खंड ५ - अध्याय ४५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । दक्ष प्राथीं मुद्‍गलाप्रत । गणेश कीलक मजप्रत । सर्वार्थदायक सांगा पुनीत । मंत्रांसी पूर्णत्वदायक जें ॥१॥
मुद्‍गल तेव्हां त्यास सांगत । कीलकविहीन मंत्र जपत । तरी ते सुखप्रद न होत । म्हणोनि प्रथम कीलक जपावा ॥२॥
कीलक युक्त जे मंत्र म्हणत । जे होती वीर्ययुक्त । नाना सिद्धिप्रत । पुनीत सांगतों तुज यथाश्रुत ॥३॥
आंगिरसानें मज कथिलें । रहस्य हें गुहयतम भलें । सिद्धिप्रद गणेश कीलक जें जाहलें । साधकां पाठका सुखप्रद ॥४॥
या श्रीगणेश कीलकाचा असत । शिवऋषि अनुष्टुप छंद उदात । श्रीगणपति ही देवता ख्यात । अन्य तंत्रही सांगतों ॥५॥
ॐ गँ योगाय स्वाहा जपावें । ॐ गँ हें बीज बरवें । गणपतिप्रीत्यर्थ विनियोगावें । विद्या अविद्या शक्तियुक्ता ॥६॥
छंद ऋषिआदि । न्यास करावे प्रारंभीं विशेष । एकाक्षर मंत्रें षंडगन्यास । आचरावे बुद्धिमंतें ॥७॥
तदनंतर ध्यावा गणेश । ज्योगिरूपधर परेश । मनवाणीविहीन सुरेश । चतुर्भुज विराजित ॥८॥
शुंडादंडादि मुखयुक्त । पूर्णदर्शन अशक्य असत । विद्या अविद्या समायुक्त । विभूतीनीं उपासित जो ॥९॥
ऐसें गणेशाचें ध्यान । करावें प्रथम मानसपूजन । पंचोपचारांनी पावन । नंतर जप उच्चारावा ॥१०॥
एकवीस वेळा जप करावा । नंतर स्तोत्रपाठ बरवा । तदनंतर आचरावा । सर्व विधि सविस्तर ॥११॥
रूपबळ श्रीयश वीर्य देई । मेधा प्रजा कीर्ति प्रत्यही । म्हणोनि नमस्कार मात्र घेई । प्रीतिपूर्वक केला जो ॥१२॥
जेव्हां देवादिक समस्त । दैत्यहस्तें होती कुंठित । तेव्हां तू त्या दैत्यां मारित । देवास करिसी वीर्ययुत ॥१३॥
तैसेचि दुरात्म्यांनी कुंठित । शापांमुळें मंत्र होत । तेव्हां गणेशा वीर्ययुक्त । पुनरपि प्रभो करी त्यांसी ॥१४॥
तुजसी करितों नमन । शक्ति जेव्हां कंठित उद्विग्न । तुझें करितां स्मरण । ज्ञान वीर्ययुक्त त्या होती ॥१५॥
विघ्नेशा तुज अभिवादन । चरावर जग जेव्हां सत्ताहीन । तुझ्या स्मरणें सत्तायुक्त पसन्न । नमन तुजला पुनः पुन्हा ॥१६॥
जेव्हां तत्त्वें विघ्नहीन होतीं । तेव्हां विघ्नपा तुज स्मरती । त्यायोगें पुनः वीर्यप्राप्ति । त्या तत्त्वांसी होत असे ॥१७॥
ब्रह्में योगहीन होती । तेव्हां तुज गणेशा स्मरति । पुनरपि योगयुक्त होती । ढुंढें तुज वंदन पुनः पुन्हा ॥१८॥
विघ्नेशा तुझ्या स्मरणें होत । विविध वस्तुजात वीर्ययुक्त । सर्व जगही सत्तायुक्त । नमस्कार तुज वारंवार ॥१९॥
तैसेचि गणेशाना मंत्र होत । वीर्यहीन तैं ते तुज स्मरत । त्यायोगें ते वीर्ययुक्त । ढुंढे पुनरपि करावे ॥२०॥
माझे मंत्रपूजनादि जगांत । सर्व सत्तासमायुक्त । तें तुझ्या नामें वक्रतुंडा समस्त । वंदन तुजला नमोनमः ॥२१॥
महामंत्रांचें उत्कीलन । करी जपानें स्तोत्रपाठें पावन । सर्वसद्धिप्रद मंत्र प्रसन्न । होवोत तुझ्या प्रसादानें ॥२२॥
गणेशासी हेरंबासी । एकदंतासी स्वानंदवासीसी । ब्रह्मणस्पते तुजसी । नमन माझे पुनःपुन्हा ॥२३॥
गणेशाचें हें कीलक समस्त । कथिलें प्रजापते तुजप्रत । शिवप्रोक्त हें रहस्य असत । उत्कीलनपर श्रेष्ठ जगीं ॥२४॥
जो हें भावभक्तीनें वाचित । जपून तुझा मंत्रोत्तम श्रद्धायुक्त । त्यास सर्वसिद्धि लाभत । नानामंत्रें उत्पन्न ज्या ॥२५॥
हें कीलक त्यागून जपत । मंत्र गणेशाचा जो सतत । तो सर्व फलहीन होत । यांत संशय कांहीं नसे ॥२६॥
शंभूनें स्वतः तें जपून । सिद्धि मिळविली महान । तें हें कीलक पुरातन । परम अद्‍भुत कथिलें तुज ॥२७॥
विष्णु ब्रह्मादिक देवायोगी मुनी । या कीलकें मंत्रसिद्धि लाभूनी । झाले कृतकृत्य जीवनीं । ऐल नृपही कीलक म्हणे ॥२८॥
तदनंतर मंत्र परायण हो । त्यायोगें स्वानंदपुरींत जात । भक्तराज जाहले प्रख्यात । ऐसा पावन वृत्तांत हा ॥२९॥
स्त्रीसहित जड देहानें अवलोकन । ब्रह्मांडाचें करून । होतां नंतर गणेशदर्शन । ज्योतिरूप जो जाहला ॥३०॥
दक्षाच्या तैं मनांत । कुतूहल एक निर्माण होत । ऐलानें जडशरीरें युक्त । ब्रह्मांड कैसें पाहिलें ॥३१॥
जें देवादिकांनी युक्त । तें ब्रह्मांड तो कैसें पाहत । तैंसाच पुण्याराशि तो साक्षात । नरकादी कैसे पाहतसे ॥३२॥
पापिदर्शन योग्य नरकादी वर्तत । ऐलाची दृष्टि तेथ कां जात । हें सारें मजप्रत । मुद्‍गलमुने सांगावें ॥३३॥
मुद्‍गल तेव्हां सांगत । विमानस्थ नृप पहात । जडस्थ असून गणेशांत । शिवविष्णूदिकांमध्यें ॥३४॥
स्वानंदग विमानांत । जे भक्तजन बैसत । ते सहज शुभाशुभ पाहत । योगरूपें समस्त तैं ॥३५॥
ऐसें हें ऐलाचें चरित । कथिलें तुज समस्त । जो ऐकतो हें मर्त्य जगांत । भक्तिमुक्ति त्यास लाभेल ॥३६॥
जो हा लंबोदराचा खंड वाचित । नरोत्तम तो ब्रह्मभूत । अथवा वाचून दाखवित । अन्यांस तोही मुक्त होय ॥३७॥
यासम अन्य कांहीं नसत । भुक्तिमुक्तिप्रद हा खंड अद‍भुत । योगरूप महाभावा निश्चित । लंबोदर जेथ स्तविला असे ॥३८॥
नानाश्रुति स्मृति ऐकून । नरास जें फळ मिळत महान । तें सर्वही लाभें करितां । खंडश्रवण । हलोकीच भक्तिभावें ॥३९॥
नाना दानें तीर्थ क्षेंत्रांत । स्नान करूनि जें लाभत । त्याहून शंभर पट अधिक प्राप्त । पुण्य़ या खंडाच्या वाचनश्रवणें ॥४०॥
यज्ञयाग व्रतादिक करित । त्यानें पुण्य जें लाभत । त्याच्या शतपट प्राप्त । या खंडाच्या श्रवणमात्रें ॥४१॥
नाना तपें आचरित । जो नर पुनः पुनः वेदोक्त । त्यानें जे पुण्य़ लाभत । त्याहून अपार पुण्याप्राप्त । या खंडश्रवणानें ॥४२॥
पुप्रपौत्रादिक युक्त होत । धनधान्यादींनीं युक्त । या खंडाच्या श्रवणें त्वरित । यांत संशय कांहीं नसे ॥४३॥
जें जें इच्छित मनांत । तें तें सर्वही त्वरित सफल होत । प्रजानाथा या खंडाच्या श्रवणें जगांत । यांत अल्पही संशय नसे ॥४४॥
काय सांगावें आणखी बहुत । साक्षात योगप्रद हा खंड असत । सर्वसिद्धिप्रद सर्वदा ख्यात । ऐसा तुज मी कथिला असे ॥४५॥
हें लंबोदराचें चरित्र । सर्वसिद्धिप्रद पवित्र । संक्षेपें कथिलें तें इहपरत्र । हितकारक सर्वदा ॥४६॥
आतां आणकी काय ऐकण्यास । इच्छा असे तव मनास । म्हणें सूत म्हणें शौनकास । हयाच परीचें वचन शुभ ॥४७॥
जैसें दक्षास मुद्‍गलें कथिलें । तैसें भार्गवाग्रजे तुज सांगितलें । लंबोदराचें चरित्र भलें । धन्य मीं गणेश चरित्री मग्न ॥४८॥
तुमच्या योगें मज स्मरण झालें । गणेशचरित्राचे विवरण केले । शिवादिदेव वेद शेषादि थकले । त्या वर्णनी माझी काय कथा ? ॥४९॥
व्तासानें पूर्वी जैसें कथिलें । तैसें तुज सर्व सांगितलें । आणखी काय ऐकण्या झालें । मातस तुझें समुत्सुक ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते श्रवणमाहात्म्यवर्णनं नाम पंचचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
॥ इति श्रीमुद्‍गल पुराणे पंचमः खंडः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP