मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि ५

सूत्रस्थान - अन्नपानविधि ५

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


फलवर्ग

डाळिंब , आवळे , बोर , लहान बोरे , कर्कध (खडकी बोरे , अगदीच लहान असतात ती ), सौवीर (फार मोठे बोर -हे अपक्व अवस्थेत देखील गोड असते हे मारवाडदेशांत होते ), सिंचीतिकाफळ (ही एक बोराचीच जात असून हे बोर मुठीएवढे मोठे व अति गोड असते ), कवठ , महाळुंग , आंबा , अंबाडा , करवंद , प्रियाल (चार फळ - चारोळी हे आंबट -, मधुर असते .) नारिंग , जंबीर (झांबर -ईड ), लकूच (ओटीचे फळ ), भव्य (करमर किंवा नीव ), पारावत (अननस ), वेताचे फळ , पाणआंवळा तितिडीक (आम्लवेत ), नीप , (कळंब फळ ), कोशाम्रू कोशिंबा -कोकम वा चिंच हा आम्ल फळांचा वर्ग आहे

॥१३९॥

ही डाळिंब आदिकरून सर्व फळे सामान्यतः रुचीला आंबट असून ह्याचा विपाकही आंबटच आहे . तशीच ही सर्व फळे पचनाला जड व उष्णवीर्य असून पित्तकारक , वातनाशक व कफाचा प्रकोप करणारी आहेत .

त्यापैकी डाळिंब हे किंचित तुरट असून फारसे पित्तकर नाही . तसेच ते अग्निदीपक , रुचिकारक , मनाला आवडणारे (हृद्य ) व मळ बांधीव करणारे आहे . आंबट डाळिंब व गोड डाळिंबाचे दोन प्रकार आहेत . त्यापैकी गोड डाळिंब त्रिदोषनाशक असून आंबट डाळिंब वात व कफनाशक आहे .

आवळा हा मुख्यतः आंबट किंचित मधुर , कडु , व तिखट असा आहे , तसाच तो सारक (शौचास साफ करणारा ), डोळ्य़ांच्या विकारात पथ्यकारक , सर्व दोषनाशक व वृष्य (शुक्रवर्धक ) आहे . आवळा हा आपल्या आंबट गुणाने वाताचा , मधुरपणा व शीतपणा ह्या गुणांनी पित्ताचा आणि तुरट व रूक्ष गुणांनी कफाचा नाश करितो . म्हणून आवळा सर्व फळांत श्रेष्ठ आहे . कर्कधु , कोल व बदर अशी तिन्हीही जातीची बोरे अपक्व असता पित्तकफकारक आहेत . आणि ती पिकली म्हणजे वातपित्तनाशक , स्निग्ध , किंचित् गोड व सारक आहेत . पिकलेली वाळवून ठेवलेली एक वर्षाची जुनी बोरे तृषानाशक , श्रमनाशक , अग्निदीपक व हलकी असतात . सौबीर जातीचे मोठे बोर स्निग्ध , मधुर व वातपित्तनाशक आहे . आणि सिंचितिकानावाचे फार मोठे बोर तुरट , गोड , ग्राहक (बांधीव मळ करणारे ) व थंड आहे . कच्चे कवठ आवाज बसविणारे , कफनाशक , ग्राहक व वात वाढविणारे आहे . तेच पिकलेले कवठ कफवात नाशक आंबटमधुर व पचनाला जड आहे . तसेच ते श्वास , खोकला , व अरुचि ह्यांचा नाश करिते . तृषा शमविते आणि घसा मोकळा करिते .

महाळुंगफळ हे सामान्यतः पचनाला हलके , आंबट , अग्निदीपक व मनाला प्रिय (हुद्य ) असे आहे . ह्याची साल कडवट , पचण्याला फार जड , वात , कृमि व कफ दोष ह्यांची नाशक आहे . महाळुंगातील दळ (गर ) हा गोड , यड , जड , स्निग्ध व वातपित्तशामक आहे . महाळुंगातील केसर हे बुद्धिवर्धक , शूळ , वातरोग , वांती कफदोष व अरुचि ह्यांचा नाश करणारे , अग्निदीपक , पचनाला हलके , संग्राहक (मळ बांधीव करणारे ) आणि गुल्म व मुळव्याधनाशक आहे . महाळुंगाच्या केसराचा रस शूल , अजीर्ण , मलमूत्रादिकांचा अवरोध , अग्निमांद्य , कफ वातरोग व विशेषतः अरुचि ह्याजवर द्यावा म्हणून सांगितले आहे . कोवळे महाळुंगे हे वातपित्तकारक असून ज्याच्या आंत केसर तयार झालेले आहे असे महाळुंगे पित्तकारक आहे .

आंब्याचे पिकलेले फळ मनाला प्रिय , अंगाचा वर्ण चांगला करणारे , रुचिकारक , रक्त , मांस व शक्ति वाढविणारे , किंचित् तुरट , गोड , वातनाशक , पौष्टिक , जड पित्ताचा प्रतिकार न करणारे व शुक्रवर्धक आहे . अंबाड्याचे फळ पक्व पौष्टिकम , मधुर शक्तिवर्धक व जड असून पचन होताना पोटात वात उत्पन्न करिते . (पोट फुगून गुडगुडते ), शिवाय ते वृष्य , स्निग्ध व कफ वाढविणारे आहे . ओटीचे फळ त्रिदोषनाशक मलाचा व मूत्राचा अवरोध करणारे व शुक्रनाशक आहे . करवंद हे आंबट , तृषानाशक , रुचिकारकव पित्तकारक आहे . चाराचे फळ वातपित्तनाशक , वृष्य (कामवर्धक ), जड , व थंड आहे . भव्य (करभर ) हे हृद्य , गोड , किंचित तुरट व आंबट , तोंड स्वच्छ करणारे , कफपित्तनाशक , ग्राही (मलबधक ), जड विष्टंभि (मळाचा अवारोध व शूल उत्पन्न करणारे ) व थंड आहे . पारावतफळ (हे कामरूपदेशांत प्रसिद्ध असून ते पिकले म्हणजे पांढुरके तांबडे व आंबटमधुर असते . निघंटांतून ‘‘पारावति ’’ असे नाव अननसाला आढळते व रूपसादृश्यही तसेच दिसते ) हे आंबटमधुर रुचिकारक असून अत्यग्नि व वातदोष ह्यांचा नाश करिते , नीप (कळंदाचे फळ ), हे कृत्रीम किंवा जीर्ण विषरोगाचा नाश करणारे असून प्राचीनामलक (पाणआंबळीचे फळ ) ही तसेच आहे . तितिडीक (आम्लवेताचे फळ ) हे कच्चे असता वातनाशक व कफपित्तकारक आहे . तेच पिकले म्हणजे ग्राहक , उष्ण , अग्निदीपक , रुचिकारक व कफवातनाशक आहे . त्यापेक्षा काही थोड्या अंतराने कमी गुणाचे असे कोशाम्र (कोकम ) फळ आहे . (ह्या कोकमफळाचीच अमसुले असतात ). चिंचेचे फळही गुणाने कोकम किंवा कोशाम्रफळासारखेच असून मलाचे भेदन करणारे आहे . नारिंगाचे फळ आंबट , किंचित मधुर , हृद्य , विशद , (तोंड वगैरे स्वच्छ करणारे ), अन्नावर वासना करणारे , वातनाशक , पचन होताना पोटात दुखणे वगैरे पीडाकारक (दुर्जर ) व जड आहे . जंबीर जातीचे लिंबू (ईडलिंबू ) हे तहान , शूळ , कफाचा प्रकोप , वांती व श्वास ह्यांचे निवारण करणारे , वातकफनाशक , विबंधनाशक (मळ व मूत्रांचा अवरोधनाशक ), पितकारक व जड आहे . ऐरवत (नारिंगाचा भेद ) व दंतशठ (थोरईडलिंबू ) ही फळे आंबट असून रक्तपित्तकारक आहे ॥१४० -१६२॥

वड , उंबर , पिंपळ , पिंपरणी वगैरे क्षीर वृक्षांची फळे , जांभळीचे फळ , रांजणीचे फळ , तोदन (तोरण ), शीतफळ (भोकर किंवा रावण चिंच ), टेंभुरणी , बकुळ , धामण , वृक्ष , आपटा , अश्वकर्ण (पूर्वदेशात ह्याला ‘‘गंधमुंड ’’ असे नाव असून हा पिंपळासारखा असतो ), फल्गु (काळा उंबर ), परूषक (फालसा ), गांगेरुकी (नागबला -तुपकडी ) पुष्करवर्ति (रामोद फळ उत्तरप्रदेशांत प्रसिद्ध ), बेल व तोंडली ह्यांची फळे हा तुरट फळांचा वर्ग झाला .

क्षीर वृक्षादिकांची ही सर्व तुरट फळे सामान्यतः थंड , कफपित्तनाशक , संग्राहक (मळ बांधीव करणारी ), रूक्ष तुरट व मधुर असतात .

त्यापैकी वड , उंबर , पिंपळ , पिंपरणी ह्या क्षीर वृक्षांची फळे जड , अवष्टंभकारक , थंड , तुरट , मधुर , किंचित् आंबट व फारशी वात वाढविणारी नाहीत . जांभळीचे फळ अत्यंत वातकारक , ग्राहक , व कफपित्तनाशक आहे , रांजणीचे फळ स्निग्ध , गोड , तुरट , व जड आहे . तोरणीचे फळ तुरट , मधुर , रूक्ष व कफवातनाशक आहे . शिवाय ते आंबट , उष्ण , हलके , संग्राहक स्निग्ध आणि पित्त व जठराग्नि ह्यांना वाढविणारे आहे . टेंभुरणीचे कच्चे फळ तुरट , संग्राहक व वातकारक आहे . आणि पिकलेले फळ पचनाला जड , मधुर व कफपित्तनाशक आहे . बकुळीचे फळ मधुर , तुरट , स्निग्ध व संग्राहक आहे . तसेच ते दाताला बळकटी आणणारे व तोंड स्वच्छ करणारे आहे . धामणीचे फळ तुरट , थंड , गोड व कफवातनाशक आहे . गांगेरुकीचे (तुपकडीचे ) फळ गुणाने धामणीसारखेच असून आपट्याची फळेही गुणांनी तशीच आहेत . काळ्या उंबराची फळे अवष्टंभकारक , मधुर , स्निग्ध , तृप्तीकारक व जड आहेत . फलशाचे कच्चे फळ अति आंबट , किंचित मधुर , किंचित् तुरट , हलके , व वातनाशक व पित्तकारक आहे . तेच पिकले म्हणजे मधुर , व वातनाशक आहे . शिवाय ते मधुरविपाकी , थंड व रक्तपित्तासंबंधी दोष घालविणारे आहे . पुष्कर वृक्षाचे फळ (रामोद ) गोड , अवष्टंभकारक , शक्तिवर्धक कफकारक व जड आहे . कोवळे बेलफळ कफवातनाशक , तीक्ष्ण , स्निग्ध , संग्राही , अग्निदीपक , तिखट , कडु , तुरट व उष्ण असे आहे . तेच पिकलेले बेलफळ किंचित् मधुर , जड , विदाहकारक , अवष्टंभकारक , वातादि दोषांना वाढविणारे व अपानवायुला दुर्गंधी करणारे आहे . तोंडलीचे फळ व अश्वकर्ण (पारोसा पिंपळ ) ह्यांचे फळ स्त्रियांच्या दुधाची वाढ करणारे ,

कफपित्तनाशक असून तृषा , दाह , ज्वर , रक्तपित्त , खोकला , श्वास , व क्षय ह्यांचा नाश करणारे आहे ॥१६३ -१७६॥

ताड , नारळ , फणस , केळ , इत्यादि फळे मधुर फळांच्या वर्गातील आहेत .

ही मधुर फळे सामान्यतः रसाला व विपाकाला मधुर , वातपित्तनाशक शक्तिवर्धक , स्निग्ध , पौष्टिक व थंड आहेत .

त्यापैकी ताडाचे फळ गोड , जड , व पित्तनाशक आहे . त्यांचे बी (दळ ) मधुरविपाकी , मूत्रल व वातपित्तनाशक आहे . नारळीचे फळ , जड , स्निग्ध , पित्तनाशक , गोड व थंड आहे . तसेच ते बळ व मांस वाढविणारे , हृद्य पौष्टिक व बस्तिशोधक आहे . फणस हा किंचित् तुरट असून स्निग्ध , गोड व जड आहे . केळीचे फळ मधुर , किंचित् तुरट , फार थंड नाही असे , रक्तपित्तनाशक , वृष्य , रुचिकारक , कफकारक व जड आहे ॥१७७ -१८१॥

द्राक्षे , शिवणीची फळे , खजूर , मोहाची फुले व फळे ही फळेही मधुर फळांच्या वर्गातील आहेत .

द्राक्षे वगैरे ही मधुर फळे रक्तपित्तनाशक , जड व मधुर आहेत .

त्यापैकी द्राक्षे ही सारक , स्वर चांगला करणारी , मधुर , स्निग्ध , थंड आणि रक्तपित्त , ज्वर , श्वास , तहान , दाह व क्षयनाशक आहेत . शिवणीचे फळ मनाला प्रिय , मूत्राचा अवरोधनाशक , रक्तपित्त व वातनाशक , केसांना हितकारक , रसायन (शरीरातील सर्व धातु समस्थितीत राखून त्यांना जोरदार करणे ) व बुद्धिवर्धक आहे , खारीक उरःक्षत व क्षयनाशक , मनाला , प्रिय , शीतळ , तृप्तिकारक , जड , रसकाळी , मधुर आणि रक्तपित्तनाशक आहे . मोहाची फुले पौष्टिक , मनाला न आवडणारी व जड आहेत . आणि मोहाचे फळ वातपित्तनाशक आहे ॥१८२ -१८६॥

बदाम , अक्रोड (पर्वत पीलू ), अभिषुक , निचुल , पिचू , निकोचक , (पिस्ते ) उरमाण इत्यादि फळेही मधुर फळाच्याच वर्गातील आहेत .

बदाम वगैरे फळेही सामान्यतः कफपित्तनाशक , स्निग्ध , उष्ण , जड , पौष्टिक , वातनाशक , शक्तिवर्धक व मधुर आहेत .

लवलीफळ हे तुरट , कफपित्तनाशक , किंचित कडू , रुचिकारक , मनाला प्रिय सुगंधी व स्वच्छ करणारे (ह्यालाच हरपरेवंडी किंवा रायआवळा म्हणतात .) आहे .

वसीर (सूर्यावर्तफळ किंवा तांबड्य़ा आघाड्याचे बी ), शीतपाक्य (चिकण्याचे बी ) व बिव्याच्या मागील बोंड (बिब्ब्या ) ही अवष्टभकारक , पचनाच्या वेळी पीडा देणारी , रूक्ष , थंड , वात वाढविणारी , मधुर विपाकी आणि रक्तपित्ताचे शोधन करणारी आहेत . (बसीर व शीतवाक्य ह्यांची मराठी नावे टीकाकाराच्या नावाच्या धोरणाने दिली आहेत ,

तथापि ती बिनचूक आहेत अशी खात्री नाही ॥१८७ -१९०॥

ऐरावत (नारिंगाची जात ) दंतशट (ईड ) ही फळे आंबट व पित्तकारक आहेत . टंकफळ (हे काश्मीरात ह्याच नावाने प्रसिद्ध आहे .) हे फळ थंड , तुरट , गोड , वातकारक व जड आहे . हिंगण्याचे फळ स्निग्ध , उष्ण , कडु , मधुर व वातपित्तनाशक आहे . शमीचे फळ जड मधुर , रूक्ष , उष्ण व केसांना अपायकारक आहे . भोकरीचे फळ जड , कफकारक , मधुर व थंड आहे .

करीर (नेपतीचे फळ मारवाडात प्रसिद्ध ) अधिक (रंजकफल ) पीलू (किंकण वृक्षाची फळे ) व तृणशून्य (केतकीचे फळ ) ही फळे मधुर , कडू तिखट उष्ण व कफवातनाशक आहेत , त्यापैकी पीलूची फळे कडू , पित्तकारक सारक , तिखटविपाकी , तीक्ष्ण (त्वरित परिणाकारक ) उष्ण तिखट तेलकट व कफवातनाशक आहे . बिब्बे व तुवराचे फळ तुरट व तिखटविपाकी असून उष्ण आहे . कृमि , ज्वर आनाह (पोट स्तब्ध होणे ) प्रमेह , उदावर्त ह्यांचा नाश करणारे तसेच कुष्ठ , गुल्म , उदर , मूळव्याध ह्यांचाही नाश करणारे असून विपाककाळी तिखट आहे . अंकोलाचे फळ बेचव , जड , कफनाशक व थंड आहे ॥१९१ -१९६॥

करंज , पळस व कडुलिंब ह्यांची फळे जंत (पोटातील कृमी ) व प्रमेह ह्यांचा नाश करणारी आहेत . त्याचप्रमाणे ती रूक्ष , उष्ण तिखटविपाकी , हलकी व कफवातनाशक आहेत . वावडिंगे किंचित् कडु , असून विषरोगात पथ्यकारक व कृमिनाशक आहेत . हिरड्याचे फळ व्रणशोधक , उष्ण , सारक , बुद्धिप्रद , वातादिदोषनाशक , सूज व कुष्ठ ह्यांचा नाश करणारे , तुरट , अग्निदीपक , अग्निदीपक , आंबट व डोळ्य़ांना हितकारक आहे . बेहड्याचे फळ मलभेदक , हलके , रूक्ष , उष्ण , आवाज बिघडविणारे , कृमिनाशक , डोळ्य़ांना हितकारक , मधुर विपाकी , तुरट व कफपित्तनाशक आहे . (सुपारी ) कफपित्तनाशक रूक्ष , तोंडातील बुळबुळीतपणा नाश करणारे , तोंड स्वच्छ करणारे , तुरट , किंचित् मधुर व किंचित् सारकही आहे .

जायपत्री , कापूर , जायफळ , लता कस्तुरीचे किंवा लघु कंकोळाचे दाणे -फळे -कंकोळ (मोठा कंकोळ ) व लवंग ही फळे किंचित् कडु तिखट , कफनाशक , हलकी , तृषा नाशक , तोंडाचा बुळबुळितपणा व दुर्गंधी नाशक आहेत . कापूर हा असून सुगंधी , थंड , हलका , लेखन (दोषांना खरडून काढणारा ) आणि तहान , तोंडाची कोरड व तोंडाचा मळमळितपणा ह्यांचा नाश करणारा आहे . लता कस्तूरिका (हिचे लहान झाड असते ) ही गुणाने कापरासारखीच असून थंड व बस्तिशोधक आहे . चाराच्या फळांतील बी (चारोळी ) मधुर , वृष्य व वातपित्तनाशक आहे . बेहड्याचे आंतील बी मदकारक (गुंगी आणणारे ) व कफवातनाशक आहे . बोराच्या बियांतील मगज तुरट , मधुर व पित्तनाशकअसून तूषा , वांति व वातविकार ह्यांचा नाश करणारा आहे . आवळ्य़ाच्या बियांचे गुणही बोराच्या बियांप्रमाणेच आहेत . महाळुंगातील बिया , वाहव्याच्या शेंगातील बिया व कोशिंब्याच्या (कोकमफळाच्या ) बिया मधुरविपाकी , अग्निदीपक , शक्तिवर्धक , स्निग्ध व वातपित्तनाशक आहेत . ह्या ठिकाणी सांगितलेल्या फळांपैकी ज्या ज्या फळाचे जसे जसे गुण असतील त्या त्या प्रमाणे त्या त्या फळांच्या बियांचे गुण समजावे . फळांपैकी बेलाशिवाय जी फळे चांगली पक्व झाली असतील तीच उत्तम गुणकारक समजावी . बेलाचे फळ मात्र कोवळे असेल तरच ते गुणकारक असते . कोवळे बेलफळ हे ग्राहक (मळबांधीव करणारे ), अग्निदीपक , उष्ण , तुरट , किंचित् तिखट व कडु असते .

फळांपैकी रोगट फळ , किड्यांनी खाल्लेले , पिकून उतरलेले , हंगामाव्यतिरिक्त दिवसात तयार झालेले (वर्षाऋतूंतील किंवा शरदऋतूंतील आंबे ) आणि अपक्व (कोवळे , कच्चे वगैरे ) असे फळ खाण्यास वर्ज करावे ॥१९७ -२१०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP