अध्याय १० वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इत्यंतरेणार्जुनयोः कृष्णस्तु यमयोर्ययौ । आत्मनिर्वेशमात्रेण तिर्यग्गतमुलूखलम् ॥२६॥

ऐसा वृत्तांत चिंतून । दोहीं यमलार्जुनांमधून । जाता झाला श्रीभगवान । तो श्रीकृष्ण जगदात्मा ॥१७॥
द्रुमांमधूनि स्वशरीर । संकोचूनि प्रवेशमात्र । करितां उलूखल वक्र । झालें सत्वर ओढितां ॥१८॥

बालेन निष्कर्षयताऽन्वगुलूखलं तद्दामोदरेण तरसोत्कलितांघ्रिबंधौ ।
निष्पेततुः परमविक्रमितातिवेपस्कंधप्रवालविटपौ कृतचंडसब्दौ ॥२७॥

वृक्षीं गुंतलें वक्र उखळ । बाळें आकर्षितां तें प्रबळ । कपिकर्षणें द्रोणाचळ । तेंवि यमल थरारिले ॥१९॥
दामरज्जु सूक्ष्मतर । बळें ओढितां दामोदर । कैसेनि रज्जु झाली सधर । तो प्रकार अवधारा ॥३२०॥
माया अघटितघटनापटीं । ज्याच्या योगें विश्व प्रकटी । जो ते लेऊनि नटला नटीं । त्याच्या गोठी त्या योग्य ॥२१॥
सूर्यसमान तपेषाठी । भूगोलअग्रीं वाहे काठीं । मुखीं दाखवी ब्रह्मांडकोटी । ऐशा गोठी त्या योग्य ॥२२॥
निर्बळा हातींचा सुटतां शर । भेदूं न शके वस्त्रमात्र । बलिष्ठ विंधितां कडतर । फोडि शरीर कवचेंशीं ॥२३॥
इच्छामात्रें ब्रह्मांडकोटी । दावूनि लपवी मायेपोटीं । तो हा श्रीकृष्ण जगजेठी । मनुष्यनटीं नटलासे ॥२४॥
तेणें ओढितां तें उखळ बळें । युग्मार्जुनांचीं उपडलीं मूळें । विक्रमें कर्षितां गोपाळें । झाले डाहाळें सकंप ॥३२५॥
चंडशब्दें कडकडूनि । उन्मळूनि पडिले दोन्ही । नाद भरला दिशागगनीं । पतनें अवनि दणाणिली ॥२६॥

तत्र श्रिया परमया ककुभः स्फुरंतौ सिद्धावुपेत्य कुजयोरिव जातवेदाः ।
कृष्णं प्रणम्य शिरसाऽखिललोकनाथं श्रद्धांजली विरजसाविदमूचतुः स्म ॥२८॥

दिशा प्रकाशी देदीप्यमान । त्यांचे आंगींची शोभा पूर्ण । ते सिद्ध निघाले वृक्षांतून । जेंवि कृशान निर्मथनीं ॥२७॥
रजतमाचे गेले मळ । झाले सबाह्य निर्मळ । पाळी अखिल ब्रह्मांडगोळ । तो गोपाळ ते नमिती ॥२८॥
मग जोडूनि अंजलिपुट । स्तविला सप्रेम वैकुंठ । त्याचा यथार्थ स्तोत्रपाठ । शुक वरिष्ठ वाखाणी ॥२९॥

गुह्यकावूचतुः - कृष्ण कृष्ण महायोगिंस्त्वमाद्यः पुरुषः परः । व्यक्ताव्यक्तमिदं विश्वं रूपं ते ब्राह्मणा विदुः ॥२९॥

गौळियाचें मी लेंकरूं । मज कां करितां नमस्कारु । तरी हें न बोलें उत्तरु । तूं योगीश्वर जगदात्मा ॥३३०॥
तुझें ऐश्वर्य अचिंत्य । मायानियंता अनंत । तुझा प्रवाह अव्याहत । तूं जगन्नाथ जगद्रूप ॥३१॥
म्हणसी विश्व मायामय । तें प्रकृतिपुरुषापासूनि होय । तरी तूं आदिपुरुष अव्यय । ब्रह्मान्वय विश्वात्मा ॥३२॥
प्रकृतिपुरुषें इयें दोन्ही । प्रकाशिलीं ज्यापासूनी । यास्तव आद्यकारण म्हणूनि । तुजलागोनि बोलिजे ॥३३॥
म्हणसी कारण निमित्तभूत । तरी उपादानही तूंचि एथ । व्याप्य व्यापक व्यक्ताव्यक्त । तूं सतत अद्वितीय ॥३४॥
स्थूळ सूक्ष्म एकानेक । अवघाचि अन्वयव्यतिरेक । मायाकृत तूं तिचा जनक । हा जाणती विवेक ब्रह्मनिष्ठ ॥३३५॥

त्वमेकः सर्वभूतानां देहास्वात्मेंद्रियेश्वरः । त्वमेव कालो भगवान् विष्णुरव्यय ईश्वरः ॥३०॥

गुह्यक म्हणती जी अनंता । तूंचि नियम्य आणि नियंता । नियम्यनियंतृविभागता । त्या वृत्तांता अवधारीं ॥३६॥
पृथ्वी आप तेज पवन । पांचवें व्यापक केवळ गगन । अष्टधा प्रकृतीचा भगवान । नियंता सर्वज्ञ ईश्वर तूं ॥३७॥
एवं कथिलीं अविकृतें । आतां सूक्ष्में विकारवंतें । ऐक तयाच्या विस्तारातें । तुझेंचि त्यांतें ईशत्व ॥३८॥
शुक्रशोणित मिथुनीभूत । समरसोनि तें परिणमत । पांचभौतिक देह होत । कर्मजनितसंस्कारें ॥३९॥
तेथ गोचर पंच प्राण । अगोचरही पंचधा भिन्न । एवं असु हें अभिधान । दशविध जाण वायूचें ॥३४०॥
आत्मा म्हणिजे अहंकार । अंतःकरणादि प्रकार । संकल्प निश्चयादि अनुकार । सर्व एकत्र अभिमान ॥४१॥
इंद्रियें म्हणिजे जीवचैतन्य । विषयोन्मुख करी स्फुरण । जिहीं मार्गीं प्रकाशोन । विपरीत ज्ञान अभ्यासी ॥४२॥
वास्तव विसरे मागिलीकडे । विवर्त साच मानी पुढें । त्याच्या प्रेमें होय वेडें । भोगी निवाडें भवदुःख ॥४३॥
बाह्य महाभूतांचें भान । विषयरूपें परिणमोन । भ्रांत करी जीवचैतन्य । तो हा करणसमुच्चय ॥४४॥
श्रोत्र त्वचा आणि नयन । चौथी जिव्हा पांचवें घ्राण । इहीं उपजे विषयज्ञान । ज्ञानकरण पंचविध ॥३४५॥
शब्दविषय पडतां श्रवणीं । तो विवरूनि अंतःकरणीं । परिहरणीं कां अंगीकरणीं । विचरे वाणी ते वाचा ॥४६॥
स्पर्श त्वगिंद्रियासि झगटे । त्याची जाणीव मानसीं उमटे । त्यागा दानीं प्रवर्ते नेटें । तें गोमटें प्राणेंद्रिय ॥४७॥
चक्षु दावी पदार्थरूप । बुद्धि जाणे तें क्रूर सकृप । संयोगवियोगीं गतिसाक्षेप । करी साटोप पदेंद्रिय ॥४८॥
चित्ता मानले जिव्हारस । सेवितां होय धातुविशेष । शिश्नेंद्रियें तो स्मरोत्कर्ष । रतिविलास अपेक्षी ॥४९॥
उच्चा नाकें साभिमानी । होऊनि प्रर्वततां विषयाचरणीं । पुढें सुगंध मागें घ्राणी । पायु घाणी प्रकाशी ॥३५०॥
वाचा पाणि पाद शिश्न । गुह्यें सहित पांचही जाण । कर्मेंद्रियें या अभिधान । विषयाचरणक्रिया या ॥५१॥
देह अहंता आणि प्राण । तैसाचि उभयेंद्रियांचा गण । चाळक नियंता सर्वज्ञ । ईश्वर पूर्ण तूं यांचा ॥५२॥
स्वामी ऐसें तूं जरी म्हणसी । एवं कथिलिया प्रपंचासी । निमित्तकारण काळ त्यासी । उपादान प्रकृति हे ॥५३॥
प्रकृतीपासूनि महत्त्वें झाला । विश्वात्मकत्वें जो परिणमला । कर्ता नियंता पुरुष बोलिला । तेथ मजला कां स्तविजे ॥५४॥
मी गौळियाचें अज्ञानबाळ । अनावरत्वें अपराधशीळ । म्हणोनि उदरीं बांधलें उखळ । त्या स्तुतिरोळ हा कां ह्या ॥३५५॥
सहसा स्वामी ऐसें न म्हण । जो कां विश्वात्मा सर्वज्ञ । तो तूं विष्णु सनातन । गुणपरिपूर्ण परमात्मा ॥५६॥
काळचेष्टा ही तुझी लीला । तुझी शक्ति हे प्रकृति अबळा । पुरुष तवांश गोपाळा । तुज वेगळा तो कैंचा ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP