कार्तिक शु. द्वादशी

Kartika shudha Dvadashi


* तुलसीविवाह

पद्मपुराणमतानुसार तुलसीविवाह कार्तिक शु. नवमीस दिलेला आहे. 'निर्णय सिंधू' वगैरेंचे मताने महाराष्ट्रात व कर्नाटकात द्वादशी ही तुलसीविवाहाची तिथी आहे.

पद्मपुराणानुसार कार्तिक शु. नवमीला तुलसीविवाहाचा उल्लेख आढळतो; पण इतर ग्रंथांच्या मते प्रबोधिनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस अधिक फलदायी होतो. विवाहाच्या पूर्वदिवशी तुलसीवृंदावन सारवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात व तुलसीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवतात. काही लोक सकाळी, काही सायंकाळी तुलसीविवाह लावतात.

व्रत करताना विवाहापूर्वी तीन महिने आधीपासून तुळशीला पाणी घालून टवटवीत ठेवावे. प्रबोधिनी किंवा भीष्मपंचक किंवा ज्योति:शास्त्रोक्‍त मुहूर्तावर तोरण बांधून, मंडप बनवून, सोबत आणखी चार ब्राह्मण घेऊन गणपति-मातृकापूजन, नांदी श्राद्ध व पुण्याहवाचन करून टवटवीत अशा तुळशीबरोबरच सोन्याची लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व चांदीची तुळस चांगल्या आसनावर प्रतिष्ठित करावी (पूर्वाभिमुख) व यजमानांनी सपत्‍निक उत्तराभिमुख बसून 'तुलसीविवाह विधी' नुसार 'वर 'पूजन (भगवान विष्णुचे पूजन), तसेच कन्या. 'तुळस' हिचे कन्यादान इ. विधी करावेत. कुशकण्डीहवन व सप्तपदी करून वस्त्रालंकार दान द्यावेत. यथाशक्‍ती ब्राह्मण-भोजन घालून मग स्वत: जेवावे. तुळसीविवाहसमाप्तीनंतर चातुर्मासात जी व्रते घेतली असतील त्या सर्वांची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणास दान देऊन मग स्वत: सेवन करतात.

* नीरांजन द्वादशी

कार्तिक शु. द्वादशीच्या दिवशी रात्रौ विष्णू चार महिन्यांच्या झोपेतून जागा होतो. म्हणून या दिवशी व्रताला आरंभ करतात. हे व्रत पाच दिवस करावयाचे असते. या कालात विष्णु, शिव, सूर्य, गौरी इ. देवतांना आणि त्याचप्रमाणे आईबाप, गाई-घोडे हत्ती यांना नीरांजनाने ओवाळावे. हे व्रत म्हणजे एकप्रकारची शांतीच आहे. अजापाल नामक राजाने हे व्रत केले होते, अशी कथा आहे. प्रत्येक वर्षी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.

फल - रोगनिवारण आणि समृद्धी.

 

* योगेश्‍वर द्वादशीव्रत

हे तिथिव्रत आहे. कार्तिक शु. एकादशीला या व्रताचा आरंभ करून द्वादशीला संकल्पपूर्वक स्नान करून विषणुपूजा करतात. उद्यापनाच्या वेळी वैदिक ब्राह्मणाला सम संख्येने द्रव्यदान करावे. वेदवेत्त्याला दुप्पट आणि पंचरात्र यज्ञ करणार्‍या आचार्याला सहस्रपट धान्य द्यावे, असे सांगितले आहे

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP