अध्याय १० वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीगोविंदसद्गुरुपरब्रह्मणे नमः ।
चिन्मात्रैकसुखसुरवाड । फावोनि होय ज्याचेनि गोड । पुरे परमार्थाचें कोड । उपडे मोड भवाचा ॥१॥
विषयाकारें सुखावभास । भावूनि भ्रमे चित्प्रकाश । तो उमजवूनि ने मूळास । सुख निर्दोष चाखवी ॥२॥
चाखतां चाखणें चाखींव मुरे । केवळ सुखचि जें कां उरे । तें चिन्मात्रैकसुख निर्धारें । अमृतोद्गारें जो पाजी ॥३॥
सुख आणि सुखभोक्तया । पैस नुरेचि नांदावया । चिन्मात्रैक नमितां पायां । भोगावया सोपें तें ॥४॥
ज्याच्या लाभें दृश्य मरे । जेणें आसिलेनि हें स्फुरे । तो द्रष्टा तरी वेगळा उरे । माझा सुरे तद्दुःखें ॥५॥
ज्याचें मरूनि उरोनि भोगणें । नुरोनि पुरोनि अवगमणें । कांहीं न होऊनि सर्व होणें । कीं न होणें सर्वहीं ॥६॥
मरणाहूनि भोगणें कठिण । एवढें जयाचें अवघडपण । ऐसेंही भोगवी जी सघृण । गोडिसेपणें प्रकटूनि ॥७॥
जेथिंची चवी चाखिल्या मनें । दिविवैभवें मानी वमनें । फलप्रलोभीं विश्वास नमनें । आथिलेपणें अपरोक्षें ॥८॥
जें सर्वांगें आपण झालें । तया वियोगें प्रलोभिलें । तें वाचारंभणमात्र उरलें । कीं नाथिलें न घेतां ॥९॥
जळासी मृगजळाचा रस । कथूनि उपजवितां हव्यास । सरस नाथिला न करी सोस । होय ते फोस वक्तृता ॥१०॥
विरक्त परमार्थाचिये हांवे । भरूनि साधनीं घेती धांवे । तिही पावतां जेथींचे सिंवे । मग नाठवे स्मर्तृत्व ॥११॥
ऐशियेही प्राप्तदशे । भवांकुरांचें विरूढणें असे । तेव्हां स्वप्नींचीं माणुसें । गजीं आकाशें नांगरिती ॥१२॥
अग्निमाजि प्रेरिलें विरूढे । कीं समुद्रीं वरिखलें वेगळें निवडे । तरी दशा सिद्धिमंता न घडे । भवभयकोडें गोंवी हें ॥१३॥
भ्रांत्या नाथिल्या पुष्पितवाणी । इहामुत्रार्थफलभोगकथनीं । झकविती स्थितप्रज्ञालागोनी । हे कहाणी केउती ॥१४॥
ऐसें ज्याचें कृपेचें करणें । तो गोगोप्ता गोविंदपणें । प्रकट होतां अनाथकरुणें । तैं उद्धरणें मादृशीं ॥१५॥
चरणस्पर्शमणीच्या संगें । जीवदशेचें लोहत्व भंगे । चिन्मात्र कांचन तेंचि वेगें । असे निजांगें संचलें ॥१६॥
वाङ्मयामृताची सुरनिम्नगा । दृश्याभासकल्मषभंगा । ब्रह्मावबोधें उजळी जगा । अहं अघौघा ग्रासक ॥१७॥
जयाचा अपांगभाभास्कर । अनेकतेचा अलंकार । नाशी शर्वरी सशार्वर । नित्य सन्मात्र प्रकाशी ॥१८॥
ऐसा प्रभूचा अगाध महिमा । न सरे शताब्द कथितां ब्रह्मा । जिव्हा चिरल्या भुजंगमा । निखिल निगमा न वर्णवे ॥१९॥
चंद्र पूर्णत्वें अंबरीं । बिंबे प्रकटुनि क्षीरसागरीं । आनंदाचें भरतें भरी । समर्थ करी हें तैसें ॥२०॥
तेणें आज्ञापूनि मातें । सरतें केलें अपांगपातें । कृपामृताचें प्रज्ञाभरतें । भरलें पुरतें दयार्णवीं ॥२१॥
तेचि कृपेचा कल्लोळ । वरदटीका हे रसाल । श्रवणादरें सुखसुकाळ । सप्रेम भोगिती ॥२२॥
विग्रालागीं लावण्यमहिमा । पुंस्त्वरहिता सुरत वामा । न फावे तैसा तेथींचा प्रेमा । न रुचे अधमा विमुखातें ॥२३॥
एथ अधिकारी गुरुभक्त । उभयभोगीं अनासक्त । नवपंकजीं षट्पद रत । तैसे निरत हरिचरितीं ॥२४॥
तयेचेंचि हें श्रवणखाजें । येरां कुतर्कियां हें नसजे । ढेंकुणापरी रिघोनि शेजे । जे सुखनिजे भंगिती ॥२५॥
ते अपानींए रोमांकुर । अपानवातचि त्यां रुचिकर । सुगंध तैल श्मश्रुपर । त्यां दुष्कर तो भोग ॥२६॥
त्या क्षुरप्राय तीक्ष्णोत्तरें । वपनें त्यागिजे अंतरें । कीं आच्छादोनि अधोवस्त्रें । पार्ष्णिप्रहारें दडपिजे ॥२७॥
मग बैसोनि स्वसुखासनीं । सज्जनांचिये सभास्थानीं । ज्याच्या श्रवणें संसृतिहानि । तें एथूनि परियेसा ॥२८॥
भागवतींचा दशमस्कंध । त्यांतील दशमाध्याय हा विशद । षट्पद होऊनि विदुषवृंद । श्रवणोमोद अनुभविती ॥२९॥
दशमाध्यायीं दशम रस । भक्तिप्रेमा जो कां सुरस । जेणें सौभाग्य नव रसांस । ज्यावीण ओस अवघे ते ॥३०॥
दशमामाजीं श्रीकृष्णनाथ । बांधला रांगोनि उखळेंसहित । यमलार्जुन अंतर्गत । ते उन्मळीत तद्व्याजें ॥३१॥
कृष्णस्पर्शें नलकूबर । शापविमुक्त दिव्य शरीर । करूनि कृष्णासि नमस्कार । गेले निर्जर निजलोका ॥३२॥
ये अध्यायीं इतुकी कथा । शुक निवेदी जगतीकांता । श्रद्धापूर्वक परिसे श्रोता । तो अनंता प्रिय होय ॥३३॥
नवमाध्यायीं दामोदरा । उखळीं बांधोनि नंददारा । विगुंतली गृहव्यापारा । नलकूबरां हरि लक्षी ॥३४॥
नारदशापें नलकूबर । झाले यमलार्जुन तरुवर । हें ऐकोनि मात्स्यीकुमार । स्वयें सादर परिसावया ॥३५॥
सादर भूपति प्रश्न करी । शापकार्ण मोक्षणपरी । ते हे कथा सविस्तरीं । दशमामाझारीं परियेसा ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP