मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
भूमिप्रविभागीय

सूत्रस्थान - भूमिप्रविभागीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय छत्तिसावा

आता ‘‘भूमिप्रविभागीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

औषधी घेण्याविषयी जमीन कशी असावी ते सांगतात . ज्या जमिनीत उंदीर , मुंगुस वगैरे बिलेशय प्राण्याची बिळे नाहीत , फुटक्या मातीच्या , भांड्याच्या खापर्‍याचे तुकडे नाहीत , दगड , लहानमोठी वारुळे नाहीत , स्मशान नाही , वधस्थान नाही , देऊळ नाही व वाळवंट नाही , तसेच जी जमीन उखर (खारीची ) नाही , जिला भेगा अथवा घळी पडलेल्या नाहीत , ज्या जमिनीला पाणी फार लांब नाही , जी स्निग्ध आहे , लागवडीत असणारी आहे , तसेच जी मऊ , स्थिर , पाण्याने वगैरे वाहून न गेलेली , सपाट आहे , त्याचप्रमाणे जी रंगाने काळी , पिवळी किंवा तांबुस आहे , अशी जमीन औषधीसंग्रहार्थ पसंत करावी . (अशा जमिनीतील वनस्पति औषधार्थ घ्यावा .) असे जरी आहे तरी अशा जमिनीत औषधी असली तरी देखील ती किड्यांनी खाल्लेली , विषादिकांचा संपर्क झालेली , शस्त्राचा आघात झालेली . ऊन , वारा , अग्नि व पाणी ह्यांची बाधा नसलेली व मनुष्यांच्या रहदारीच्या मार्गात नसलेली अशी असावी . त्याचप्रमाणे ती रसभरीत , पुष्ट (जोमदार ) जिची साल जड आहे , मुळ्या बर्‍याच खोल आहेत , अशी औषधी पाहून ती उत्तर दिशेकडील व उत्तराभिमुख राहून काढून घ्यावी . ही औषधिग्रहणाविषयी व जमिनीविषयी सामान्य परीक्षा सांगितली ॥३॥

आता जमिनीचे विशेष गुण -जी जमीन दगडानी युक्त , पाण्याने वगैरे न वाहून गेलेली , जाड , काळसर पांढुरकी किंवा काळी , मोठमोठे वृक्ष असलेली व धान्याच्या शेतांनी युक्त असते ती ‘‘पृथ्वीतत्वगुणविशिष्ट ’’ जमीन समजावी . ती जमीन स्निग्ध , शीतल , जवळच पाणी असलेली , स्निग्ध धान्ये (साळी वगैरे ), गवत व लहान लहान वृक्ष ह्यांनी युक्त व पांढरी असते ती ‘‘जलतत्वगुणविशिष्ट ’’ जमीन समजावी . जी जमीन अनेक रंगाची (मिश्र रंगाची ) लहान लहान दगड असलेली , ज्यांची त्वचा पांढरी आहे अशी लहान झाडे क्वचित् कोठेकोठे असलेली (अतिशय विरळ झाडे असलेली ) अशी जमीन ‘‘अग्नितत्त्वगुणविशिष्ट ’’ समजावी . जी जमीन रूक्ष राखेच्या किंवा गाढवाच्या रंगासारखी विरळ झाडी असून तिच्यामधील झाडे रूक्ष , ढोली पडलेली , भरपूर रस नाही अशी असलेली जमीन ‘‘वायुतत्वगुणविशिष्ट ’’ समजावी . जी जमीन मऊ , सपाट , पुष्कळ बिळे असलेली , रस (रुची ) व पाणी ही उघडपणे न कळण्यासारखी , सर्वत्र नित्सव (एरंडासारखे ) वृक्ष असलेली व जिच्याठिकाणी मोठमोठ्या वृक्षांनी युक्त असे मोठमोठे पर्वत आहेत अशी व काळसर अशी जी जमीन ती ‘‘आकाशतत्वगुणविशिष्ट ’’ समजावी .

काही आचार्याचे मत असे आहे की , पावसाळा (आषाढाचा महिनाप्रावृपकाळ ) ह्या ऋतूत औषधाची मुळे संग्रह करावी . वर्षाऋतूत पाने , शरदऋतूत साल , हेमंतऋतूत क्षीर (सालीतून गळणारा पांढरा चीक ), वसंतऋतूत सार (सालीच्या आतील नार म्हणजे खोड ), आणि ग्रीष्मऋतूत फळे याप्रमाणे औषधींचा संग्रह करावा . पण ते योग्य नाही ;

कारण हे सर्व जग अग्निसोमात्मक (अग्नितत्व व सोमतत्वप्रधान ) आहे . म्हणून सोमतत्वात्मक (शीत ) व अग्नितत्वात्मक (उष्ण ) अशी जी औषधे ती अनुक्रमे सौम्यऋतूंत (हेमंतऋतूंत व वसंतऋतूंत ) आणि आग्नेयऋतूत (ग्रीष्म किंवा शरदऋतूंत ) संग्रह करावी . म्हणजे त्यांच्या गुणाला बाध येत नाही . सौम्यतत्वात्मक जी औषधे ती सौम्य (हेमंतादि ) ऋतूत घेतली असून ती सोमतत्वाचे (जलतत्वाचे ) गुण पूर्ण असलेल्या जमिनीत जर झाली असली तर ती मधुर , स्निग्ध व थंड अशी असतात . एवढे सांगितले म्हणजे आग्नेय औषधासंबंधी वेगळे सांगण्याचे कारणच नाही .

वर सांगितलेल्या जमिनीच्या विशेश गुणाप्रमाणे पृथ्वी व जलतत्वगुणयुक्त जी जमीन त्या जमिनीतून विरेचन द्रव्ये आणावी . अग्नि , आकाश व वायुतत्त्वगुणयुक्त जमिनीतून वामक (वांतिकारक ) द्रव्यांचा संग्रह करावा आणि ह्या दोन्हीही गुणयुक्त (पंचभूत गुणयुक्त ) जमिनीतून वमन व विरेचन या दोन्ही योगात उपयोगी पडणारी औषधे आणावी . केवळ आकाशगुणात्मक जमिनीतून शमन करणारी औषधे घ्यावी . ह्या प्रमाणे त्या त्या गुणयुक्त जमिनीतून संग्रह केलेली ती ती औषधे गुणाच्या कामी जोरदार असतात .

मध , तूप , गूळ , पिंपळी व वावडिंगे ह्या औषधी सोडून बाकीच्या सर्व औषधी ताज्या घ्याव्या . ह्या मधतुपादि औषधीखेरीजकरून बाकीच्या औषधी रसयुक्त म्हणजे ज्यांच्यामध्ये रस (ओलेपणा ) आहे अशा घ्याव्या . तशा न मिळाल्यास , ज्या औषधीचा संग्रह करून पूर्ण वर्ष झाले नाही . अशा वर्षाच्या आतील संग्रह केलेल्या घ्याव्या ॥४ -७॥

गायी राखणारे (गोरक्षक ), अरण्यात राहून तपश्चर्या करणारे व्याध (पारध करणारे ) आणि इतरही अरण्यात संचार करून कंदमुळांचा आहार करून असणारे अशा लोकांकडून औषधीची ओळख करून घ्यावी . ज्या ठिकाणी सर्व अवयव (फळे , मुळे , साली , पाने , खोड ) म्हणजे पंचांगच उपयोगात आणावयाचे असते , अशी जी पळस वगैरे द्रव्ये व सैंधवादि लवणे अशा औषधांच्या संग्रहाला अमुकच एक काळ असावा असे सांगितले नाही . त्याअर्थी ती सुमुहूर्त व दिनशुद्धि पाहून केव्हाही आणावी .

गंध , वर्ण व रस ह्यांनी युक्त अशी जमीन सहा प्रकारची आहे त्यामुळे जमीनीच्या गुणाला अनुसरून वृक्षादिकामध्येही मधुरादि सहा रस उतरतात .

पाण्यातील रस हा अव्यक्त आहे , म्हणजे पाण्यात सहा रसांपैकी कोणताही रस नाही , हे निश्चत ठरलेले आहे . तो पाण्याच्या ठिकाणी अव्यक्त असलेला रस भूमिच्या रसाच्या संयोगाने उघड होतो . साधारण प्रदेशातील जी जमीन ती सर्व गुणांनी युक्त असते . द्रव्येही सर्व जमिनीपासूनच उत्पन्न होणारी असल्यामुळे ती ज्या प्रकारच्यास जमिनीत झाली असतील त्या जमीनीत गुण त्या द्रव्यात विशेष असतात .

द्रव्याच्या वासात व रस इत्यादिकात (रुचि वगैरेमध्ये ) बिघाड झाला नसला तर मग ते द्रव्य ताजे किंवा जुने (वर्षाच्या आतील ) असले तरी घेण्यास हरकत नाही म्हणून सांगावे .

वावडिंग , पिंपळी , मध व तूप ही द्रव्ये एक वर्ष होऊन गेलेली इतकी तरी जुनी असावी . बाकीची औषधे मात्र किडकी वगैरे नाहीत अशी निर्दोष पाहून नवी (ताजी ) घ्यावी .

आता जंगम द्रव्यासंबंधाने सांगावयाचे म्हणजे जे प्राणी तरुण असतील त्यांनी खाल्लेला आहार पचन झाल्यावर , त्याच्यापासून रक्त , केस , नखे , दूध , मूत्र व विष्टा वगैरे जे काही पदार्थ घ्यावयाचे ते घ्यावे .

औषधशाळा बांधावयाची ती पूर्व किंवा उत्तरभागी पवित्र अशा जाग्यावर बांधावी . आणि तिजमध्ये औषधे ठेवावयाची ती सुताची , तागाची रेशमाची वगैरे पोती करून त्यामधून ठेवण्यास योग्य असलेली औषधे त्यात ठेवावी . जी मातीच्या भांड्यात ठेवणे अवश्य आहे ती मातीच्या भांड्यांत ठेवावी . जी पेट्यांमधून अगर नारळाच्या वगैरे बेलट्यामधून ठेवण्यासारखी असतील ती त्यात ठेवावी . जी नुसती काठी -खुंटीला अडकवूनच ठेवणे योग्य आहे अशी औषधे त्या ठिकाणी ठेवावी ॥८ -१६॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP