मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ७४१ ते ७५०

रामनाममहिमा - अभंग ७४१ ते ७५०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


७४१

तरले तरती हा निर्धार । नामाचि सार घेतां वाचे ॥१॥

तें हें श्रीरामानाम वाचा । शंकराचा विश्राम ॥२॥

उणें पुरें नको कांहीं । वाया प्रवाहींपडुं नको ॥३॥

एका जनार्दनीं नाम । पूर्ण चैतन्य निष्काम ॥४॥

७४२

श्रीरामनाम पावन क्षितीं । नामें दोषां होय शांती ।

नामेंचि उद्धरती । महा पातकी चांडाळ ॥१॥

नाम पावन पावन । शंभु राजा जपे जाण ।

इतरां ती खूण । न कळेचि कल्पातीं ॥२॥

नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । त्यांची कीर्ति जो घोकी ।

जाय सत्यलोकीं । नाम घेतां प्राणी तो ॥३॥

एका जनार्दनीं नाम । पाववितें निजधाम ।

स्त्रियादि अंत्यजां सम । सारिखेंचि सर्वांसी ॥४॥

७४३

गणिका नेली मोक्षपदां । रामनाम वदे एकदां ॥१॥

धन्य नामाचा महिमा । वदतां शेषा उपरमा ॥२॥

ध्यानी ध्यातो शूळपाणी । रामनाम निशिदिनीं ॥३॥

रामनाम दोन अक्षर । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥

७४४

आन नाहीं दुजा हेत । सदा रामनाम जपत ॥१॥

धन्य धन्य तें शरीर । पावन देह चराचर ॥२॥

अनुग्रहासाठी । हरिहर लाळ घोटी ॥३॥

एका जनार्दनीं देव । तेथें तिष्ठे स्वयमेव ॥४॥

७४५

अहर्निशी म्हणतां । तेथें न बाधे काळ सत्ता ॥१॥

वरीष्ठा वरिष्ठ नाम । तिहीं लोकीं तें उत्तम ॥२॥

असो भलते याती । परी मुखीं नाम जपती ॥३॥

वंद्य होती हरिहरां । देवा इंद्रादिकां थोरां ॥४॥

ऐशीं नामीं जयां आवडी । एका जनार्दनीं गोडीं ॥५॥

७४६

राम नाम वदे वाचे । धन्य मुख तयाचें लोटांगणीं साचे । हरिहर पैं येती ॥१॥

नाम चांगलें चांगलें । जड जीव उद्धरले । वैकुंठवासी केलें । कुडे कपाटियासी ॥२॥

अजमेळादि पातकी । नामें तारिलें महादोषी । यवनादि सुखी नामें केलें ॥३॥

हास्य विनोदें नाम । घेतं पावे सर्वोत्तम । मा दृढ धरलीया प्रेम । देवचि होय ॥४॥

एका जनार्दनीं अनुभव । कालीमाजीं तारक सर्व । नामवांचुनीं अन्यभाव । नाहीं नाहीं ॥५॥

७४७

जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हर हरि जपे त्याचे हृदयीं मुद्रा ॥१॥

सोपा जप अखंड वाचेसी वदतां । कामक्रोध लोभ पळे अहं ममता ॥२॥

कासया जप तप अनुष्ठान वाउगा श्रम । नका गुंतू संसारा वाचे म्हणा रामनाम ॥३॥

वाउगी उपाधी सांडोनी भजा श्रीरामा । एका जनार्दनीं वाचे वदा अत्मारामा ॥४॥

७४८

अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥

रामनाम वदता वाचे । ब्रह्मासुख तेथें नाचें ॥२॥

राम नाम वाचे टाळी । महादोषां होय होळीं ॥३॥

दो अक्षरासाठीं । ब्रह्मा लागे पाठोपाठीं ॥४॥

एका जनार्दनीं नाम । सहज चैतन्य निष्काम ॥५॥

७४९

वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगीं त्याचा ॥१॥

आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचें चरण चुरी ॥२॥

शिव विष्णु ब्रह्मा इंद्रादिक देव । करिती गौरव त्याचा बहु ॥३॥

जनार्दनाचा एका सांगतसे उपाव । धरा नामीं भाव दृढ जनीं ॥४॥

७५०

घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥

अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥

हरिहर कावड घेतां खांदीं । तुटे जन्ममरण व्याधी ॥३॥

घेऊनि कावडी नाचे एका । एका जनार्दनीं आवडी देखा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP