कार्तिक पौर्णिमा

Kartika Purnima


* आवळी-पूजन

कार्तिक पौर्णिमेस आवळी वृक्षाची पूजा करतात. मृदुमान्य दैत्याने देवांना स्वर्गातून स्थानभ्रष्ट केले. तेव्हा देवांनी पृथ्वीवर येऊन आवळीच्या झाडाचा आश्रय घेतला. त्या दिवसापासून या वृक्षाला या दिवशी पूज्यत प्राप्त झाली. म्हणून कार्तिक पौर्णिमेस या वृक्षाची पूजा विहित आहे. पूजेच्या वेळी आवळीला सूत गुंडाळतात. श्रीफलयुक्त अर्घ्य देतात. तिच्या चारी दिशांना बलिदान करतात. अष्ट दिशांना तुपाचे दिवे लावतात. पुढील मंत्राने प्रार्थना करतात

धात्रिदेवि नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरि ।

निरोगं कुरु मां नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा ॥

नंतर पितरांचे तर्पण, घृतपात्रदान व दंपतीभोजन करून व्रत समाप्त करतात.

 

 

* कार्तिकी व्रत

तामिळ लोकांचे एक व्रत. कार्तिकी पौर्णिमेस पंचमहाभूतांप्रीत्यर्थ हे व्रत करतात. यात अग्नीला प्राधान्य असते. यामुळेच सूर्यास्तानंतर घरीदारी दिवे लावून सर्वत्र प्रकाश करणे हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे.

दक्षिण अर्काट जिल्ह्यातील तिरुवन्नमलाईच्या शिव-मंदिरात हा व्रतोत्सव थाटाने साजरा करतात. या वेळी त्या सर्व डोंगरावर रोषणाई होते व शिखरावर एक मोठी मशाल पेटविली जाते. या उत्सवात पालापाचोळा एकत्र करून जाळण्याची प्रथा आहे.

निचेंगोडू, पळणि व वेदारण्यम् व तिरुचेंदूर येथेही हा उत्सव करतात. याच्या कथेचे पर्याय पुढीलप्रमाणे

(१) सर्वांगाच दाह होत होता म्हणुन बलिराजाने हे व्रत केले.

(२) महिषासुराशी लढताना शिवलिंग भग्न झाले, म्हणून त्या पापाच्या क्षालनासाठी पार्वतीने हे व्रत केले.

 

 

* त्रिपुरीज्वलन व्रत

कार्तिक पौर्णिमेस या व्रताचे नाव आहे. या पौर्णिमेस आरंभ करून पुढील वर्षाच्या कार्तिकी पौर्णिमेस व्रताचे उद्यापन करतात. या व्रताचा मुख्य देव शिव आहे. दरमहा पौर्णिमेला शिवापुढे निरनिराळ्या प्रकारच्या ७५० वाती लावणे, निरनिराळी दीपपात्रे दान करणे, नैवेद्यासाठी निरनिराळे अन्नपदार्थ करणे, शिवाच्या निरनिराळ्या नावांचा आदेश करून ते पदार्थ शिवाला अर्पण करणे, असा या व्रताचा विधी आहे. दुसर्‍या दिवशी दांपत्याला भोजन घालून वस्त्रालंकारांनी त्याची संभावना करायची असते. उद्यापनाच्या दिवशी संकल्पपूर्वक ब्रह्मादी देवतांची स्थापना, कलशावर पूर्णपात्रात शिवाची सुवर्ण प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. नंतर पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी देवाची आरती करतात. रात्री जागरण करून दुसर्‍या दिवशी समिधा, तीळ पायस व तूप या हविर्द्रव्यांनी हवन करतात. शेवटी गोदान, पीठदान करून बारा दापंत्यांना यथाशक्‍ती वस्त्रालंकार व सौभाग्य वायने देतात.

 

* त्रिपुरी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमेस हे नाव आहे. या दिवशी रात्री घरात, देवळात आणि घराबाहेरही दिवे लावतात. दीपदान द्यावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे, असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थांनात दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे म्हणतात. दीपोत्सवाचा मंत्र असा -

कीटा: पतंगा: मशकाश्‍च वृक्षा

जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।

दृष्ट्वा प्रदीपं न च जन्मभागिनो

भवन्ति नित्यं श्‍वपचा हि विप्रा: ॥

 

* स्कंदजयंती

कार्तिकी पौर्णिमे दिवशी स्कंदजयंती मानतात व त्या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असताना स्कंदाचे दर्शन घेणारा धनवान व वेदपारंगत होतो. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजा करून एका उंच स्तंभावर अग्नी प्रज्वलित करतात.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP