मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि ८

सूत्रस्थान - अन्नपानविधि ८

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


कृतान्न वर्ग

आता ह्यापुढे तयार केलेल्या पक्कान्नांचे गुण विस्तारपूर्वक सांगतो .

भाताच्या वगैरे लाह्यांचा केलेला भंड (शीतरहित जलांश ) हा वामनविरेचनादिकांनी ज्यांनी आपल्या कोठ्याचे शोधन केले आहे त्यांना पथ्यकारक असून पाचक व अग्निदीपक आहे . तोच मंड पिंपळी व सुंठ ह्यांचे चूर्ण टाकून घेतला असता वाताचे अनुलोमन करणारा (मार्गावर आणणारा व हृद्य ) (मनाला प्रिय ) असा आहे .

पेया (पेज , हिजमध्ये शिते असतात . हिच्याच वरच्या पाण्याला मंड म्हणतात .) ही घाम आणणारी , जठराग्नि उत्पन्न करणारी , पचनाला हलकी , अग्निदीपक , बस्तिशोधक आणि भूक , तहान , श्रम व ग्लानी ह्यांचा नाश करणारी असून वाताचे अनुलोमन करणारी आहे .

विलेपी (ही पेजेपेक्षा दाट पुष्कळ शिताची अशी असते ) ही तृप्तिकारक , मनाला प्रिय , ग्राहक , बलवर्धक , पथ्यकारक , रुचीला गोड , हलकी , अग्निदीपक , आणि भूक व तहाननाशक आहे .

भाजी , मांसाचे तुकडे व रुचिकारक अशा फळांचे वगैरे तुकडे टाकून केलेली विलेपी हृद्य , तृप्तिकारक , वृष्य (कामवर्धक ), पौष्टिक व शक्तिवर्धक आहे . तीच चिंचेचा कोळ वगैरे आंबट पदार्थ घालून आंबट केली असता जिरण्याला फार त्रासदायक आहे .

मंड हा शितविरहित असतो . पेया (पेज ) पातळच पण शितासहित असते . विलेपी ही देखील पातळच , पण हिजमध्ये शितांचा भाग बराच असतो आणि यवागुमध्ये पाणी फार कमी , सर्व शितेच असतात , पण तीही पातळच पण विलेपीपेक्षा दाट असते .

पायस (दूध घालून केलेली तांदळाची खीर ) हा मलावष्टंभकारक , बलवर्धक मेद व कफ वाढविणारा व जड आहे .

कृशरा (तीळ , तांदूळ व उडदाची डाळ घालून केलेली यवाग ) ही कफपित्तकारक , बलवर्धक व वातनाशक आहे .

तांदूळ धुऊन शिजवून पेज काढून केलेला व चांगला शिजलेला ऊन भात निर्मळ , शुद्ध , मनाला प्रसन्नता आणणारा , सुगंधी , स्वच्छ व हलका असतो . तोच तांदूळ न धूता केलेला , पेज न काढलेला व चांगला न शिजलेला भात जड असतो . भाजलेल्या तांदुळाचा भात हलका , सुगंधी व कफनाशक असतो . मासाचे तुकडे , व वांगी वगैरे फळांचे तुकडे व बटाटे वगैरे कंदांचे तुकडे , मुगाची वगैरे डाळ आणि चिंचेचा कोळ वगैरे आंबट रस घालून तयार केलेला व तुपात वगैरे फोडणीस टाकून तयार केलेले निरनिराळे सर्व भात जड , पौष्टिक व शक्तिवर्धक आहेत . त्याचप्रमाणे दुधात शिजविलेले भातही तशाच गुणाचे आहेत .

सडून कोंडा वगैरे काढून तयार केलेल्या डाळीचे किंचित भाजून केलेले वरण हलके व हितकारक आहे .

शिजवून पिळून टाकून तुपात वगैरे फोडणीस टाकलेली भाजी पथ्यकारक आहे . तीच शिजवून पिळून न टाकलेली व फोडणी न दिलेली भाजी अपथ्यकारक समजावी .

मांस हे आपल्या जातीच्याच गुणाने कामवर्धक असून स्निग्ध व बलवर्धक आहे . दही , ताक , कांजी , चिंच वगैरे आंबट फळांचा रस (कोळी ) व तिखट मिश्र करून तुपात किंवा तेलात फोडणीस टाकून तयार केलेले मांस पथ्यकारक , बलवर्धक , रुचिकारक , पौष्टिक व जड आहे . तेच मांस दही शिंपून हिंग , जिरे वगैरे सुगंधी मसाला घालून तयार केले असता ते कफपित्तकारक व बल मास व जठराग्निवर्धक आहे . कठीण मासाचे तुकडे पुष्कळशा तुपात तळून त्यावर वरचेवर ऊन पाणी शिंपून ते मऊ झाले म्हणजे हिंग , जिरे वगैरे मसाला टाकून तयार करितात . त्याला परिशुष्कमांस असे म्हणतात . ते शरीराला बळकटी आणणारे , स्निग्ध , आनंददायक , प्रीतिवर्धक , जड , रुचिकार , बलकारक , बुद्धिवर्धक अग्निदीपक , मांस , ओज व शुक्र ह्यांना वाढविणारे आहे . तेच परिशुष्कमांस शस्त्रादिकांनी छेदून अगदी पिठा प्रमाणे बारीक केले तर त्याला स्वयंपाक करणारे आचारी ‘उल्लिप्तपिष्ठ ’ असे म्हणतात . तेही परिशुष्काप्रमाणेच गुणकारक आहे . तेच प्रत्यक्ष अग्नीवर भाजले असता त्याहून हलके आहे . तेच मांस लोखंडाच्या सळईच्या टोकावर धरून निखार्‍यावर भाजले आणि त्याजवर तूप , दही वगैरे शिंपून तयार केले तर फारच जड होते .

वर सांगितलेले ‘‘उल्लप्त ’’ मांस , तुपात वगैरे तळलेले ते ‘भर्जित ’ मांस , पिठाप्रमाणे बारीक कुटून त्याचे वडे वगैरे केलेले ते ‘‘पिष्ट ’’ मांस , निखार्‍यावर भाजलेले ते ‘‘प्रतप्त ’’ मांस , मांसाच्या तुकड्य़ावर उत्तम मसाला फासून ते सुरापात्रात शिजवून त्याला मधाप्रमाणे तांबुस रंग आला म्हणजे त्याला मोहरीचा वास देतात त्याला ‘‘कंदुपाचित ’’ मांस म्हणतात . ते तसेच वर सांगितलेले हे परिशुष्क , प्रदिग्ध व शुल्य यांस किंवा ह्यासारखे अन्य प्रकाराने तयार केलेले मांस ह्यापैंकी कोणतेही मांस तेलात तळले असता ते उष्णवीर्य , पित्तकारक व जड होते . तेच तुपात तळले असता हलके अग्निदीपक , हृद्य , रुचिकारक , दृष्टी स्वच्छ करणारे , उष्णता करणारे , पित्तनाशक व मनाला आनंददायक होते .

.

मांसरस हा प्रीतिवर्धक , प्राणशक्ति उत्पन्न करणारा , श्वास , खोकला व क्षयनाशक , वातपित्त व श्रमनाशक व हृद्य असा आहे . शिवाय ज्याची स्मरणशक्ति नष्ट झाली आहे , ओज क्षीण झाले आहे , स्वर बिघडला आहे , जे ज्वराने अशक्त झाले आहेत , उरःक्षताने क्षीण झाले आहेत , ज्यांचे हाड मोडले आहे , ज्यांचे सांधे निखळले आहेत , जे कृश आहेत , ज्यांचे शुक्र क्षीण झाले आहे , अशांना पुष्टि आणणारा , हाडे व सांधे सांधणारा , शुक्राची वाढ करणारा आणि शक्ति वाढविणारा आहे . तोच मांसरस आंबट डाळिंबाचा रस घालून तयार केला असता तो दृष्य व दोषनाशक आहे .

सौराव (शूखा ) हा सर्वांना आवडणारा , त्यात विशेषतः ज्याच्या तोंडाला कोरड पडली आहे त्याला फारच प्रिय , भूक व तहाननाशक , सर्व मांसमय पदार्थात श्रेष्ठ , गोड व थंड असा आहे . ज्या मांसाचा रस काढून घेतला आहे ते मांस पुष्टि व बलदायक नसते . ते मलावष्टंभकारक पचनाचे वेळी त्रासदायक , रूक्ष बेचव व वात वाढविणारे आहे .

खानिष्क (वेसवाराचा एक प्रकार ) हा ज्याचा जठराग्नि प्रदीप्त आहे त्याला सदा हितकारकच आहे .

वेसवार हा करण्याची रीत -हाडे काढून टाकलेले मांस शिजवून ते पुनः पाट्यावर बारीक वाटावे . नंतर त्यात पिंपळी , सूंठ , मिरे , गुळ व तूप घालून पुनः चांगले पचन करावे . ह्या मांसाच्या पक्वान्नाला ‘‘वेसवार ’’ असे म्हणतात . हा जड , स्निग्ध , बलकारक व वातरोगनाशक आहे ॥३४० -३६६॥

मुगाचा यूष (मूग शिजवून त्याचे काढून घेतलेले काही मिश्र कट ) न केलेला किंवा हिंग , जिरे वगैरे घातलेला असा दोन प्रकारचा (अकृत व कृत ) आहे . ह्यांचे लक्षण पुढे सांगितले आहे . हे दोन्ही यूष कफनाशक , अग्निदीपक , हृद्य (आवडणारा ), वमनविरेचनादिकांनी कोठा शुद्ध केलेले व व्रणाचे रोगी ह्यांना फार हितकारक असे आहेत . ह्याच मुगाच्या यूषात आंबट डाळिंबाचे दोण व मनुका घालून तयार केला असता त्याला ‘‘रोग खाडव ’’ (सार ) असे म्हणतात . हा रुचिकारक , लवकर पचणारा व वातादि दोषांना न वाढविणारा आहे .

मसुरा , मूग , गहू व हुलगे ह्यांचा सैंधव टाकून केलेला यूष कफपित्ताला न वाढविणारा व वातरोगात पथ्यकारक असा आहे . ह्यातही मनुका व आंबट डाळिंबाचे दाणे घातले असता तो वातविकारात खाण्यास पथ्यकारक आहे आणि रुचिकारक , अग्निदीपक हृद्य (आवडणारा ) व पचनाला हलका असा आहे .

कडुपडवळ किंवा कडुनिंबाची फळे ह्यापैकी कोणताही एक जिन्नस एक भाग व मुगाची वगैरे डोळ तीन भाग घालून केलेला यूष कफ व मेदनाशक , पित्तनाशक , अग्निदीपक , हृद्य आणि कृमि , कुष्ठ व ज्वरनाशक आहे . (हे गुण दोनीही यूषाचे सारखेच आहेत .)

कोवळ्य़ा मुळ्य़ांचे तुकडे एक भाग व मुग तीन भाग ह्याचा केलेला यूष श्वास , खोकला , पडसे , मळमळणे , अरुचि व ज्वर ह्यांचा नाश करितो . आणि कफ , मेद व गळ्याचे रोग ह्यांचाही नाश करितो .

हुलग्याचा यूष वातनाशक आणि श्वास , पीनस , तूणी , प्रतूणी , खोकला , मुळव्याध , गुल्म व उदावर्त ह्यांचा नाशक आहे .

आंबट डाळिंबाचे दाणे व आवळाकाठी दोन्ही मिळून एक भाग व मुग तीन भाग ह्यांचा केलेला यूष , हृद्य , दोषांचे सशमन करणारा , हलका , प्राणाला उत्तेजन आणणारा , अग्निदीपक , मूर्च्छा व मेदनाशक आणि वातपित्त ह्यांना जिंकणारा आहे . ह्याच रीतीने केलेला आवळाकाठी व मुग ह्यांचा यूष ग्राहक असून पित्त व कफदोषाला पथ्यकारक आहे . सातु , आंबट बोरे व हुलगे यांचा यूष घसा मोकळा करणारा व वातनाशक आहे . सर्व धान्यांचा केलेला यूष (मुग , मसुर वगैरे द्विदल धान्यांपैकी पथ्यकारक अशा धान्यांचा केलेला यूष ) वरील यूषाप्रमाणेच गुणाने असून पौष्टिक व प्राणशक्ति वाढविणारा आहे . (ह्याला ग्रंथातरी ‘‘नवयुष्टिक ’’ यूष म्हटले आहे .)

खड्यूष (हा मुग वगैरे द्विदल धान्ये ताकात शिजवून केलेला किंवा चाकवत वगैरे भाज्या व ताक घालून शिजवून केलेला असा दोन प्रकारचा आहे .) कांबलिकयूष (हा आंबट दही , सैंधव , तूप , तीळ व उडीद ह्यांच्या मिश्रणाने तयार केलेला ) हे दोन्हीही यूष हृद्य व वातकफदोषात पथ्यकारक आहेत .

आंबट डाळिंबाचे दाणे घालून केलेला यूष शक्तिवर्धक , वातकफनाशक व अग्निदीपक आहे . आंबट दही घालून केलेला यूष कफकारक , बलवर्धक , स्निग्ध , वातनाशक व जड आहे . आंबट ताक घालून केलेला यूष पित्तकारक , विषरोगाला अपथ्यकारक व रक्त दूषित करणारा आहे .

खड्यूष (ताक वगैरे आंबट पदार्थात केलेले यूष ), खड्यवागू खड्युषात तयार केलेली यवागू , पाडव (ज्यामध्ये आम्ल व मधुर द्रव पदार्थ पुष्कळ असून तुरट , खारट व तिखट चवीपुरते असतात , कडु पदार्थ मुळीच नसतो असे पेय ) व पानक (पन्हे किंवा सरबत ) अशा प्रकारचे व ह्यासारखे दुसरे तोंडी सांगण्याप्रमाणे करावेत .

सर्व तऱ्हेचे यूष जर तूप व तिखटमीठ न घालता नुसतेच कढवून तयार केले असतील तर त्यांना अकृत (संस्काररहित ) यूष म्हणतात . आणि त्यामध्ये तिखट मीठ घालून तुपाची फोडणी दिली म्हणजे ते कृत (संस्कारयुक्त ) यूष म्हणतात .

वरील सर्व यूष अनुक्रमे ताक , कांजी व चिंचेचा कोळ वगैरे आंबट फळांचे रस घालून केलेले यूष किंवा मांसरस हे तिखट , मीठ व तुपाची फोडणी वगैरे संस्कार केलेले असोत अगर संस्कारहित असोत ते उत्तरोत्तर पचनाला हलके व पथ्यकारक आहेत .

आंबट दह्यावरील पाणी किंवा इतर आम्लरस ह्यात तयार केलेल्या यूषाला कांबलिक म्हणतात . तीळ व तिळाची पेंड ह्यांची व्यंजने (चटण्या , कोशिंबिरी , रायती वगैरे तोंडीलावणी ), वाळविलेल्या भाज्या , धान्यादिकांचे मोड व सिंडाकी हे पदार्थ जड असून कफपित्तनाशक आहेत . वडेही गुणाने असेच जड व विदाहकारक आहेत . राग (साखर , संचळ , सैंधव , आमसुले , फालसा वगैरे आंबट फळे (फळांचे तुकडे व पिकलेल्या जांभळाचा रस व मोहर्‍या ह्यांचे मिश्रणाने तयार करितात त्याला राग असे म्हणतात ) म्हणजे रायती व खाडव (पंचामृत ह्याचे लक्षण मागे ३७८ श्लोकाचे भाषांतरात सांगितले आहे ) हे दोन्हीही हलके , पौष्टिक , वृष्य , हृद्य , रुचिकारक , अग्निदीपक आणि तहान मूर्च्छा , भ्रम (घेरी ), ओकारी व श्रमनाशक आहेत .

रसाला (केळादि मधुर फळांच्या रसाची शिखरण किंवा दह्याचे श्रीखंड ) ही पौष्टिक , शक्तिवर्धक , स्निग्ध , वृष्य व रुचिकारक असते . दही हे गूळ घालून खाल्ले असता स्निग्ध , हृद्य व वातनाशक आहे . सातु वगैरे धान्ये भाजून त्याचे केलेले पीठ थोड्य़ाशा तुपाने मळून त्यात थंडपाणी व साखर घालून फार दाट किंवा पातळ नाही असे पेय करितात त्याला मंथ म्हणतात . हा तात्काळ शक्ति आणणारा आणि तहान व श्रमनाशक आहे . ह्यामध्ये आम्लरस तूप व गूळ मिश्र केला असता तो मूत्रकृच्छ व उदावर्त ह्यांचा नाश करितो . तोच मंथ साखर , उसाचा रस व द्राक्षे मिश्र करून केला असता तो पित्तविकाराचा नाश करतो . द्राक्षे (किंवा मनुका ) व मोहाची फुले ह्यांच्या मिश्रणाने तयार केलेला मंथ कफविकाराचा नाश करितो . आणि वरील तीनही दोषनाशक पदार्थांच्या मिश्रणाने केलेला मंथ मलमूत्रदिकांचे व वातादिदोषांचे अनुलोमन करणारा आहे .

आंबट रस मिश्र करून किंवा आंबट रस न घालता तयार केलेले गुळाचे पानक (पन्हे -पेय ) हे जड व मूत्रल असते . तेच पन्हे खडीसाखर , मनुका व साखर मिश्र करून त्यात आंबटपणा येण्याकरिता चिंचेचा वगैरे कोळ , थोडी मिरे व कापुर मिश्र केला असता ते फारच चांगले होते . मनुकाचे पानक (पन्हे किंवा सरबत ) श्रमनाशक आणि मूर्च्छा , दाह व तहान ह्यांचा नाशकारक आहे . फालशाच्या फळांचे किंवा बोरांचे पानक (सरबत ) मनाला आवडणारे व मलावरोधकारक आहे . पानकांतील द्रव्ये व त्याजवरील (मसाला वगैरे घालण्याचे ) संस्कार ह्या सर्वांचा विचार करून ते किती घ्यावे ह्याचे प्रमाण ठरवावे आणि त्यामध्ये ज्या ज्या द्रव्यांचा संयोग असेल त्यावरून ते जड किंवा हलके आहे हे ठरवावे ॥३६७ -३९१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP