अध्याय १० वा - श्लोक ५ ते ७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यदृच्छया च देवर्षिर्भगवांस्तत्र कौरव । अपश्यन्नारदो देवौ क्षीबाणौ समबुध्यत ॥५॥

शुक ह्मणे गा कौरवपति । प्रथम प्रश्नाची निवृत्ति । मदोन्मत्तां गुह्यकांप्रति । कामभ्रांतीं अनुमजु ॥१३॥
तंव अकस्मात नारदमुनि । दैवें आला ते काननीं । षड्गुणैश्वर्याची श्रेणि । ज्याचे वचनीं सुरसिद्ध ॥१४॥
ब्रह्मवेत्ता विरागवंत । ब्रह्मावबोधें दृश्यीं रमत । वेदविहितीं अतंद्रित । तो महंत देवर्षि ॥११५॥
भक्तांमाजीं अग्रगणी । नित्य निरत हरिकीर्तनीं । तानमानीं सामगानीं । चक्रपाणिप्रियकर ॥१६॥
मदिरोन्मादें व्याकुळ । मन्मथमार्गणें विव्हळ । सुरतकर्दमें झाले समळ । नेत्रकमळ नुघडती ॥१७॥
ऐसा नारद अकस्मात । तेथ पावला कृपावंत । तेणें देखिले मदोन्मत्त । दोघे सुत धनदाचे ॥१८॥
देखोनि तयांच्या इंगिता । त्यांची पूर्वापर अवस्था । कळों सरली बुद्धिमंता । त्या महंता मुनिवर्या ॥१९॥
चकारार्थें सुरकामिनी । त्याही मुनीनें देखिल्या नयनीं । पुढें वर्तली जैशी करणी । ते ऐकें श्रवणीं कुरुनाथा ॥१२०॥

तं दृष्ट्वा व्रीडिता देव्यो विवस्त्राः शापशंकिताः । वासांसि पर्यधुः शीघ्रं विवस्त्रौ नैव गुह्यकौ ॥६॥

काय तिहीं अनार्य केलें । किमर्थ मुनीनें शापिलें । ऐसें राया त्वां जें पुशिलें । तें परिशिलें पाहिजे ॥२१॥
मुनीतें देखोनि स्वर्गांगना । गुह्यकांशीं क्रीडतां नग्ना । होऊनि अत्यंत लज्जायमाना । सवेग वसना वेढिती ॥२२॥
मुनीचें मानूनि शापभय । सव्रीडिता दीनप्राय । देखोनि त्यांवरी मुनिवर्य । सहसा सदय न कोपे ॥२३॥
परी ते उन्मत्त गुह्यक दोन्ही । नग्न निःशंक येतां मुनि । उभारल्या स्मरकेतनीं । पाहती नयनीं ओथरलें ॥२४॥
कामच्छत्रें उभारिलीं । नेत्रकमळें ओथरलीं । ऐशी अवज्ञा मुनीची केली । नाहीं धरिली शंकाही ॥१२५॥
नाहीं नमन अभ्युत्थान । नाहीं स्तवनादि सन्मान । न करिती वस्त्रेंही परिधान । शिश्नोत्थापन दाविती ॥२६॥
ऐसें अयुक्त घडलें त्यांसी । द्विविध कथिली तुझी पुसी । कैसा नारद कोपला म्हणसी । त्या प्रश्नासि अवधारीं ॥२७॥

तौ दृष्ट्वा मदिरामत्तौ श्रीमदांधौ सुरात्मजौ । तयोरनुग्रहार्थाय शापं दास्यन्निदं जगौ ॥७॥

दोघे देखोनि मदिरामत्त । श्रीमदांध धनदसुत । शापामाजीं अनुग्रहार्थ । काय विवरित मुनिवर्य ॥२८॥
जो विवरणरूप नारदगीत । पंधरा श्लोक शापें सहित । श्रोतीं होऊनि सावचित्त । तो वृत्तांत परिसिजे ॥२९॥
विचार विवरूनि दिधला शाप । केंवि म्हणावा तो सकोप । शापें क्षाळिला उन्मादलेप । परम सकृप मुनिवर्य ॥१३०॥
श्रीमदाची होय निवृत्ति । भगवद्दर्शनाची अलभ्य प्राप्ति । पुढें अभंग सप्रेमभक्ति । ऐशी युक्ति विवरिली ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP