मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक १८ वा

एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शब्दब्रह्मणि निष्णातो न निष्णायात्परे यदि ।

श्रमस्तस्य श्रमफलो ह्यधेनुमिव रक्षतः ॥१८॥

शब्दब्रह्म वेदशास्त्रार्थ । पढोनि वाचोनि अति पंडित ।

चारी वेद मूर्तिमंत । सदा तिष्ठत वाचेसी ॥१३॥

संहिता पद क्रम स्वरयुक्त । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्त ।

जटा माला ध्वज रथ । पढों जाणत वर्णक ॥१४॥

आयुर्वेद धनुर्वेद । गांधर्ववेदींचा जाणे भेद ।

काव्यनाटकीं अतिशुद्ध । वेद उपवेद तो जाणे ॥१५॥

व्याकरणीं अतिनेटक । सांख्य पातंजळ जाणे तर्क ।

शास्त्र जाणे वैशेषिक । कर्ममीमांसक यज्ञांत ॥१६॥

विवर्ण वाचस्पति वेदांत । शास्त्र जाणे वार्तिकांत ।

तिन्ही प्रस्थानें मूर्तिंमंत । पुढां तिष्ठत योग्यत्वें ॥१७॥

शिल्पशास्त्रीं अतिनिपुण । सुपशास्त्रामाजीं प्रवीण ।

रत्‍नपरीक्षालक्षण । जाणे आपण वाजिवाह ॥१८॥

आगमीं नेटका मंत्रमांत्री । शैवी वैष्णवी दीक्षेची परी ।

सौर शाक्त अभिचारी । नाना मंत्रीं प्रवीण ॥१९॥

कोकशास्त्रींची अधिष्ठात्री । अतिप्रवीण संगीतशास्त्रीं ।

प्रबंध करूं जाणे कुसरी । राजमंत्रीं राजसु ॥५२०॥

निघंटु वसे प्रज्ञेपुढां । चमत्कारु जाणे गारुडा ।

पंचाक्षरी अतिगाढा । वैद्य धडफुडा रसज्ञ ॥२१॥

रसौषधी साधावी तेणें । भूत भविष्य ज्योतिष जाणे ।

अमरकोश अभिधानें । अठरा पुराणें मुखोद्‍गत ॥२२॥

प्रश्नावली पाहों जाणे । स्वप्नाध्यावो सांगावा तेणें ।

इतिहासादि प्रकरणें । जाणे लक्षणें गर्भाचीं ॥२३॥

शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । जाणे साधकबाधक युक्ती ।

समयींची समयीं स्फुरे स्फूर्ती । अपर बृहस्पति बोलावया ॥२४॥

जेवीं तळहातींचा आंवळा । तेवीं ब्रह्मज्ञान बोले प्रांजळा ।

परी अपरोक्षसाक्षात्कारीं आंधळा । नेणे जिव्हाळा तेथींचा ॥२५॥

मोराअंगीं अतिडोळसें । अंगभरी भरलीं पिसें ।

एके दृष्टीवीण आंधळे जैसें । जाहलें तैसें विद्वांसा ॥२६॥

जेथूनि क्षीर स्त्रवती सड । तेथेंही लागोनि गोचिड ।

अशुद्ध सेविताती मूढ । तेवीं विद्वांस दृढ विषयांसी ॥२७॥

गोचिडाचे मुखीं क्षीर रिघे । तो अशुद्धावांचोनि तें नेघे ।

तेवीं ज्ञान विकूनि अंगें । विद्वांसू मागे विषयांतें ॥२८॥

सांडूनि सुगंधचंदनासी । आवडीं दुर्गंधा धांवे माशी ।

तेवीं सांडूनि निजात्मज्ञानासी । पंडित विषयांसी झोंबत ॥ २९ ॥

असोनि कमळआमोदापासी । दर्दुर सेविती कर्दमासी ।

तेवीं सांडूनि निजात्मज्ञानासी । पंडित विषयांसी लोलुप्त ॥ ५३०॥

करूनि अद्वैतव्युत्पत्ती । तें ज्ञान विकूं देशांतरा जाती ।

मूर्ख ज्ञात्यातें उपहासिती । तर्‍ही वांछिती सन्मानू ॥३१॥

सांगतां ब्रह्मनिरूपण । सात्त्विकाचें परमार्थीं मन ।

व्याख्याता तो वांछी धन । विपरीत ज्ञान विद्वांसा ॥३२॥

सांगे आन करी आन । तेथें कैंचें ब्रह्मज्ञान ।

जेथ वसे धनमान । तेथ आत्मज्ञान असेना ॥३३॥

दृढ धनमान करोनि पोटीं । सांगतां ब्रह्मज्ञानगोठी ।

त्यास आत्मसाक्षात्कारभेटी । नव्हे कल्पकोटी गेलिया ॥३४॥

नाना पदव्युत्तिविंदान । एके श्लोकीं दशधा व्याख्यान ।

पोटीं असतां मानाभिमान । ब्रह्मज्ञान त्या कैंचें ॥३५॥

मी पंडितू अतिज्ञाता । ऐसिया नागवले अहंता ।

जेवीं आंधळें नोळखे पिता । नित्य असतां एकत्र ॥३६॥

तैशी गति विद्वांसासी । नित्य असती आत्मसमरसीं ।

तेंचि वाखाणिती अहर्निशीं । परी त्या स्वरूपासी नेणती ॥३७॥

करावया विषयभरण । केलें शास्त्रव्युपत्तिव्याख्यान ।

ते वृथा कष्ट गेले जाण । जेवीं वंध्याधेनु पोशिली ॥३८॥

जे कधीं वोळे ना फळे । सुटली तरी सैरां पळे ।

नित्य वोढाळी राजमळे । तें दुःख आदळे स्वामीसी ॥३९॥

तैशी गति पंडितंमन्यासी । व्युत्पत्तीं पोशिलें वाचेंसी ।

ते वोढाळ झाली विषयांसी । ज्याची त्यासी नावरे ॥५४०॥

जेवीं का निर्दैवाहातीं । कनक पडलें तें होय माती ।

तेवीं पंडितंमान्याची व्युत्पत्ती । विषयासक्तीं नाशिली ॥४१॥

द्विजा दीधला भद्रजाती । त्यासी न पोसवे तो निश्चितीं ।

मग फुकासाठीं विकिती । तेवीं व्युपत्ती विद्वांसा ॥४२॥

अद्वैतशास्त्राची व्युत्पत्ती । हे त्यासी झाली असभ्यप्राप्ती ।

जे विषयालागीं विकिती । ते मूर्ख निश्चितीं विद्वांस ॥४३॥

मुखीं ऊस घालिजे घाणा । तो रस पिळूनि भरे भाणा ।

फिका चोपटीं करकरी घाणा । ते गति जाणा विद्वांसा ॥४४॥

विद्वांस करिता ज्ञानकथन । सारांश सात्त्विकीं नेला जाण ।

शब्दसोपटी करकरी वदन । गोडपण तेथें कैंचें ॥४५॥

जेवीं का नपुंसकाच्या करीं । वोपिली पद्मिणी सुंदरी ।

ते अखंड रडे जयापरी । तेवीं विद्वांसाघरीं व्युत्पत्ती ॥४६॥

पाहे पां ब्रह्मज्ञानेंवीण । शब्दज्ञानें संन्यासग्रहण ।

केलें तेंही वृथा जाण । जरी धारणा ध्यान करीना ॥४७॥

जैसी जैसी शब्दज्ञानव्युत्पत्ती । तैसी तैसी न करितां स्थिती ।

वर्तणें जैं विषयासक्ती । तैं निजमुखीं माती घातली ॥४८॥

वेदशास्त्रसंपन्न जाला । त्यावरी पोट भरूं लागला ।

तरी तो उदमी थोर जाला । परी थित्या मुकला मुदलासी ॥४९॥

रत्‍न देऊनि कवडा घेतला । कां अमृत देऊनि कांजी प्याला ।

तैसा परिपाकु पंडितांचा जाला । थित्या नागवला निजज्ञाना ॥५५०॥

शब्दज्ञान जोडिलें कष्टे । तेणेंचि साधनें परब्रह्म भेटे ।

इटेसाठीं परीस पालटे । मूर्ख वोखटें मानिती ॥५१॥

पोट भरावयाची युक्ती । आपुली मिरवावया व्युत्पत्ती ।

पत्रावलंबनें करिती । द्वाराप्रती सधनाच्या ॥५२॥

जेवीं पोट भरावया भांड । नाना परी वाजवी तोंड ।

तेवीं नाना व्युत्पत्ती वादवितंड । करिती अखंड उदरार्थ ॥५३॥

करूनि व्युत्पत्ती शब्दब्रह्म । जरी न साधीचि परब्रह्म ।

तरी त्या श्रमाचें फळही श्रम । जेवीं रत्‍नें उत्तम घाणा गाळी ॥५४॥

तेथें तेल ना पेंडी । झाली रत्‍नांची राखोंडी ।

तैशीं विद्वांसें झाली वेडीं । श्रमें श्रमकोडी भोगिती ॥५५॥

श्रमें श्रमूचि पावती । दुःखें दुःखचि भोगिती ।

हेंचि कथन बहु दृष्टांतीं । उद्धवाप्रती हरि बोले ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP