मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
बघुनि तया मज होय कसेंसें !

बघुनि तया मज होय कसेंसें !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


बघुनि तया मज होय कसेसें,

झुरशि मना, कां भरुनि तुज पिसें ? ध्रु०

हीन दीन मी ब्राह्मणविधवा,

तृणसम जन मज टाकि जणुं शवा;

वासना-भुतें भिवविति जीवा,

शरीर जीवा हें थडगेंसें. १

ह्रदयतळीं वळवळति कल्पना,

हाय मना, ही काय हेलना !

जीवनगीतिंत फसशि कां मना ?

जालिं पाखरूं हाय जणुं फसे ! २

आसन त्यास्तव घालायाला;

वस्त्र चुणुनिया ठेवायाला

हातांनो, फुरफूर कशाला ?

कळे तया का ? काय तो पुसे ? ३

बघुनि तया कां डोळे वळती ?

येतां तो कां पायहि पळती ?

कान लपुनि कां शब्द ऐकती ?

हा रे दैवा ! कां हें धुमसे ? ४

जीव तयाच्या प्रकाशीं रिझे,

आहुतिसा जळण्यासही सजे,

हा रे दैवा ! कां हें नुमजे ?

निष्फळ हें ! मग हाय कां असें ? ५

फूल सूर्यमुइ भूवरि, नभिं रवि,

चंडकिरणिं मुख अविरत फिरवी,

जातां तो मुख दुःखें झुकवी,

जळुनि राख हो किरणिं, हें तसें ! ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - पादाकुलक

राग - पिलू

ठिकाण - प्रतापगढ

दिनांक - २३ सप्टेंबर १९२०


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP