खंड ५ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष विचारी मुद्‍गलाप्रत । तुलसीपत्र गणेशपूजनांत । जो कोणी कळून वाहत । न कळत वा त्याचें काय फळ ॥१॥
कथामृत ऐकून रमणीय । माझी तृप्तता न होय । गणेशभक्ति दुर्लभ असाध्य । यांत संशय मुळी नसे ॥२॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । प्राचीन इतिहास तुजप्रत । सांगतों तो ऐकतां जात । सर्व संशय विलयासी ॥३॥
ब्राह्मण कोणी काश्यपकुळांत । नित्य तुलसीनें गणेशास पूजित । निषिद्धता जाणूनही करित । हट्टानें तो ऐसें कर्म ॥४॥
अन्य ब्राह्मण त्यास निवारिती । परी त्याची त्या न क्षितो । बौद्ध ज्ञानाची तर्करीती । प्रतिपादी तो खल तेव्हां ॥५॥
गणेश सर्वत्र सर्वरूप असत । तरी विधि निषेध कैसा उरत । अमुक स्वीकारार्ह अमुक त्याज्य ही रीत । गणेश पूजनांत न तर्कसंमत ॥६॥
तें ऐकून अन्य द्विजोत्तम । भयोद्विग्न होऊन परम । परस्परां म्हणती ते गाणपत्य उत्तम । आतां काय करावें ॥७॥
एक दिवसाचा अपवाद सोडून । जरी गणेशमस्तकीं तुलसीदर्शन । तरी तो त्वरित दूर करून । गाणपत्यें नियम पाळावा ॥८॥
जरी तेथ विलंब लावित । तरी पापी तो नर होत । आतां काय करावें त्या दुष्ट द्विजाप्रत । विचार याचा करूया ॥९॥
र्जैसी पर्वतांसी वज्रानें पीडा होत । तैसा तुलसी वाहतां गणेश कथित । ऐश्या विचारें घालवून देत । त्या हटवादी विप्रासी ॥१०॥
गणेश मंदिरांतून बहिष्कृत । तो पापी विप्र स्वगृहीं जात । तेथ तुलसीपत्रें पूजित । गणेशासी हट्टानें ॥११॥
तदनंतर अल्प अवधीत । तो काश्यप द्विज झाला मृत । यमदूत त्यासी त्वरित । नरकांत तैं टाकिती ॥१२॥
एककल्पापर्यंत राहत । तो पापी विविध नरकांत । तदनंतर राक्षसाचा जन्म लाभत । सुदारुण त्या विप्रासी ॥१३॥
तो क्षुधेनें सतत पीडित । दाह रोगादींनी युक्त । सर्व कार्यांत अशक्त । वनामध्यें संचार करी ॥१४॥
एके दिनीं गार्ग्य मुनि येत । स्वेच्छेनें त्या वनांत । तो प्रख्यात गणेशभक्त । महायोगी जगतांस ॥१५॥
त्यास पाहून राक्षस धावत । त्यास भक्षण्या आतुरचित्त । गार्ग्य गणेशमंत्र जपित । मंत्रजल फेकिलें राक्षसावरी ॥१६॥
त्या मंत्रजलाचा पुण्यप्रभावें होत । गार्ग्यदर्शनें स्मरण चित्तांत । त्या राक्षसाच्या त्वरित । पूर्व जन्मीच्या वृत्तान्ताचें ॥१७॥
त्यायोगें तो अति खेदयुक्त । रडत रडत प्रणाम करित । कर जोडून गार्ग्यास म्हणत । हाहाकार करीत तेव्हां ॥१८॥
पूर्वींचा तो धर्मध्रुक्‍ ब्राह्मण । गार्ग्यास करी अभिवादन । म्हणे मुनिशार्दूला खूण । आता पटली मदंतरीं ॥१९॥
आपण गाणपत्य महायश ख्यात । आपल्या चरणीं मी लीन विनीत । त्वरित सोडवा सांप्रत । संसार सागरांतून मजला ॥२०॥
तदनंतर तो राक्षस सांगत । पूर्व जन्मींचा सर्व वृत्तान्त । म्हणे तुमच्या मंत्रजलानें मजप्रत । सर्व वृत्त आठवलें ॥२१॥
त्याचा वृत्तान्त ऐकून । शरणागत त्यास जाणून । महामुनि दयायुक्त होऊन । गणेशमंत्र देई तयासी ॥२२॥
गार्ग्य मुनि त्या राक्षसास सांगत । हितावह हा मंत्र असत । हा नाममंत्र जप सतत । तुलसीकृत स्तोत्रही वाच ॥२३॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला तैं गार्ग्यं परम पावन । तो दुष्ट राक्षस उपदेश स्मरून । दुखभयें मंत्र जपत होता ॥२४॥
तेव्हां त्याची क्षुधा शमली । रोगहीनता नष्ट झाली । काया सबळ जाहली । गाणपत्य प्रिय तो झाला ॥२५॥
राक्षस जन्माचा भोग संपला । तैं तो गणेश्वराप्रत गेला । दुःखर्वीजत जाहला । विघ्नेश्वराचें भजन करी ॥२६॥
योग स्वभावें त्यास पूजित । ऐसें हें कथिलें तैं प्रेमें वृत्त । तुलसी वर्जन करण्या निमित्त । सर्व संशय नाशकर ॥२७॥
म्हणोनि जो नर गणनाथपूजेंत । तुलसीपत्रें समर्पण करित । तो चांडाल निःसंदेह होत । नरकांत अंतीं जातसे ॥२८॥
त्यांचा वंश खंडित होत । लक्ष्मी सारी विनष्ट होत । रोगादींनी पीडित अत्यंत । मृत्यूनंतर नरकवास ॥२९॥
ऐशा नरास स्पर्श न करावा । झाल्यास स्नानविधि आचरावा । सचैल स्नान न करिता जीवा । पाप अत्यंत लागेल ॥३०॥
ऐशा पाप्याचें नावही न घ्यावें । याहून अधिक काय सांगावें । पापरूपी नर तो हें जाणावें । रहस्य सर्वदा मनांत ॥३१॥
तुझी उत्कंठा ऐकून । हें सर्व केलें तुज कथन । आणखी काय ऐकण्य़ा मन । उत्सुक तुझें तें सांग ॥३२॥
ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते तुलसीसमर्पणवर्जनवर्णनं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP