मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक १५ वा

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यस्यात्मा हिंस्यते हिंस्रैः येन किञ्चिद् यदृच्छया ।

अर्च्यते वा क्वचित्तत्र न व्यतिक्रियते बुधः ॥१५॥

ज्याचिया देहासी जाण । हिंसा करिती हिंसक जन ।

छेद भेद दंड मुंडण । गर्जन तर्जन जर्‍ही केलें ॥५४॥

तर्‍ही ते देहाची व्यथा । मुक्तासी नाहीं सर्वथा ।

नाना उपचारीं पूजितां । नेघे श्लाघ्यता सन्मानें ॥५५॥

देहीं वर्तमान असतां । देहबुद्धी नाहीं सर्वथा ।

त्यासीच बोलिजे जीवन्मुक्तता । यालागीं देहव्यथा त्या नाहीं ॥५६॥

जैसी पुरुषांसवें छाया असे । पुरुषयोगें चळती दिसे ।

ते छायेची अहंममता नसे । निजमानसें पुरुषासी ॥५७॥

तैसाचि मुक्ताचा देहो । मुक्तासवें वर्ते पहा हो ।

परी त्यासी नाहीं अहंभावो । हा नित्यस्वभावो मुक्ताचा ॥५८॥

त्यासी चोरु हेरु कातरु । म्हणोनि दंडू केला थोरु ।

कां पूजिला ईश्वरु । पुरुष श्रेष्ठतरु म्हणोनि ॥५९॥

परी पूजितां कां गांजितां । त्याची डंडळीना समता ।

जेवीं छायेची मानापमानता । न करी व्यथा पुरुषासी ॥४६०॥

देहो व्याघ्रामुखीं सांपडला । दैवें पालखीमाजीं चढला ।

तो हरुषविषादा नाहीं आला । समत्वें झाला निर्द्वंद्व ॥६१॥

देहो द्यावया नेतां सुळीं । मी मरतों ऐसें न कळवळी ।

कां गजस्कंदी पूजिला सकळीं । तेणें सुखावली वृत्ति नव्हे ॥६२॥

सुखदुःखादि नाना व्यथा । आगमापायी आविद्यकता ।

देहाचें मिथ्यात्व जाणता । यालागीं व्यथा पावेना ॥६३॥

अतिसन्मानु जेथ देखे । तेथ न राहे तेणें सुखें ।

अपमानचिये आडके । देखोनि न फडके भयभीतू ॥६४॥

देहासी नाना विपत्ति होये । तोही त्या देहाचें कौतुक पाहे ।

देह मी मज व्यथा आहे । हें ठावें नोहे मुक्तासी ॥६५॥

येथवर देहातीतता । दृढ बाणली जीवन्मुक्ता ।

यालागीं देहदुःखाची व्यथा । त्यासी सर्वथा बाधीना ॥६६॥

नाना जनपदवार्ता । अतिस्तवनें स्तुति करितां ।

कां परुषवचनी निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP