मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक २६ वा

एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीउद्धव उवाच ।

साधुस्तवोत्तमश्लोक मतः कीदृग्विधः प्रभो ।

भक्तिस्त्वय्युपयुज्येत कीदृशी सद्‌भिरादृता ॥२६॥

ज्ञाते वक्ते आहेत बहुत । परी ते रजतमगुणयुक्त ।

गुणानुसारें निरूपीत । त्यांसी पुसों चित्त मानीना ॥९५॥

अथवा सात्त्विक केवळ । तो सत्त्वगुणें विव्हळ ।

बोलणें बोलतां जाये बरळ । नव्हे केवळ निजबोधू ॥९६॥

तैसा तूं नव्हेसी कृष्णनाथा । तुजआधीन गुण तत्त्वतां ।

लीलाविग्रहें देहधरिता । निजज्ञानवक्ता तूंचि एक ॥९७॥

यालागीं जी उत्तमश्लोक । तुज म्हणती तीन्ही लोक ।

तुजवेगळा आणिक । आम्हांसी देख मानेना ॥९८॥

माझिया प्रश्नाचा वक्ता । तूंचि एक कृष्णनाथा ।

तरी साधु कोण तत्त्वतां । तुज सर्वथा मानला ॥९९॥

तुज मानले जे साधुजन । त्यांचें संपूर्ण सांग लक्षण ।

तुज पढियंती भक्ति कोण । तेंही लक्षण सांगावें ॥८००॥

भक्तीमाजीं भक्ति सधर । जे कां माझी प्राप्तिकर ।

अतिउत्तम परात्पर । संतीं निरंतर आदरिली ॥१॥

संतीं आदरिलें जे भक्तीसी । संतासी पुसो जाये म्हणसी ।

मज विश्वास तुझिया वचनासी । पुसों आणिकांसी मानेना ॥२॥

जे ज्या देवतांतरा भजती । ते ती उत्तम भक्ति म्हणती ।

तुज मानिली जे श्रीपती । ते मजप्रती सांगावी ॥३॥

समान कुळशीळसंवादु । तैसियासीच म्हणती साधु ।

तूं निजमुखें जो म्हणसी शुद्धु । ती मज वंद्यु सर्वथा ॥४॥

तीं संबोधनीं सारंगधरू । उद्धव प्रार्थूनि करी सादरू ।

तीं विशेषणीं निजविचारू । श्रवणाधिकारू सांगतु ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP