अध्याय १० वा - श्लोक ४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अंतः प्रविश्य गंगायामंभोजवनराजिनि । चिक्रीडतुर्युवतिभिर्गजाविव करेणुभिः ॥४॥

उत्फुल्लपद्माचिया हारी । मल्लिका शतपत्रिका कल्हारी । रोलंबांच्या झंकारगजरीं । स्मर शरीरीं अवतरे ॥८४॥
ऐशी फुल्लारविंदश्रेणी - । मंडित मिरवे मंदाकिनी । माजीं क्रीडती गुह्यक दोन्ही । रहितवसनीं वनितांशीं ॥८५॥
अप्सरांचा सुरतमहिमा । रमतां हव्यस चढे कामा । भ्रमर भुलोनि गुंते पद्मा । तेंवि वामा स्मरकदनीं ॥८६॥
नवपल्लवांचिया अशनीं । उन्मत्त होती कुंजरकरिणी । स्वेच्छा क्रीडती अगाध जीवनीं । तेंवि हे दोन्ही गुह्यक ॥८७॥
जलमैथुनें बाहुतरणें । न्युब्ज उत्तान गात्रां करणें । विपरीतसुरतीं आलिम्गनें । पाहती नयनें अवयवां ॥८८॥
चंद्रानना मृगलोचना । विद्रुमाधरी सुकुंदरदना । भ्रूकटाक्षें समता नयना । शरसंधाना शराच्या ॥८९॥
भ्रमरभासुर केशपाश । शुभ्र गुंफिले सुमनघोंस । भांगीं सिंदुर ओघ विशेष । सरस्वतीचा प्रयागीं ॥९०॥
त्रिवेणिसाम्य ऐशा वेणी । माजीं झळकती रत्नलेणीं । ज्यांच्या मूर्ति स्मरोनि ध्यानीं । हांव यज्ञीं याज्ञिकां ॥९१॥
तप्तचामीकराभगौरा । नवयौवना विलासचतुरा । ज्यांचे अंगप्रभेचा वारा । सुरां असुरां मोहक ॥९२॥
शृंगी केला जिहीं गृहस्थ । श्वान केला गाधिसुत । पुरूरवा ऐल गीत । जगद्विख्यात पुराणीं ॥९३॥
ज्यांच्या रूपांचा संबंधु । होतां सुंदोपसुंद बंधु । परस्परें पावले वधु । ऐसा विनोदु जयांचा ॥९४॥
त्या या प्रत्यक्ष निर्जरवनिता । अस्त्रसामग्री जे मन्मथा । त्यांच्या लावण्याची कथा । गिरा बोलतां मौनावे ॥९५॥
विद्युल्लता चमकती घनीं । तैशा तळपती जीवनीं । तन्मैथुनें गुह्यक दोन्ही । मंदाकिनी डहुळितां ॥९६॥
कर्णभूषणाचिया कांति । गंडस्थळीं प्रतिबिंबती । कुटिल कुंटल तरळताती । नेत्र पंक्ति साञ्जिता ॥९७॥
नितंब पृथुल कुच वर्तुळ । नाभी गंभीर तनु मवाळ । नासा सरळ मुक्ताफळ । अतिसुढाळ शोभविती ॥९८॥
हनुभृकुटीमध्यभागीं । गोंदिल्या सुंदर पाचरंगीं । कुंकुमरेखेची झगमगी । पाहतां दृगीं अनिमेष ॥९९॥
गौर सरळ बाहुयुगलें । करतळें जैशीं रातोत्पळें । कोंपर कळाविया अंगुळें । अतिकोमळें सुरेखें ॥१००॥
कंठउदरहृदयशोभा । मध्य सूक्ष्म लावण्यगाभा । मन्मथसदनीं हेमप्रभा । वरी पक्ष्माभा विखुरली ॥१॥
कर्दळिस्तंभासारिखे ऊरू । पदतळ आरक्तविद्रुमाकारु । मन्मथशस्त्रांचें शरीर । तो प्रकार त्या मूर्ति ॥२॥
प्रत्यक्ष लक्ष्मीच्या बहिणी । असाम्य नसती चंचळपणीं । गरळसहोदरा म्हणोनी । कटाक्षबाणें मारिती ॥३॥
मादक मदिरेचीं भावंडें । दावूनि मोहिती गात्रभांडें । शंखभगिनी लावूनि वेडें । शंख तोंडें करविती ॥४॥
कल्पतरू समान पोटीं । खवळिती कामसंकल्पकोटी । कौस्तुभातुल्य अंगयष्टि । पाहतां दृष्टीं भासती ॥१०५॥
ऐरावतासारिख्या गति । भ्रूव्यंकटा शार्ङ्गाकृति । कामज्वराची निवृत्ति । साम्य करिती सुरवैद्यां ॥६॥
चंद्रानुजा चंद्रानना । अर्पिती क्षयाची दक्षिणा । अमृतोपम संभाषणा । भावगायना दाविती ॥७॥
उच्चैःश्रव्याची हे पदवी । रथा जुंपिला सूर्य भ्रमवी । मानसरज्जु बांधोनि जीवीं । सुरनर तेंवि फिरविती यां ॥८॥
कामधेनू समान कामें । दुभती कामुकां नित्य नेमें । वत्सापरी वेधवर्में । भोगप्रेमें वेधिती ॥९॥
वरी निर्मळ पोटीं गरळ । क्षीराब्धि ऐशा हृदयीं कुटिळ । मंदरप्राय काठिण्य बहळ । जैसा व्याळ कृतघ्न ॥११०॥
ऐशिया ज्या देवांगना । गुह्यकीं करूनि मद्यपाना । भुलले त्यांचिये मैथुना । तेणें नयना अनोळखी ॥११॥
निर्जनीं चिखलीं रुतली गाय । दैवें दयाळ तेथें जाय । मग ते जैसी निर्गम लाहे । तेणें न्यायें मुनि आला ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP