमलोद्भव सहस्रनेत्र ॥ सहस्रवक्र स्तवी जया ॥६६॥

सनकादिक हृदयीं ध्याती ॥ जो वेद उदयाचळींचा गभस्ती ॥ तो हा पुराणपुरुष आला व्यक्ती ॥ मूळप्रकृतीसमवेत ॥६७॥

ब्रह्मांडनगरस्तंभ अद्भुत ॥ मायाचक्रचाळक शाश्र्वत ॥ दशरथाचा पुण्यपर्वत ॥ श्रीरामरूपें प्रगटला ॥६८॥

तैसा वेदवंद्य रघुवीर ॥ त्यासी तुम्ही निंदितां पामर ॥ रावणासी झोंबला कामविखार ॥ भुलला साचार म्हणोनी ॥६९॥

कार्तवीर्याचे बंदी जाऊन ॥ पडिला होता द्विपंचवदन ॥ परम पुरुषार्थी सहस्रार्जुन ॥ भृगुनंदनें वधिलें त्यासी ॥१७०॥

जो क्षत्रियांतक प्रळयरुद्र ॥ त्यास जिंकी हा रामचंद्र ॥ मतिहीन झाला विंशतिनेत्र ॥ नोळखे स्वरूप तयाचें ॥७१॥

वनचर न होती द्रुमपाणी ॥ अवघे अवतरले सुधापानी ॥ अजून तरी हें मनीं जाणोनी ॥ जानकी द्वावी रामचंद्रा ॥७२॥

चंड कोदंड अद्भुत ॥ रावणासी नुचले जड बहुत ॥ तें दुखंड करी रघुनाथ ॥ सकळ रायांदेखतां ॥७३॥

यालागीं सागरपैलापारीं ॥ रामचंद्र जों आहे दूरी ॥ तों मंगळजननीची कुमरी ॥ राघवेंद्रा समर्पावी ॥७४॥

ऊर्मिलाजीवनाची चापरेखा ॥ नुलंघवेचि तुज दशमुखा ॥ यालागीं त्रिभुवननायका ॥ जानकी नेऊन भेटवीं ॥७५॥

जानकीस भेटवी रघुनंदन ॥ बंदींचे सोडवी सुरगण ॥ मग चंद्रार्कवरी कल्याण ॥ पुत्रपौत्रीं नांदसी ॥७६॥

माझीं वचनें वाटती कठीण ॥ परी पुढें गोड अमृताहून ॥ औषध आधीं कटुवट पूर्ण ॥ परी रोगहरण पुढें करी ॥७७॥

गोड अत्यंत नाबदी साखर ॥ मुखीं घालितां कडकड फार ॥ परी गोडी ते अपार ॥ तैसीं साचार वचनें माझीं ॥७८॥

तुरट वाटे आमलक ॥ परी पुढें गोडी दे अधिक ॥ तैसीं माझीं वचनें दुःखमोचक ॥ हृदयीं धरी दशकंधरा ॥७९॥

पिता पढवी पुत्रालागून ॥ त्यास वाटे विषासमान ॥ परी पुढें गोड सुधेहून ॥ महिमा पूर्ण वाढे जेव्हां ॥१८०॥

अशुभ चिन्हें अत्यंत ॥ लंकेमाजी होती बहुत ॥ क्षणक्षणां उल्कापात ॥ नभ थरथरतें वाटतसे ॥८१॥

जलदजाळ नसे किंचित ॥ रुधिरधारा मेघ वर्षत ॥ दुष्ट स्वप्नें अत्यंत ॥ मंदोदरीस जाणविती ॥८२॥

विगतधवा स्त्रिया येऊन ॥ ओटी भरिती मृत्तिका घेऊन ॥ मंगळसूत्र तोडून ॥ कृष्णवस्त्रपुरुष नेतसे ॥८३॥

यालागीं दशवदना तूं सज्ञान ॥ टाकिलीं वेदांचीं खंडें करून ॥ तरी जाणत जाणतां कृशान ॥ पदरीं कैसा बांधिसी ॥८४॥

समजोनिया विष दारुण ॥ कां करावें बळें प्राशन ॥ दंदशूक ओळखून ॥ मग कां उशीं करावा ॥८५॥

खदिरांगार जाणोन ॥ मग कां वरी करावें शयन ॥ उदरीं पाषाण बांधोन ॥ महाडोहीं कां निघावें ॥८६॥

ऐसें बोलतां बिभीषण ॥ तटस्थ जाहले सभाजन ॥ क्रोधें व्याप्त रावण ॥ मौन धरून उगाचि ॥८७॥

बिभीषणासी म्हणे प्रहस्त ॥ उगेच बैसा हो निश्र्चित ॥ सभेंत बोलतां अनुचित ॥ मृत्यु पावाल निर्धारें ॥८८॥

तुम्ही राजबंधु म्हणवितां जाण ॥ परी शतमूर्खाहूनि बुद्धिहीन ॥ तुम्हांस नाहीं चातुर्यज्ञान ॥ तरी उठोन गृहा जावें ॥८९॥

सक्रोधें बोलें इंद्रजित ॥ तूं अनुचित बोललासी सभेंत ॥ तुज आतांचि वधितों यथार्थ ॥ परी पितृव्य म्हणोनि शंकलों ॥१९०॥

शक्रजित म्हणे दशमुखा ॥ हा तुमचा बंधु सखा ॥ परी हा शत्रुचा पक्षपाती देखा ॥ अनर्थकारक दिसतसे ॥९१॥

बिभीषण म्हणे तूं चांडाळ ॥ महाकपटी कृतघ्न खळ ॥ तुमचे संगतीनें भूपाळ ॥ मतिमंद जाहला ॥९२॥

अंकुशें आकर्षिजे वारण ॥ भुजंग आकळिजे मंत्रेंकरून ॥ राजमती आकळिती प्रधान ॥ परम सज्ञान चतुर जे ॥९३॥

माजला अत्यंत कृशान ॥ तो विझविजे जळेंकरून ॥ कीं क्रोधोर्मी अति दारुण ॥ सद्विवेकें आकर्षिजे ॥९४॥

नृपें करितां अनुचित करणी ॥ तत्काळ आवरिजे प्रधानीं ॥ परी तुम्ही अवघे पापखाणी ॥ निर्दय आणि कृतघ्न ॥९५॥

राजा आधींच अत्यंत खळ ॥ प्रधान मिळाला अमंगळ ॥ मग अविवेक वाढे प्रबळ ॥ कुबुद्धिकल्लोळ उठती पैं ॥९६॥

शंख करावयाची हौस गहन ॥ त्यांत पातला मास फाल्गुन ॥ कीं स्त्रीराज्यांतील पारिपत्य पूर्ण ॥ जारासी प्राप्त जाहलें ॥९७॥

आधींच चाहाड तस्कर ॥ त्यावरी पाठिराखा नृपवर ॥ कीं उन्मत्तासी सरोवर ॥ प्राप्त जाहलें मद्याचें ॥९८॥

तैसा कुबुद्धीनें वेष्टिला दशवदन ॥ तैसेंच तुम्ही मिळालां प्रधान ॥ जैसे वृकाचे सदनीं श्र्वान ॥ कारभारी जाहलें ॥९९॥

अरे तुझें मरण आलें जवळी ॥ म्हणोनि आणिली जनकबाळी ॥ अयोध्याप्रभु प्रतापबळी ॥ आला निकट काळ तुझा ॥२००॥

रावणें अनुचित कर्म मांडिलें ॥ म्हणोनि मातेनें मज प्रेरिलें ॥ यालागीं तुम्हांतें बोलिले ॥ मनीं धराल म्हणोनी ॥१॥

परी होणार बळिवंत ॥ तुम्ही नायकाचि उन्मत्त ॥ सीता न द्याल तरी निश्र्चित ॥ कुळक्षय होईल तुमचा ॥२॥

ऐसें ऐकतां रावण ॥ क्रोधें व्यापिला परिपूर्ण ॥ बिभीषणावरी शस्त्र घेऊन ॥ परम आवेशें धांविन्नला ॥३॥

बिभीषण केवळ परम भक्त ॥ तयासी रक्षिता रघुनाथ ॥ तो रावणाचा उपटला हात ॥ शस्त्र पडलें धरेवरी ॥४॥

मागुता धांवे रावण ॥ इंद्रजितें धरिला आवरून ॥ मग झाडिला वाम चरण ॥ तो लागला बिभीषणासी ॥५॥

बिभीषण केवळ शांत ॥ निर्मत्सर भेदरहित ॥ रावणासी मागुती म्हणत ॥ सखा रघुनाथ करीं कां रे ॥६॥

बिभीषण क्षमाशील पूर्ण ॥ वानिती सकळ राक्षसगण ॥ तो माता कैकसी येऊन ॥ सांगें हित बिभीषणा ॥७॥

म्हणे पुत्रासी तूं ऊठ आतां ॥ शरण जाईं रघुनाथा ॥ जो वज्रपंजर शरणागता ॥ भवव्यथा वारील तो ॥८॥

माझे उदरा आलासी साचार ॥ करीं माझा उद्धार ॥ तनुमनधनेंसी सत्वर ॥ शरण जाईं रघुवीरा ॥९॥

सांडोनि सकळ मायाचिंता ॥ शरण जावें जानकीनाथा ॥ रावणें क्षय केला तत्वतां ॥ तूं जाय परता येथूनी ॥२१०॥

जे बळेंचि विष भक्षिती ॥ शहाणे न बैसती त्यांचे पंक्ती ॥ तरी तूं सखा करी रघुपती ॥ नाश कल्पांतीं नव्हे तूंतें ॥११॥

ऐकोनि मातेचें वचन ॥ बिभीषणें केलें साष्टांग नमन ॥ घेऊनि चौघेजण प्रधान ॥ उभा ठाकला ते काळीं ॥१२॥

रावणासी म्हणे बिभीषण ॥ मी श्रीरामासी जातो शरण ॥ तूं ज्येष्ठबंधु म्हणोन ॥ पुसतों तुज मागुती ॥१३॥

ऐसें बोलोनि त्वरित ॥ बिभीषण उडाला अकस्मात ॥ चौघां प्रधानांसमवेत ॥ सर्वांदेखतां ते काळीं ॥१४॥

जैसें कलेवर सांडून ॥ एकदांच निघती पंचप्राण ॥ कीं पांचही दिवाकर मिळोन ॥ अस्ताचळावरी चालिले ॥१५॥

कीं कल्पांतीं पंचमहाभूतें ॥ जाती स्वरूपास मिळावयातें ॥ तैसे शरण जनकजापतीतें ॥ पांचही जाती त्वरेंनें ॥१६॥

श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ रामेश्र्वर ॥ आवडीच्या कावडी भरोनि सत्वर ॥ सभक्त नर धांवती ॥१७॥

भाव प्रयागींचें प्रेमोदक ॥ जे या रामेश्र्वरावरी करिती अभिषेक ॥ त्यांचे मनोरथ अयोध्यानायक ॥ सत्य परिपूर्ण करील ॥१८॥

अयोध्याधीशा ब्रह्मानंदा ॥ श्रीधरवरदा वेदवंद्या ॥ छेदोनियां अविद्याभेदा ॥ अभंग पदा देशी कीं ॥१९॥

स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिक नाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२२०॥

ओंव्या ॥२२०॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP