खंड ५ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल पुढें सांगती । दुर्वेचें माहात्म्य सुखद अती । ज्या दूर्वेनें परम तृप्ती । जाहली द्विरदाननाची ॥१॥
एके दिवशीं नारद जात । जनकाच्या राजवाडयांत । आतिथ्य स्वीकारून म्हणत । जनकनृपासी तो मुनी ॥२॥
धन्य तूं गणनाथाचा भक्त । परम भाविक जगांत । गणाध्यक्ष तुजला देत । मनेप्सित सारें सर्वदा ॥३॥
नारदाचें ऐकून वचन । हांसून म्हणे जनक वचन । योगज्ञ तो ज्ञानघन । याज्ञवल्क्यें योग मज कथिला ॥४॥
पूर्ण शांतिप्रद शुभप्रद । विप्रा हा गाणेशयोग कीर्तिद । मज दिला त्यानें मंत्र विशद । एकाक्षर गणेशाचा ॥५॥
कृपा करून मजप्रत । साधन त्याचें सांगत । त्यापरी साधिला मीं एकचित्त । उत्तम योग हा महात्म्याचा ॥६॥
गुरुसम मी योगी झालों । गणेशकृपेनें सुख पावलो । म्हणून अभिन्नत्व लाधली । गणेशासी मुनिसत्तमा ॥७॥
मी नसे गणनाथाहून भिन्न । गणेशकृपा करी धन्य । मीं जें जें चिंतिलें तें तें देऊन । विघ्नप कैसा मज तोषवी ॥८॥
ज्यांसी नसे योग ज्ञात । त्यांना हें भ्रांतिपूर्ण वाटत । पंचधा चित्तवृत्ति ज्ञात । त्यांसी प्रकाशदाता प्रभू ॥९॥
चिंतामणि तो स्वयं साक्षात्‍ । क्रीडा करी माझ्या ह्रदयांत । आता योगींद्रा मी जनक सांप्रत । भिन्न कैसा असणार ॥१०॥
त्यांतही गणेशकृपादिक । तरी मी कर्ताहर्ता पालक । ऐसा भ्रांतपर विचार उद्रेक । कैसा मनीं उद्‍भवावा ? ॥११॥
नारदा योगिसत्तमा सांप्रत । भ्रांतासम भाषण तुझें वाटत । तें ऐकतां क्रोधसंयुक्त । नारद म्हणे त्या महाभागासी ॥१२॥
निर्भर्त्सना प्रथम करित । म्हणे जनका तूं मदोन्मत्त । राजेंद्रा तूं नश्वररूप असत । कैसा होशील गणेशाकार ? ॥१३॥
तूं देहवान भ्रमधारक । गणेश देहातीत निःशंक । ब्रह्मणस्पति नायक । वेद ऐसें सांगताती ॥१४॥
त्याची पूर्णभावें शरीरावर । सत्ता असते योगमयी उदार । योगीदेहांत ती सत्ता थोर । कदापि न वसे अज्ञ नृपा ॥१५॥
समाधियोगें तो गणेश ख्यात । योगींद्र नामें जगांत । प्रारब्ध देहधारी नर असत । योगी ऐसा ख्यात जगीं ॥१६॥
नरतुल्या सत्ता शरीरावर । असते त्याची सर्वत्र । गर्विष्ठ योगमहात्म्यानें अनुदार । जाहलास जनका तूं ॥१७॥
गजाननाच्या प्रसादें होईल । गर्व तुझा भंग या वेळ । ऐसें बोलून नारद योगी सबल । गेला गणपा सन्निध ॥१८॥
गणेश होता कैलासांत तेथ जाऊन त्यास वंदित । गजानन घोष करित । प्रणाम करी विनयानें ॥१९॥
तदनंतर सर्व वृत्तान्त । जनकाचा त्यास सांगत । पुनरपि त्यास वंदित । नंतर गेला तेथून ॥२०॥
नारद गणनाथाच्या गायनांत । आसक्त सदा भक्त असत । तो गेल्यावर स्वयं होत । गजाननरूप ब्राह्मणाचें ॥२१॥
वृक्ष ब्राह्मण होऊन । जनकगृहीं करी गमन । कोड फुटलें सर्वांगीं दाखवून । किडे पडले व्रणांत ॥२२॥
तो ब्राह्मण थरथर कापत दुर्गंधी सुटलीं अमित । पूं रक्त घामानें व्याप्त । माशा फार घोंघावती ॥२३॥
राजाज्ञा लाभता सोडित । त्या ब्राह्मणा राजवाडायांत । तैं त्या राजाजवळ याचित । इच्छाभोजन ब्राह्मण तो ॥२४॥
जनक राजा पूजा करित । प्रथम त्या याचका सम्मानित । तदनंतर महाप्रसाद अर्पित । उत्तमोत्तम अन्नाचा ॥२५॥
तो वृद्ध ब्राह्मण तें अन्न खात । पुनः मागे अन्न क्षुधार्त । दहा हजार वेळा वाढित । तदनंतर अन्न जनक नृप त्यासी ॥२६॥
तेंही त्यानें भक्षिलें । आणखी अन्न याचिलें । घरांत जें जें शिजविलें । तें तें दिलें जनकनृपें ॥२७॥
तदनंतर न शिजलेलें । धान्य त्यासी वाढिलें । त्या द्विजोत्तमें तेंही भक्षिलें । क्षणार्धात तैं दक्षा ॥२८॥
संपूर्ण नगरांत शिजविलेलें । अथवा जें जें साठविलें । तें तें संपूर्ण धान्य आणिलें । जनकनृपें याचकास्तव ॥२९॥
तेंही त्या याचकें भक्षिलें । राज्यातून तैं धान्य आणलें । पुरप्रांतीं जें उरलें । तेंही सर्व दिलें याचकास ॥३०॥
परी त्याची तृप्ती न होत । जें जें दिलें तें ब्राह्मण भक्षित । म्हणे नृपवरा मजप्रत । आणखी अन्न वाढावें ॥३१॥
जनक नृप लज्जायुक्त । कांहीं उत्तर न देत । जेव्हां तो मुनिवर्य त्यास म्हणत । हासत हासत त्या वेळीं ॥३२॥
तूं जरी गणेश निश्चित । तरी कैसा सत्ताविवर्जित । कर्तुमकर्तुं अन्यथा कर्तुं शक्त । गजानन ऐसें वेद सांगती ॥३३॥
तूं जर गणेश साक्षात । तरी स्वस्थ कां बसलास सांप्रत । तें सांग सारे मजप्रत । योगमदानें भ्रांत तूं ॥३४॥
राजेंद्रा संशय नसे यांत । प्रत्यक्ष तूं नरासम वाटत । गणेश न वाटसी साक्षात । अन्यथा सत्ता कुठे गेली ? ॥३५॥
ऐसें बोलून गणेशान । ब्राह्मण रूपातच बाहेर पडून । ल लोकांसन्निध जाऊन । याचना करी अन्नाची ॥३६॥
त्या क्षृधातुरासी सांगती । नगरलोक विस्मितमती । जें जें होतें जवळी निश्चिती । तें तें सारें नृपें नेलें ॥३७॥
तें सारें तूं अन्न भक्षिलें । आता आमुच्या घरीं कांहीं न उरलें । अरे वाडव कुठून झालें । आगमन तुझें न कळें कोणा ॥३८॥
तें ऐकून हसत । विप्र तो येथतेथ फिरत । पुरप्रांतीं जाता पाहत । वाडवाचें एक सदन ॥३९॥
त्रिशिर नामा मुनिवर । अयाचित वृत्ति उदार । गाणपत्यश्रेष्ठ योगपर । पत्नीसहित तेथ होता ॥४०॥
विरोचना नाम त्याची कान्ता । गणेशपूजनीं सुख शांतता । भजनीं मननीं गुणवत्ता । दांपत्यानें प्राप्त केली ॥४१॥
त्या दंपतीसी पाहत । गणेश प्रवेशला त्या आश्रमांत । तेथ धातु धान्यादी नसत । काही नव्हतें खावयासी ॥४२॥
त्या त्रिशिरा मुनीस भेटत । तृप्तिकर अन्न ब्राह्मण तो याचित । म्हणे मी असे क्षुधार्त । गणपति त्या रूपांत ॥४३॥
त्यास त्रिशिर ब्राह्मण म्हणत । धान्य अल्पही न मम गृहांत । दरिद्रयांचा महाराज ख्यात । असे मी हो निःसंशय ॥४४॥
माझ्यासम दरिद्री जगांत । नसेल मानव कोणी सांप्रत । गणेशपूजनार्थ मीं घरांत । आणले होते दूर्वांकुर ॥४५॥
त्यांतला एखादा असेल उरला । त्याविना अन्य नसे मजला । द्रव्यांश वा अन्नांश या वेळां । घरामध्यें उपलब्ध ॥४६॥
त्याचें तें वचन ऐकत । तैं ब्राह्मण बोले क्षुधार्त । भक्तिपूर्वक ऐई मजप्रत । दूर्वांकुर जो उरला असे ॥४७॥
तेव्हां विरोचन विनत । गजाननासी मनीं ध्यात । उरला एक दूर्वांकुर देत । अन्य अन्न कांहीं नव्हतें ॥४८॥
तिनें भक्तिपूर्वक जो दिला । प्रेमानें दूर्वांकुर त्याला । तो त्या वृद्ध ब्राह्मणें भक्षिला । तृप्त जाहला पूर्णत्वें ॥४९॥
त्रिशिरा विप्राच्या भक्तीनें संतोषित । गणनायक दर्शन देत । गजमुखादि चिन्हांनी युक्त । प्रकटला साक्षात्‍ गजानन ॥५०॥
लंबोदरास प्रत्यक्ष पाहती । तैं भक्तिभावें ती दंपती । पुनः पुनः त्यास नमिती । आनंदाश्रु नयनीं त्यांच्या ॥५१॥
कर जोडून त्यास स्तवित । पूजा करून भावयुक्त । गणेशासी आम्हीं वंदित । सर्व प्रियकरास नमन । करूं ॥५२॥
ब्रह्मासी ब्रह्मनाथासी । विघ्नेशासी हेरंबासी ॥ परेशासी मूषकध्वजासी । आत्म्यासी तुजला नमन असो ॥५३॥
अनात्म्यासी लंबोदरासी । अनामयासी अनाधारासी । सर्वाधारासी सुमूर्तीसी । वक्रतुंडा तुज नमन ॥५४॥
सर्वपूज्यासी आदिमध्यान्तहीनासी । तदाकारासी ढूंढीसी । सर्वांच्या मातापित्यासी । ज्येष्ठराजासीं नमन असो ॥५५॥
सर्वादि शूर्पकर्णासी । पूर्णासी धरणीधरासी । शेषनाग नाभिभूषणासी । चिंतामणीसी नमन असो ॥५६॥
सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । स्वानंदीं निवास करणारासी । भक्तांस शांतिदात्यासी । शांतिनिष्ठासी नमन असो ॥५७॥
सिद्धिबुद्धिवरासी । नमन मूषकवाहनासी । ज्येष्ठांस ज्येष्ठ पददात्यासी । गजाननासी नमन असो ॥५८॥
धन्य माझी माता पिता । धन्य कुलशीलादिक सर्वथा । वेदान्त गोचर पाहिला आता । गणाधीश मीं प्रत्यक्ष ॥५९॥
आम्ही पतिपत्नी धन्य असत । गणनाथासी प्रत्यक्ष पाहत । हें आश्चर्य अघटित । शांतीनें लाभतो गजानन ॥६०॥
वेद ज्याचें रूप न जाणती । योग्यांसही जो अगम्य जगतों ब्रह्मा विष्णु शिवही न जाणती । ऐसा हा पर अप्रमेय ॥६१॥
परात्पर तूं गजानन । प्रकटता धन्य माझें सदन । कैसें केलेंस आगमन । माझ्यासम कोणी न धन्य ॥६२॥
या समस्त ब्रह्मांडांत । गणेशा आज मजसम नसत । तुझ्या पादपद्याचें लाभत । प्रत्यक्ष दर्शन आम्हांसी ॥६३॥
ऐसे करीतसें स्तवन । पत्नीसहित तो ब्राह्मण । भक्तिप्रभावें कंठ दाटून । नाचूं लागला परमानंदें ॥६४॥
रोमांचित झालें शरीर । डोळयांतून वाहे आनंदनीर । तयासी वचन हितकर । गणनाथ तेव्हां बोलती ॥६५॥
त्याची भक्ती पाहून । आनंदाश्रु ढाळी गजानन । शरीर रोमांचित होऊन । त्यासी म्हणे तूं धन्य ॥६६॥
तूं केलेलें स्तोत्र उत्तम । मज वाटें हें अभिराम । जनांसी होईल परम । भक्तिवर्धक माझें जगीं ॥६७॥
जो हें वाचील अथवा ऐकेल । तो सर्व इच्छित लाभेल । भक्तिमुक्ति मिळून होईल । ब्रह्मभूत मत्प्रिय ॥६८॥
त्रिशिरा वर माग मनवांछित । ते मी देईन समस्त । महायोग्या मी तोषित । भक्तीनें तुझ्या निःसंशय ॥६९॥
ऐसें गणेंशवचन ऐकून । त्रिशिर स्त्रीसहित करी वंदन । भक्तिभावें परिपूर्ण । महामुनी विनवी गजाननासी ॥७०॥
नाथा मज कां मोहविसी । सर्व भ्रांतिप्रद अन्य मजसी । म्हणोइ केवळ स्थिर भक्तीसी । याचितों मी तुझ्या जवळ ॥७१॥
तें ऐकून विस्मित । विघ्नराज बोले तयाप्रत । सुदृढ भक्ति मात्र मागत । वाडव तूं विप्र थोर ॥७२॥
महायोग्या तुज लाभेल । पूर्ण भक्ति जी विमल । त्या योगें वशित्व मिळेल । माझ्यावरी तुजलागी ॥७३॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला ब्रह्मनायक गजानन । स्त्रीसहित त्रिशिराचें वदन । खेदयुक्त तेव्हां झालें ॥७४॥
तंव तेथ आश्चर्य एक घडत । गणेशकृपा अयाचित । होऊन शीभे रत्नयुक्त । त्रिशिर ब्राह्मणाचें सदन तैं ॥७५॥
सोन्याच्या भिंती चमकत । नाना सेवकजन दारांत । सुवर्णयष्टि घेऊन हिंडत । दासीजनही असंख्य ॥७६॥
सेवा करण्यास तत्पर । ऐसे आज्ञाधारक किंकर । नाना संपत्तियुक्त घर । पाहून विस्मित पतिपत्नी ॥७७॥
दास दासी पुढतीं येती । सेवा त्यांची करू इच्छिती । ते पाहून आश्चर्य जगतीं । त्रिशिर म्हणे स्वपत्नीला ॥७८॥
आपुली भक्ती दूर करण्यासी । माया दाखवी विघ्नेश्वर आम्हांसी । तेव्हां जागरूक राहून भोगांसी । उपभोगी पतिव्रते ॥७९॥
ऐशिया परी मदविहीन । होऊन करिती सुखसेवन । बहुत देती याचका दान । परि न्यूनता न येई ॥८०॥
तें पाहून अति विस्मित । अखंडित ऐश्वर्य घरांत । गणेशप्रसाद हा असत । आम्हांवरी सर्वदा ॥८१॥
दक्षा तुज हें सांगितलें । दूर्वामहात्म्य जें भलें । गणेश तोषक जें झाले । सर्वसिद्धिप्रदायक ॥८२॥
गणेशाच्या शरीरावरती । जीं असंख्या रोमरंध्रें असती । अनेक ब्रह्मांडें त्यांत राहती । नानाविध ब्रह्मही ॥८३॥
एक विघ्नेश्वर तृप्त होत । तरी ति सर्व संतुष्ट । त्या तृप्तीचें फल अमित । कोण वर्णू शकेल ॥८४॥
म्हणोन दूर्वेसमान । नसे जगतीं कांहीं पावन । त्रैलोक्यही वाटे न्यून । अपार पुण्यादा दूर्वा ही ॥८५॥
गणेशासी तोषवित । ऐसा दूर्वेचा महिमा ख्यात । भुक्तिमुक्तिप्रदायक होय । पाठकां वाचकां सर्वांसी ॥८६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते त्रिशिरसश्चरितवर्णनं नाम एकोनत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP