मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १८६१ ते १८८८

सद्गुरुमहिमा - अभंग १८६१ ते १८८८

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१८६१

कोटी कंदर्पांच्या श्रेणीं । कुर्वडींतक जनार्दनीं ॥१॥

बरवा जनार्दनीं जनीं । पाहतां तनुमन भुलवणी ॥२॥

नयन लाचावले दोन्हीं । आन न दिसे त्रिभुवनीं ॥३॥

शंकरासी झाला गोड । काय इतरांचा पाड ॥४॥

रूपा भाळला कंदर्प । तेणें कृष्ण केला बाप ॥५॥

रमा रमणीये सर्वांसी । झाली चरणाची दासी ॥६॥

सनकादिक अति विरक्ति । तेहि हरिपदीं आसक्त ॥७॥

जनीं जनार्दन नेटका । एकाएकी चरणीं देखा ॥८॥

१८६२

तुम्हीं करुनियां सेवा । वाढविलें मज नांवा ॥१॥

ऐसा कृपाळू उदार । पांडुरंग तूं निर्धार ॥२॥

नानापरी उपचार । नित्य पुरवा अपार ॥३॥

उतराई नोहे देखा । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥

१८३३

पुजा उपचार । मज पुरविले अपार ॥१॥

कळूं दिली नाहीं मात । अपराधी मी पतीत ॥२॥

जडजीवां उद्धरीलं । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥३॥

१८६४

तुम्हीं कृपाळुजी देवा । केलीं सेवा आवडी ॥१॥

करुनी सडा समार्जन । पाळिलें वचन प्रमाण ॥२॥

उगाळुनि गंध पुरविलें । सोहोअळे केले दासाचे ॥३॥

ऐसा अपराधी पतीत । एका जनार्दनीं म्हणत ॥४॥

१८६५

तुम्हीं पुर्ण कृपा केली । मज दाविली निजमूर्ति ॥१॥

तेणे निवरला शीण । गेलें जन्ममरण भान ॥२॥

जें जें मधी होतें आड । त्याचें कोडें फेडिलें ॥३॥

जाचलों होतों पषऊर्मीं । पावलों दरुशनों सुख जेणें ॥४॥

एका जनार्दनीं वासना ।जाहलें समाधान मना ॥५॥

१८६६

गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभुक ॥१॥

आसनीं शयनीं भोजनीं । गुरुतें न विसंबे ध्यानीं मनीं ॥२॥

गुरुसेवेची आवडी । सेवा करी चढोवोढी ॥३॥

गुरुचरणाची गोडी । एका जनार्दनी पायीं दडीं ॥४॥

१८६७

निगुर्णाची प्राप्ति सगुणाचें योगें । वरि भक्ति अंगीं दृढ भाव ॥१॥

नलगे ध्यान प्रौढी योगयाग तपें । ज्ञानचियें बापें हातां नये ॥२॥

पाहिजे समता सर्वाभूती भाव । मुंगी आणि राव सारखेची ॥३॥

एका जनार्दनीं हेंचि हातवटीं । देवा तुझी भेटी तरीच होय ॥४॥

१८६८

मुळीच निर्विकार ब्रह्मा तें निश्चळ । त्यामाजीं चंचळ अहंस्फूर्ति ॥१॥

तेचि ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरुप । तो हरी संकल्प पुरातन ॥२॥

संकल्पी कल्पेन तेचि मूळ प्रकृती । जन्म अव्यक्त ती माया पोटीं ॥३॥

तेथोनी हिरण्यगर्भ तें जन्मलें । तया पोटा आलें विराट पैं ॥४॥

गुणभूत देह होतो माये पोटीं । तत्त्वज्ञान पाठीं विस्तारलें ॥५॥

स्थळा पासोनियां मुळाकडे जावें । सर्वसाक्षी व्हावें स्वयंब्रह्मा ॥६॥

सदगुरुचा तो पैं जालिया प्रसाद । एकाजनार्दनीं बोध ठरावे तो ॥७॥

१८६९

निराळा निराळा राहे तु सढळ । दृश्याचे पाल्हाळ मागें सारी ॥१॥

तेथे तीर्थ संन्यास घेई निश्चयाचा । मेरु होई सुखाचा सहजपणें ॥२॥

धृतीची धारणा नाद आणि मना । मेळवी गगना गुरुमुखें ॥३॥

तेथें पिंडापदा ग्रास स्वरुप चिदाकाश । एका जनार्दनीं वास एकपणें ॥४॥

१८७०

दृश्य तो जोगिळी देखणें कवळी । दृष्टी ज्याचें मेळी समरस होय ॥१॥

लक्षालक्ष भेदी निरसी उपाधी । महाशून्य पदीं पैठा होय ॥२॥

मन पवन गांठीं संगम गोल्हाटीं । तूर्या औटपिठीं स्थिर करी ॥३॥

मनाचें उन्मन जनार्दनीं खूण । यालागीं शरण एकनाथ ॥४॥

१८७१

महा तम अंक दाता जो मोक्षाचा । गुरुपदी साचा भाव असो ॥१॥

आनंदित मन चिंतनाचे ठायीं । मनी नसो काहीं विकल्प तो ॥२॥

पाप ताप दैन्य जातील सहज । गुरुचरणरज वंदिलीया ॥३॥

एका जनार्दनीं सदगुरुचरणीं । वृत्ति असो वाणी नाम वदो ॥४॥

१८७२

पृथ्वी आप तेज वायु गगन । हीं पंचभुतें भिन्नभिन्न ॥१॥

येथें न करीं ठाव । धरी गुरुचरणीं भाव ॥२॥

पंचभूतें पंचप्राण । अवघा एक परिपूर्ण ॥३॥

देहीं आसोनी विदेही । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥

१८७३

तोंडी घासु डोई टोला । ऐसा भजनार्थ जाला ॥१॥

तो सर्वस्वी नागवला । वैरी आपुला आपणचि ॥२॥

एका जनार्दनीं मात । भज भज सदगुरुनाथ ॥३॥

१८७४

एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन सदा ॥१॥

दोघांमांजी वसे परमात्मा एक । परि बुद्धिचा तो देख पालटची ॥२॥

एका जानर्दनीं गुरुसी शरण । काया वाचा मन ठेवा पायीं ॥३॥

१८७५

हाती सांपडतां वर्म । वाउगा श्रम कोन करी ॥१॥

पायाळची जवळी असतां । धन सर्वथा बहु जोडे ॥२॥

अंजन तें गुरुकृपा । पुण्य पापा कोण लेखा ॥३॥

शरण एका जानर्दनी । दुजेपणीं एकला दिसे ॥४॥

१८७६

पीक पीकलें प्रेमाचें । सांठविलें गगन टांचें ॥१॥

भूमि शोधोनी पेरिजे बीज । सदगुरुकृपें उगवलें सहज ॥२॥

कामक्रोधाच्या उपटोनी पेंडी । कल्पनेच्या काशा काढीं ॥३॥

एका जनार्दनीं निजभाव । विश्वंभारित पिकला देव ॥४॥

१८७७

सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं ॥१॥

पार नाहीं सुखा तयांचिया दैवा । वांचुनी केशवा भक्ति नाहीं ॥२॥

एका जनार्दनीं सर्वभावें शरण । तनुमनधन वोवाळावें ॥३॥

१८७८

निरालंब देशींचा गुरुराया । धरें कां रे भाव चरणकमळीं ॥१॥

धरितांचि भाव नासतसे माया । त्यांचें स्वरुप ठाया वोळखावें ॥२॥

भाव अभावा विरहित साचे । तें रुप जयाचें हृदयीं ध्यावें ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें जें रुपडें । हृदयीं चोखडें ध्याई जना ॥४॥

१८७९

गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येर्‍हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥

राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारितां खेपा खंडे कर्म ॥२॥

तुटती भावना द्वैताची ते बुद्धि । निरसे उपाधि कामक्रोध ॥३॥

एका जनार्दनीं सत्य सत्य साचा । रामनाम मंत्रांचा जप करीं ॥४॥

१८८०

मोह ममता ही समुळ नाशावी । तेव्हाचि पावावी आत्मशुद्धि ॥१॥

चित्तशुद्धि झालिया गुरुचरणसेवा । तेणें ज्ञानठेवा प्राप्त होय ॥२॥

एका जनार्दनीं प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्मा परिपुर्ण अनुभवेल ॥३॥

१८८१

वर्णावी ती थोरी एका सदगुरुची । येरा मानवाची कामा नये ॥१॥

सदगुरु समर्थ कृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ॥२॥

सदगुरुचरणीं तल्लीन हे वृत्ति । वृत्तीची निवृत्ति क्षणमात्रें ॥३॥

एका जनार्दनीं आठवीं सदगुरु । भवसिंधु पारु पावलसे ॥४॥

१८८२

बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं ॥१॥

सदगुरुचें दास्य करीं एकभावें । काया वाचा जीवें शरण रिघा ॥२॥

पंचभूतापर प्रकृतीचा वर । नामरुप विस्तार नाही जेथें ॥३॥

एका जनार्दनीं धारणा ही बळी । चतुर्थ शुण्यावरी चित्त यावें ॥४॥

१८८३

परब्रह्मा प्राप्तीलागीं । कर्मे आचरावी वेगीं ॥१॥

चित्त शुद्ध तेणें होय । भेटी सदगुर्चे पाय ॥२॥

कर्म नित्य नैमित्तिक । प्रायश्चित जाण एक ॥३॥

उपासन ते चवथें । आचरावें शुद्ध चित्तें ॥४॥

तेणें होय चित्त स्थिर । ज्ञानालागीं अधिकार ॥५॥

होय भेटी सदगुरुची । ज्ञानप्राप्ति तैंचि साची ॥६॥

प्राप्त झाल्या ब्रह्माज्ञान । आपण जग ब्रह्मा परिपूर्ण ॥७॥

एका जनार्दनीं भेटला । ब्रह्मास्वरुप स्वयें झाला ॥८॥

१८८४

बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥

सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रें होतां कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥

कां रे होता उगेच उदास । आशा मोह तोडा पाश । कां रे कासावीस । होतां वाउगे परदेशी ॥३॥

धरा धरा मंत्र मुखीं । जेणें शिवादिक जाहलें सुखीं । तुमचें तुम्हां न कळे शेखीं । वाउगें कां शिणतां ॥४॥

अरे नको वेरझारा । चुकवा जन्ममरणा सारा । एका जानर्दनीं म्हणे । धरा विश्वास संतवचनीं ॥५॥

१८८५

ऐसें जे धाले पुर्ण निमाले । ते नाहीं आले परतोनियां ॥१॥

घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतापायीं ॥२॥

सांडोनियां काम स्मरे रामनाम । अंतरीं तें प्रेम धरुनियां ॥३॥

एका जानर्दनीं रंगलें नामीं । तया वंदुं आम्हीं सर्वभावें ॥४॥

१८८६

चंचळत्व मनाचें मोडे । दृष्टीचें स्थिरत्व जोडे । सहज समाधि घडे । हरिकॄपेनें पाहे पां ॥१॥

पवफ़्न पवनाची आटणी । आसनीं दृढ दृष्टी ठेउनी । गोल्हाट भेदोनी । त्रिकुटाचल मस्तकीं ॥२॥

निरालंबीं विश्रांति । पूर्ण एकाजर्नादन स्थिति । अखंड भोगिताति । जनार्दन कृपें ॥३॥

१८८७

गोडी वेगळा ऊंस वाढे । हें तो न जोडे कल्पांतीं ॥१॥

जों जों वाढे तों तों गोड । ऐशी चाड भावाची ॥२॥

जों जों धरिशील भाव । तों तों देव दिसे पुढें ॥३॥

ही तों प्रचीति घ्या अंगीं । नाचा रंगीं संतांच्या ॥४॥

रुपावेगळी ती छाया । एका जानर्दनीं लागे पायीं ॥५॥

१८८८

श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या ॥१॥

परब्रह्मा राम वसिष्ठा शरण । कृष्णें संदीपन गुरु केला ॥२॥

वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी । वंद्य त्रिभूवनीं झाला वाल्हा ॥३॥

एका जनार्दनीं गुरु मज भेटला । मोकळा दाविला मार्ग तेंणें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP