खंड ५ - अध्याय ४१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । कपिल पुढें वर्णन सांगती । मी विचारलें गजाननाप्रती । तुझ्या भक्तियुक्त जाती । नर ते स्वानंदलोकांत ॥१॥
ते कोणत्या मार्गें जाती । तें सांगावें मजप्रती । चिंतामणि म्हणे तयाप्रती । मत्परायण जे मन्निष्ठ ॥२॥
माझ्या उपासनेनें युक्त । अंतकाळीं मज स्मरत । ते येती माझ्या लोकांत । कपिल महामुने निःसंशय ॥३॥
स्वस्वरूपाढय विमान पाठवित । त्यांना मीं आणण्या त्वरित । शिवविष्णु आदिदेवा न दिसत । निजलोकांतून तें कदापि ॥४॥
त्या विमानांत बसून । गणांसह माझे भक्तजन । देहधारी स्वयं येऊन । स्वर्ग पाहून विस्मित होती ॥५॥
ऐसा विमानस्थ भक्त । देवां तैसा योगिजनां न दिसत । ते स्वानंद चक्षुहीन वर्तत । मृतदेहमय सारे ॥६॥
शक्तिलोक उल्लंधून । सौरवैष्णव शैव पार करून । तो माझा भक्त प्रसन्न । माझ्या लोकीं पोहोचतो ॥७॥
तेथ प्रथम अज्ञानमय अंधार । पाहतो तो स्वानंदस्थ नर । देहधारण कारणें समग्र । गणांसी अंधकार न भासे ॥८॥
विमा नाच्या प्रभेनें । तैसेंचि माझ्या स्मरणानें । उल्लंघी भक्त अयुत योजनें । तेव्हां प्रकाश दिसे त्यासी ॥९॥
तेथ भ्रामरिका देवी वसत । प्रचंड देहधारिणी त्या स्थानांत । ज्योतिर्मय स्वरूपें भयद होत । अज्ञानयुक्त नरासी ॥१०॥
जन्ममृत्युभय समस्त । नाना भेदकर भ्रमयुक्त । माझ्या मायेनें संचार करित । ऐसें जाण रहस्त तूं ॥११॥
ती भ्रामरी तेथ राहत । सर्व भूतांसी फिरवित । स्वाआधारें तेथेच असत । स्वानंदमय शरीर तिचें ॥१२॥
तिज पाहून भयभीत । मज स्मरे विशेषें भक्त । तेव्हां गण त्यास आश्वासन देत । पुढे नेती मानोत्तमासी ॥१३॥
तिच्या मस्तकीं जी शक्ति । आधाररूपिणी ती ज्योति । अज्ञान्यांस सदा ती । विप्रा भयप्रद वाटतसे ॥१४॥
जीवरूप तें सर्व भेदमोहधर । शिवरूपधारी तदाधार । देहादींचा महायोग्या आधार । असे जीव संज्ञित ॥१५॥
स्वयं आधारहीन तो असत । खरा आधार परमात्मा ख्यात । सर्वांचा पूर्ण आधार वर्तत । त्या ज्योतीनें कल्पित जो ॥१६॥
आधारशक्ति ती थोर । त्या नांवानें ख्यात योगपर । त्या शक्तीनें चित्तांत श्रेष्ठवर । द्विविध मीं अज्ञानी जनांच्या ॥१७॥
जीवात्मा परमात्मा रूपें वर्तत । माया परा तेथ वर्तत । माझ्या ध्यानबळेंच उल्लंघित । मानवभक्त ती माया ॥१८॥
पुढें तैं त्यास गण नेती । माझ्या दर्शनाची उत्कंठा चित्तीं । त्याच्या मस्तकीं एक शक्ति । ज्योतिशरूपी विलसत ॥१९॥
ती शक्ति कामदायिनी । शोभते हर्षप्रदायिनी । जन्ममृत्युयुत सर्व असुनी । भेदरूप तें असे ॥२०॥
त्याच्या प्र आत्माकार । त्यांच्या योगें योगरूप सुंदर । त्या शक्तीनें कामयुत प्रकृतपर । देहात्मयोग घडतसे ॥२१॥
उत्पत्तिस्थितिसंहारयुक्त । भ्रांतिधर ती स्मृत । नाना भेदमय पूर्ण असत । क्षयवृद्धयादींनी युक्त ॥२२॥
आत्मा सदा अमृताचा आधार । ऐसें सांगे वेद शास्त्र । वृद्धिक्षयहीन अपार । उत्पत्तिस्थिति नाश न त्यास ॥२३॥
भेदयुक्त सदैव वांछित । किमर्थ मिळत आत्म्याप्रत । आत्मवैचित्र्य पाहत । विरुद्धरूपें मानदा ॥२४॥
कामयुक्त असि पदें होत । द्वंद्वभावस्थ मोह प्रभाव युक्त । जग परस्परहित । तत्‍ त्वं असि या वाक्यांत ॥२५॥
म्हणोनि ती शक्ति ख्यात । कामदा सर्व मोहिनी प्रशस्त । असि म्हणजे आहेस रूपयुक्त । महामाया ती माझी ॥२६॥
भ्रामरीनें भ्रामिका शक्ति न दिसत । ती पदस्था माया ज्ञात । जाणी तूं प्रभावें अद्‍भुत । आधारशक्तीस ना अन्य आधार ॥२७॥
तत्पदस्था शक्ति ती वर्तत । कामदेची शक्ति कामदाच असत । सर्वदा सर्वरूपा असि पदमयी सतत । माझा लोक तिच्या मस्तकावरी ॥२८॥
मायेनें तो मी रचित । स्वस्वरूपक स्वानुभवयुत । तेथ येऊन महाभक्त । इक्षुसागर जलपान करी ॥२९॥
त्यायोगें तो क्षणांत । ज्योतीरूपधर होत । भेदाभेदहीणन होऊन पाहत । मजसी तैं तो भक्त माझा ॥३०॥
माझ्या दर्शनें नर ब्रह्मभूत । होतो निःसंशय त्वरित । स्वेच्छेनें निजलोकांत । येथे तेथे फिरेल ॥३१॥
सगुण निर्गुण होऊन । स्वानंदग सदा पावन । त्यास पुनः भ्रांतिभय न । कल्पकोटिशत वर्षांनीही ॥३२॥
मुनिसत्तमा वेदवादी सांगती । ऐसी ही वेदान्त स्थिति । महाप्रलयांत एकत्र येती । माझ्यांत चतुर्विध सृष्टिजीव ॥३३॥
ते अज्ञानानें युक्त । त्यांसी पुनरपि मी सृजित । ऐसें माझ्या लोकीचें रहस्य अद्‍भुत । संक्षेपें तुज कथिलें असे ॥३४॥
सुसिद्धिप्रद मार्गहीन । कपिल बोले तें ऐकून । तुझी उपासना करून । बहुत जाती तुझ्या लोकीं ॥३५॥
विघ्नेशा सामान्यजन । तैसेही योगीजन । ब्रह्मभूत ते होऊन । पुनः न पडती भूवरी ॥३६॥
त्यांस पुनर्जन्म नसत । त्यायोगं जग क्षीण होत । तरी तूं पुनः पुनः निर्मित । क्षीण होतां हें जग कैसें ॥३७॥
हें पूर्ण विश्व नित्य विलसत । त्यायोगें तू क्रीडापर खेळत । हें रहस्य सांगावें मजप्रत । चिंतामणि तैं त्यास म्हणे ॥३८॥
जैसा हे विप्रा युद्धकाळांत । मी अनंत रूपानें लढत । मायेनें युक्त क्रीडा करित । विश्वरक्षणा कारणें ॥३९॥
दैत्यादिक सर्व मारून । पुनः एकरूप धरून । मी होतों सर्वभावज्ञ । लीलेसाठीं अवतार घेई ॥४०॥
तैसेंचि मायाबळें निर्मिंत । नूतन मीं सारें जगत । विश्व सर्वदा तैसेंचि राहत । न्यून वा अधिक होत नसे ॥४१॥
कपिल विचारी चिंतामणिप्रत । तुझे भक्त असंख्यात । नर नारी प्राणिजात । स्वानंदलोकीं अंतीं जाती ॥४२॥
तूं अनंत स्वानंदगामी असत । त्यांचा निवास कैसा त्या नगरांत । तेथ कैशी जागा मिळत । गर्दी होत असेल बहु ॥४३॥
ते त्या नियत लोकांत । कैसे राहती असंख्यात । तैं चिंतामणि उत्तर देत । कल्पान्तपर्यंत ते भिन्न ॥४४॥
कल्पान्त होतां महालयांत । माझ्या देहीं ते विलीन होत । युगप्रारंभीं मीं सर्व भिन्न करित । युगान्तीं मद्रूप योगभावें ॥४५॥
माझ्या देहीं योगभावें येती । अज्ञानयुत जे असती । ते योगनिद्रा अनुभवती । विप्रेंद्रा माझी बुधसंमत ॥४६॥
स्वानंदस्थ सारे जन । ज्ञानयुक्त जे महान । ते माझ्या देहीं लीन । योगींद्रा होती योगभावें ॥४७॥
पुनः सृष्टि निर्माण होत । तैं अज्ञानयुत विश्व प्रकटत । माझ्या मायेंत लीन असत । यांत संशय कांही नसे ॥४८॥
जे ज्ञानपूर्ण माझ्या देहांत । विलीन होती भक्त । ते पुनर्रचना समयांत । पुनः भिन्नरूप न होती ॥४९॥
योगबळें ते तेथ निवसत । प्रतिकल्पीं माझ्या देहांत । सायुज्य माझें तें लाभत । ऐसें रहस्य जाणावें ॥५०॥
कपिल पुनरपि विचारित । जे विघ्नेशा तुझी वांछित । नित्य आदरें प्रेमभाव युक्त । योगानें ते कोठें जाती ॥५१॥
कल्पोकल्पीं महाभाग भक्त । जे पूर्णभावें मुक्त होत । ते कल्पान्तापर्यंत । अपारसंख्यांक कुठें राहती ॥५२॥
चिंतामणि म्हणे कपिलाप्रत । दशयोजन सहस्त्र प्रमाण असत । माझा योग योगि जना असत । सर्वकाळ हे सत्य ॥५३॥
परी जे माझे मुमुक्षू भक्त । त्यासाठीं स्थल मर्यादा नसत । अपार योजनें विस्तार वर्तत । त्यास्तव माझ्या लोकाचा ॥५४॥
स्वानंद लोक अमर्याद असत । तेथ सेवनोत्सुक भक्त वसत । संख्यातीत ते प्रेमरसप्लुत । माझे भक्त सर्वदा ॥५५॥
प्रतिकल्पीं जे भजत । नवधा भक्तीनें श्रद्धायुक्त । त्यांची व्यथा नष्ट होत । ते सारे माझ्या लोकीं वसती ॥५६॥
जे असती होणार पूर्वी झाले । ते माझे भक्त भले । माझ्या सन्निध सदैव राहिले । असती सदा मोहप्रद ॥५७॥
महाभागा भक्तिसम नमत । अन्य कांही मजला प्रिय जगांत । भक्तीच्या अधीन मी असत । भक्तसन्निध महा आनंदें ॥५८॥
संचार मी सदा करित । जेथे जेथे माझे भक्त । तेथ मी सर्वभावें राहत । तयांसी रक्षी सुविहवल ॥५९॥
नवधा चित्त भावें मोहित । भक्तांसमीप मोदें राहत । भक्तांचें माहात्म्य भजत । तदर्थ कार्यमग्न सदा ॥६०॥
जितुके माझे भक्त वाटत । प्रिय मजला या जगांत । तितुका स्वानंद न वाटत सिद्धिबुद्धि सुत दोन्ही ॥६१॥
माझा देह्ही न अधिक प्रिय । जैसे माझे भक्त सदय । कपिल विचारी हे सगुण आनंदमय । प्रश्न आणखी एक असे ॥६२॥
स्वानंदसंस्थ जे तुमचे गण । भक्तांसी नेण्या येती सगुण । ते ज्योतिरूप असून । भक्तांस कैसे ते दिसती ॥६३॥
चिंतामणि तैं उत्तर देत । माझ्या मायेनें हें घडत । त्या मायेस महायोग्या जगांत । दुर्लभ काय असणार ॥६४॥
माझ्या कृपेनें युक्त । ते चर्मचक्षूंनी गणांस पाहत । स्वानंद सर्वरूपमार्ग असत । तोही सांगतों तुजला मीं ॥६५॥
जे असती भेदयुक्त । त्यांत गण भेदसंयुत दिसत । जे स्वयं भेदहीन वर्तत । त्यांस ते वाटती आत्मसंस्थ ॥६६॥
सदा आत्मस्थपणें निर्गुण । त्यांना वाटती माझे गण । स्वसंवेद्यात्मक महान । ऐसें रहस्य जाणावें ॥६७॥
जलादींत जैसें प्रतिबिंब पडत । तैसे माझ्या लोकांत । जे जन राहती ते दिसत । सर्व मंडळी विश्वांत ॥६८॥
ऐसें माझ्या लोकीचें वर्णन । सांगितलें तुज समजावून । आतां मीं जातों परतून । महामुने माझ्या लोकांत ॥६९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते स्वानंदस्थितिवर्णनं नामैकचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP