मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक २९ वा

एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीभगवानुवाच ।

कृपालुरकृतद्रोहस्तितिक्षुः सर्वदेहिनाम् ।

सत्यसारोऽनवद्यात्मा समः सर्वोपकारकः ॥२९॥

कृपेसी स्वतंत्र जन्म नाहीं । जेथ उपजे तो साधु पाहीं ।

कृपा वसे संतांच्या देही । त्यांचेनि ते पाहीं दाटुगी जगीं ॥८३०॥

कृपा त्यांचेनि महिमे आली । दया त्यांचेनि जीवें झाली ।

कठिणत्वाची कांटी काढिली । समूळीं उपटिली निष्ठुरता ॥३१॥

कृपा भूतमात्राच्या ठायीं । सारिखीच सर्व देहीं ।

येथतेथ हें त्या नाहीं । अवकृपा ठायीं निमाली ॥३२॥

नवल कृपाळुत्वाचें चित्त । जीवाची जीव जीवीं स्यूत ।

दुःख हरोनि सुख देत । कृपा अद्‍भुत यापरी ॥३३॥

जेणें आपणासी होय दुःख । तें परासी न करी निःशेख ।

जेणें आपणिया होय सुख । तें करी आवश्यक प्राणिमात्रां ॥३४॥

या नांव कृपाळुता । हे पहिलें लक्षण संतां ।

दुसरें तें अद्रोहता । ऐक आतां सांगेन ॥३५॥

लोकीं हिंडतां अद्रोहता । ठावो न लभेचि सर्वथा ।

मग शरण आली साधुसंतां । सावकाशता वस्तीसी ॥३६॥

ते दयाळु शरणागता । तिंहीं प्रतिपाळिली अद्रोहता ।

भूतीं भगवंतू देखतां । द्रोहाची वार्ता निमाली ॥३७॥

व्याघ्रसर्पादि देहांसी । कदा द्वेष नुपजे त्यासी ।

जरी देऊं आलें उपद्रवासी । तरी द्वेषासी करीना ॥३८॥

देहास आलिया आपदा । तेणें झाडिकरी प्रारब्धा ।

द्वेष येऊं नेदी कदा । नातळे क्रोधा निजबोधें ॥३९॥

हे जाण पां अद्रोहता । दुसरें लक्षण तत्त्वतां ।

तितिक्षा ते ऐक आतां । सहनशीलता साधूंची ॥८४०॥

शांति परदेशी झाली होती । जेथें जाये तो दवडी परती ।

मग अतिदीन येतां काकुळती । निजधामा संतीं आणिली ॥४१॥

संतीं वाढविली अतिप्रीतीं । ते भगवंताची झाली पढियंती ।

तेणें आपुली निजसंपत्ती । शांतीच्या हातीं दिधली ॥४२॥

शांती सकळ वैभवेंसीं । अखंड असे संतांपांशीं ।

यालागी सहनशीलता तयांसी । अहर्निशीं अनिवार ॥४३॥

लागतां सकळ भूतांचा झटा । न म्हणे हा भला वोखटा ।

नाचतू निजशांतीचे चोहटा । संत गोमटा त्या नांव ॥४४॥

ऐशी जे सहनशीलता । ते तितिक्षा जाण तत्त्वतां ।

हे तिसरी लक्षणता । सत्याची सत्यता अवधारीं ॥४५॥

सत्य अल्पायुषी झालें येथें । मरे उपजे जेथींच्या तेथें ।

कोठेंही नव्हे वाढतें । तेणें संतांतें ठाकिलें ॥४६॥

सत्यासी संतांसी होतां भेटी । तंव सत्यस्वरूपीं पडली गांठी ।

सत्य संतत्वे उठी । झालें सृष्टीं चिरायु ॥४७॥

यापरी सत्य संतदृष्टीं । सत्य सारें आलें पुष्टी ।

बळें वाढलें सृष्टीं । सत्यें भेटी परब्रह्मीं ॥४८॥

संतांसी होआवा उतरायी । सत्य लागलें त्यांचे पायीं ।

संतचरणावेगळा पाहीं । थारा नाहीं सत्यासी ॥४९॥

ऐसे सत्यास आधारभूत । ज्यांचे पाखोवा सत्य जीत ।

ज्यांचेनि बळें सत्य समर्थ । ते शुद्ध संत जाणावे ॥८५०॥

ज्यांसी सबाह्य सत्यत्वें तुष्टी । जे सत्यस्वरूपें आले पुष्टी ।

सत्ये धाली दे ढेकर दृष्टी । ज्यांची वाचा उठी सत्यत्वें ॥५१॥

या नांव जाण सत्याचें सार । हें संतांचें वसते घर ।

हे मज मान्य संत साचार । मी निरंतर त्यांपाशीं ॥५२॥

जिंहीं असत्याची वाहूनि आण । ज्यांमाजी सत्य सप्रमाण ।

जे सदा सत्यत्वें संपन्न । हें मुख्य लक्षण साधूंचें ॥५३॥

या नांव सत्यसार । संतलक्षण साचार ।

हा चौथा गुण सधर । अनवद्य अपार तें ऐका ॥५४॥

निंदा असूयादि दोष समस्त । निजात्मबोधें प्रक्षाळित ।

अत्यंत पवित्र केलें चित्त । अनिंदित निजबोधें ॥५५॥

गुरुआज्ञातीर्थीं न्हाला । न्हावोनि सर्वांगीं निवाला ।

त्रिविधतापें सांडवला । पवित्र झाला मद्‌रूपें ॥५६॥

काय सांगूं त्याची पवित्रता । तीर्थें मागती चरणतीर्था ।

मीही पदरज वांछिता । इतरांची कथा कायसी ॥५७॥

कृष्ण म्हणे उद्धवा । हा अनवद्य गुण पांचवा ।

ऐक आतां सहावा । सम सर्वां समभावें ॥५८॥

निजरूपें सर्वसमता । समचि देखे सर्वां भूतां ।

निःशेष निमाली विषमता । जेवीं सैंधवता सागरीं ॥५९॥

नाना अलंकार पदार्था । सोनेंपणें विकत घेतां ।

ते ते पदार्थ न मोडितां । स्वभावतां सम सोनें ॥८६०॥

तैसे नाना आकार नाना नाम । अवघें जग दिसे विषम ।

साधूचि चिद्‌रूपें सर्व सम । न देखे विषम निजबोधे ॥६१॥

ऐसिया समसाम्यावस्थेसी । दैवें आलिया सुखदुःखांसी ।

तेहीं मुकली द्वंद्वभावासी । सहजें समरसीं निजसाम्यें ॥६२॥

सव्यें मीनल्या महानदीसी । अपसव्यें आल्या गांवरसासी ।

गंगा दोहींतेंही समरसी । गुणदोषांसीं उडवूनी ॥६३॥

तेथ पवित्रअपवित्रता । बोलूंचि न ये सर्वथा ।

गोडकडूपणांची वार्ता । निजांगें समता करी गंगा ॥६४॥

तैसें सुखदुःखांचें भान । साधूंसी समत्वें समान ।

सदा निजबोधें संपन्न । हे अगाध लक्षण संतांचें ॥६५॥

नटिया एकचि एकला । गायव्याघ्रांचें सोंग अवगला ।

भीतरील खेळ्या जैं वोळखिला । तैं फिटला भवभ्रमू ॥६६॥

तैसी भयाभयवार्ता । द्वैतभावें उठी सर्वथा ।

साधु उभयसाम्यें पुरता । भयनिर्भयता तो नेणे ॥६७॥

द्वंद्वसाम्यें परिपूर्ण । साधूचा हा सहावा गुण ।

ऐक सातवें लक्षण । परोपकारीपण तयाचें ॥६८॥

पत्र पुष्प छाया फळ । त्वचा काष्ठ समूळ ।

वृक्ष सर्वांगें सफळ । सर्वांसी केवळ उपकारी ॥६९॥

जो वृक्षा प्रतिपाळी । कां जो घावो घाली मूळीं ।

दोन्हीतें वृक्ष पुष्पीं फळीं । समानमेळीं संतुष्ट ॥८७०॥

मोडूनि फळें आलिया वृक्षें । वृक्षु एकही स्वयें न चाखे ।

तेवीं कर्मफळा जो न टेकें । तो यथासुखें परब्रह्म ॥७१॥

तैसा कायावाचामनें प्राणें । साधु वाढला उपकाराकारणें ।

आपुलें परावें म्हणों नेणे । उपकारू करणें सर्वांसी ॥७२॥

हो कां चंद्र उगवोनि अंबरीं । जेवीं जगाचें आंधारें निवारी ।

विश्वाचा ताप दूर करी । निववी निजकरीं सर्वांतें ॥७३॥

तेथ चंद्रामृत चकोरीं सेवावें । येरांसी चंद्र न म्हणे न द्यावें ।

जो जो भजे जेणें भावें । तो तो पावे तें सुख ॥७४॥

तैसेंचि जाण साधूपासी । जो जो श्रद्धा करी जैसी ।

त्या त्या देतसे सुखासी । होत जगासी उपकारी ॥७५॥

काउळे चंद्रासी हेळसिती । चकोर चंद्रामृत सेविती ।

तेवीं दुष्ट साधूतें धिक्कारिती । भावार्थी पावती निजलाभू ॥७६॥

सातव्या लक्षणाचा उभारा । सांगितलें परोपकारा ।

पुढील श्लोकीं लक्षणें अकरा । साधुनिर्धारा सांगत ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP