मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
रसविशेषविज्ञानीय

सूत्रस्थान - रसविशेषविज्ञानीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय बेचाळीसावा

आता ‘रसविशेषविज्ञानीय ’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

आकाश , वायु , तेज , उदक व पृथ्वी ह्या पंचमहाभूतांमध्ये शब्द , स्पर्श , रूप , रस व गंध हे त्यांचे गुण ह्याच अनुक्रमाने उत्तरोत्तर एक एक वाढत्या प्रमाणांत असतात . (जसे शब्द हा आकाशाचा गुण एकच आहे ; पण वायुमध्ये शब्द व स्पर्श हे दोन गुण संभवतात . ह्याप्रमाणे सर्व महाभूतांसंबंधी जाणावे .) म्हणूनच रस हा जलतत्त्वप्रधान आहे .

ह्या महाभूतांचा परस्परांशी संयोग आहे . ह्यांचा परस्पर कार्यकारणसंबंध आहे . ही परस्परांशी मिसळतात . असे ह्यांचे परस्परांशी संबंध असल्याकारणाने ह्या सर्वांशी सान्निध्य आहे . तथापि जो एकादा गुण न्यूनाधिक असेल त्याप्रमाणे तो त्या त्या महाभूताचा आहे असे मानतात . ह्याच नियमाला अनुसरून रसाला आप्य असे म्हटले आहे . तो ‘‘रस ’’ बाकीच्या महाभूतांच्या संसर्गाने पक्व झाल्यामुळे त्याचे सहा निरनिराळे ‘रस ’ झाले ते असे - मधुर , आम्ल , (आंबट ), लवण (खारट ), तिखट , कडु , तुरट असे हे सहा रस आहेत . ह्यांचाही पुनः परस्परांशी संयोग होऊन त्यांचे एकंदर त्रेसष्ट भेद होतात .

त्यापैकी भूमि व जलतत्त्वांच्या गुणाधिक्याने मधुर रस असतो . भूमि व अग्नितत्त्वांच्या गुणाधिक्याने आम्ल रस असतो . जल व अग्नि ह्यांच्या गुणाधिक्याने लवण रस असतो . वायु व अग्नि ह्यांच्या गुणधिक्याने कडुरस असतो आणि पृथ्वी व वायु यांच्या गुणाधिक्याने तुरट रस होतो ॥३॥

त्यापैकी मधुर आंबट व लवण (खारट ) हे रस वातनाशक आहेत . मधुर , कडु व तुरट हे पित्तनाशक आहेत . आणि तिखट , कडु व तुरट हे कफनाशक आहेत .

त्यापैकी वायु हा वायुपासूनच उत्पन्न झालेला आहे . पित्त अग्निपासूनच झालेले आहे . आणि कफ हा पाण्यापासून उत्पन्न झालेला आहे . तसेच रसही आपआपल्या उत्पादकत्त्वाच्या गुणाचा ऱ्हास करणारे आहेत .

कित्येक आचार्याचे असे मत आहे की , सर्व जग हे अग्निसोमात्मक (शीतोष्णात्मक ) आहे म्हणून रसही दोनच प्रकारचे आहेत . एक सोमातत्त्वात्मक व दुसरा अग्नितत्त्वात्मक . त्यापैकी मधुर , कडु व तुरट हे रस सौम्य आहेत . तिखट , आंबट व खारट हे आग्नेय आहेत . त्यापैकी मधुर , आंबट व खारट हे रस स्निग्ध व जड आहेत . आणि तिखट , कडु , व तुरट हे रुक्ष असून हलके आहेत . तसेच सौम्यरस हे थंड आहेत व आग्नेय रस उष्ण आहेत ॥४ -७॥

थंडपणा , रुक्षता , हलकेपणा , स्वच्छपणा , व स्तंभन (आडून रहाणे ) हे गुण वाताचे आहेत . कषाय (तुरट ) रसाची उत्पत्तिही वायुतत्त्वापासूनच असल्यामुळे तो आपल्या थंड गुणाने थंडपणा वाढवितो . आपल्या रुक्षपणाने रुक्षता वाढवितो . हलकेपणाने हलकेपणा वाढवितो . विशदपणाने वैशद्य (स्वच्छपणा ) वाढवितो ; आणि स्तंभित गुणाने अवरोध उत्पन्न करितो .

उष्णता , तीक्ष्णपणा , रुक्षता , हलकेपणा व स्वच्छपणा हे गुण पित्ताचे आहेत . ह्या पित्ताची व तिखट रसाची उत्पत्ति एकाच अग्नितत्त्वापासून आहे . म्हणून तिखट रस आपल्या उष्ण गुणाने उष्णता वाढवितो . तीक्ष्णपणाने तीक्ष्णता वाढवितो . रूक्षपणामुळे रूक्षता वाढवितो . हलकेपणाने हलकेपणा वाढवितो . आणि विशदपणाने विशदपणा वाढवितो .

मधुरपणा (गोडी ), स्तिग्धपणा (तेलकटपणा ), जडत्व , थंडपणा व बुळबुळितपणा हे गुण कफाचे आहेत . कफाची व मधुर रसाची उत्पत्ति एकाच जलतत्त्वापासून आहे . म्हणून मधुर रस आपल्या आंगच्या गोडीने माधुर्याची वाढ करितो . स्निग्धपणाने स्निग्धपणा वाढवितो . जडत्वाने जडपणा वाढवितो थंडपणाने थंडपणा वाढवितो . आणि बुळबुळितपणाने बुळबुळितपणा वाढवितो .

आता ह्या कफाहून अगदी विरूद्ध तत्त्वापासून म्हणजे अग्नितत्त्वापासून तिखट रसाची उत्पत्ति आहे . त्यामुळे कफाचे व त्या तिखट रसाचे अगदी विरूद्ध गुण आहेत . त्यामुळे तिखट रस आपल्या तिखटपणामुळे कफाच्या मधुरपणाचा नाश करितो . रूक्ष गुणाने स्निग्धपणाचा नाश करितो . लघुत्त्वाने जडत्त्वाचा नाश करितो . उष्ण गुणाने शैल्याचा नाश करितो . आणि विरूद्धपणाने (स्वच्छ धर्माने ) बुळबुळितपणाचा नाश करितो . हे थोडक्यात येथे दाखविले आहे . ह्यावरून वातादिदोषांच्या क्षयवृद्धीला अनुसरून त्या त्या अनुकूल अगर प्रतिकूल रसांची योजना करावी ॥८॥

रसांचे लक्षण .

ह्या रसांचे लक्षण आता सांगतो . ह्या रसापैकी जो रस संतोष उत्पन्न करितो , मनाला उत्साह आणतो , तृप्ती देतो , प्राणधारण करितो , तोंडाला आतून चिकटपणा आणतो आणि कफाला वाढवितो त्याला ‘‘मधुररस ’’ म्हणावे . जो रस जास्ती सेवन केला असता दात आंबतात , तोंडाला पाणी सुटते व अन्न खाण्याविषयी वासना उत्पन्न करितो , त्याला आंबट रस म्हणावे . जो अन्न खाण्याविषयी वासना उत्पन्न करितो . कफाला पातळ आणि त्वचेला वगैरे मऊपणा आणतो तो ‘‘लवणरस ’’ समजावा . जो रस जिभेला लागला असता जिभेच्या शेंड्याला झटका देतो , अतिशय झाला तर तोंड पोळते व त्यामुळे कासाविसपणा उत्पन्न होतो , मस्तक भणाणून जाते आणि नाकातून स्राव (पाणी ) येते त्या रसाला ‘‘तिखट ’’ रस असे म्हणतात जो रस अतिसेवनाने गळ्यात (घशात ) ओढल्यासारखी पीडा करितो , तोंड स्वच्छ करितो , अन्न खाण्याबद्दल वासना उत्पन्न करितो , आणि जो रस भक्षण करीत असता तोंडाला कोरड पडते , जीभ ताठल्यासारखी होते घशात तोटरा बसतो , छातीत ओढ बसते व पीडा होते त्या रसाला ‘‘तुरट ’’ रस असे म्हणतात ॥९॥

रसांचे गुण .

आता ह्यापुढे रसाचे गुण सांगतो . ह्या सहा रसांपैकी मधुररस रस , रक्त , मांस , भेद , हाडे , मज्जा , ओज , शुक्र व अंगावरील दूध ह्यांना वाढविणारा , डोळ्याला हितकारक , केसांना पोषक , अंगाचा वर्ण चांगला करणारा शक्ति वाढविणारा , मोडलेल्या हाडाला साधारण रक्त व रस ह्या धातूना प्रसादन करणारा , (पूर्णता आणणारा ) लहान मुले , वृद्ध माणसे व उरःक्षताच्या आजाराने क्षीण झालेले ह्यांना पथ्यकारक , भुंगे व मुंग्या ह्यांना प्रीय , तहान , मूर्च्छा , दाह ह्यांचे शमन करणारा , सहाही इंद्रियांना (मनासुद्धा ) उत्साह उत्पन्न करणारा , आणि जंत व कफदोष ह्यांना उत्पन्न करणारा आहे . हा मधुररस ह्याप्रमाणे गुण करणारा आहे ; तथापि हा अति सेवन केला असता खोकला , श्वास , अलसक (अजीर्णाचा प्रकार ), ओकारी तोंडाला गोडपणा , आवाज बसणे , कृमि व गालगुंड हे विकार उत्पन्न करितो . तसेच आवाळु , श्लीपद , बस्ति व गुद ह्या ठिकाणी बुळबुळितपणा (आमसंचय ) व डोळे येणे हे रोग उत्पन्न करितो . (१ )

आंबटरस अन्न जिरविणारा , दोषादिकांचे पाचन करणारा , अग्निदीपक वातनाशक , वाताचे अनुलोमन करणारा (मार्गावर आणणारा ), कोठ्यात दाह करणारा , बाहेर उपयोगात आणिला असता थंड , ओलसरपणा उत्पन्न करणारा व बहुतेक सर्वांना प्रिय असा आहे . ह्या आंबटरसाचे असे गुण आहेत . तथापि हा अतिशय खाण्यात आला असता दाताला आंबटपणा , डोळे मिटणे , अंगावर रोमांच उभे राहाणे , कफ पातळ होणे व शरीराला शिथिलपणा हे विकार उत्पन्न करितो . तसेच व्रणाने पिडलेले , भाजल्यामुळे जखमा झालेले , विषारी दंश झालेले , हाड मोडलेले , सूज आलेले , एखादा अवयव वाकलेले , सांधा वगैरे निखळलेले , विषारी प्राण्यांच्या मूत्राचा संसर्ग झालेले , स्पर्शजन्य विषारी जंतूंचा स्पर्श बाधलेले , हाड पिचलेले , फुटलेले , हाडाला वगैरे भोक पडलेले , हाड चुरलेले , इत्यादि प्रकारांनी पिडीत अशा अवयवांना हा आंबटरस आपल्या अग्नेयधर्माने पक्व करणारा आहे . शिवाय कंठ (घसा ), ऊर व हृदय यांच्या ठिकाणी जळजळ उत्पन्न करणारा आहे . (२ )

लवण (खारट ) रस शोधक , पाचक , सांध्यांना विस्कळित करणारा , ओलसरपणा उत्पन्न करणारा अवयवाना वगैरे शैथिल्य आणणारा , उष्ण , मधुरादि सर्व रसाशी विरूद्ध असणारा (विघातक ), मलमूत्रादि मार्गाचे शोधन करणारा व सर्व शरीराच्या अवयवांना मृदुपणा आणणारा आहे ; हा लवण रस ह्याप्रमाणे आहे . तथापि हा फारच खाण्यात आला तर अंगाला कडु उत्पन्न करितो . त्या योगाने अंगावर गांधी उठतात ; अंग सुजते ; अंगाचा वर्ण बदलतो . तसेच पुरुषत्वाचा नाश होतो ; इंद्रिये संतप्त होतात ; तोंडात व डोळ्यांत बारीक फोड येतात . रक्तपिक्त , वातरक्त व आम्लपित्त हे विकार उत्पन्न होतात . (३ )

तिखटरस हा अग्निदीपक , पाचक , रुचिकारक , व्रणाचे वगैरे शोधन करणारा , स्थूलपणा (मेद ), आळस , कफ , कृमि , विष , कुष्ट (दद्रु वगैरे ) व कडु ह्याचा नाश करितो . आखडलेले सांधे मोकळे करणारा , उत्साह नाहीसा करणारा व स्त्रियांच्या स्तनातील दूध , शुक्र व मेद ह्यांचा नाश करणारा असा आहे . हा अशा प्रकारच्या गुणाचा आहे ,

तथापि अतिशय खाण्यात आला असता भ्रम (घेरी ), मद (मादकपणा ), गळा , टाळा व ओठ ह्यांना कोरड हे विकार उत्पन्न करितो , दाह व अंग तप्त होणे हे विकार करितो , शक्ति कमी करतो , अंगाला कंप उत्पन्न करितो , टोचल्याप्रमाणे व्यथा किंवा अंगाला अंग फुटल्याप्रमाणे भेगा पडणे हे विकार करितो ; हात , पाय , कुशी व पाठ इत्यादि अवयवांच्या ठिकाणी वातजन्य गळू (ठणका ) उत्पन्न करितो (४ )

कडुरस कफाचे वगैरे छेदन करणारा , रुचि उत्पन्न करणारा , अग्निदीपक , व्रणादिकाचे शोधन करणारा , कडू , गांधी , तहान , मूर्च्छा व ज्वर ह्यांचा नाश करणारा , स्तनातील दुधाचे शोधन करणारा व मल , मूत्र , व्रणातील वगैरे ओलावा , भेद , वसा (चरबी ) व पू ह्याचे शोषण करणारा (वाळविणारा ) आहे . ह्याप्रमाणे हा कडु रस जरी गुणकारक आहे तरी तो फार खाण्यात आला असता शरीराचे अवयव व मान ह्यांना ताठवितो . आक्षेपक (आकडी ), एक (वातरोग ), अर्दित (तोंड वाकडे होणे , एक वातरोग ) मस्तकशूळ ,

भ्रम (घेरी ), टोचल्याप्रमाणे व्यथा , फोडल्याप्रमाणे व तोडल्याप्रमाणे वेदना व तोंडाला बेचवपणा हे विकार उत्पन्न करितो .

तुरटरस मळाला वगैरे घट्ट करणारा , व्रणाला भरून आणणारा ; शौचाचा वगैरे अवरोध करणारा , (किंवा मृदु अवयवांना दृढ करणारा ); व्रणाचे शोधन करणारा (लेखन ),

व्रणातील ओलाव्याचे वगैरे शोषण करणारा , व्रणाचे किंवा हृदयाचे पीडन करणारा , व्रणातील किंवा शरीराचा ओलेपणा शोषण करणारा असा आहे , हा तुरट रस अशा प्रकारच्या गुणाचा आहे तथापि तो फार खाण्यात आला असता हृदयात दुखणे , तोंडाला कोरड , पोट फुगणे , बोलता न येणे , मान ताठणे , अंग फुरफुरणे , अंगाला मोहरीचा लेप लावल्याप्रमाणे चुणचुण होणे , सांधे आखडणे व अवयव अतिशय कापणे इत्यादि विकार होतात ॥१०॥

प्रत्येक रसांच्या द्रव्याचे वर्ग

आता ह्या सर्व रसांची (निरनिराळी ) द्रव्ये सांगतो . ती अशी —— काकोल्यादि गणांतील द्रव्ये , तूप , वसा (चरबी ) मज्जा , साळी , साठ्यासाळी , सातु गहु , उडीद , शिंगाडे कचरा (नागरमोथ्याचा भेद ), तवसे (काकडीचा भेद ), काकडी , शेंदाड , भोपळा , कलंगडे , निवळीचे बी , गिलोड्य , चारोळी , कमलाक्ष , शिवण , मोहाचे झाड , द्राक्षे , खजूर , राजदान (रांजणी किंवा खिरणी ), ताड , नारळ , ऊस व उसाचे गूळ , साखर वगैरे पदार्थ , चिकणा , करंडीचे झाड (मुद्रिका ), कुहिली , भुई कोहाळा , दुधी , गोखरू , विरजलेले दूध (क्षारमोरट ), काळीद्राक्षे व कोहाळा हा मधुर द्रव्यांचा वर्ग थोडक्यात सांगितला .

डाळिंब , आवळा , महाळुंग , अंबाडा , कवठ , करवंद , बोर , लहान बोर , हायआवळे , चिंच , कोशिंबा (रानआंबा ), करमर (नीव ), फालसा , वाताचे फळ , चुका , आम्लवेतस , इडनिंबु , दही , ताक , सुरा (आंबट मद्य ), शुक्त . सौवीर , तुषोदक व धान्याम्ल (शुक्तापासून धान्याम्लापर्यंत सर्व कांजीचेच भेद आहेत .) ही द्रव्ये मिळून हा थोडक्यात आम्लद्रव्यांचा वर्ग आहे .

सैंधव , संचळ , बिडलोण , बांगडखार , सोरमीठ , समुद्राचे मीठ , नवसागर , जवखार , खार्‍यामातीपासून काढलेले मीठ , व सज्जिखार ही द्रव्ये म्हणजे संक्षेपतः लवण द्रव्याचा वर्ग आहे .

पिप्लल्यादि गणांतील औषध , सुरसादि गणांतील औषधे , शेवगा (कडु ), गोडा शेवगा , मुळा , लसूण , पांढरा अजवला , दालचिनी , कापर , कोष्ठ , देवदार , रेणुकाबीज , बावचीचे फळ (बी ), किरमाणी ओवा , गुग्गुळ , नागरमोथा , कळलावी , टेंटू व पीलुची फळे (आक्रोड किंवा किंकण वृक्षाची फळे ) ही द्रव्ये व सालसारादि गणातील औषधे मिळून हा संक्षेपतः कटुक (तिखट ) द्रव्यांचा वर्ग आहे .

आरग्वधादि गणांतील औषधे , गुडुच्यादि गणांतील औषधे , ब्राह्मी , वेताचे अंकुर , हळद , दारु हळद , इंद्रजव , वायवर्णा , बेहेकळ , सातबीण , डोरली , रिंगणी , सांखवेल , मोगली एरंड , निशोत्तर , कडू दोडका , कटोली (काटली ), कारली वांगे , कळकाचे अंकूर (कोंब ) कणेर , जाई शंखपुष्पी , आघाडा , त्रायमाण , अशोक , कुटकी . टाकळी , सूर्यफुल , पुनर्नवा (वसु ), विंचवाचे झाड (वृश्चिकालि ) व मालकांगोणी ही द्रव्ये मिळून थोडक्यात कडुद्रव्यांचा वर्ग आहे .

न्यग्रोधादि वर्ग , अंबष्ठादि वर्ग , प्रियंग्वादि वर्ग , रोध्रादि वर्ग , त्रिफळा (हिरडे , बेहेडे , आवळकठी ), साळईचा वृक्ष , जांभळीचे झाड , आंब्याचे झाड , बकुळ , टेंबुरणीचे फळ (बी ), सागाचे बी व पाषाणभेद , ह्यांपैकी न्यग्रोधादि वर्गातील वनस्पतीची फळे घ्यावी . सालसारादि गणांतील द्रव्ये , तांबडी कोरांटी , कांचन , जीवंती , (हरणदोडी ), चिलघोळ , लापखशाक , (पोईची भाजी ) आणि करडुची भाजी , नीवार (देवभात ) वगैरे तृणधान्ये व मूग वगैरे द्विदल (डाळींची ) धान्ये हा संक्षेपतः काषाय (तुरट ) द्रव्यांचा वर्ग आहे ॥११॥

रसाचे भेद

ह्या सहा रसांच्या परस्परसंयोगाने रसाचे एकंदर त्रेसष्ट भेद होतात . ते असे -दोन दोन रसांच्या संयोगाने पंधरा . तीन तीन रसांचे संयोगाने वीस . चार चार रसांचे संयोगाने पंधरा पाच पाच रसांच्या संयोगाने सहा . एक एक रसाचे सहा . आणि सहा रसांचा एक . असे एकंदर त्रेसष्ट भेद आहेत . ह्यांचे सविस्तर वर्णन पुढे उत्तरतंत्रांत सांगू॥१२॥

बलवान् मनुष्याचे प्रकुपित झालेले वातादि दोष त्याच्या शक्तिच्या जोरावर दबले जाऊन काही एक विकार करू शकत नाहीत . त्याप्रमाणे बलवान् मनुष्याने ह्या सहा रसांपैकी एक एक रसाचे जरी अतिशय सेवन केले तरी ते त्याच्या शक्तिच्या जोराने त्याला पचतेच . काहीएक विकार करीत नाहीत ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP