कार्तिक शु. एकादशी

Kartika shudha Ekadashi


* कार्तिकी व्रत किंवा कृत्तिका व्रत

कार्तिक शु. एकादशीपासून अथवा पौर्णिमेपासून हे व्रत करतात. कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, नैमिष, मूलस्थान किंवा दुसर्‍या कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी स्नान करणे. कृत्तिकांच्या सोने, चांदी, रत्‍ने, लोणी व पीठ यांच्या सहा मूर्ती करून त्यांना सुशोभित करून ब्राह्मणांना दान देणे असा याचा विधी आहे.

कार्तिक शु. एकादशीस पंढरीची वारी करतात. पाहा - आषाढ शु. एकादशी.

 

* प्रबोधिनी एकादशी

कार्तिक शु. एकादशी 'प्रबोधिनी' किंवा 'देवोत्थानी' या नावांनी ओळखली जाते. या दिवशी स्नान, दान व उपवास यथापूर्वविधीने करावे. वैशिष्ट्ये असे की, एका वेदीवर सोळा पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर सागरोपम, जलपूर्ण, रत्‍नप्रयुक्‍त, मलयगिरीने चर्चित, कण्ड प्रदेशात नाळेने आबद्ध केलेले व पांढर्‍याशुभ्र वस्त्राने आच्छादित असे चार कलश ठेवावेत. या सर्वांमध्ये शंखचक्रगदाधारी, पीतांबरधारी शेषशायी भगवान विष्णुची मुर्ती स्थापन करावी.

'ॐ सहस्रशीर्षा...'

या ऋचांनी अंगन्यास करून यथाविधी अगस्त्याच्या फुलांनी विष्णुपूजा करावी. रात्री जागरण करून पहाटॆ वेदज्ञ पाच ब्राह्मणांना बोलावून चौघांना चार कलश व उरलेल्या पाचव्याला सोन्याची (शक्य असल्यास) भगवान विष्णूची मूर्ती द्यावी. त्यांना फराळ देऊन मग आपण फराळ करावा. या सर्वांचे फळ गंगादी तीर्थात स्नान केल्याप्रमाणे, सुवर्णादी वस्तू दान केल्याप्रमाणे व सर्व देवांच्या पूजेनुसार मिळते.

फल - विष्णुलोकप्राप्ती.

आषाढ शु. एकादशील क्षीरसागरात झोपी गेलेला विष्णु कार्तिकात शु. एकादशीस जागा होतो म्हणून या एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' म्हणतात.

 

 

* प्रबोधैकादशी उत्सव किंवा कृत्य

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 'चातुर्मास' भरच्या कालात ब्रह्मा, इन्द्र, रुद्र, अग्नी, वरुण, कुबेर, सूर्य, चंद्र इ. नी वंदित असे जगत्पालक योगेश्‍वर भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करीत असतात. भक्‍तलोक त्यांच्या शयन परिवर्तन व प्रबोधा (जागृति) साठी लक्षपूर्वक विविध घर्मकृत्ये करीत असतात. त्यांपैकीच हे प्रबोध व्रत होय. खरे पाहता, परमेश्‍वर एक क्षणही झोप घेत नाही; तरी

'यथा देहे तथा देवे'

मानणारे लोक शास्त्रानुसार धर्मकृत्ये करतातच. कार्तिक शु. एकादशी रोजी हे व्रत केले जाते. झोपलेल्या भगवान विष्णूल दीर्घ निद्रेतून जागे करण्यासाठी (१) वेगवेगळ्या सुभाषितांचे व स्तोत्रांचे वाचन, पुराणे भगवत्कथाश्रवण व विविध भजनांचे गायन, (२) शंख, घंटा, मृदंग, नगारा, तंबोरा इ. वाद्ये वाजविणे, (३) विविध देवोपम खेळ, लीला, नाच इ. विधी केले जातात. तसेच,

'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते ।

त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेत् इदम् ।'

'उत्थिते चेष्टते सर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठ माधव ।

गता मेघा वियच्चैव निर्मलं निर्मला दिशा: ।'

'शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव ।'

इ. मंत्र म्हणून विष्णुचे सिंहासन (किंवा मंदिर) विविध पानाफुलांनी, हारतोरणादिकांनी सजवून, 'विष्णुपूजा, पंचदेवपूजा-विधान' किंवा 'रामार्चनचंद्रिका' इ. नुसार योग्य पद्धतींनी पूजा करावी. नंतर

'यज्ञेन यज्ञमयजन्त देवा: तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।

तेहनाकं महिमान: सचन्तयत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ।

अशी पुष्पांजली वाहून

'इयं तु द्वादशी देव प्रबोऽधाय विनिर्मिता ।

त्वयैव सर्वलोकानां हितार्थ शेषशायिना ॥'

'इदं व्रतं मया देव कृतं प्रीत्यै तव प्रभो ।

न्यूनं संपूर्णतां यातु त्वप्रसादाज्जनार्दन ॥'

अशीप्रार्थना करून प्रल्हाद नारद, पुंडलीक, व्यास, अंबरीप, शुक, भीष्म, शौनक इ. भक्‍तांचे स्मरण करून तीर्थप्रसाद वाटावा. नंतर रथ ओढल्यास प्रत्येक पावलाला यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. ज्यावेळी बळीराजास पाताळात दडपून तीन पावले भूमिदान घेऊन वामन परत गेला, तेव्हा जाताना दैत्यराज बळीने वामनास रथात बसविले व स्वत: रथ ओढला. म्हणून ही क्रिया केल्याने भगवान विष्णू योगनिद्रेचा त्याग करून जागृत होतात. व विविध कार्यास प्रवृत्त होतात. आपले जगाच्या पालन-पोषणाचे काम व रक्षणाचे कार्य चालू करतात. प्रबोधिनीच्या पारण्याच्या वेळी रेवतीनक्षत्राचा तृतीय चरण असेल तर त्यात भोजन करू नये.

पुराणपरत्वे या उत्सवाच्या दिवशी विधिविधानांत फरक आहे.तथापि कार्तिक शु. एकादशी अथवा द्वादशीस त्याला जागे करणे, असे मानतात. या उत्सवाला जोडूनच काही ठिकाणी 'तुळसीविवाह' करतात.

 

* बकपंचक

हे एक व्रत आहे. कार्तिक शु. एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात श्रीविष्णू निद्रेतून जागा होतो. या पाच दिवसांना बकपंचक म्हणतात. या पाच दिवसांत बगळासुद्धा मासा खात नाही. म्हणून माणसाने या पाच दिवसांत मांसाहार वर्ज्य करावा.

 

* भीष्मपंचक

प्रबोधिनी म्हणजे कार्तिक शु. एकदशीपासून चालू झालेले हे व्रत पौर्णिमेस संपते. यासाठी कामक्रोधादीचा त्याग करून दया, क्षमा, उदारता इ. चा अवलंब करावा. सोने अगर चांदी यांची लक्ष्मीनारायणाची मूर्ती करून वेदीवर बसवावी. उपलब्ध गंध, फूल, धूप व दीप यांनी तिची पूजा करून नैवेद्य दाखवावा, पाच दिवसपर्यंत निराहार, फलाहार, एकभुक्त, मिताहार किंवा नक्‍तव्रत इ. पैकी जमेल तसे व्रत करावे. रोज पद्मपुराणातीला कथांचे श्रवण करावे. नियमित पूजेशिवाय पहिल्या दिवशी विष्णुच्या ह्रदयाची कमळांनी, दुसर्‍या दिवशी कटिप्रदेशाची बेलाने, तिसर्‍या दिवशी गुडघ्यांची केवड्याने, चौथ्या दिवशी पावलांची चमेलीच्या फुलांनी व पाचव्या दिवशी सर्व शरीराची तुलसीमंजिर्‍यांनी पूजा करावी. रोज

'ॐ नमो वासुदेवाय'

चा शंभर, हजार, दहा हजार अगर जमेल तितका जप करावा. व्रताच्या शेवटी ब्राह्मणदंपतीला भोजन घालून मग स्वत: जेवावे आपल्याकडे पुष्कळ स्त्रिया एकादशी, द्वादशी निराहार; त्रयोदशी शाकाहार; व चतुर्दशी, पौर्णिमा पुन्हा निराहार राहून मग प्रतिपदेस सकाळी ब्राह्मण दंपतीस भोजन घालून मग स्वत: जेवतात.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP