खंड ५ - अध्याय ४३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मी मुद्‍गला धन्य । कृतकृत्य झालों साम्य । जें ऐकिलें त्याचें रम्य । अन्यत्र कोठें न मिळणार ॥१॥
स्वानंदलोकाची कथा । ऐकतां हरली माझी व्यथा । माझ्या चित्तीं संतोष सर्वथा । जाहलासे अनुपम ॥२॥
आता सांगा पुढचा वृत्तान्त । ऐल भक्ति सतत करित । गार्ग्ये उपदेश करितां भजत । कोणत्या प्रकारें गणेशासी ॥३॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । जैसे गार्ग्यानें सांगितलें तयाप्रत । त्याच गाणपत्य मार्गनें भजत । गणनायका ऐल नृपति ॥४॥
स्कंदानें स्थापिला गजानन । लक्षनामक तेथ शोभन । त्यास नित्य अनन्य एकमन । विघ्नपासी भजे नृप ॥५॥
गणेशाहून श्रेष्ठ अपर । न कोणी हें जाणून । मुद्‍गला । एकनिष्ठ स्वभावें पूजनपर । जाहला लक्षविघ्नपाचा ॥६॥
दक्ष पुनरपि प्रार्थित । एकनिष्ठ तैसी अन्य भक्ति मजप्रत । मुद्‍गल सांगा जेणें होत विघ्नेश्वर संतुष्ट लोकांवर ॥७॥
मुद्‍गल सांगती दक्षा तुजप्रत । पंचायतन पूजा आदि सेवन उक्त । द्विजांची सेवाही । नियमित । मानावी सर्वसंमत जगीं ॥८॥
विघ्नरूप महाघोर । परत्र इह बंधनकर । ब्रह्ममार्गी संरोधकर । जाण दक्षा सर्वदा ॥९॥
त्या विघ्नराजास जिंकावें । विघ्नराज पूजनें भक्तिभावें । विद्यालाभार्थ पूजावें । नित्य आदरें शंकरासी ॥१०॥
यशप्राप्तिस्तव केशवपूजन । आरोग्यार्थ रविभजन । सौभाग्यलाभार्थ अंबिकापूजन । मनुष्यानें करावें ॥११॥
कर्मसिद्धीस्तव अग्निपूजन । होमादिक विधियुक्त करून । देवांस आहुति प्रदान । सर्व संतोषदायक ॥१२॥
ऐसें जाणून जो मर्त्य आचरित । स्वधर्म प्रजानाथा जगांत । ब्रह्मार्पणभावें सतत । त्याचा विधि तुज सांगितला ॥१३॥
अथवा जो असेल कामनायुक्त । त्यानेंहि करावें हें व्रत । कर्मांग देवतांसी समर्पित । सकला क्रिया श्रद्धेनें ॥१४॥
त्यास सर्वही समानरूप वाटत । स्वधर्माचरण श्रेष्ठ त्या वाटत । सर्वंसौख्यप्रद आनंदयुत । पंचायतन पूजा ऐसी करी ॥१५॥
विघ्नेश्वरास मध्यें स्थापावा । ईशान्येस विष्णु कल्पावा । आग्नेय दिशेस शंभु पूजावा । नैऋत्येस जगदंबिका ॥१६॥
वायव्येस आदरें रविपूजन । पुजाव्या पाच देवता मनापासून । पंचायतन भावें पूजन । मधला गणपति पूजावा ॥१७॥
सर्वांच्या पूज्यभावें वर्तत । सर्वाग्रीं ज्येष्ठराजरूप तेजयुक्त । ऐसा तो विघ्नप मध्ये राहत । त्याचें पूजन प्रामुख्यें ॥१८॥
अथवा पांच देवांतून स्वीकारित । स्वभावनुसार एक दैवत । मंत्र त्याचा स्थापन करित । जप त्याचाच करीतसे ॥१९॥
सर्व देव कलांशे स्थित । कलांशरूपें पंचायतनांत । त्या पांचासी पूजित । तैं सारें जग पूजिलें त्यानें ॥२०॥
गणेशदेव नाना देव निर्मित । कार्य सिद्धयर्थ ते लाभत । परी ते सर्व तत्स्वरूप वर्तत । पूजनीय नरासी ॥२१॥
ही सर्वात्मिका भक्ति । सांगितली तुज भावरीती । स्वैइष्टभावें सर्वत्र ध्याती । ध्यानकारणाहून परतत्त्वासी ॥२२॥
आतां ऐक एकनिष्ठ भक्ति । महा अद्‍भुत जी जगतीं । स्वल्पकाळें ती भक्तांप्रती । परमप्रिया भक्तांसी सदा ॥२३॥
आपल्या इष्ट देवतेंत । प्रतिष्ठित झालें विश्व समस्त । त्याच्या पूजनमात्रें लाभत । सर्वपूजेचें श्रेय साधका ॥२४॥
अनंतरूपभावें वर्तत । सर्वत्र आपुल्या कलांनी युक्त । त्यांचे पूजन न अपेक्षित । देहधारी मानवासी ॥२५॥
चराचरमय देव हा असत । चराचर पूजनीय वर्तन । असंख्यभावें असंख्यात । विप्रेंद्रा देव तो पूजावा ॥२६॥
चराचर समस्त जरी नर पूजित । तरी ब्रह्मांड हें सारें गणेशाच्या एका रोमरंध्रांत । असतें सदैव व्याप्त । कोटयावधी रोमरंध्रें असती ॥२७॥
म्हणोनि संपूर्न देहाचें पूजन । करण्याचें न प्रयोजन । भक्तवात्सल्यार्थ देहधारण करीतसे तो गजानन देव ॥२८॥
त्याचें करितां पूजन । अन्य सर्वांचेंही होत पूजन । या निश्चयानें पूजन भजन । करावें आपुल्या इष्ट देवतेचें ॥२९॥
अन्य देवतांच्या क्षोभतोष । ऐसा भक्त न इच्छी विशेष । एकत्वाचा आश्रय घेत । परी अन्यांस न निंदी न करी स्तुति ॥३०॥
आपुल्या इष्टदेवाच्या भक्तींत । निमग्न जो सदा असत । तो हया इष्टदेवपूजेनें लाभत । परम सिद्धि जगतांत ॥३१॥
तो विघ्नेश्वरानेंच सदा युक्त । कारण विघ्नेश्वरच सत्यार्थें जगांत । ज्या ज्या कोणाचें पूजत करित । तो तो मूलतः विघ्नेश्वर ॥३२॥
एकनिष्ठा महाभक्ति असत । ती न व्हावी कदापि खंडित । त्या संबधींचा मार्ग तुजप्रत । सांगतों सर्वसंशयनाशकर ॥३३॥
जैसें स्वशाखेनें युक्त । संध्यादिक करावें नरें विधिवत । तैसेंच अग्रपूज्य भावें सतत । गणनायकास पूजावें ॥३४॥
वेदवादांत संमत । सर्वांचा आदि पूज्य तो असत । अग्रपूजा न करितां नष्ट होत । वेदविरुद्ध सकल क्रिया ॥३५॥
शिवविष्णु प्रमुखांचें अग्रपूजन । सर्वप्रथम न होय म्हणून । त्यांचा त्याग इष्ट परी गजानन । कदापि नसे त्याज्य जगीं ॥३६॥
दुसरें ऐक माझें वचन । गणेश सिद्धिबुद्धिसहित महान सर्वांसी फलदाता शोभन । यांत संदेह कांहीं नसे ॥३७॥
धर्म अर्थ काम मोक्ष अधीन । तैसें सिद्धीच्या स्वाधीन । देवपंचक पराधीन । वेदवादानुसार ॥३८॥
कर्ता बुद्धि समायुक्त । स्व इष्टदेव त्या बुद्धीनें युक्त । बुद्धिअधीन जग समस्त । सर्व ज्ञान देहादिक पर ॥३९॥
त्या सिद्धिबुद्धींचा स्वामी प्रख्यात । गणेश ब्रह्मणस्पति नामें वर्णित । सर्वारंभीं त्यास न पूजित । नरकांत पडेल तो नर ॥४०॥
जेथ गणपतीस प्रथम न पूजिती । तेथ सिद्धिबुद्धी पतिव्रता न जाती । सर्वसिद्धिहीन दुर्बुद्धी ते देहांतीं । नरकांत जाती निःसंशय ॥४१॥
शिवविष्णु मुख्यांत कीर्तित । गणेश हा श्रेष्ठ देव विश्वांत । त्याच्या उल्लंघन मात्रें होत । अन्य देवताही भ्रष्ट सदा ॥४२॥
बलि असुर वैष्णवोत्तम । परी द्वेष्टा गजाननाचा दुर्मन । म्हणून विष्णूनें नरकांत टाकून । शासन त्यालाही केलें ॥४३॥
जैसे संध्यावंदन । तैसा सर्वांदी हा पावन । त्याचें करितां पूजन । एकनिष्ठा न खंडित होते ॥४४॥
जरी गणेशासी एकनिष्ठ । पूजित मानून त्यास इष्ट । तरी तो एकमेव पूज्य विशिष्ट । अन्यांचें पूजन खंडित होत ॥४५॥
ब्रह्म नानाविध वर्तत । म्हणोनि एकनिष्ठ भक्ति विशेषयुक्त । त्या ब्रह्माच्या पूजनें होत विश्व सारें पूजित भक्तीनें ॥४६॥
जग ब्रह्मयुत देव असत । स्व-इष्ट संपूर्णभावें सतत । त्यास पूजितां होत । सकल संतुष्ट सर्वकाळ ॥४७॥
जैसा मानदा भक्त असत । तैसाचि एकनिष्ठ देव राहत । एकभक्ताधीन सतत । तेथेचि राही मूलाधारे ॥४८॥
ऐसें हें त्रिविध भजन । तुजसी सांगितलें पावन । या भक्तिमार्गें वांछित लाभून । कृतकृत्य नर होती ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते भक्तिमार्गवर्णनं नाम त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP