मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि १०

सूत्रस्थान - अन्नपानविधि १०

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अनुपान वर्ग

आता सर्व प्रकारची अनुपाने सांगतो . अनुपान म्हणजे एकदा पदार्थ थोडा जास्त खाण्यात आला असता तो पचन व्हावा ह्यासाठी त्याजवर जो दुसरा पदार्थ प्राशनार्थ देतात त्याला अनुपान असे म्हणतात . आंबट पदार्थ अतिशय खाल्ल्याने ज्याचे मनाला आंबट रसाचा अगदी तिटकारा आला आहे अशा मनुष्यांना मधुर गोड पदार्थ खाण्यास द्यावे ; म्हणजे त्या गोड रसाने त्यांना समाधान होते . तसेच गोड पदार्थ फार खाण्याने ज्यांचे मन विटले आहे त्यांना आंबट पदार्थ खावयास द्यावे म्हणजे त्या आंबट रसाने त्यांची समाधानी होते . बाकीचे तिखट , खारट वगैरे रस फार खाणे संभवत नसल्यामुळे त्यांच्या संबंधाने सांगितले नाही .

चाणाक्ष वैद्याने व्याधीचे बलाबल व ऋतुमान वगैरे लक्षात घेऊन खाणाराने जेवणात कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेत ते पाहून , त्यापासून काही अपाय होऊ नये ह्याकरिता जेवण झाल्यावर थंड किंवा ऊनपाणी द्राक्षासवादि आसवे , मद्य , निरनिराळे धान्याचे यूष , महाळुंग वगैरे फळांचे आंबट रस , कांजी दूध व मांसरस ह्यांपैकी ज्याला जे अनुपान हितकारक असेल ते त्याला योग्य प्रमाणात प्राशनार्थ द्यावे . सर्व अनुपानामध्ये अश्विनमहिन्यातील पावसाचे पाणी ज्याला ‘‘अंतरिक्षजल ’’ किंवा ‘‘गांगजल ’’ म्हणतात ते चांगल्या भांड्यात साठवून ठेविले असल्याने श्रेष्ठ आहे असे म्हणतात , कारण सर्व लोकांना पाणी हे जन्मापासूनच प्रशस्त असून मधुरादि सर्व रसही जलरूपच आहेत त्याअर्थी निर्दोष असे अश्विनमहिन्यातील पावसाचे पाणीच सर्व अनुपानात श्रेष्ठ आहे .

ह्याप्रमाणे हा संक्षेपतः अनुपानाचा प्रकार सांगितला . आता ह्यापुढे विस्ताराने सांगतो ॥४१८ -४२१॥

तेल , तूप , वसा मज्जा वगैरे स्नेहावर ऊनपाणी प्यावयास द्यावे असे आहे ; तथापि बिब्ब्याचे तेल व तूवकराचे तेल (तीवर किंवा किंकण ह्याचे तेल ) ह्याजवर मात्र ऊनपाणी देऊ नये . ह्या दोन तेलांना थंड पाणीच द्यावे . कित्येकांच्या मताने तेलावर उन्हाळ्यात यूष प्यावयास द्यावा व थंडीच्या दिवसांत कांजी प्यावयास द्यावी . मधावर अनुपानार्थ थंड पाणी द्यावे ; तसेच पिष्टमय पदार्थावरही बहुतेक थंड पाणीच द्यावे . कित्येक कोमट पाणी पिष्टमय पदार्थांवर द्यावे असे म्हणतात . त्याचप्रमाणे दही , तांदुळाची वगैरे खीर ह्याजवर थंड पाणीच अनुपानार्थ द्यावे . मद्याच्या प्राशनामुळे होणार्‍या दाहादिकांवर व विषविकारातही थंड पाणीच अनुपानार्थ द्यावे . पिष्टमय पदार्थांवर कित्येकांच्या मताने कोमट पाणी प्यावयास द्यावे . साळीच्या तांदुळाचा भात व मुगादिकांची उसळ अशा प्रकारचे अन्न खाल्ले असता त्याजवर दूध किंवा मांसरस अनुपानार्थ द्यावा . त्याचप्रमाणे कुस्ती वगैरे युद्धे करून दमलेला , मार्ग चालून थकलेला , उन्हामुळे किंवा विस्तवाच्या शेकामुहे तप्त झालेला , विष भक्षण केलेला मद्याच्या प्राशनाने पिडित अशांनाही दूध अगर मांसरस हा अनुपानार्थ द्यावा . उडदाच्या वगैरे पदार्थांवर कांजी अथवा दह्यांतील पाणी (मस्तु ) प्यावयास द्यावे सर्व प्रकारच्या मांसावर ज्यांना मद्य पिण्यास परवानगी आहे अशांना मद्यच अनुपानार्थ द्यावे . कारण मासावर मद्यच अनुपानार्थ श्रेष्ठ आहे आणि ज्यांना मद्य पिण्याची धर्मशास्त्राने परवानगी नाही अशांना मांसावर अनुपानार्थ पाणी अथवा आंबट डाळिंबाचा किंवा त्यासारख्या महाळुंग वगैरे फळांचा रस द्यावा . उन्हातून दमून आलेला , मार्ग चालून थकलेला , संभाषण किंवा मोठ्य़मोठ्याने अध्ययन करून दमलेला व स्त्रीसंगाने शिणलेला अशा मनुष्याला दूध प्यावयास द्यावे . ते त्यांना अमृताप्रमाणे गुणकारक आहे . कृश मनुष्याला सुरा व स्थूल मनुष्याला थंड पाणी व मध हे अनुपानार्थ द्यावे . जे निरोगी आहेत त्यांनी जेवणामध्ये नाना प्रकारची पक्वाने , चटण्या , कोशिंबिरी वगैरे खुशाल खावी . वातविकारांत रूक्ष व उष्ण पदार्थ खाणे प्रशस्त आहे . आणि पित्तविकारात मधुर व थंड असे अनुपान योजावे रक्तपित्ताच्या आजारांत दूध व उसाचा रस अनुपानार्थ द्यावा . आणि विषाच्या आजारात रुई , भोंकर , व शिरस (शीरीष वृक्ष ) ह्यांची आसवे अनुपानार्थ द्यावी ॥४२२ -४६०॥

आता धान्यादि सर्व वर्गाची निरनिराळी अनुपाने क्रमाने सांगतो ती ऐक .

गहु , तांदूळ , सातु वगैरे शूक धान्ये व राळे , सावे , हारीक वगैरे कुधान्ये (तृण धान्ये ) ही भक्षण केल्यावर त्यांजवर आंबट बोरांचा रस अनुपानार्थ प्यावयास द्यावा . द्विदल धान्ये (तुरी हरबरे वगैरे ) भक्षण केल्यावर त्याजवर कांजी अनुपानार्थ प्यावयास द्यावी हरीण वगैरे वेगवान जनावरांचे मांस व जांगलदेशांतील वर्तकादि पक्ष्यांचे मांस ह्याजवर पिंपळीचे आसव अनुपानार्थ द्यावे . लावा , वर्तिक (राण चिमणी ) वगैरे विष्किरवर्गातील पक्ष्यांच्या मासांवर लहान व मध्यम जातीच्या बोरांचे आसव द्यावे शिवाय पिप्ल्यासवही वाटल्यास द्यावे . पारवा , कबुत्तर , चिंमणी वगैरे प्रसूदवर्गातील पक्ष्यांच्या मांसावर वड , उंबर वगैरे क्षीर वृक्षाचे आसव अनुपानार्थ द्यावे , गुहेत राहणार्‍या पशूच्या मांसावर खजूराचे व नारळाचे आसव अनुपानार्थ द्यावे . अस्वल ससाणा वगैरे प्रसंगातील पशुपक्ष्यांच्या मांसावर अश्वगंधाचे आसव अनुपानार्थ द्यावे . वानर वगैरे पर्णमृगांच्या मांसावर शेवग्याचे आसव अनुपानार्थ द्यावे . साळई , ससा वगैरे बिलेशय पशूंच्या मांसावर आंबट फळांचे आसव अनुपानार्थ द्यावे . घोडे वगैरे एक खुराच्या पशूंच्या मांसावर त्रिफळ्य़ाचे आसव द्यावे . हत्ती , गवे , रेडे वगैरे कुलचर पशु , गोगलगाय वगैरे कोशस्थ प्राणी व कासव वगैरे पादीन प्राणी ह्यांच्या मांसावर शिंगाडे व कचरा (नागरमोथ्यातील एक प्रकार ) ह्यांचे आसव अनुपानार्थ द्यावे . बदक , पाणकोंबड्या वगैरे प्लववर्गातील पक्ष्यांच्या मासावर उसाच्या रसाचे आसव द्यावे नदीतील माशांवर कमळांचया देठाचे किंवा मुळ्य़ांचे आसव द्यावे . समुद्रातील माशांवर महाळुंगाच्या रसाचे आसव द्यावे . आंबट फळे खाल्ली असता त्याजवर पद्म (मोठे कमळ ) व उत्पल (निळे कमळ ) ह्यांच्या गड्ड्य़ाचे आसव द्यावे . द्राक्षे , बदाम , वगैरे मधुर फळांवर सुंठ , मिरे व पिंपळीचे चूर्ण घालून खंडासव (शर्करासव ) अनुपानार्थ द्यावे .ताडांच्या वगैरे फळांवर कांजी अनुपानार्थ द्यावी . तिखट फळांवर दूर्वा , देवनारळ व वेत ह्यांचे आसव अनुपानार्थ द्यावे . पिप्पल्यादिवर्गातील द्रव्ये भक्षण केली असता त्याजवर गोखरू व वसु ह्यांचे आसव अनुपानार्थ द्यावे . कोहाळे वगैरे फळभाज्यांवर दारूहाळद व कळकाचे कोंब ह्यांचे आसव अनुपानार्थ द्यावे . चंचु (चिचुची भाजी ) वगैरे भाज्यांवर लोघ्रासव अनुपानार्थ द्यावे . जीवंति वगैरे भाज्यांवर त्रिफळ्य़ाचे आसव द्यावे . करड्यांच्या पाल्यांचा भाजीवरही त्रिफळ्य़ाचेच आसव अनुपानार्थ द्यावे . ब्राह्मी , वगैरे खाल्ले असता त्यांजवर आंबट डाळिंब वगैरे आंबट फळांचे आसव अनुपानार्थ द्यावे . सैंधव वगैरे लवणवर्गातील पदार्थावर मद्य , आसव व कांजी ही अनुपानार्थ द्यावी . अथवा सर्व पदार्थांवर सामान्येकरून पाणी हे अनुपानार्थ द्यावे ॥४३१ -४३२॥

४३३ ) सर्व अनुपानात ‘‘माहेंद्रतोय ’’ म्हणजे अश्विनमासातील अंतरिक्षपाणी हे फार उत्तम आहे . अथवा ज्याला जे पाणी प्रकृतीला मानवले आहे , तेच त्याला हितकारक आहे . कफ व वातदोषावर ऊन पाणी पथ्यकारक आहे आणि रक्तदोष व पित्तदोष ह्यांजवर थंड पाणी पथ्यकारक आहे .वातादिदोषांना वाढविणारे असे अन्न खाल्ले असता , तसेच जड किंवा अतिशय अन्न खाल्ले असता त्याजवर योग्य ते अनुपान प्राशन केले असता ते सुखाने पचन होते .

जेवण केल्यावर जे अनुपान प्राशन केले असता ते रुचिपद , पौष्टिक , वृष्य , एकत्र झालेल्या दोषांना पृथक् करणारे , तृप्तिकारक , शरीराला कोमलपणा आणणारे , श्रम व थकवा नाहीसा करणारे , सुखकारक , अग्निदीपक , दोषांचे शमन करणारे , तहान शमविण्याविषयी फारच उत्तम , बलवर्धक व अंगकांती चांगली करणारे असे असते . ते अनुपान उत्तम समजावे .

हे अनुपान जेवणापूर्वी घेतले असता शरीर कृश करिते . जेवणाच्यामध्ये घेतले असता ते शरीर कृश किंवा स्थूळ न करिता मध्यम प्रमाणांत ठेविते . आणि जेवणानंतर घेतले असता ते शरीराला पुष्ट करिते . ह्यासाठी नीट पाहून योग्य त्या योजनेने त्याचा उपयोग करावा . कठीण व कोरडे (शुष्क ) अन्न खाणार्‍या मनुष्याने त्या अन्नांवर जर पाणी वगैरे द्रव पदार्थांचे अनुपान घेतले नाही तर त्याला ते अन्न पीडाकारक होते . ह्यासाठी जेवण झाल्यावर त्याजवर योग्य ते अनुपान अवश्य प्यावे .

श्वास व खोकला ह्यांनी पीडित , मानेच्या वरच्या भागांतील ज्यांना रोग आहेत ते , ज्यांना उरःक्षत रोग आहे ते ज्यांना मळमळते किंवा तोंडास पाणी सुटते ते व ज्यांचा आवाज वातादिदोषांनी बिघडला आहे ते , अशा लोकांनी जेवण झाल्यावर त्याजवर अनुपानार्थ पाणी वगैरे काहीही प्राशन करू नये .

अनुपान प्राशन केल्यावर मार्गक्रमण , व्याख्यान , अध्ययन , गायन व झोप घेणे ह्या गोष्टी करू नयेत . कारण त्या योगाने ते अनुपान घसा व हृद्याचे ठिकाणी स्थित होऊन आमाशयाला दूषित करिते . त्यामुळे कफ पातळ होणे , अग्निमांद्य व वांति , वगैरे अनेक रोगांना ते उत्पन्न करिते .

गुरुत्व (जडपणा ) व लघुत्व (हलकेपणा ) हे धर्म द्रव्याच्या ठिकाणी स्वाभाविकच असतात . ते पदार्थाला सोडून नसतातच . तसेच त्या पदार्थावरील संस्कार , त्यांचे सेवन

करण्याचे प्रमाणे , अन्न (मंड , पेज , भात व लाडू वगैरे पक्वाने ही उत्तरोत्तर जड असतात ) व काल हे देखील त्या पदार्थाला सोडून नाहीत व हे उत्तरोत्तर पदार्थांशी अधिकच संलग्न असतात म्हणून खाण्याच्या पदार्थांच्या जड व हलकेपणाबद्दल ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काय ते ठरवावे .

हा जो वर पदार्थांच्या जड व हलकेपणा ठरविण्याविषयीचा विचार सांगितला आहे तो जे लोक फारसा उद्योग न करणारे , जठराग्नि मंद असलेले , चांगलेसे निरोगी नसलेले सुकुमार व सुखी असतात त्यांच्या आहाराच्या ठिकाणी अवश्य करावा म्हणून सांगितला आहे .

जे बलवान आहेत , ज्यांना भाकरी वगैरे कठीण अन्न खाण्याची सवय आहे , ज्यांचा जठराग्नि चांगला प्रदीप्त आहे , व जे नित्य उद्योग करणारे आहेत त्याच्या आहाराविषयी ह्या गुरुत्वाचा व लघुत्वाचा विचार करण्याचे कारण नाही ॥४३४ -४४४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP