मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
प्रबोधोत्सव व तुलसीविवाह

धर्मसिंधु - प्रबोधोत्सव व तुलसीविवाह

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


प्रबोधोत्सव हा क्वचित ग्रंथात कार्तिक शुद्ध एकादशीला करावा असे म्हटले आहे. रामार्चनचन्द्रिकादि ग्रंथात द्वादशीलाच करावा असे म्हटले आहे. उत्थापनाच्या (उठण्याच्या) मंत्रातही द्वादशिचाच निर्देश असल्याने, तो द्वादशीलाच करणे योग्य आहे. त्याकरिता द्वादशीच्या रात्रीच्या पहिल्या भागात जर रेवतीच्या शेवटच्या चरणाचा योग असेल, तर तो उत्तम होय. तसा जर योग नसेल तर रात्रीच्या पहिल्या भागात फक्त रेवतीयोग असला तरी योग्य आहे. त्याच्या अभावी रात्रीच्या पहिल्या भागात फक्त द्वादशी किंवा तिच्याही अभावी रात्रीच्या पहिल्या भागी निवळ रेवती अथवा त्या दोहोंचाही रात्री अभाव असल्यास, दिवसासच द्वादसीत हा प्रबोधोत्सव करावा, असे कौस्तुभात जरी सांगितले आहे, तरी 'पारणेच्या पूर्वरात्री' असे वचन असल्याने, पारणेच्या रात्रीच्या पहिल्या भागात द्वादशीचा अभाव असताही त्रयोदशीतच पारणेच्या दिवशी प्रबोधोत्सव करण्याचा संप्रदाय आहे. याप्रमाणेच नवमीपासून तीन दिवसपर्यंत किंवा एकादशीपासून पुनवेपर्यंत कोणत्या तरी एका दिवशी, अथवा कार्तिकशुद्धात विवाहनक्षत्री तुलसीविवाह करावा. असे तुळशीच्या लग्नाचे जरी अनेक काळ आहेत, तरी पारण्याच्या दिवशीच प्रबोधोत्सवाच्या कर्मासह तंत्रानेच सर्वत्र तुळशीचे लग्न करतात; यास्तव तुळशीचे लग्नसुद्धा प्रबोधोत्सवासारखेच पारण्याच्या रात्रीच पहिल्या भागात करावे. प्रबोधोत्सव आणि तुलसीविवाह जर निरनिराळे करायचे असतील, तर तुळशीचे लग्न निराळ्या वेळी करावे. पुण्याहवाचन, नान्दीश्राद्ध, विवाहहोम वगैरे अंगांसह तुलसीविवाहाचा प्रयोग कौस्तुभादि ग्रंथात पाहावा. प्रबोधोत्सवाबरोबरच तुलसीविवाह करण्याचा शिष्टाचार असल्याने त्या बाबतीत येथे संक्षेपानेच ते कर्म लिहितो. देशकालादिकांचा उच्चार करून,

'श्रीदामोदरप्रीत्यर्थं प्रबोधोत्सवं संक्षेपतस्तुलसीविवाहविधिंच तंत्रेण करिष्ये तदंगतया पुरुषसूक्तेन विधिना षोडशोपचारैस्तंत्रेण श्रीमहाविष्णुपूजां तुलसीपूजांच करिष्ये'

असा संकल्प करून, न्यासादिक केल्यावर श्रीविष्णु व तुलसी यांचे ध्यान करावे. सहस्त्रशीर्षा० या मंत्राने श्रीमहाविष्णु व तुलसी यांचे आवाहन करून, 'पुरुष एव० वगैरे मंत्रांनी 'श्रीमहाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यैच नमः आसनम् वगैरे स्नानापर्यंत पूजा करून मंगलवाद्ये वाजवावीत, आणि सुवासिनीकडून किंवा स्वतः आपण नागवेलीच्या पानांनी सुगन्धी तेल व हळद लावून ऊन पाण्याने विष्णु व तुळस यांना मंगलस्नान घालावे. त्यानंतर पंचामृतस्नान घालून स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. वस्त्र, जानवे व चंदन ही नंतर विष्णूला अर्पण करून, तुळशीला-हळद, कुंकू, गळेसर व इतर मंगलालंकार देऊन, मंत्रपुष्पासहित सर्व पूजा संपवावी. त्यानंतर घंटा वगैरेंच्या वाजवण्याने देवाला जागे करावे. (प्रबोधोत्सव- देवाला जागे करण्याचा उत्सव) जागे करण्याचा मंत्र - इदंविष्णु० योजागार०' हा आचार करणे तर प्राप्तच आहे.

'ब्रह्मेंद्ररुद्राग्निकुबेरसूर्यसोमादिभिर्वन्दितवन्दनीय बुध्यस्व देवेश जगन्निवास मत्रप्रभावेन सुखेन देव ॥

इयंच द्वादशी देव प्रबोधार्थतु निर्मिता ।

त्वयैव सर्वलोकानां हितार्थ शेषशायिना ॥

उत्तिष्ठोत्तिष्ठगोविंदत्यज निद्रां जगत्पते ॥

त्वयिसुप्ते जगत्सुप्तमुत्थिते चोत्थित जगत् ॥

देवाला उठविल्यावर

'चरणं पवित्रं' 'गता मेघा वियच्चैव निर्मलं निर्मला दिशः ।

शारदानिच पुष्पाणि गृहाण मम केशव ॥'

वगैरे मंत्रांनी पुष्पांजली द्यावी. त्यानंतर परिपाठाप्रमाणे श्रीकृष्णमूर्ति तुळशीच्या पुढे ठेवून, त्या दोहोंमध्ये अंतःपट धरावा आणि मंगलाष्टके म्हणावीत. त्यानंतर अंतःपट काढून घेऊन अक्षता टाकल्यावर, दामोदराच्या हातावर तुळशीचे दान करावे.

'देवी कनकसंपन्ना कनकाभरणैर्युताम् ।

दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजितीमया ।

मया संवर्धिता यथाशक्त्यलंकृतां इमां तुलसीदेवी दामोदराय श्रीधराय वराय तुभ्यमहं संप्रददे'

असे म्हणून देवापुढे अक्षतायुक्त पाणी सोडावे, व 'श्रीमहाविष्णुः प्रीयताम्' असे म्हटल्यावर, 'इमां देवी प्रतिगृह्णातु भवान्‌' असे देवाला सांगावे. त्यानंतर तुळशीचा देवाच्या हाताला स्पर्श करून,

'क इदं कस्माअदात्कामः कामायादात्कामो दाता कामः प्रतिगृहीताकामं समुद्रमाविश कामेनत्वाप्रतिगृह्णामि कामैतत्ते वृष्टिरसिद्यौस्त्वाददातु पृथिवी प्रतिगृह्णातु'

हा मंत्र दुसर्‍याकडून म्हणवावा. यजमानाने '

'त्वं देविमेऽग्रतो भूयास्तुलसीदेवि पार्श्वतः देवित्वं पृष्ठतो भूयास्त्वद्दानान्मोक्षमाप्नुयाम् ॥

दानस्य प्रतिष्ठासिद्ध्यर्थं इमां दक्षिणां संप्रददे ॥

असा उच्चार करून देवापुढे दक्षिणा ठेवल्यावर,

'स्वस्ति नो मिमीता० शं० नः'

इत्यादि ज्याच्या त्याच्या शाखेत सांगितलेली शांतिसूक्ते व विष्णुसूक्ते म्हणावीत. त्यानंतर तुलसीसह विष्णूची आरती करून त्यांना मंत्रपुष्प द्यावे. त्यानंतर पत्नीसह गोत्रज व अमात्या यांना बरोबर घेउन यजमानाने त्या देवतांना चार प्रदक्षिणा घालाव्या. ब्राह्मणांना नंतर दक्षिणा दिल्यावर, यथाशक्ति ब्राह्मणभोजनाचा संकल्प करून सर्व कर्म ईश्वराला अर्पण करावे. याप्रमाणे देवाला जागे केल्यावर कार्तिकात जे जे पदार्थ सोडलेले असतील ते ते पदार्थ आणि वर सांगितल्याप्रमाणे इतर पदार्थ ब्राह्मणांना देऊन, व्रताची पूर्णता होण्यासाठी प्रार्थना करावी. ती अशी

'इदं व्रतं मया देव कृतं प्रीत्यै तवप्रभो ।

न्यूनं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादाज्जनार्दन ॥

या प्रार्थनेनंतर भगवंताला व्रतार्पण करावे, याच दिवशी चातुर्मास्यव्रताचीही समाप्ति करण्यास काही ग्रंथकारांनी सांगितले आहे. कार्तिकमासव्रत चातुर्मास्यव्रत यांची उद्यापने चतुर्दशी किंवा पौर्णिमा या तिथींवर करावीत. असेही इतर ग्रंथकार म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP