कार्तिक शु. द्वितीया

Kartika shudha Dvitiya


* कांतिव्रत

हे एक काम्य व्रत आहे. कार्तिक शु. द्वितीयेस प्रारंभ. व्रतावधी एक वर्ष. बलराम, केशव, व चंद्रकोर यांची पूजा करतात. कार्तिकापासून आठ महिने तिलहोम व आषाढापासून चार महिने घृतहोम. वर्षाच्या शेवटी चंद्राच्या प्रतिमेचे (रौप्यप्रतिमा ) दान.

वैशाख महिन्यात प्रारंभ. त्या महिन्यात व्रतकर्त्याने मीठ वर्ज्य करायचे असते. व्रतावधी एक वर्ष.

फल - एक कल्पपर्यंत विष्णुपदाजवळ वास, तसेच कांती आणि कीर्ती यांचा लाभ.

 

* गोवर्धनपूजा

कार्तिक शु. द्वितीया. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी घराच्या दाराजवळच्या भागात शेणाने गोवर्धनपर्वताचा आकार तयार करावा. शास्त्रानुसार शिखरयुक्त, झाडे-झुडपांनी व्यापलेला व फुलाफळांनी दाटालेला असे याचे वर्णन आहे; पण काही ठिकाणी त्याऎवजी तो मनुष्याकार करून फुलांनी सजवितात. या वृक्षाची गंध-फुलांनी पूजा करून.

'गोवर्धन घराघर गोकुलत्राणकारक

विष्णुबाहुकृतोच्छाय गवांकोटि प्रदोभव ।'

नंतर भूषणीय गाई-बैलांना आवाहन करून यथाविधी पूजा करावी. त्या दिवशी गाईचे सर्व दूध वासरांना पाजावे.

'लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता ।

घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ।'

अशी प्रार्थना करून रात्री गाईंकडून गोवर्धनाचे उपमर्दन करावे.

 

* यमद्वितीया किंवा भाऊबीज

कार्तिक शु. द्वितीयेस हे नाव आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला. या तिथीस यमाची पूजा करतात, म्हणून या तिथीचा 'यमद्वितीया' असा उल्लेख करतात. तसेच याच दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जेवण करतो, म्हणून त्यास भाऊबीज असे म्हणतात. हे एक व्रत आहे.

ही तिथी हेमाद्रीच्या मते मध्याह्‌ नव्यापिनी पूर्वविद्धा भाऊबीज श्रेष्ठ. स्मार्तमतानुसार दिवसाच्या पाचव्या प्रहरात भाऊबीज श्रेष्ठ. तर स्कंदच्या मते अपराह नव्यापिनी श्रेष्ठ. पण स्कंदाचे मत सयुक्तिक वाटते.

या दिवशी यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांचे पूजन करतात. या दिवशी बहिणीच्या घरी जाऊन बहिणीकडून भावाने पूजा स्वीकारावी. यावेळी बहिणीने भावास उत्तम आसन देऊन त्याचे हातपाय धुवावे व गंधाक्षतांनी त्याची पूजा करावी. नंतर भावाने बहिणीस यथाशक्ती वस्त्रेभूषणे, द्रव्य वगैरे देऊन तिचा बहुमान करावा, व बहिणीने भावास यथाशक्‍ति त्यास आवडणार्‍या पदार्थांचे भोजन घालावे.

'भ्राअस्तवानुजाताहं भुङ्‌क्ष्व भक्‍तमिमं शुभम् ।

प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत: ॥'

अशा मंत्राने भावाची स्तुती करावी. ज्यांना सख्खी बहीण नसेल त्यांनी चुलत बहिणीला, मामे बहिणीला अगर मित्र-भगिनीला सख्खी बहीण मानून भावाने तिच्या घरी जेवण करावे. या दिवशी यमुनेकाठी बहिणीच्या हातचे जेवण केल्यास भावाच्या आयुष्यात वाढ व बहिणीच्या नवर्‍याचे रक्षण होते.

 

* या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानतात. हा स्नानोत्सव सर्वात मोठा आहे. या दिवशी यमुनेबरोबर यमाची पूजा करतात.

 

* वहीपूजन :

या दिवशी व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या वह्या, शाईची दौत, लेखनसाहित्य यांची पूजा करतात, काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात. हेच ते विक्रमसंवत्सर होय.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP