अध्याय १० वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नमः परमकल्याण नमः परममंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः ॥३६॥

नश्वर देहादि सौभाग्य पूर्ण । मूर्ख मानिती तें कल्याण । त्या देहासि येतां मरन । तैं अकल्याण अवघेंची ॥६॥
तैसींच स्वर्गादि अनेक भुवनें । जोडतां कल्याण मानिजे मनें । तीं नासती काळकलनें । अकल्याणें ते काळीं ॥७॥
परमकल्याण तुझे पाय । जेथ न रिघे काळभय । संबोधनार्थ नामधेय । परमकल्याण हें तुज साजे ॥८॥
भेद तितुका अमंगळ । ज्यामाजीं अनेक विकल्पमळ । अभेद आत्मा तूं निर्मळ । परम मंगळ तुज नमो ॥९॥
तुझा निवास चराचरीं । भूतभौतिकव्यक्तिमात्रीं । यालागीं वासुदेवनामोच्चारीं । तुज मुरारि नमितसों ॥४१०॥
कामा प्रवेश नाहीं जेथें । निष्कामसुखाचें पूर्ण भरितें । अनुचंबळत नोहे रितें । नमूं शांतातें त्या तुज ॥११॥
सांप्रत यदुकुळीं अवतार । घेतला उतरावया धराभार । तोचि तूं हा यदुप्रवर । नमस्कार यदुवर्या ॥१२॥
ऐसें करूनि स्तवन नमन । आतां संबंधपरिज्ञान । व्हावया स्नेहाभिवर्धन । करिती कथन गुह्यक ॥१३॥

अनुजानीहि नौ भूमंस्तवानुचरकिंकरौ । दर्शनं नौ भगवत ऋषेरासीदनुग्रहात् ॥३७॥

आम्ही मणिग्रीव नलकूवर । तुझिया अनुचराचे किंकर । आपुले जाणूनि अभय कर । ओपीं सत्वर श्रीपते ॥१४॥
भूमन् ऐसें संबोधन । करावयाचें हें कारण । जें तूं आत्मा अपरिच्छिन्न । अमल सर्वज्ञ स्वप्रकाश ॥४१५॥
देशें काळें तुझें ज्ञान । आवरिलें न वचे जाण । कालत्रयीं सनातन । प्रकाशघन चिन्मूर्ति ॥१६॥
यालागीं अनुचरकिंकर आम्ही । सर्व विदित हें तुजला स्वामी । काळाचिये ही अतिक्रमीं । न पडे भ्रमीं तव बोधें ॥१७॥
रुद्र तुझा जो अनुचर । आम्ही तयाचें किंकर । कीं बिभीषणाग्रज कुबेर । आम्ही कुमार तयाचे ॥१८॥
द्रविणपति गुह्यकपति । कुबेर उत्तरेचा दिक्पति । ज्यासि तुझी सप्रेम भक्ति । आम्ही संतति तयाची ॥१९॥
नारद तुझा परम प्रिय । त्याच्या अनुग्रहें साधलें कार्य । देखिलासि तूं वृष्णिधुर्य । पुन्हा अनार्य हें न घडो ॥४२०॥
देवर्षींच्य अनुग्रहेंकरून । तुझें आम्हांसी हें दर्शन । महाद्भाग्यें झालें जाण । दुष्टाचरण पुन्हा न घडो ॥२१॥
कंटाळलेती दुष्टाचरणा । तरी काय आवडे तुमच्या मना । ऐसें पुससी जनार्दना । तरी ते प्रार्थना ऐकावी ॥२२॥

वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायां हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः ।
स्मृत्यां शिरस्तव निवासजगत्प्रणामे दृष्टिः सतां दर्शनेऽस्तु भवत्तनूनाम् ॥३८॥

अनुचरकिंकरांलागीं आम्हां । इतुकें देईं मेघश्यामा । सर्वेंद्रियांचा अक्षयप्रेमा । असो जगदात्मा त्वत्पर ॥२३॥
तुम्हीच प्रेमा धरा म्हणसी । तरी इतुकें इयेविशीं । जैसें वर्षल्या जीवनासी । दाही दिशीं विखुरतो ॥२४॥
कीं पर्वताग्रींच्या धात्रीफळां । पतनें न घडे एकवळा । तैसा मानसा विषयव्याकुळा । न वचे लाविला अनुराग ॥४२५॥
भजनमार्गीं सप्रेम करणें । प्रवर्तती हें तुमचें करणें । यावेगळें अंतःकरणें । अभिलाषणें आन नको ॥२६॥
मयूर नाचे देखोनि घन । निम्न भूभागीं जीवन । ना तरी चंचरिकाचें गमन । पंकजवन लक्षूनी ॥२७॥
बाळें वांचती स्तनपानें । जळें जीजे यादोगणें । तेंवि आमुचीं सप्रेमकरणें । तुझेनि भजनें तोषोत ॥२८॥
ह्म्सालागीं मानसा गोड । सुगंधें पुरे षट्पदकोड । तेंवि तव प्रेमें सुरवाड । वाटो वाड मम करणा ॥२९॥
कोणे करणीं कैसें भजन । म्हणसी तरी तें विज्ञापन । सेवेसी कीजेल त्या प्रमाण कृपावरदानें ओपिजे ॥४३०॥
तव गुणकथनीं रंगो वाणी । प्रियकर तव कीर्ति हो श्रवणीं । परिचर्येच्या कर्मीं पाणि । चरण स्मरणीं मम रंगो ॥३१॥
गोडी साखरेचिये अंगीं । तैसा जगद्रूप तूं जगीं । त्या जगत्प्रणामालागीं । उत्तमांगीं प्रेम असो ॥३२॥
तुझ्या मूर्ति सचेतन । ज्ञानी योगी भगवज्जन । त्यांचें प्रियतम दर्शन । आम्हांलागून घडों दे ॥३३॥
देव द्विज पतिव्रता । तीर्थें क्षेत्रें माता पिता । तुझ्या प्रतिमा चेताचेता । नेत्रीं तत्त्वतां रुचों दे ॥३४॥
एवं तव कीर्तीचें श्रवण । तव गुणांचें संकीर्तन । तव चरणांचें नित्य स्मरण । पादसेवनपूर्वक ॥४३५॥
हस्तीं घडो तवार्चन । दास्यरूप कर्माचरण । जगद्रूपी जगज्जीवन । सख्यनमन आत्मत्वें ॥३६॥
व्यक्ताव्यक्त तुझिया तनु । पाहतां निरसोनि अभिमानु । घडो आत्मनिवेदनु । तुझिया चरणप्रसादें ॥३७॥
एवं नवविध भजन आम्हां । वरें ओपीं पुरुषोत्तमा । यावेगळा आमुचा प्रेमा । भवसंभ्रमा न रमों दे ॥३८॥

श्रीशुक उवाच - इत्थं संकेर्तितस्ताभ्यां भगवान् गोकुलेश्वरः ।
दाम्ना चोलूखले बद्धः प्रहसन्नाह गुह्यकौ ॥३९॥

शुक म्हणे कौरवमौळि । दांवें बांधिला जो कां उखळीं । लीलानाट्यें गोवळमेळीं । स्वयें गोकुळीं क्रीडतां ॥३९॥
त्याकारणें त्या गुह्यकीं । नारदकृपेचे ओळखीं । स्तवनीं नमनीं करूनि सुखी । प्रेमोत्सुकीं प्रार्थिला ॥४४०॥
नमनें स्तवनें संकीर्तनें । सप्रेमभक्ति अभ्यर्थनें । तोष पावोनि अंतःकरणें । हास्यवदनें हें बोले ॥४१॥

श्रीभगवान् उवाच - ज्ञातं मम पुरैवैतदृषिणा करुणात्मना । यच्छ्रीमदांधयोर्वाग्भिर्विभ्रंशोऽनुग्रहः कृतः ॥४०॥

षड्गुणांचा ऐश्वर्यराशि । श्रीभगवान तो गुह्यकांसी । म्हणे तुमच्या वृत्तांतासी । मी मानसीं जाणतसें ॥४२॥
जैसें तुमचें विगर्हित । देखोनि नारद करुणावंत । पूर्वकृतानुग्रहार्थ । मदोपहत करावया ॥४३॥
तुम्ही श्रीमदें मदांध दोन्ही । मद उतरावयालागूनी । दारिद्र्यांजन विवरूनि मनीं । तुमच्या नयनीं लेवविलें ॥४४॥
त्याचें करावया पथ्य । स्थावरयोनि केली प्राप्त । दिव्य क्रमिल्या अब्दशत । रोग समस्त शमेल ॥४४५॥
तेणें निर्मळ होईल दृष्टि । घडेल वासुदेवाची भेटी । पूर्वींच विदित मज हे गोठी । सर्वरहाटी समवेत ॥४६॥
दिव्यशताब्दें भरलीं पूर्ण । झालें दुर्मदक्षालन । जाणोनि मुनीचें वरवचन । दिधलें दर्शन तुम्हांसी ॥४७॥
तुझें दर्शन सर्व जनां । एथ होतसे जनार्दना । म्हणाल दुर्जनाचिया मना । सद्भावना कां नोहे ॥४८॥
तरी अविद्यासुषुप्ति झांकी दृष्टि । तेणें दिसती स्वप्नसृष्टि । वास्तवबोधें न घडे भेटी । जंव न प्रकटी रवि नेत्रां ॥४९॥
तेंवि अविद्यामायापटळें । झांकले आहेत ज्यांचे डोळे । गुरुभास्करें दृष्टि नुजळे । तंव त्यां न कळे मम महिमा ॥४५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP