सोळा सोमवार व्रत

[ सोळा सोमवार व्रत करणाराने पुढील प्रमाणें वागावें ]
*
"सोळा सोमवार" हे श्रीशंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे.
*
हे श्रीशंकराचे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दु:ख-दारिद्र्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीहि सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करावयाचे असते. नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी, किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे.
*
हे व्रत केल्याने, दरिद्री धनवान होतो. रोगी रोगमुक्‍त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते. दु:खी माणसाला सुख प्राप्त होते. मनींची चिंता नाहीशी होते. दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते. पुत्र-कन्यांचा लाभ होतो. कुमारिकांना मनपसंत पती मिळतो. व्यापार्‍याला व्यापारांत फायदा होतो. नोकरीत प्रमोशन मिळते, श्रद्धापूर्वक हे व्रत करणाराची मनींची इच्छा परीपूर्ण होते. व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी, मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे.
*
व्रताला सुरवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी. १६ सोमवार व्रत करून येणार्‍या १७व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. किंवा कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे.
*
व्रत करणाराने सकाळी स्नान करून सोवळें किंवा धूत वस्त्र नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी. साष्टांग नमस्कार घालावा. नित्याप्रमाणे आपल्या नोकरी-धंद्यावर जावे. आपल्या उद्योगाला लागावे. दिवसभर उपास करावा. मनांत शंकराचे स्मरण करावे. [ उपास न झेपणारांनी जरूर तर "गहू, गूळ व तूप" मिळुन तयार केलेले पदार्थ उदा० शिरा, खीर वगैरे पदार्थ खावे. ]
*
संध्याकाळी आंघोळ करावी. मनोभावे शंकराची [ मूर्ती अगर चित्र, तसबिरीची ] पंचमोपचार पूजा करावी. पूजेत बेलाची पाने अवश्य असावी. देवासमोर बसून "सोळा सोमवार कथा." ( कहाणी ) वाचावी. किंवा "सोळा सोमवार माहात्म्य " ही पोथी वाचावी. "शिवस्तुती" म्हणून नंतर आरती करावी. जमलेल्या व घरांतल्या मंडळीस कणिकेच्या चूर्म्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वत: घ्यावा. [चूर्मा-गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकर्‍या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे. ] त्या हातानेकुसकरून चाळणीने चाळाव्या. यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे. याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाराने अर्धाशेर कणिकेचा चूर्मा घेऊन उपास सोडावा. चूर्मा करतांना कणिकेत मीठ घालू नये. तसेच उपासास खावयाच्या पदार्थांतही मीठ असतां कामानये या दिवशी मीठ वर्ज्य आहे.
*
ओळीने १६ सोमवार व्रत करून येणार्‍या १७ व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाचे दिवशी प्रसादासाठी पांच शेर कणिकेचा (गव्हाचे पिठाचा ) चूर्मा तयार करावा. पूजेचे साहित्य तयार करावे. स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा. या पूजा साहित्यांत "सोळा" वस्तू असाव्या. (अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ, बेलाची पाने नैवेद्य. ) शंकराचे देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. १०८ किंवा १ हजार ८ बिल्वपत्रे वहावी. नैवेद्य दाखवुन आरती करावी. मनांतल्यामनांत आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी. साष्टांग नमस्कार घालावा. चूर्म्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग घरी आणून कुटंबातल्या सर्व मंडळींनी व स्वत: प्रसाद घ्यावा.
*
शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून श्रीशंकराची षोडशोपचार पूजा करावी. देवळात करावयाच्या म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी कराव्या. ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वत:च कराव्या.
*
उद्यापनाच्या दिवशी देवळांत पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील १६ सोमवारांप्रमाणे "सोळा सोमवार कथा" व "सोळा सोमवार माहात्म्य" वाचावे. "शिवस्तुती" म्हणून आरती करावी. चूर्म्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, आपणा घ्यावा. कुटुंबातल्या सर्वांनी, व्रत करणारासह पंचपक्वान्नाचे भोजन करावे.
*
मनोभावें हे व्रत करणाराची इच्छा श्रीशंकर पूर्ण करतात.

N/A

N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP