TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सोळा सोमवार व्रत कथा

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक महादेवाचं देऊळ होत. एके दिवशी काय झालं? शिवपार्वती फिरतां फिरतां त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली, "डाव कोणी जिंकला?" म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला "तूं कोडी होशील" म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊं लागल्या. पुढं एके दिवशीं काय झालं ? देऊळीं स्वर्गींच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुशिलं. गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, "भिऊं नको. घाबरू नको. तूं सोळा सोमवारांचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल." गुरव म्हणाला, "तें व्रत कसं करावं?" अप्सरांनी सांगितलं, "सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यांत तूप गूळ घालावा व तें खावं. मीठ त्या दिवशी खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारी पांच शेर कणीक घ्यावी, त्यांत तूप गूळ घालून चूर्मा करावा. तो देवळीं न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारें पूजा करावी. नंतर चूर्म्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देउळीं ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं." असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरवानं ते व्रत केलं, गुरव चांगला झाला.
पुढं काही दिवसांनी शंकरपार्वती पुन्हां त्या देउळीं आलीं. पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरवाला विचारलं, "तुझं कोड कशानं गेलं?" गुरवानं सांगितलं, "मी सोळा सोमवारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं." पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हें व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक-स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, "आई आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो, आणि मला पुन्हां तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?" पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढें कार्तिकस्वामीनं तें व्रत केलं.
त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यांत भेट झाली. पुढें कार्तिकस्वामीनं हें व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनांत धरला. मनोभावे सोळा सोमवारांचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरतां फिरतां एका नगरांत आला. तिथं काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यांत हत्तिण घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यांत घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं, व नवरानवरींची बोळवण केली.
पुढं काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशीं दोघं नवराबायको एका दिवशी खोलींत बसली आहेत, तसं बायकोनं नवर्‍याला विचारलं, "कोणत्या पुण्यानं मी आपणांस प्राप्त झालें?" त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचीति पाहण्याकरितां पुत्रप्राप्तीचा हेतु मनात धरला व तें व्रत ती करूं लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की, "मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालों?" तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनांत धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला? फिरतां फिरतां तो एका नगरांत गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हां कोणीतरी एकादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी, व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायासं त्या पुत्राची गांठ पडली. राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्हं त्याच्या दृष्टीस पडलीं. राजानं त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं.
इतकं होतं आहे तों त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळी गेला. घरीं बायकोला निरोप पाठविला की, पांच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनांत आणला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकांत पांचशें रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाहीं, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांतदिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील. दारिद्यानं पिडशील. असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशीं ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, "राज्य हें तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टान्त, अमान्य करणं हेंही अयोग्य आहे. " मग उभयतांनी विचार केला. तिला नगरांतून हाकलून लावलं.
पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊं लागली. जातां जातां एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊंपिऊं घातलं. पुढं काय झालं ? एके दिवशीं म्हातारीन तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारांत ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेलीं. तिनं घरीं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरांतून हांकलून लावलं. तिथून निघाली तों एका तेल्याच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यांजवर तिची नजर गेली. तसं त्यांतलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जातां जातां एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टि त्याजवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जातां जातां एक सुंदर तळं लागलं. त्याजवर तिची दृष्टि गेली, तसे पाण्यांत किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तान्हेली राहिली. पुढं काय झालं? एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टि जाऊं लागली. ज्यांत तिची दृष्टि जाई त्यांत किडे पडावे, कांही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतदृष्टि लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. तें नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टि चांगली होणार नाहीं असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला सोळा सोमवारांचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारांचं व्रत करविलं, तसा परमेश्वराचा कोप नाहींसा झाला.
तिच्या नवर्‍याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोहिंकडे शोधाला पाठवले. शोधतां शोधतां तिथ आले. गोसाव्याच्या मठींत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनीं सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्ण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं, ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा, व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद." राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरीं आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करूं लागलीं.
तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं देवाब्राह्मणांचे द्वारीं, गाईंचे गोठीं, पिंपळाचे पारीं, सुफळ संपूर्ण.
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-02-12T21:13:35.3730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

pyramidal

  • Zool. पिरॅमिडी 
  • पिरॅमिडी 
  • पिरॅमिडी 
RANDOM WORD

Did you know?

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site