अध्याय १० वा - श्लोक १९ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तदहं मत्तयोर्माध्व्या वारुण्या श्रीमदांधयोः । तमोमदं हरिष्यामि स्त्रैणयोरजितात्मनोः ॥१९॥

आधींच श्रीमदें मातलें । वरी वारुणी मधुर मदिरा प्याले । मनामागें धाविन्नले । स्त्रैण झाले सकाम ॥८६॥
ऐसे अजितात्मे श्रियोन्मत्त । माध्वी मदिरा पिऊनि भ्रांत । स्त्रैण स्त्रीकामीं आसक्त । जें दुष्कृत अज्ञान ॥८७॥
तो तयांचा मदांधकार । श्रीमदाचा भूतसंचार । आजि नाशीन मी समग्र । म्हणोनि मुनिवर कोपला ॥८८॥

यदिमौ लोकपालस्य पुत्रौ भूत्वा तमःप्लुतौ । न विवाससमात्मानं विजानीतः सुदुर्मदौ ॥२०॥

कैसें दैव पैं विचित्र । लोकपाळाचे होऊनि पुत्र । ज्या कारणास्तव झाले पात्र । अज्ञानप्रचुरतमाचें ॥८९॥
जया अज्ञानाचिये भ्रांतीं । आपणा नग्न हें नेणती । सुदुर्मद गुह्यकजाती । त्या मदाची शांति करीन ॥२९०॥
रजतमें हे भ्रांत झाले । म्हणोनि स्वहितीं जे वंचले । त्यांच्या कारुन्यें कळवळिलें । मन कोंवळें मुनीचें ॥९१॥

अतोऽर्हतः स्थावरतां स्यातां नैवं यथा पुनः । स्मृतिः स्यान्मत्प्रसादेन तत्रापि मदनुग्रहात ॥२१॥

कोणा न करिती सन्मान । नेणती विनय अभ्युत्थान । वृक्षा ऐसें उद्धटपण । आपणा नग्न नेणती ॥९२॥
स्थावरा ऐसा ताठा आंगीं । तरी स्थावरयोनिचि पैं गा जोगी । पुन्हा क्रिया ही बाउगी । जियेचा भोग या यां न घडे ॥९३॥
ज्या कारणास्तव हे योनि । पावलो ऐशी अंतःकरणीं । माझ्या प्रसादें करूनि । यांलागोनि स्मृति असो ॥९४॥
पुन्हा ऐसें न घडे आम्हां । जेणें पाविजे योनि अधमा । माझ्या अनुग्रहें ऐसा प्रेमा । त्यांसि निःसीम असो पैं ॥२९५॥

वासुदेवस्य सान्निध्यं लब्ध्वा दिव्यशरच्छते । वृत्ते स्वर्लोकतां भूयो लब्धभक्ती भविष्यतः ॥२२॥

ऐसें विवरूनि गुह्यकांसी । शाप बोलिला तपोराशि । मदपराधें स्थावरतेसी । वृक्षयोनीसि पावाल ॥९६॥
आणि माझिया अनुग्रहें । स्मरण असेल मागील जें हें । स्थावरयोनि वृक्षदेहें । शताब्द मोहें भोगाल ॥९७॥
दिव्यशताब्द क्रमिल्या पुढें । स्वर्गलोकाची प्राप्ति घडे । विष्णुभजनीं प्रेमा जडे । जेणें विघडे रजतम ॥९८॥
अतिक्रमिलिया शताब्द । पावाल वासुदेवसान्निध्य । यथापूर्व होऊनि विबुध । भजनानंद भोगाल ॥९९॥
शीतोष्णादि सहनशील । श्रांतालागीं सुशीतळ । अर्जुनवृक्ष होआल यमल । फल दल मूल अवंचक ॥३००॥
येणें मदाचें क्षाळण । होतां भेटेल जनार्दन । लाहोनि पूर्वील विबुधपण । भगवद्भजन घडो तुम्हां ॥१॥
शाप किंवा अनुग्रहो । क्षोभ किंवा म्हणिजे स्नेहो । नारदकृपेचा नवलाहो । नाशोनि मोहो सुखदानी ॥२॥

श्रीशुक उवाच - एवमुक्त्वा स देवर्षिर्गतो नारायणाश्रमम् । नलकूबरमणिग्रीवावासतुर्यमलार्जुनौ ॥२३॥

शुक म्हणे गा पुण्यश्लोका । ऐकें जनमेजयाच्या जनका । ऐशा विवरूनियां विवेका । नारदें गुह्यकां शापिलें ॥३॥
दीनदयाळ नारद पूर्ण । नव्हे क्रोधाचें भाजन । तिहीं प्रश्नाचें विवरण । तुज हें पूर्ण निरूपिलें ॥४॥
सर्वज्ञ देवर्षि नारद । ऐसा बोलूनि शापशब्द । बदरीवना तो कोविद । गेला मुकुंद चिंतूनि ॥३०५॥
नलकूबर बृहद्वनीं । जन्म पावले तमो योनीं । यमलार्जुन झाले दोन्ही । शापवचनीं मुनीच्या ॥६॥

ऋषेर्भागवतमुख्यस्य सत्यं कर्तु वचो हरिः । जगाम शनकैस्तत्र यत्रास्तां यमलार्जुनौ ॥२४॥

कैसें शापाचें कारण । तें इतिहासें केलें कथन । पुढें काय करी कृष्ण । तें व्याख्यान अवधारा ॥७॥
भगवद्भक्तां अग्रगणी । त्या मुनीची सत्य वाणी । करावया चक्रपाणि । अर्जुन दोन्ही अवलोकी ॥८॥
अलूखलरज्जुनिबद्धजठर । उद्धरावया धनदकुमार । जाता झाला कमलाधर । जेथें तरुवर ते होते ॥९॥
हळूहळूच रांगे खुरडे । कांहीं स्फुंदे कांहीं रडे । जेथ गुह्यक यमलझाडें । गेला निवाडें ते ठायीं ॥३१०॥
क्रमिलें दिव्य वत्सरशतक । शापदग्ध हे गुह्यक । यथोक्त मुनीचें करावया वाक्य । यदुनायक प्रवर्तला ॥११॥

देवर्षिर्मे प्रियतमो यदिमौ धनदात्मजौ । तत्तथा साधयिष्यामि यद्गीतं तन्महात्मना ॥२५॥

माझा प्रियतम देवर्षि । तेणें शापिलें कौबेरांसी । त्याची गाथा जैशी जैशी । ते ते विधीसि साधीन ॥१२॥
हे तों धनदाचे उभय कुमार । विशेष रुद्राचे अनुचर । नारदाचें कृपापात्र । यांचा उद्धार आवश्यक ॥१३॥
अनित्यात्मकत्वें कवळून । परिणमें तें जीवचैतन्य । जो वास्तव नित्यात्मज्ञ । त्या अभिधान महात्मा ॥१४॥
ज्ञानसंपन्न भक्तियोग । अनित्यावबोधें सविराग । ब्रह्मान्वयात्मकत्व जग। सानुराग चिदैक्यें ॥३१५॥
ऐसा महात्मा ब्रह्मसुत । तेणें जैसा गाइला गीत । तैसा साधीन मी कार्यार्थ । ऐसा हेतु स्मरोनि ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP