मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि ११

सूत्रस्थान - अन्नपानविधि ११

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


आहारविधि

आता आहार कसा घ्यावा ह्याविषयी सर्व प्रकारची माहिती सविस्तर सांगतो , बाळा सुश्रुता , ती तू ऐक .

निर्भय , स्वच्छ व पवित्र अशा ठिकाणी भव्य असे स्वयंपाक घर करावे . आणि त्या ठिकाणी पाकसिद्धि करिता वगैरे ठेवावयाची माणसे ती चांगली विश्वासूक अशी ठेवावी .

वैद्याने त्या विश्वासू अशा स्वयंपाक करणाराकडून ज्यांना रुची , वास व वर्ण वगैरे यथास्थित आहे अशी निरनिराळी भक्ष्यभोज्यादि पक्वाने करवून ती चांगल्या शुद्ध अशा जागी झाकून गुप्त रीतीने ठेववावी .

नंतर त्या अन्नावर विषनाशक अशा अगदाचे चूर्ण टाकावे . विषनाशक अशा सिद्ध मंत्रानी अभिमंत्रित केलेले पाणी विषनाशक अशा पंख्यांनी त्या अन्नावर प्रोक्षण करावे . अशा रीतीने ते अन्न निर्विष झाले आहे अशी खात्री झाल्यावर मग ते राजाला भोजनार्थ द्यावे ॥४४५ -४४७॥

आता आहाराचे पदार्थ कोणकोणाच्या पात्रात ठेवावे वगैरे माहिती सांगतो .

तूपे वाढावयाचे ते शुद्ध पोलादाच्या भांड्यात वाढावे . काही आचार्यांच्या मताने कांतलोहाच्या पात्रात वाढावे . पेज वगैरे द्यावयाची ती रुप्याच्या भांड्यात द्यावी . फळे व लाडू , करंज्या वगैरे सर्व भक्ष्य पदार्थ हे केळीच्या वगैरे पानातून द्यावे . कित्येक आचार्य वेताच्या अगर वेळूच्या सालींनी विणलेल्या पानाच्या टोपलीतून द्यावे असे म्हणतात .

परिशुल्क (पुष्कळ तुपात जिरे वगैरे मसाला घातलेले मांस ) व प्रदिग्ध (परिशुष्क मांसावर दही वगैरे शिंपले म्हणजे त्याला प्रदिग्धमांस म्हणतात ) मांस सोन्याच्या भांड्यातून द्यावे . पातळ पदार्थ व मांसरस रुप्याच्या भांड्यातून द्यावा कटवर (मठ्ठा ), व सर्व प्रकारचे खंड (ताकात केलेल्या भाज्या व सांबरे ) हे पदार्थ दगडाच्या पात्रातून द्यावे . चांगले तापविलेले व थंड केलेले असे दूध तांब्याच्या भांड्यातून द्यावे . पाणी , पन्ही (सरबते ) व मद्य हे पदार्थ मातीच्या भांड्यातून द्यावे . अथवा काच अगर स्फटिक ह्यांच्या थंडगार व स्वच्छ अशा भांड्यातून द्यावे . रायती , पाडव (रायत्यांचाच एक प्रकार निरनिराळी लोणची म्हटले तरी चालेल ; व सटक (श्रीखंडासारखा एक पदार्थ ) हे पदार्थ वैडूर्य रत्नानी चित्रविचित्र केलेल्या भांड्यातून द्यावे .)

जेवणारापुढे स्वच्छ , विस्तीर्ण व सुंदर असे ताट ठेऊन वाढणाराने त्या ताटांत जेवणाराच्या पुढेच प्रथमतः वरणभात व चाटून खाण्यासारखे (भरीत वगैरे ) लेह्य पदार्थ वाढावे . फळे , सर्व भक्ष्य पदार्थ व शुष्कपदार्थ हे ताटामध्ये जेवणाराच्या उजव्या बाजूस वाढावे , सांबारे , कढी वगैरे द्रव पदार्थ , मांसरस , पाणी , पन्ही (सरबते , सार वगैरे ) दूध , खड , यूष व पेज वगैरे पदार्थ जेवणाच्या डाव्य बाजूस वाढावे . राग (रायती ), पाडव व सट्टक वगैरे पदार्थ व गुळाचे केलेले (लोणची वगैरे ) सर्व पदार्थ हे उजव्या व डाव्या बाजूच्या पदार्थांच्या मध्यभागी ताटांत जेवणाच्या पुढच्या भागी वाढावे .

ह्याप्रमाणे बुद्धिवान वैद्याने जेवणासंबंधी सर्व गोष्टी लक्षात घेऊन जेवणाराला (राजाला ) एकांत स्थळी रम्य व शांत अशा सपाट , स्वच्छ व शुभ जागी उत्तम सुवासिक फुले वगैरे पसरून त्या ठिकाणी भोजन करवावे ॥४४८ -४५७॥

जेवणाराला आवडणार्‍या अशा फोडण्या , मसाले वगैरे विशेष उत्तम प्रकारच्या संस्कारांनी तयार केलेले रुची व सुवासादिकांनी उत्तम असलेले हितकारक , जे पाहिले असता मन प्रसन्न होते असे पवित्र , (शुचिर्भूतपणाने केलेले ) फार कढत नाही असे ताजे अन्न खाण्यास फार हितकारक असते .

वैद्याने जेवणाराला प्रथमतः गोड पदार्थ खावयास द्यावे . नंतर जेवणाच्या मध्यंतरी आंबट , खारट असे पदार्थ द्यावे आणि जेवणाच्या शेवटी इतर रसांचे पदार्थ खाण्यास द्यावे .

जेवणाराने प्रथमतः डाळिंबाचे दाणे वगैरे फळे खावी . नंतर पेय पदार्थ खावे . त्यानंतर भात वगैरे भोज्य पदार्थ खावे . आणि त्यानंतर अनेक प्रकारचे भक्ष्य पदार्थ खावे .

काही वैद्यशास्त्रज्ञांचे असे मत आहे की , प्रथमतः लाडू वगैरे कठीण पदार्थ खावे . पण दुसरे काही वैद्यशास्त्रवेत्ते ह्याच्या उलट प्रतिपादन करितात ; म्हणजे प्रथम द्रव पदार्थ

खाऊन नंतर कठीण पदार्थ खावे असे म्हणतात .

सर्व फळांत आवळा हा कोणत्याही प्रकारे अपाय न करणारा व दोष नाशक आहे म्हणून तो (अथवा आवळ्य़ाचे लोणचे ) जेवणाच्या आधी , मध्ये किंवा शेवटी केव्हाही खाण्यास हितकारक आहे .

कमळाचे देठ , बिसे व कमळाचे गड्डे , तसेच मुळे , रताळी वगैरे इतर कंद व ऊस वगैरे पदार्थ हे वैद्याने जेवणाच्या पूर्वीच खाण्यास द्यावे . जेवण झाल्यावर केव्हाही देऊ नयेत .

आपल्या प्रकृतीला कोणचे अन्न हितकारक आहे , एवढी माहिती वैद्य शास्त्रानुरोधाने समजून घेऊन , चांगली भूक लागली म्हणजे जेवणाच्या योग्य वेळी किंचित उंच अशा आसनावर (पाटावर ) नीट व्यवस्थित रीतीने बसून अन्नाकडेच लक्ष ठेऊन , आपल्याला मानवणारे , (नित्य सवयीचे ) हलके , स्निग्ध , ऊन ऊन , द्रव पदार्थांनी युक्त असे अन्न फार घाई न करता व अति सावकाशही न करता , आपल्या भुकेच्या मानाने योग्य प्रमाणात (जेवल्यानंतर पोटास किंवा कुशीत ताण पडणार नाही व श्वासोच्छ्वास घेण्यास होणार नाही अशा बेताने ) अन्न सेवन करावे .

योग्यवेळी (चांगली भूक लागली असेल अशा वेळी ) सात्म्य असे (नित्य सवयीचे ) अन्न खाल्ले असता त्याने मनाची समाधानी होते , व ते अन्न काही पिडा करीत नाही . हलके अन्न लवकर पचन होते , स्निग्ध व ऊन असे बलवर्धक व अग्निदीपक असते . फार घाई किंवा फार उशीर न लावता खालेले अन्न एकाचवेळी चांगले पचन होते . द्रव पदार्थांनी युक्त असे अन्न खाल्ले असता ते निर्दोषपणाने पचन होते . आणि योग्य प्रमाणात खाल्लेले अन्न सुखाने जिरते व रसरक्तादि सर्व धातूंना सम प्रमाणात ठेविते ॥४५८ -४८२॥

ज्या ऋतूंत रात्री फार मोठ्या असतात , त्या ऋतूंत (हेमंत व शिशिरऋतूत ) वाढणार्‍या दोषास प्रतिकार करील अशा प्रकारचे अन्न प्रातःकाळीच (संघप्रहर दिवसास ) सेवन करावे . तसेच ज्या ऋतूत दिवस मोठे असतात त्या ऋतूंत (ग्रीष्म व वर्षाऋतूत ) त्या कालाला योग्य असे अन्न दिवसाचे साडेतीन प्रहाराच्या सुमारास खावे आणि ज्या ऋतूत रात्री व दिवस समान असता अशा ऋतूत (शरद व वसंतऋतूत ) वरीलप्रमाणेच दोषांचा प्रतिकार होईल अशा प्रकारचे अन्न दिवसाच्या मध्यभागी दोन प्रहरी खावे . हा प्रकार एक वेळ जेवणारानी भुकेच्या मानाने निम्मे किंवा तीन हिस्से अन्न सकाळी सवा प्रहर दिवसास खावे . आणि दुसरे जेवण साडेचार प्रहर झाल्यानंतर (म्हणजे अजमासे एक किंवा दीड तास रात्रीस ) करावे .

जेवणाचा योग्य काळ येण्यापूर्वी किंवा जेवणाची वेळ टळून गेल्यावर अशा अनियमितपणाने केव्हाही जेवण करू नये . अगदी योग्य वेळी करावे (योग्यवेळी म्हणजे चांगली भूक लागली असेल अशावेळी ) तसेच भुकेच्या मानाने अतिशय कमी किंवा जास्ती अन्न खाऊ नये . जेवणाच्या वेळेपूर्वी (चांगली भूक लागण्यापूर्वी ) मनुष्याच्या शरिरात जडत्व असते , त्यामुळे त्यावेळी जेवले असता नानाप्रकारचे रोग उत्पन्न होतात . कदाचित् मृत्युही येतो .

जेवणाची वेळ टाळून जेवण केल्याने वायुच्या प्रकोपाने अग्निमांद्य होऊन खाल्लेले अन्न फार पीडा देऊन पचन होते . आणि पुनः अन्न खाण्याची वासना होत नाही . भुकेपेक्षा कमी अन्न खाल्ल्याने आळस , जडत्व , पोट फुगणे व अंग गलित होणे हे विकार होतात . म्हणून जेवणाच्या दोनीही वेळा प्रकृतीचे दोषमान व काल ह्यांचा विचार करून वर सांगितलेले दोष वर्ज करून उत्तम प्रकारे शिजवून तयार केलेले व त्याचे जे उत्तम गुण सांगितले आहेत त्यांनी युक्त असे अन्न युक्तीने सेवन करावे .

अपवित्र , विषारी पदार्थदिकांनी दूषित झालेले दुसर्‍याचे उष्टे अन्न , दगड (खडे ), माती वगैरे (केर -कचरा ) पडलेले मनाला न आवडणारे , शिळे , ज्याला काही गोडी (चव ) नाही असे , आंबलेले किंवा नासलेले , व शत्रु किंवा वारांगनादिकांनी दिलेले अन्न खाऊ नये . तसेच अन्न शिजवून तयार झाल्यावर फार वेळ होऊन गेलेले , कठीण , थंड झालेले अन्न पुनः ऊन केलेले , ज्या अन्नातील पेज वगैरे बरोबर काढून टाकली नाही असे , फार शिजल्यामुळे , अगर भाजल्यामुळे करपलेले व जे चांगले रुचिकर नाही असे दिसते ते , अशा प्रकारचेही अन्न खाऊ नये .

जे जे पदार्थ क्रमाने एकापेक्षा एक रुचीने अधिक चांगले असतील ते त्या क्रमानेच एकामागून एक असे वाढावे . म्हणजे सर्वात उत्तम रुचिकारक जे पक्वानन ते बाकीच्या पदार्थांच्या मागून वाढावे . (व जेवणारानेही त्याच पद्धतीने खावे .)

जेवणाराने जेवताना एक एक पदार्थ खाऊन झाल्यावर पाण्याने चुळा भरून टाकून जीभ स्वच्छ करावी . कारण जीभ स्वच्छ झाल्याने पूर्वी खाल्लेल्या पदार्थाची चव अथवा गोडी जाऊन पुनः दुसरे खाल्लेले अन्न प्रथमतःच खाल्याप्रमाणे रुचिकारक लागते . जीभ स्वच्छ करण्याचा हेतु असा आहे की , प्रथम खाल्लेल्या पदार्थाच्या गोडीने (रुचीने जीभ त्या पदार्थांच्या चवीने युक्त असते , त्यामुळे त्याजवर दुसरा पदार्थ खाल्ला असता त्याची रुची जिभेला कळत नाही . म्हणून जेवताना एक पदार्थ खाऊन झाल्यावर मध्यंतरी चुळा भरून तोंड स्वच्छ करावे .)

जे अन्न चांगले रुचिकारक असते ते खाल्ले असता त्यापासून मनाला उत्साह वाटणे , सामर्थ्य येणे , पुष्टी , हुषारी , मनाला आनंद , सुख , ह्यांची प्राप्ती होते आणि तेच जर बेचव अन्न खाल्ले तर ते ह्याच्या उलट म्हणजे मनाला अनुत्साह व निर्बळपणा वगैरे विकार करिते .

जे अन्न पोटभर खाल्ले असताही पुनः खाण्याची इच्छा होते त्या अन्नाला गोड किंवा रुचिकारक अन्न म्हणावे .

पाणी प्यावयाचे ते जेवण झाल्यावर किंवा जेवणाच्या मध्यंतरी जसे प्रकृतिमानाप्रमाणे योग्य वाटेल त्याप्रमाणे प्यावे .

जेवण झाल्यावर आचवताना गवताच्या काडीने दाताच्या मधून राहिलेले अन्न हळूहळू काढून टाकावे . कारण ते जर काढून टाकिले नाही तर तोंडाला घाण येते . म्हणून दंतशोधन अवश्य करावे ॥४७० -४८२॥

खाल्लेले अन्न जिरल्यावर वायुची वाढ होते . अन्नाचे पचन होत असता पित्त वाढते आणि जेवण पूर्ण होते त्यावेळी कफ वाढलेला असतो . म्हणून जेवल्यावर वाढलेला कफ आपल्याला आवडत्या अशा किंवा तुरट , तिखट , कडु अशा पदार्थांचे धूम्रपान करून तो पातळ करावा . आणि सुपारी , कंकोळ , कापूर , लवंगा व जायफळ ह्यांचे चूर्ण तोंडात टाकावे किंवा तोंड स्वच्छ करणारी अशी तिखट व तुरट फळे खावी अथवा वरील सुपारी वगैरे पदार्थांचे चूर्ण विड्याच्या पानात घालून त्यात आणखी काही सुगंधी द्रव्ये घालून विडा करून खावा . म्हणजे तोंड स्वच्छ होऊन कफाचे शमन होते . जेवल्यानंतर अन्न सेवनामुळे झालेले श्रम परिहार होण्याकरिता काही वेळ राजाप्रमाणे स्वस्थ बसून राहावे . श्रमपरिहार झाल्यावर शंभर पावले चालावे . (शतपाउली करावी .) नंतर डाव्या कुशीवर थोडा वेळ निजावे .

जेवण केलेल्या मनुष्याने मनाला प्रिय अशा प्रकारचे शब्द , रूप (नृत्यगायनादि ), रस (डाळिंब वगैरे ), सुवासिक पदार्थ व स्पर्शादि विषय ह्यांचे सेवन करावे . त्यायोगाने खाल्लेले अन्न सुव्यवस्थित राहाते . शब्द रूप , रस , स्पर्श व गंध हे विषय अश्लीलपणाचे ओंगळ असे असले तर त्यापासून , तसेच अपवित्र अन्नाच्या योगाने व जेवल्यावर अतिशय हसल्याने वांती होते .

जेवणानंतर फार वेळ निजू नये , तसेच फार वेळ बसून राहू नये , पातळ पदार्थ पुष्कळ असलेले असे जेवण करू नये , विस्तवाचा शेक किंवा ऊन फार घेऊ नये , फार पोहू नये , गाडीत वगैरे बसून किंवा धोडे वगैरे वाहनावरून फार प्रवास करू नये , एकाच प्रकारचे (रुचीचे ) अनन सारखे केव्हाही खाऊ नये . त्याच प्रमाणे भाज्या , राळे , सावे वगैरे हलक्या प्रतीचे अन्न व आंबट पदार्थ खाऊ नयेत .

केवळ एकच रसाचे (रुचीचे ) पदार्थ फार खाऊ नयेत अथवा सर्व प्रकारचे पदार्थ एके ठिकाणी कालवून केव्हाही खाऊ नयेत . तसेच सकाळी जेवण केल्यावर जठराग्नी मंद असल्यामुळे खाल्लेले अन्न पचले नाही तर दुसर्‍या वेळी (दोन प्रहरी किंवा रात्रीही ) पुनः जेवण करू नये . कारण अग्नि प्रदीप्त नसल्यामुळे पूर्वी खाल्लेले अन्न अर्धवट पचन होत असता त्याजवर पुनः जेवण केले असता जेवणाराचा जठराग्नि नाश पावतो .

मुग , सातु ह्यासारख्या हलक्या धान्याचे अन्न असले तरी ते प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये . त्याचप्रमाणे उडीद वगैरे जड धान्ये व रेडा वगैरे पशूंचे जड मांस हेही खाऊ नयेच . त्याचप्रमाणे पिष्टान्न केव्हाही खाऊ नये . फारच भूक लागली असेल तर फार बेताने खावे आणि त्याजवर त्या अन्नाच्या दुप्पट पाणी प्यावे म्हणजे त्याचे सुखाने पचन होते .

पेय पदार्थ (पेज वगैरे ), लेह्य पदार्थ (श्रीखंड वगैरे ), अद्य पदार्थ (भात वगैरे ) व भक्ष्य पदार्थ (लाडू वगैरे ) हे क्रमाने उत्तरोत्तर अधिक जड आहेत , म्हणजे भक्ष्य पदार्थ लाडु वगैरे हे सर्वात जड आहेत .

अन्न फार जड असेल तर ते भुकेच्या मानाने अर्ध्या प्रमाणात खावे किंवा तीन हिस्से प्रमाणात खावे आणि हलके अन्न असेल तर ते तृप्ति होईपर्यंत खावे . द्रव पदार्थ (ताक वगैरे ) बरेच घालून पातळ केलेले किंवा केवळ पातळ असे अन्न प्रमाणाने जड होत नाही . कोरडे अन्न पातळ पदार्थांशी खाल्ले असता ते काही दोषकारक होत नाही . कोरडे अन्न खाल्ले असता ते चांगले पचन होत नाही , तसेच फारसे ओलसर नसून लाडू वगैरेसारखे केलेले अर्धवट कोरडे अन्नही अर्धवट पचते .

पित्ताचा प्रकोप होऊन ते आमाशयात किंवा पक्वाशयात जाऊन बसले असता ते विदाहकारक किंवा विदाहन करणारे असे अन्न खाल्ले तरी ते विदाहकारक (घशाशी जळजळ करणारे ) होते म्हणजे त्याचे अर्धवट पचन होते ॥४८३ -४९६॥

पिष्टान्नादि शुष्क (कोरडे ) अन्न , दूध व मासे ह्या सारखे विरूद्ध अन्न व हरभरे , उडीद वगैरे विष्ठंभी (मलावरोध करणारे ) अन्न खाल्ले असता ते जठराग्नीला मंद करिते आणि त्यामुळे अजीर्ण उत्पन्न होते . ते कफप्रकोपामुळे आमाजीर्ण पित्तप्रकोपामुळे विदग्धाजीर्ण आणि वातप्रकोपामुळे विष्ठब्धाजीर्ण असे अजीर्णाचे तीन प्रकार आहेत . तथापि कित्येक आचार्यांच्या मताने अन्नरस शेष राहिला असता त्यामुळे होणारे रस शेषाजीर्ण म्हणून चौथे अजीर्ण होते . ह्याप्रमाणे अजीर्णाचे चार प्रकार आहेत .

अतिशय पाणी पिणे अगर विषम भोजन करणे अथवा मलमूत्रादिकांचे वेग आवरून धरणे किंवा झोपेचा विपर्यास करणे (म्हणजे दिवसा झोप घेऊन रात्री जागरण करणे ) अशा कारणांनी योग्य वेळी नित्य सवयीचा (नित्य खाण्यातला ) व हलका , असा आहार करूनही तो पचन होत नाही . त्याचप्रमाणे इर्षा (परोत्कर्ष सहन न होणे ) भय , राग ह्यांच्या योगाने मन व्यग्र झाले असता , लोभाने युक्त असता , रोगादिकांनी किंवा दैन्यावस्थेने मन व्याप्त असता अशा वेळी किंवा मनात मात्सर्य असता त्यावेळी खाल्लेले अन्नही चांगले पचन होत नाही .

आमाजीर्ण झाले असता कफप्रकोपामुळे खाल्लेले अन्न मधुर होते , विदग्धाजीर्णामध्ये अन्न किंचित पक्व झाल्यामुळे त्याला आम्लपणा येतो , आणि विष्टब्धाजीर्णामध्ये अत्यंत तोद (पोटात सुई टोचल्याप्रमाणे पीडा ) शूळ पोट फुगणे व वायुचा अवरोध ही लक्षणे होतात ढेकर शुद्ध येत असूनही जेवण्याची इच्छा होत नाही . हृदयात जडपणा वाटतो व मळमळते (तोंडास पाणी सुटते ) ही लक्षणे रसदोष अजीर्णामुळे होतात . ह्या अजीर्णाला चौथे अजीर्ण म्हणतात .

मूर्च्छा , बडबड , ओकारी , तोंडाला पाणी सुटणे , अंग गलित होणे , घेरी येणे , वगैरे उपद्रव अजीर्ण वाढले असता होतात व अखेर मृत्यूही येतो ॥४९७ -५१२॥

आमाजीर्ण झाले असता लंघन (उपास ) करावा . विदग्धाजीर्ण झाले असता वमन करावे . विष्टब्धाजीर्ण झाले असता स्वेदन (वाफारा ) करावे आणि रसशेषाजीर्ण असता निजून रहावे , स्वेदनही करावे .

विदाग्धाजीर्ण झाले असता त्या मनुष्याला सैंधव घातलेले ऊन पाणी पाजून वांती करावी . आणि पूर्ववत् चांगली भूक लागेपर्यंत उपोषण करवावे . जर त्या रोग्याचे शरीराला जडत्व नसेल तर त्याला वांती वगैरे उपचार न करिता दोष नाहीसा होऊन हुषारी वाटेपर्यंत त्याला लंघनाचाच उपचार करावा .

आपणास हितकारक अशा अन्नाबरोबर थोडे अहितकारक अन्न खाल्ले असता त्याला ‘‘समशन ’’ (सामान्य प्रतीचे जेवण ) असे म्हणतात . भुकेपेक्षा जास्ती किंवा थोडे अन्न खाणे किंवा भलत्याच वेळी खाणे , ह्याला ‘‘विषमाशन ’’ (विरूद्ध भोजन ) असे म्हणतात . आणि पहिले खाल्लेले अन्न पचन झालेले नसताना त्याजवर पुनः जेवणे ह्याला ‘‘अध्यशन ’’ म्हणतात . असे हे जेवणाचे तीनही प्रकार मनुष्याचा प्राणनाश करितात किंवा नानाप्रकारचे रोग उत्पन्न करितात .

विदग्धाजीर्ण झालेल्या मनुष्याला थंड पाणी प्यावयास द्यावे . म्हणजे त्या अजीर्णाचे त्वरित पाचन होते . आणि पाण्याच्या थंडपणाने त्याचे पित्त नाश पावते . अन्नाला ओलसरपणा मिळाल्यामुळे ते पचन होऊन खाली सरते व विरेचनाने निघून जाते .

जेवल्यावर ज्याचे अन्न विदाही (आम्लरसयुक्त ) होऊन हृदय , कोठा व घसा ह्या ठिकाणी दाह (जळजळ ) करिते त्याला मनुका व हिरडेदळ ह्याचे चूर्ण मधाशी द्यावे . किंवा नुसते हिरड्याचे चूर्ण मधातून द्यावे , म्हणजे त्याला बरे वाटते .

ज्याचा कोठा स्निग्ध आहे व जो सशक्त आहे अशा मनुष्याला सकाळी निजून उठल्यावर जर अजीर्ण झाले आहे अशी शंका वाटली , तर त्याने जेवणाचे वेळी सुंठ व हिरडेदळ ह्यांचे समभाग चूर्ण सहा मासेपर्यंत योग्य अनुपानातून अगर ऊन पाण्याशी प्राशन करावे व मग निःशंकपणाने हितकारक असे अन्न खावे .

थोडासा संचित झालेला आमदोश वातादिदोषांनी बद्ध झाल्यामुळे कोठ्यात लीन होऊन राहतो . तो अल्प असल्यामुळे त्याला जठराग्नीचा मार्ग बंर करिता येत नाही ; त्यामुळे मनुष्याला अजीर्ण असूनही भूक लागलीशी वाटते व त्यामुळे एकाद्या मेदबुद्धि मनुष्याला ती विषाप्रमाणे मारते (म्हणजे ह्या खोट्या भुकेला खरी भूक समजून त्याने जर अन्न सेवन केले तर त्यामुळे ते अजीर्ण विकोपास जाऊन मृत्यू येण्याचा संभव असतो ॥५०४ -५२३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP