खंड ५ - अध्याय ३०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । दूर्वार्पणाचें माहात्म्य ऐकलें । परि चित्त ना पूर्ण तोषलें । दूर्वेसम अन्य न त्रिभुवनीं असलें । सर्वसिद्धिप्रद साधन ॥१॥
योगामृत परायण मी असत । म्हणोनि अद्यापि न तृप्त । दक्ष म्हणे मुद्‍गलाप्त । जनककथा आणखी सांगावी ॥२॥
वृद्ध ब्राह्मणाचें रूप घेऊन । जनकाचा गर्व हरण । करून गेला गजानन । तदनंतर त्यानें काय केलें ॥३॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐक जनकाचें चरित्र सांप्रत । गणेश्वर निघून जातां होत । दुःखयुक्त जनक राजा ॥४॥
ह्रदयांत शोक करी बहुत । नारदें कथिलें तें सत्य वाटत । गर्व दाटला मम वित्तांत । म्हणोनी दुःख पावलों मीं ॥५॥
नरदेह भक्तिसाधन प्रख्यात । तो लाभतां गणेशास न भजत । ऐसा जाणावा नर वंचित । मायाप्रभावे या जगीं ॥६॥
स्वहित साधण्या कर्मनिष्ठांनी । तपफल लाभण्या तपोनिष्ठांनी । ज्ञान संपादण्या ज्ञाननिष्ठांनी । सेवावा श्रीगजानन ॥७॥
योग्यांनीं योगसिद्धीस्तव । सेवावा हा ब्रह्ममय देव । ब्रह्मणस्पति वाचक अपूर्व । देहधारी हा साक्षात ॥८॥
ऐसे वेदांत असे कथित । यांत संशय तिळमात्र नसत । त्या गणेशास विसरून भ्रांत । मूर्खासम मी जाहलों ॥९॥
योगप्रभावें मदोन्मत्त । मनुजासम गणेशास मानत । मीच गणेश ऐसे म्हणत । अज्ञानीं मी मूढमति ॥१०॥
गणेशभजन मुख्य मानित । तेंच सदैव जो करित । तो योगींद्र गुरु साक्षात । त्यासम अन्य कोणी नसे ॥११॥
ऐसा चित्तक्षोभ सहन करित । जनक राहिला स्वगृहांत । तेथ नऊ योगींद्र येत । ऋषभनंदन प्रख्यात ॥१२॥
ते सर्वही योगसंपन्न । अनुभवती सदा यौवन । सदा फिरती ते नग्न । त्रैलोक्यांत स्वेच्छेनें ॥१३॥
सर्ववंद्य ते पूजनीय असती । ब्रह्मरूपधर साक्षात जगतीं । विधिनिषेधहीन वर्तती । योगरूपधर सर्वही ॥१४॥
गणेशाची चरित्रें परस्परांस । सांगती ते अतिसुरा । तद्रूप ते हर्षभरें जयघोष । करिती गणेश नांवाचा ॥१५॥
स्वपर ऐसी भ्रांति नसत । मृत्तिका काष्ठ कांचन सम लेखित । भेदाभेदविहीन वर्तत । वर्णाश्रम विवर्जित ॥१६॥
स्वेच्छापूर्वक कर्म करिती । स्वेच्छेनें ज्ञानधारक होती । स्वच्छंदें समशील असती । स्वेच्छेनें तें सहज प्रिय ॥१७॥
स्वेच्छेनें स्वस्त्ररूपस्थ राहती । स्वेच्छेनें योगतत्पर जगतीं । स्वेच्छेनें पूर्ण योगस्थ वर्तती । स्वेच्छेनें ते वर्णवंत ॥१८॥
स्वेच्छेनें आश्रम संयुक्त । स्वेच्छेनें विधिधारक समस्त । स्वेच्छेनें ते निषेधयुक्त । ऐसे स्वाधीन ते योगी ॥१९॥
विधिनिषेधहीन ते असत । स्वेच्छेनें विनायक सतत । दंडादींनी विहीन वर्तत । गणेशगायनीं तत्पर सदा ॥२०॥
त्यांस पाहून जनक नृपति । संभ्रमाकुल जाहला चित्तीं । वरती उठून विनम्र रीती । घाली साष्टांग नमस्कार ॥२१॥
मग पूजोपचार आणून । विधियुक्त केलें पूजन । आतृप्ति जेवूं घालून । पाय चुरी भक्तीनें ॥२२॥
तदनंतर वचन हितयुक्त । जनक म्हणे तयांप्रत । धन्य माझी मातापिता वाटत । विद्या तप स्वाध्यायादी ॥२३॥
ब्रह्मणस्पति रूप तुमचें दर्शन । घडलें मजला पावन । निस्पृह सर्व भावांत । निरभिमात । निःसंशय आपण सारे ॥२४॥
तथापि जी आज्ञा कराल । ती पाळण्या मी उत्सुक अमल । तुम्हां योग्यांची जो आज्ञा पाळील । त्यास पुनर्जन्म ना मिळे ॥२५॥
परी करितां तुमचा अवमान । नरकयोग्य होतो जन । तुम्हीं साक्षात योगस्वरूप योगीजन । कृपा करून आलात ॥२६॥
माझ्या सम ना त्रैलोक्यांत । आपुल्या दर्शनें मी पुनीत । कृतकृत्य जाहलों सांप्रत । परम सद्‍भाग्यें माझिया ॥२७॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । जनकाचें वचन ऐकून बोलत । प्रह्रष्ट भावें त्या नृपाप्रत । शांतिप्रदायक ते सारे ॥२८॥
नव योगी म्हणती जनकाप्रत । धन्य तूं मानवराजा वाटत । देहधारी असून विदेही वर्तत । यांत आश्चर्य कांहीं नसे ॥२९॥
साधुदर्शन लालस आलों । तुझ्या घरीं विसावलों । तुज पूर्ण योग्यास पाहून झालों । श्रुतकीर्ति पूर्ण तृप्त ॥३०॥
आता आम्हीं निरोप घेतों । राजशार्दूला कांहीं न वांछितों । तूं केलेली स्वीकारितों । पूजा तेणें संतुष्ट सारे ॥३१॥
त्यांचें हें बचन ऐकून । नृप पुनरपि बोले वचन । भक्तिभावें त्यास नमून । सर्वजनप्रिय हितकारक ॥३२॥
योगींद्रहो सांगा मजप्रत । योगसिद्धि कैशी होत । जनांनी काय करावें जगांत । जेणें वंद्य पंडित होती ॥३३॥
कवि हरि अंतरिक्ष प्रबुद्ध । पिप्पलायन अविहोत्री सुबुद्ध । द्रुमिल चमस करभाजन अनिर्बंध । नवयोगी तैं उपदेशिती ॥३४॥
प्रथम कवि म्हणे जनकाप्रत । योग परायण स्वधर्म पाळित । रजतमा तें तिरस्कारित । सत्त्वयुक्त मुमुक्षू ॥३५॥
गणेशार्पण बुद्धीनें करित । ऐसा नर कर्में सतत । श्रौत स्मार्त व्रतादिक आचरित । आंतर वायु साधनकें ॥३६॥
स्मृतिप्रणीत तीं सर्व करित । ध्यानपरायण राहत । गणेशाचें सदा ध्यान करित । ऐसा योगी ह्रदयांत ॥३७॥
एकाक्षरादि मंत्र असती । त्यातील एक जपे भक्ति । संप्रज्ञात समधिस्थ स्थिति । जरी संभवली नृपा ॥३८॥
तथापि गणराजाचें ध्यान । कधीं न सोडावें हें सत्य ज्ञान । असंप्रज्ञात योगस्थही होऊन । विघ्नराजास सदा ध्यावें ॥३९॥
गणेश ध्यानानें युक्त । योगभूमी तैं उल्लांघित । विघ्नें नष्ट होत स्वल्प काळांत । नृपात्मजा तो योगींद्रा ॥४०॥
तेव्हां तो योगी होईल । खरोखर शांतिपरायण अमल । चित्तांत चिंतामणिपर सबळ । तदाकार सुसाधानानें ॥४१॥
गणेशासम जग्तांत । कांहीं ब्रह्मद नसत । सर्वांस योगदानार्थ होत । देहधारी गजानन ॥४२॥
हें भूपा तुज कथिलें । योगप्राप्त्यर्थ सुसिद्ध चांगलें । भजन सिद्धिनाथाचें वर्णिलें । योगसिद्धि जें देई ॥४३॥
जनक विचारी तयांप्रत । चिंतामणि कैसा ख्यात । कैसें त्याचें रूप चित्तांत । जाणावें विशेषे नरानें ॥४४॥
दुसरा हरि योगी तैं सांगत । चित्त पंचविध ख्यात । तेथ चिंतामणि स्थित । चित्त प्रकाशक तो असे ॥४५॥
म्हणोनि विघ्नेशान त्यास म्हणती । आतां ऐक चित्ताची पंचविध स्थिति । क्षिप्त मूढ विक्षिप्तरीती । एकाग्र तैसें निरोधक ॥४६॥
ऐसें पंचविध चित्त । त्याचें वर्णन विस्तृत । आतां भूमिपा ऐक पुनीत । जें जाणतां ज्ञानोदय ॥४७॥
जेथ सर्वांशीं मन क्षिप्त । तेथ राहील ज्ञानयुत । समान्यांसम तेच कर्म करण्या उद्युक्त । समर्थ कैसा होईल ॥४८॥
क्षिप्त चित्त तें जाणून । प्रकाशक तेथ चिंतामणि तरी म्हणून । गणाधीशाचें करी भजन । महामते सर्वदा ॥४९॥
जेथ जरी क्षेपिलें तरी न जात । नरें आपुलें हो चित्त । ज्ञानहीनतेनें मूढ संज्ञित । मूढासम त्या नराचें ॥५०॥
दुसरें भ्रांतियुक्तांचें चित्त । पिशाचासम सर्वदा वर्तत । तेंच जाणावें मूढ जगांत । जनवत्सला जनकनृपा ॥५१॥
तेथ प्रकाशदाता तोच असत । नाना क्रौडापर चिंतामणि पुनीत । गणाध्यक्ष ऐसा वर्तत । त्यासी भजावें नृपाळा ॥५२॥
सत्त्वभावें समायुक्त । मानव जो मोक्ष कामुक असत । ब्रह्मार्पणभावें कर्म करित । नित्य तो सर्वही जीवनीं ॥५३॥
ब्रह्माच्या अणुभावें हीन । सुखलालस नसे जगीं म्हणून । ब्रह्मार्थ त्याचें चित्त सुमन । विक्षिप्त म्हणती बुध तेव्हां ॥५४॥
संसरांत क्षिप्तभाव वर्तत । म्हणोनि विगत क्षेपण कर्ण्या उद्युक्त । सदा साधन तत्पर राहत । तदा चित्त विक्षिप्त म्हणती ॥५५॥
तेथ प्रकाश देईअ सतत । चिंतामणि देव ह्रदयांत । त्यास भज तूं एकचित्त । आता एकाग्र स्थिति वर्णितों ॥५६॥
ज्ञानदृष्टि समुत्पन्न । होतां सर्वत्र नृपा समान । साक्षात्‍ भावें युक्त असून । अवयवादिकांनी वर्जित तैं ॥५७॥
त्या दृष्टीनें जो नर पाहत । योगज्ञ त्यास तेथ दिसत । सर्व विश्वआकाररहित । यांत संशाय मुळीं नसे ॥५८॥
अष्टधा तों समाख्यात । संप्रज्ञात स्वरूपयुक्त । एकभावकरा वृत्ति ख्यात । एकाग्रनामा चित्ताची ॥५९॥
तेथही चिंतामणी साक्षात । प्रकाशकारक असे ज्ञात । त्यास भज तूं विधियुक्त । सर्वसिद्धिप्रदायकासी ॥६०॥
हें जगदादि अवयवयुक्त । चतुर्देहमय असत । बिंदु त्याची पराकाष्ठा ख्यात । ब्रह्ममाया प्रधारक ॥६१॥
देही भेदविहीन असत । देहचालक त्यास म्हणत । तो मीं मात्रात्मक वर्तत । वेदवादी ’सोऽहं’ शब्दें ॥६२॥
त्यांच्या योगें विरोध होत । सदा चित्ताचा जगांत । त्याचे दोन भेद उक्त । संयोग अयोग नांवानें ॥६३॥
स्वतः उत्थान परतः उत्थान । ब्रह्म त्या उभय वर्जित असून । हें संयोगक महान । समाधिधारक तें पर ॥६४॥
सर्वांचा तेथ संयोग घडत । ब्रह्माकारें जगांत । दुसरें अयोगरूप वर्तत । निवृत्तिधारक जें परम ॥६५॥
ब्रह्म मायाविहीन । व्यतिरेक प्रभावें मान । कोणाच्या मतें संयोग उत्पन्न । ब्रह्मांचा व जगतांचा ॥६६॥
कोणी म्हणती ब्रह्मयोग न घडत । स्वकीय भेद नष्ट होत । यात संशय कांहीं नसत । तेंच ब्रह्मभूतत्व निरोधज ॥६७॥
जेव्हां निरोधपर चित्त । प्रकाशवित गणेश्वर सतत । त्या चिंतामणीस भज निश्चित । खेळण्या लालस जो असतो ॥६८॥
पंचधाभूमिस्थ त्यागून । योगपर व्हावें जाणून । चित्तनाश होतां सुजाण । साक्षात्‍  चिंतामणि होतो ॥६९॥
सर्व चिंतन त्वरित सोडित । तेव्हां शांति विराजे चित्तांत । नित्य आदरें तेव्हां लाभत । चिंतामणि रहस्य नरातें ॥७०॥
हें सर्व तुज पूर्ण कथिलें । चिंतामणि स्वरूप भलें । त्यानें भजन विधानें केलें । तरी शांतिसाहाय्यें योगलाभ ॥७१॥
जनक विचारी तयाप्रत । ऐसा गणेश जो असत । तो देहधारी कैसा होत । श्रद्धादिक तैशी कशी उपजे ॥७२॥
तेव्हां तिसरा अंतरिक्ष योगी सांगत । तो वामभागीं राजस असत । दक्षिण भागीं तामस ख्यात । मध्यांत सत्त्वपराय़ण ॥७३॥
त्यांचा होता संयोग । तुरीयक भाव होत सुभग । चतुर्विध पद देहयोग । तेथ अहंकार धारक असे ॥७४॥
देही तन्मय साक्षात । कंठाखालीं गणनायक ज्ञात । ज्यापासून सर्व उत्पन्न होत । अन्तीं सारे जेथ जाई ॥७५॥
महा उग्र समाधीनें संहारित । तोच गज जाणावा प्रख्यात । कधीं न जन्मे न लय पावत । गजशब्द ब्रह्मपर जगती ॥७६॥
तेंच त्या गणेशाचें मस्तक । महात्म्याचें असे ज्ञापक । त्यांच्या संयोगें गणाध्यक्षक । साकार होतो जगामाजीं ॥७७॥
कंठाखालतीं संप्रज्ञानमय । कंठावरतीं असंप्रज्ञात होय । देहाचें शिर तें महात्त्वमय । कंठावरती विराजतें विराजतें ॥७८॥
त्या दोघांच्या संयोगें होत । भक्तावर अनुग्रह करण्या वांछित । म्हणोनि देहधारी । ब्रह्मनायक पुनीत । गणेश या जगतांत ॥७९॥
त्या महात्म्याचा देह नसत । सर्वसम भावाख्य जगांत । देहधारी गणाधीश होत । भक्तिभोगार्थ त्वरेनें ॥८०॥
भक्तिसम प्रिय अन्य त्या न वाटत । म्हणोनि सकळ सोडून भक्तियुक्त । व्हावें राजेंद्रा भक्ताधीन तो असत । देव गणेश सर्वदा ॥८१॥
भ्रांतचित्तांस देहधारी भासत । माया प्रभावें तो जगांत । साक्षात्‍  योगस्वरूपधारक वर्तत । जनक विचारी त्यावरी ॥८२॥
कैसी गणराजाची माया । भ्रांतिकरी सांग सदया । योगींद्रा ब्रह्मज्ञान व्हाया । मति कैशी योग्य व्हावी ॥८३॥
तेव्हां चवथा प्रबुद्धयोगी म्हणत । वामांगापासून उत्पन्न होत । सिद्धि शक्ति साक्षात । वामभाग प्रकाशिनी ॥८४॥
गणेशाच्या दक्षिणांगापासून । बुद्धि उत्पन्न झाली पावन । दक्षिणांगधरा म्हणून । ख्यात जगतीं ती असे ॥८५॥
सिद्धिसुत लक्ष नामक असत । बुद्धीचा पुत्र लभ ख्यात । चित्तापासून ते जन्मत । खेळकर जे परम ॥८६॥
मायामोहित ज्यांचें चित्त । त्यांना भ्रम पाडिती हें सतत । त्यांचें रूप वर्णन करित । लोकहितार्थ जनक नृपा ॥८७॥
जेव्हां पापांत लक्ष लागत । तेव्हां नरकप्रद लाभ होत । परी पुण्यांत लक्ष केंद्रित । तेव्हा स्वर्गप्रद ॥८८॥
परी ब्रह्मांत लक्ष लावी नर । तेव्हां योगमय लाभ उदार । ह्रदयांत सर्वदा लक्ष स्थिर । लयदायक सर्वत्र ॥८९॥
पदार्थावर स्थित लाभ संमत । नाना फलें तो देत । हया दोन युवराजांच्या सहित । विघ्नेश मायेसह संचरे ॥९०॥
बंधहीन तो क्रोडा करित । स्वेच्छाचारी स्वरूपयुक्त । सिद्धि भ्रांतिकरी ख्यात । सर्वत्र वर्ततसे ती ॥९१॥
सिद्धीसाठीं सर्व जन । भ्रमण करिती सकाम । धर्मसिद्धि अर्थसिद्धि परम । कामप्रदायक विख्यात ॥९२॥
मोक्षसिद्धि ब्रह्मप्रदायिनी । ही गणेशरूप तरी मनीं । हीं भ्रांति उपजे कोठेनि । सिद्धिभ्रांति ति निर्मितसे ॥९३॥
भुक्तिमुक्ति ब्रह्मभूय असत । भ्रांतिधारक रूपबुद्धी सतत । बुद्धीनें जाणता निवर्तत । राजेंद्रा मोह तदनंतर ॥९४॥
पंचचित्तमयी बुद्धि ख्यात । स्वयं विश्वात्मिका ज्ञात । ब्रह्माकारा भिन्नपद इच्छित । दुःखदात्री ती सदा ॥९५॥
सकाम निष्काम ब्रह्मपरायण । बुद्धिभ्रांति करी जाण । नाना भ्रांतिकर सर्व निर्माण । सिद्धि शक्ति करीतसे ॥९६॥
नाना मोहयुक्त जें असत । तो बुद्धीचा खेळ निश्चित । त्या दोघींनी स्वंमोहित । लक्ष लाभयुत जग होतें ॥९७॥
नान लक्ष समायुक्त । नाना लाभ फळांनी संयुत । म्हणून मायायुत तो गणेश खेळत । बिंबी जैसा बिंबांत ॥९८॥
नृपसत्तमा तो ब्रह्मनायक असत । सांगितलें मायास्वरूप मोहयुक्त । जें जाणतां योगिवंद्य होत । क्षणांत मानव या जगीं ॥९९॥
जनक त्यानंतर विचारित । भक्तिप्रिय गणेश असत । तरी तो जनांस करी मोहयुत । स्वभक्ता वाचवी हें कैसें ॥१००॥
गणनायका पराधीनता नसत । स्वप्रिय तो सर्वदा वर्तदा । पराधीन समान न करित । महाअद्‍भुत तो कैसा ? ॥१०१॥
पिप्पलायन पाचवा योगी सांगत । गणेशानें हें रचिलें असत । मायामय नामा खेलयुक्त । केवळ मनोविनोदानसाठीं ॥१०२॥
तेथ प्रथम द्विविध रचिलें । त्यानें विश्व हें नटविलें । विधान पूर्वक ऐकता भलें । सर्व संशय नष्ट होय ॥१०३॥
स्वस्वस्वार्थयुत माया सुखकर । त्यासाठीं सर्व लोक उत्कंठित फार । ब्रह्मात करिती संचार । योगमार्ग तो शांतिप्रद ॥१०४॥
राजा हा गाणेश मार्ग रचित । मोहनाशार्थ उपयुक्त । मायानाशकर असत । ऐसें शास्त्र सांगतसे ॥१०५॥
योगानें गणपास जाणून । नर होतसे परिपूर्ण । तदनंतर अनन्याभावें भजन । करूण तन्निष्ठ तत्परायण ॥१०६॥
ज्याचा भाव जेथ असेल । तैसें तो आचरेल । तेथ विघ्नेश्वर साक्षात्‍ विमल । आग्रह न धरी कसलाही ॥१०७॥
जरी गणेश्वर विश्वास करित । निरंतर भक्तियुक्त । तरी गणेशाचा खेळ जगांत । तदनंतर कैसा संभवेल ? ॥१०८॥
हें सर्व तुज कथिलें । राजा आणखी इच्छिसी भलें । स्वाधीन तें पराधीन झालें ॥ पाहतां मायादृष्टीनें ॥१०९॥
जनक विचारी तयाप्रत । कर्मा अकर्म विकर्म जगांत । कर्मयोग कैसा असत । तें सांगा मज विप्रेंद्रही ॥११०॥
तेव्हां सहावा आविहोत्र सांगत । स्वधर्मयुक्त कर्म विधियुक्त । देहसौख्यप्रद प्रख्यात । जन्ममृत्युप्रद तो असे ॥१११॥
स्वधर्मविहीन जें विधिहीन । विकर्म राजेंद्रा तें असून । पापरूप जाणावें उन्मन । देहह्दूःखकर परिणामीं ॥११२॥
पापाचरणमात्रें लाभत । दुर्गति मनुष्यप्राण्या जगांत । सत्कर्म मुक्तिकाम जें असत । नित्य आदरें जे करिती ॥११३॥
ब्रह्मणि स्वभावें कर्म अकर्म । ऐसें महामते जाण कर्म । शुक्ल गतीनें जाता अभिराम । नरास शाश्वत मुक्ति लाभे ॥११४॥
अकर्माच्या प्रभावें होत । निष्काम सत्यार्थ जगांत । कर्मयोगमय विश्व समस्त । जाणावें नृपा जनका हें ॥११५॥
क्रियेत जें ब्रह्म स्थित । तोच कर्मयोग ज्ञात । क्रियमाण जें असत । तेंच कर्म तूं जाणावें ॥११६॥
त्याचें भेद आता वर्णित । ऐक तें तूं एकचित । जरी मौनही धारण करित । तरीही घडतें कर्म सदा ॥११७॥
धारणानें कर्ममय जाणावें । निःसंशय हें आघवें । वायुबंध योगें न्यावे । प्राण आपुल्या मस्तकांत ॥११८॥
वायुचालनामुळें कर्मरूप होत । तीच क्रिया योगांत । ध्यान करितां चित्तांत । दमन करून मनाचें ॥११९॥
तेही कर्मच जाण जगांत । मनोनिग्रह तें कार्य असत । जागृति जागरण कर्म वर्तत । स्वप्नांत सुप्तमय कर्म ॥१२०॥
अज्ञान तें सुषुप्तीत । कर्मरूप संशयातीत । ऐसे बहुत भेद असत । सर्वांचें वर्णन अशक्य वाटे ॥१२१॥
जो जो नामरूपें युक्त । तो तो कर्महीन न वर्तत । उत्पत्ति स्थिति संहारयुक्त । त्रिविधकर्म जाण कर्मयोगज ॥१२२॥
असत्‍ ब्रह्म वेदोक्त । ते मायेनें विनिर्मित । कर्मरूप यांत संदेह नसत । नामरूप धारणामुळें ॥१२३॥
नामरूप त्यागितां होत । असत्‍ तें स्वानंदग पुनीत । मानव ब्रह्मरूप ख्यात । कर्मौयोगी तेधवां ॥१२४॥
ऐसें कर्मस्वरूप वर्णिलें । ब्रह्मवाचक तुज भलें । कर्माधीन जग झालें । समस्त ब्रह्म नानाविध ॥१२५॥
जनक तदनंतर पृच्छा करित । ज्ञान कैसें तें सांगा मजप्रत । ज्यानें योगी नर होत । ज्ञानयोग परायण ॥१२६॥
तैं द्रूमिल सातवा योगी सांगत । स्फूर्तिमय ज्ञान ह्रदयांत । जाणावें विबुधीं समस्त । वसे स्फूर्तिदातृस्वरूपें ब्रह्म तेथें ॥१२७॥
जें जें नामरूपविहीन । सदा अमृतमय आद्यंतभावहीन । तें जाण ज्ञान उत्तम । ज्ञानचक्षूनें ब्रह्मानुभ्व ॥१२८॥
नाना ज्ञानांचा लय करून । ज्ञानयोगी होती जन । सत्य स्वानंदरूप महान । जाण तूं ज्ञानमूलक जें ॥१२९॥
ज्ञानांच्या योगभावें लाभत । योगसेवेनें तें जगांत । तदनंतर जनक म्हणत । आनंदाचें वर्णन करा ॥१३०॥
सहज आनंद कैसा असत । ब्रह्मभूय तें कैसें असत । तें सर्वही मजला सांप्रत । सांगावें योगींद्रांनो तुम्ही ॥१३१॥
तेव्हा आठवा योगी चमस बोलत । आंतरबाहय भेदें वर्तत । आनंद सर्वत्र जगांत । उभायात्मक भाव समरूप ॥१३२॥
नाना द्वंद्वांत राजेंद्रा स्थित । आनंदरूप विश्वांत । सम आनंद तो सर्वत्र दिसत । परानंद तो ब्रह्मांत ॥१३३॥
सत्यासत्यमय तें जाण । समस्वानंदग प्रसन्न । ब्रह्म सदानंदरूप सुजाण । जनका संमत शास्त्रांत ॥१३४॥
द्वंद्वांत करी नंदन । आनंद तो परमानंद महान । ब्रह्मानंद त्यास अभिधान । समभावस्थां ब्रह्म लाभे ॥१३५॥
आनंदाख्य तें ब्रह्म प्राप्त । योगसाधनें जगतांत । ऐसें हें पूर्णानंद स्वरूप उक्त । आनंदसंयोगें समस्वानंद ॥१३६॥
त्याची द्विविध माया असत । द्वंद्वभाव ती पसरवित । त्यांच्या संयोगभावें ख्यात । उभयात्मक आनंद ॥१३७॥
तेच द्विविध भावांत । नराधिपा हो मोहयुक्त । सम तें सर्वत्र असत । द्वंद्व मोहादिदायक ॥१३८॥
तिन्हींत मोहविहीन । जे सदा नेति स्वरूपयुक्त स्वाधीन । सहज तें चतुर्थ जाण । राजसत्तमा ब्रह्म जगीं ॥१३९॥
स्वेच्छेनें जें सत्‍ समायुक्त । स्वेच्छया सत्‍परायण वर्तत । स्वेच्छया आनंदसंयुक्त । स्वेच्छेनें या त्रितयहीन ॥१४०॥
आज्ञेनें त्रिविध ब्रह्म । वर्तते सर्वत्र तें परम । सर्वांचा नाश करी तें तुर्य सर्वोत्तम । सहज नेति भावामुळें ॥१४१॥
त्याचा कर्ता कोणी नसत । योगभावें तें विलसत । म्हणोनि नेतिमय स्वच्छंदग ख्यात । ऐसें नसें हें सनातन ॥१४२॥
स्वेच्छेनें होई बंधयुक्त । स्वेच्छेनें बंधवर्जित । स्वेच्छेनें समभावयुत । सहजाख्य ब्रह्म तें ॥१४३॥
अव्यक्तानें त्रिभावांत । त्या योगानें तें लाभत । सहज ब्रह्म ऐसें वर्णित । वेदवादी वेदांत ॥१४४॥
स्वाधीनांच्या संयोगें व्यक्त । स्वानंद त्यास नाम असत । अव्यक्त योगभावें विश्वांत । निराकरण अशक्य त्याचें ॥१४५॥
ऐसें हें कथिलें सहज मोहवर्जित । आता ऐक तूं सांप्रत । योग ब्रह्मभूय प्रकाशक पुनीत । जनक नृपा सावधान ॥१४६॥
स्वानंद सर्व संयोगें होत । ब्रह्मधारक जगतांत । चारांचा संयोग करावा उचित । आपुल्या समाधीनें तेथें ॥१४७॥
विविध तें मोहयुक्त । चवथें मोहहीन असत । ब्रह्मांत ऐसें नसत । राजेंद्रा तें मोहयुक्त विहीन ॥१४८॥
तें स्वाधीन वा पराधीन । ब्रह्मांचा जगांचा तेथ संगम पावन । स्वसंवेद्यमय जेथ मानव होऊन । राहे तेथ काय भिन्नभाव ॥१४९॥
संयोग नाश होता प्रकीर्तित । ब्रह्मयोग तेथ त्वरित । तेथ जगब्रह्मांचा नाश न होत । संयोग तेथें त्यानंतर ॥१५०॥
अयोगाचा संयोग न होत । कुठल्याही ब्रह्मांत न उक्त । योग्यांनी योगप्राप्त्यर्थ जगांत । व्यतिरेकानें विचार करी ॥१५१॥
संयोगांत मायेनें युक्त । गणनायक सदा होत । मायाधीन स्वरूपांत । सदा अयोग प्रवर्ततो ॥१५२॥
मायेनें सर्व भावयुक्त । द्विरदानन तो होत । संयोग अभेदभावें स्मृत । निजमायामय तोही ॥१५३॥
स्वानंदीं गणनाथाचें दर्शन । योग्यांसी होतसे पावन । संयोग अभेदक म्हणून । म्हणती स्वानंदवासी त्यासी ॥१५४॥
अयोगांत मायाहीन । गणेश सर्वदा असे प्रसन्न । जैसा असेल तैसा असून । न आगमन वा निर्गमन करी ॥१५५॥
वृथा भ्रांतिमय सर्व भासत । मायेनें या जगांत । भ्रान्तांसी निवृत्ति उपजत । सर्वत्र परा कोटीची ॥१५६॥
स्वकीया भेदभावापासून । निवृत्ति व्यतिरेकें स्थापन । स्वीकारितां अयोग योगपावन । स्वयं होतो मानव ॥१५७॥
अयोगांत मायाहीन । संयोगांत मायासहित होऊन । नर होतो राजेंद्रा तन्मन । पंच पंच स्वरूपानें ॥१५८॥
ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । त्याचा संयोग कैसा वर्तत । अयोग महीपाला नसत । अन्वयव्यतिरेक संबंधें ॥१५९॥
चित्त पंचविध त्यागून । पंचधा चित्तभ्रांति सोडून । स्वयं चिंतामणि भगवान्‍ । साक्षात्‍ ब्रह्मभूत नर होय ॥१६०॥
संयोगात्मा तो गकार । अयोगवाचक णकार । त्यांचा स्वामी गणाधीश थोर । संयोग अयोग वर्जित ॥१६१॥
ऐसें हें ब्रह्मभूत स्वरूप वर्णिलें । आतां आणखी काय उरलें । आणखी काय ऐकण्या राहिलें । मनोरथ तुझे सांग प्राज्ञा ॥१६२॥
अन्यथा यदृच्छेनें निरोप घेतों । स्वच्छंदानें आम्हीं जातों । तें ऐकतां जनक विचारिती । आणखी एक शंका असे ॥१६३॥
गणेश भक्तिभावें नराधीन । स्वयं होतसे तो गजानन । भक्तिसदृश त्या मोहद होऊन । भुलवी हें कैसें संभवेल ॥१६४॥
म्हणोनि भक्तीचें स्वरूप मजप्रत । सांगा आपण सांप्रत । योगिसत्तमहो तें होतां ज्ञात । विघ्नेश्वरा नित्य भजेन मी ॥१६५॥
तैं नववा योगी करभाजन । जनकासी सांगे वचन । नवधा भक्ति ह्रदयीं पावन । रसधारिणी कथिली असे ॥१६६॥
संक्षेपानें रसदायक कथीन । स्वरूप भक्तीचें महान । श्रवण कीर्तन त्याचें स्मरण । पादसेवन ही चवथी भक्ति ॥१६७॥
अर्चन वंदन दास्य असत । सख्य आत्मनिवेदन पुनीत । ऐसा या नवधा भक्ति वर्तत । मानसी गति सर्वत्र ॥१६८॥
भावांत रससंयुक्त । दहावी भक्ति न ज्ञात । जेव्हा पूर्ण रस प्रकटत । मानवाच्या भक्तींत ॥१६९॥
तेव्हां त्याचें नवधा वसत । चित्त नित्यही भक्तींत । तैसेंचि जरी मुक्तींत । तरी नवधा मुक्तींत तें ॥१७०॥
जेव्हां ब्रह्मभूतांत वाटत । रस नराला एकचित्त । तेव्हां नवधा योगांत । चित्त त्याचें रममाण ॥१७१॥
योगी होऊन गणनायका भजत । जी नर भक्तिभावयुक्त । त्याचें चित्त गणेशांत । नवधा सर्वदा निमग्न ॥१७२॥
योग्यांच्या हृदयीं विघ्नेश । पूर्णरूपधर सविशेष । योगहीनांच्या तो सर्वेश । कलांशानें राहतसे ॥१७३॥
म्हणोनि योगी नरें व्हावें । आणि गणेशभजनीं रमावें । पूर्णभावें तरी चाखविं । रसाचें अमृत निःसंदेह ॥१७४॥
गणेश गुणवादांचें स्मरण । संपूर्ण भावें करावें म्हणून । रससंयुत नरें होऊन । श्रवणभक्ति श्रेष्ठ होते ॥१७५॥
गणेशगुण श्रवणांत । पूर्ण रस त्यास वाटत । तेव्हां श्रवणभक्ति प्राप्त । जाहली ऐसें जाण नृपा ॥१७६॥
ऐसी श्रवणभक्ति होता प्राप्त । योग्यांत श्रेष्ठत्व तयाप्रत । कीर्तनभाव उत्पन्न  होत । तेव्हां भक्ति गणेशकीर्तनीं ॥१७७॥
गणेशार्थ जें जें असत । त्याची विस्वमृति कदापि न होत । ती स्मरणभक्ति ख्यात । प्राप्त संपूर्ण भावानें ॥१७८॥
गणेश पादपद्मास मानित । जो शाश्वत पर विश्वांत । सकल यन्तें ते सेवित । ती भक्ति जाण पादसेवन ॥१७९॥
सर्वांग विधिपूर्वक करित । नित्य आदरें पूजन भक्त । ती अर्चनात्मक भक्ति ख्यात । पाचवी भक्ति ही थोर ॥१८०॥
गणेशाहून अन्य नसत । श्रेष्ठ कोणी या विश्वांत । वेदशास्त्र विचारें संमत । य विचारांत जो सुदृढ ॥१८१॥
ती वंदन भक्ति प्रख्यात । गाणपत्य चिन्हें धारण करित । ती दास्य भक्ति ज्ञात । आता सख्य भक्ति निवेदितो ॥१८२॥
अंतर्बाह्म जें कर्म करित । तेथ साक्षी गणेश्वर असत । ऐसें भय अंतरीं बाळगून करित । सख्यरूपिणी ती भक्ति ॥१८३॥
पंचधा मोहयुक्त चित्त सोडून । योग साहाय्यें अभेद जाणून । गणेशाहून न मी भिन्न । ऐसें वाटता आत्मनिवेदन भक्ति ॥१८४॥
मन जाय प्राज्ञा जेथ । तेथ विश्वेश्वरा स्मरत । भजे त्यास रसयुक्त । तो भक्त गणेशाचा ॥१८५॥
रसरूपा स्वयं भक्ति विलसत । पूर्ण स्वभावें मनांत । तो प्राणी खरा भक्त । ऐसें जाण जनकनृपा ॥१८६॥
अन्य भोगांत न रसोत्पत्ति । ब्रह्मभूयसी मुक्ति लाभत जगतीं । गणेश भक्तिभावें भक्तचित्तीं । रसोत्पत्ति सदा वसते ॥१८७॥
प्रथम गणेशाचें स्वरूप तुजप्रत । सांगितलें आम्ही योगयुक्त । ब्रह्माकारें महाचिन्हांनी संयुक्त । तेथ विश्वास ठेवावा ॥१८८॥
ऐश्या विश्वासें रस उत्पन्न । होई तेव्हां भक्त पावन । योगिवंद्य तो होऊन । महाराजा शोभतसे ॥१८९॥
नारदें राजेंद्रा बोध दिला । परी तो तुज नाहीं उमजला । तुझ्या भावपरीक्षेस्तव केला । भक्तिदान प्रयोग ॥१९०॥
त्यानें पाठवलें तुजप्रत । वृद्ध ब्राह्मण रूप कुष्ठयुक्त । विघ्नेशदेव तो छळत । सर्वभक्षी तुजला तैं ॥१९१॥
नरदेह प्राप्त होऊन । जो नर न करि गजाननाचें भजन । पशुतुल्य तो राजेंद्रा दुर्मन । धिक्कार त्याच्या जन्माचा ॥१९२॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐसें सांगून विदेह जनकाप्रत । ते नऊ योगी स्वेच्छेनें जात । अन्यत्र स्थळीं गणेशनिष्ठ ॥१९३॥
जनक त्यांस वंदून । स्वगृहांत परतला प्रसन्न । नवविधा भक्ति गणेशावर करून । अहर्निश भजे गणनायका ॥१९४॥
अनन्यभावें गणेशास भजत । सर्वभावें तैं जनक होत । योगिवंद्य सर्व योग्यांप्रत । सदा सर्वदा गणेशा स्मरे ॥१९५॥
चालता बसता खाता पितां । झोपतां तैसाची बोलतां । विघ्नेश्वरासी स्मरे तत्त्वतां । सदैव रमला त्याच्यांत ॥१९६॥
गणेशसंतोषें त्याच्या वंशांत । सर्वज्ञान समायुक्त प्रजा होत । शोभन गुणांनी युक्त । गणेश भजनीं आसक्त सदा ॥१९७॥
नवयोगी जातां ऐकत । त्रिशिरविषयक वृत्तान्त । जनक तैं गणेश गमनात्मक जात । स्वयं त्याच्या घराकडे ॥१९८॥
तेथ जाऊन मुनिपुंगवा नमत । दैवी समृद्धि संयुक्त । योग पारंगत जो परम पुनीत । त्यास त्यानें उपदेशिलें ॥१९९॥
दूर्वा महात्म्य जाणून । जनकराजा दूर्वापरायण । होऊन करी गणनाथ पूजन । सदा भक्तिसमन्वित ॥२००॥
दूर्वाहीन न केलें पूजन । आमरण त्यानें रहस्य जाणून । अंतीं स्वानंदलोकीं जाऊन । भजतसे तो गणनायका ॥२०१॥
हें जनक राजाचें माहात्म्य । कथिलें तुज प्रजापते रम्य । भुक्तिमुक्तिप्रद काम्य । श्रवणें पठनें सिद्धिलाभ ॥२०२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते दूर्वामाहात्म्यवर्णनं नाम त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP