खंड ५ - अध्याय ४२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कपिल म्हणे जर महाभक्ति । तुझी गणनायका सर्व करिती । तरी विश्वाची स्थिति । मग कैसी संभवेल ॥१॥
जरी सर्वश्रेष्ठ तुज जाणती । तरी तें तुज सर्वभावें भजती । यांत संशय नसे चित्तीं । गणेशा माझ्या मनांत ॥२॥
परी श्रेष्ठार्थी जे नर । ती सिद्धि प्राप्त होण्या शीघ्र । देवेंद्रही तुज सोडुनअन्यत्र । अन्यास ब्रह्मपा कैसे भजती ॥३॥
चिंतामणि त्यास सांगत । मीं निर्मिलें जग समस्त । नाना भावांनीं तें युक्त । सर्व जन मजला न भजती सदा ॥४॥
चार मुख्य देवांचें उत्तम भजन । करून होती शुद्ध मन । तदनंतर मज भजती ते जन । ऐसें रहस्य हयामागचें ॥५॥
दुसरें ऐक माझें वचन । मायेनें मीं केलें प्रकाशन । तेणें सर्वश्रेष्ठ ऐसें मज न मानून । मोहित होती अन्यत्र ॥६॥
परी विप्रा मी जेव्हां न झांकित । माझा देह मायेनें तैं म्हणत । मोह विहीन तैंते जाणत । सर्वश्रेष्ठतम मजलागीं ॥७॥
मी नानाविध अवतार घेतले । देवादींच्या सदनीं स्वेच्छेनें भूषविलें । त्या त्या स्वरूपांचा समजले । जन मजला अज्ञानी ॥८॥
अग्रपूज्यत्व जें सत्यार्थें असत । सर्वपूज्यत्व विश्वांत । तें शिवानें गणेशाप्रत । दिधलें ऐसें ते म्हणती ॥९॥
माझ्या मायेनें मोहित । पार्वती मलसंभव मज मानित । शिवपुत्र शिवस्थापित । ऐसा होय विश्वास त्यांचा ॥१०॥
शिवगणस्वरूपी हा देव असत । मुक्ति देण्या क्षम नसत । कार्यसिद्धि स्वभावें असत । कामपूरक गणेश्वर ॥११॥
ऐसे बहुविध भाव प्रसृत । केले मीच जगांत । क्रीडा माझी ती असत । त्यायोगें काय घडतसे ॥१२॥
मज त्यागून अपरास । श्रेष्ठ मानिती ते विशेष । अन्यथा ते स्वानंदलोकास । पोहोचले असते सर्वजन ॥१३॥
निर्मिहानें कल्पापर्यंत । जग न होय प्रवर्तित । दुसरें कारण हें असत । कर्मयोगें जनयुक्त ब्रह्मांड ॥१४॥
नाना भावात्म मोहस्थ होत । अनेक निश्चययुक्त । अंतीं माझ्या भावांत । शुद्ध हृदय स्थिरावती ॥१५॥
महामुने जे वेदशास्त्रांत । तत्त्वज्ञ असती पारंगत । ते माझ्या भावभक्तींत । दृढ निश्चयें राहती ॥१६॥
मी साक्षात्‍ बुद्धिपति । बुद्धीचें चालन जगतीं । करून जीवांच्या चित्तीं । गणेशरूप लपवितसें ॥१७॥
त्यायोगें ते मज न ओळखती । परमपदरूप म्हणोनि भेद करिती । चार युगांत जनांची स्थिति । सांगतों कैशी असेल ॥१८॥
पूर्णभावें सर्व मानव भजत । मजला भक्तीनें कृतयुगांत । अज्ञान आवरणें हीन वदत । श्रेष्ठ ऐसें मजलागीं ॥१९॥
भावभक्ती एकपदानें हीन । त्रेतायुगांत होऊन । पंचायतन देवतांतें करिती पूजन । पांच देवां श्रेष्ठ मानिती ॥२०॥
तेथ सर्वांस साम्यें भजती । माझें सर्वश्रेष्ठत्व विसरती । ज्ञानाविरवित ते असती । चाराहून न जाणती मी श्रेष्ठ ॥२१॥
द्वापर युगांत दोन पदहीन । धर्मभावना होऊन । सुरादी भजती मज परी न्यून । त्या पूजेंत एक असे ॥२२॥
ते मज शंकराचा सुत मानितो । न्य़ूनरूप म्हणोनि ख्याति । जरी वेदशास्त्रपुराणीं प्रचीती । श्रेष्ठत्व्राची माझ्या असे ॥२३॥
तरी मोहानें युगप्रभावानें । मज न्य़ून मानितीं स्वमनें । सर्वं ब्रह्म हें वेदांचें म्हणणें । गणनायक ब्रह्म असे ॥२४॥
तरी समानकरूप सत्ता । कशी होणार अन्य देवांसी समानता । परी याचा विचार चित्ता । अज्ञानानें सुचेना ॥२५॥
कलियुगांत त्रिपादहीणन । ऐशा ज्ञानें भजती म्हणून । जन्मला गजानन मलापासून । ऐसें जन वर्णन करिती ॥२६॥
शिवानें दिलें वरदान । म्हणून गणेश्वरा अग्रपूजेचा मान । सर्वपूज्यत्व हा वर असून । दैत्यास प्राण्यांसही तो मिळतसे ॥२७॥
शिवाच्या वरप्रभावें वर्णिती । सर्व हें ब्रह्मरूप जगतीं । स्वसत्तासंयुक्त मज मानिती । न चिंतामणिरूपानें ॥२८॥
हा शंकराची भक्ति करून । लाभला म्हणती बळ महान । त्यायोगें वर लाभून । श्रेष्ठपद पावलासे ॥२९॥
कलियुगांत मज न भजतील । भक्ति एकपदा होईल । तिचा विनाश होईल । ऐसें जाण सुनिश्चित ॥३०॥
मतभेदानें मोहानें भजती । मज सोडून अन्य देवांसी जगती । शिव विष्णु आदींस मानिती । अग्रपूज्यत्वयुक्त ते ॥३१॥
त्यायोगें सर्व पूजनीयांत । अप्रपूज्यत्व नष्ट होत । तेणें सारें विघ्नयुत । नरकामध्यें दुःख भोगिती ॥३२॥
युगमानाच्या प्रसिद्धीसाठी केले । कर्मअकर्म विकर्मादी । भागशः भले । मी जरी ऐसें न केलें । माझें वरदान तसे निष्फळ ॥३३॥
कर्माविषयीं युगायुगांत । निष्फळ सारें होईल जगांत । नरक स्वर्गादी जे उक्त । ते सर्वही निष्फळ होती ॥३४॥
म्हणोनि मी खेळ दाखवित । शुभ अशुभमय सर्व स्थापित । माझ्याच वरदानें जगांत । मोहानें मज न जाणती ॥३५॥
मी सर्वांचें आदि बीज । हा दूर होई समज । हया ज्ञानाचा होता उमज । सत्यार्थें जन तरून जाती ॥३६॥
ऐसें माझें माझें कार्यजात । तुज कथिलें असे समस्त । तरी आतां संशय न धरितां चित्तांत । भज तूं मजला भक्तिभावें ॥३७॥
कपिल सांगे मुद्‍गलाप्रत । ऐसें बोलून अंतर्धान पावत । गणेश देव अकमात । खेद मजला जाहला ॥३८॥
परी नंतर माझ्या ह्रदयांत । त्यास पाहिला मी स्थित । त्यायोगें तो चिंतामणि प्रस्यापित । केला विप्रा मुद्‍गला मी ॥३९॥
त्यास मी भक्तिभावें समन्वित । नित्य पूजित तैसें भजत । ऐसें त्या बुद्धिमंताचें रहस्य आख्यात । गणेशलोकाचेंही तुला ॥४०॥
जैसें कथिलें तुजप्रत । तैसें तूं भजी भक्तियुक्त । तूं साक्षात्‍ देहधारी गणपति वाटत । यांत संशय मुळी नसे ॥४१॥
मुद्‍गला तुझ्या दर्शनमात्रें होतील । जन सारे पुनीत अमल । बोले ऐसें मुनि कपिल । तेव्हां मुद्‍गल विस्मित झाले ॥४२॥
स्वानंद लोकाचें महिमान । ऐकून मुद्‍गल विस्मितमन । कपिल महामुनीस वंदन । करून पूजिती चिंतामणि ॥४३॥
पुनरपि कपिलास प्रणास करून । मुद्‍गल जाती परतून । आपुल्या आश्रमांत शोभन । गणपतिभक्तींत निमग्न ते ॥४४॥
मार्ग्य म्हणती ऐलाप्रत । ऐसें हें रहस्य तुज सांगितलें समस्त । त्यातें भजता भावयुक्त । जडदेहें स्वानंदलाभ ॥४५॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐसें सांगून ऐलाप्रत । अनुज्ञा त्या नृपाची घेत । आपुल्या आश्रमीं जाण्य़ाची ॥४६॥
ऐल नपही त्यानंतर सतत । गणराजास एकलसें भजत । सेव्य स्वानंदग होऊन पूजित । भक्तिभावें आजीवन ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते चिंतामण्यंतर्धानवर्णनं नाम द्विचत्वारिंशत्तमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP