मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
व्याधिसमुद्देशीय

सूत्रस्थान - व्याधिसमुद्देशीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय चोविसावा

आता ‘‘व्याधिसमुद्देशीय ’’ नावाचा अध्याय जसा भगवान् धन्वंतरीनी सांगितला आहे तसा सांगतो ॥१ -२॥

रोग दोन प्रकारचे आहेत . एक शस्त्रप्रयोगाने बरे होणारे व दुसरे स्नेहस्वेदादि पंचकर्मे व औषधोपचार इत्यादिकांनी बरे होणारे . त्यापैकी जे शस्त्रप्रयोगाने साध्य होणारे आहेत त्या रोगावर जर स्नेहादि उपचार केले तरी ते चालतात ; पण जे रोग स्नेहादि उपचारांनी बरे होणारे आहेत त्यावर मात्र शस्त्रप्रयोग करीत नाहीत व करू नये .

आयुर्वेदशास्त्राची सर्व तंत्रे सामान्यतः सारखीच आहेत ; म्हणून या आमच्या शल्यतंत्रप्रतिपादक सुश्रुग्रंथात देखील सर्व रोगांचा स्थूलमानाने संग्रह करितो . आम्ही पूर्वो (प्रथमाध्यायात ) सांगितले आहे की , शारीरिक क्रियेमध्ये दुःख किंवा क्लेश यांचा संबंध येतो , अथवा अनुभव येतो त्याला ‘‘व्याधि ’’ (रोग ) असे म्हणतात ते व्याधि तीन प्रकारचे आहेत . अध्यात्मिक अधिभौतिक व अधिदैविक , या , व्याधिचे पुनः सात प्रकार होतात . ते सात प्रकारचे व्याधि असे -१ आदिबलप्रवृत्त , २ जन्मबलप्रवृत्त , ३ दोषबलप्रवृत्त ४ संघातबलप्रवृत्त , ५ कालबलप्रवृत्त , ६ दैवबलप्रवृत्त , आणि ७ स्वभावबलप्रवृत्त .

( १ ) त्यापैकी आदिबलप्रवृत्तव्याधि म्हणजे जे शुक्र व शोणीत ( आर्तव ) यांच्या ठिकाणी असणारे जे वातादि दोष त्यामुळे होणारे . ते म्हणजे कुष्ठ , मुळव्याध , प्रमेह वगैरे , त्यांचेही मातृज ( मातेच्या आर्तवदोषांमुळे होणारे ) व पितृज ( पित्याच्या बीजदोषामुळे होणारे ) असे दोन प्रकारचे आहेत .

( २ ) जन्मबलप्रवृत्तव्याधि म्हणजे गर्भवती असताना आईने मनास वाटेल त्याप्रमाणे केलेले आहारविहार व डोहाळै व पुरविणे ह्या कारणांनी पंगुत्व , अंधत्व , ( जन्मांध ),

मुकेपणा , मिन्मिनत्व (नाकात बोलणे ) व खुजेपणा वगैरे जे व्याधि होत . त्यातही एक आहाररसापासून होणारे व दुसरे डोहाळ्याच्या अपचारामुळे (डोहाळे न पुरवल्यामुळे ) होणारे असे दोन प्रकारचे आहेत .

( ३ ) दोषबलप्रवृत्तव्याधि म्हणजे - पडसे वगैरे विकार होऊन त्यापासून उत्पन्न होणारे व दुसरे प्रकारच्या आहारविहारादिकापासून होणारे . ह्यांचेही दोन प्रकार आहेत . एक आमाशयाच्या आश्रयाने होणारे व दुसरे पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे . पुनः ते शारीरिक व मानसिक असे दोन प्रकारचे आहेत . हे आध्यात्मिक रोग सांगितले .

( ४ ) संघातबलप्रवृत्तव्याधि म्हणजे अशक्त मनुष्याने बलाढ्य मनुष्याशी मारामारी केल्याने जे आगंतुक रोग होतात , ते संघातबलप्रवृत्त समजावे . ते देखील शस्त्रदिकांच्या आघाताने होणारे व वाघ वगैरे हिंसक पशूंच्या नखदंतादिकांनी होणारे असे दोन प्रकारचे आहेत . हे आधिभौतिकव्याधि समजावे .

( ५ ) कालबलप्रवृत्तव्याधि म्हणजे जे रोग थंडी , उष्णता ( किंवा उन्हाळा ), वारा व पाऊस ह्यांच्या कमीआधिक निमित्ताने होणारे . ते देखील दोन प्रकारचे आहेत . एक ऋतुत बिघाड झाल्यामुळे ( ऋृतुमानाप्रमाणे हवा नसल्यामुळे ) होणारे व दुसरे ऋृतूत बिघड नसताना होणारे .

( ६ ) दैवबलप्रवृत्तव्याधि म्हणजे जे रोग देव , गुरू इत्यादिकांचा द्रोह केल्यामुळे होतात किंवा ऋषी वगैरे तपस्वी महापुरुषांच्या शापाने होतात ; तसेच जारणमारणादि मंत्रप्रयोगाने होतात व जे उपसर्गानें ( संसर्गाने ) होतात ते होत . ह्यांना दैवबलप्रवृत्त म्हणतात . त्यांचेही दोन प्रकार आहेत एक वीजेच्या किंवा अशनी ( वज्राघाताने ) पाताने होणारे . ( वीज व अशनी यांतील फरक एवढाच की , वीज ही वेलीप्रमाणे तिर्कस गतीने अग्नीच्या लोळाप्रमाणे निघून जाते , आणि अशनी म्हणजे ( व्रज ) आकाशातून मुसळाप्रमाणे खाली येणारा मारणात्मक असा विजेचा लोळ ) ते दुसरे भूतपिशाच्चादिकांच्या बाधेने होणारे . ते पुनः आणखी दोन प्रकारचे आहेत . एक संसर्गजन्य व दुसरे आकस्मिक होणारे .

( ७ ) स्वभावबलप्रवृत्तव्याधि भूक , तहान , वृद्धावस्था , मृत्यू व निद्रा इत्यादी . याचेही दोन प्रकारे आहेतच . ते एक कालकृत व दुसरे अकालकृत त्यापैकी रोग होऊ नये म्हणून पुष्कळदा जपत असताही जे होतात , ते कालकृत समजावे आणि रोग होण्याची फिकिर न बाळगल्याने होणारे म्हणजे शरीराला रोग होऊ नये म्हणून न जपल्याने होणारे ते अकालकृत समजावे . हे आधिदैविक व्याधि सांगितले , याप्रमाणे या आध्यात्मिकादि तीन व आदिबल प्रवृत्तादि सात प्रकारांमध्ये सर्व व्याधींचा समावेश होतो ॥३ - ७॥

सर्व रोगांचे मूळ कारण वात , पित्त व कफ हे दोषच आहेत . कारण कोणत्याही रोगात याच दोषांची लक्षणे त्याच्या कमीअधिकप्रमाणे कमीजास्त असतात . शिवाय त्याच्या लक्षणानुसार त्या त्या दोषाला धरून औषधोपचार केले असता रोग बरा झाल्याचे दिसून येते . आयुर्वेदातही रोगाचे मूळ कारण वातपित्त व कफ हेच सांगितले आहे . ज्याप्रमाणे या सृष्टीतील महद्रादि सर्व विकारजात (पांच भौतिक सर्व स्थावरजंगम पदार्थ ) सत्त्व , रज व तम या तीन गुणांव्यतिरिक्त नाही त्याप्रमाणे विश्वरूपाने या देहाच्या ठिकाणी असलेले सर्व विकारसमूह (रोगसमूह ) या वातपित्त कफाला सोडून नाहीत . वातादि दोष , रसादिप्तधातु , मलमूत्रादि मल यांच्या परस्पर संयोगाने , निरनिराळ्या स्थान भेदाने व निरनिराळ्या कारणांनी त्या रोगाचे अनेक भेद आहेत . जसे वातादि दोष , रसधातु व पुरीष यांच्या संसर्गाने अतिसारादि ; वातादिदोष ; रसधातु याच्या संसर्गाने ज्वरादि ; वातादिदोष , रसधातु व मूत्र याच्या संसर्गाने प्रमेहादि वगैरे नानाविध रोग होतात . वातादि दोषापासूनच रोग होतात . तथापि त्या वातादिकांनी रसादिदूष्यांपैकी जो एखादा धातु अत्यंत दूषित होतो त्यावरून त्या रोगाला तद्धातुजन्य रोग असे म्हणतात . जसे रसधातुजन्य , रक्तधातुजन्य , मांसजन्य , अस्थिजन्य , मज्जाजन्य आणि शुक्रजन्य हा व्याधि आहे असे म्हणतात ॥८॥

रसादि धातु -गत -विकार

त्यापैकी -अन्नद्वेष , अरुचि , अपचन , अंग दुखणे , ज्वर , मळमळणे , भूक न लागणे , (तृप्ति ) अंगाला जडत्व , छातीत दुखणे , पांडुरोग , स्रोतसांचा रोध , कृशत्व , बेचवपणा , अंग व हात पाय गळाल्यासारखे वाटणे आणि अकाली अंगाला सुरकुत्या पडणे व केस पांढरे होणे इत्यादि रोग रसधातु दुषित झाल्यामुळे होतात . कुष्ठ , विसर्प (इसब ), पुटकुळ्य़ा , लासे , निळेडाग , तीळम्यच्छ (न दुखणारे काळे किंवा सांवळे डाग ) वांग , इंद्रलुप्त (चाई ), पांथरी , अंतविद्रधि किंवा बहिविद्रधि गुल्म , वातरक्त , मूळव्याध , आवाळू , अंग दुखणे , प्रदर , रक्तपित्त , वगैरे व्याधी रक्त दूषित झाल्यामुळे होतात .

गुद पिकणे , तोंड येणे , लिंग पिकणे किंवा त्याजवर फोड येणे , अधिमांस (एक मुखरोग ), आवाळु , मूळव्याध , आधिजिव्ह (जिभेचारोग ) उपजिव्हा (पडजीभ ), उपकुश (दातांचा रोग ), गलशुंडीका (तालुरोग ) आलजी , मांस -संधान , ओष्ठप्रकोप (ओठ सुजणे ) गालगुंड व गंडमाला हे रोग मांस दूषित झाले म्हणजे होतात .

गाठी , आंत्रवृद्धि , गालगुंड , अर्बुंद , मेदोजन्य , ओष्ठप्रकोप , मधुमेह अतिर्स्थोल्य (अतिशय स्थूलपणा ), फार घाम येणे हे रोग मेद दूषित झाल्यामुळे होतात . अध्यस्थि

( अधिक हाड उत्पन्न होणे ) अधिदंत ( अधिक दांत होणे ), हाडे टोचणे , हाडे दुखणे कुनख ( नखाचा एक रोग ) हे रोग हाडे दूषित झाल्यामुळे होतात .

डोळ्यांपुढे अंधेरी येणे , मूर्च्छा (फीट ), भ्रम (घेरी येणे ), पेर्‍यांच्या ठिकाणी ज्यांची मुळे खोल आहेत असे व्रण उत्पन्न होणे (‘‘पर्वगौरवस्थूलमुलोरुर्जधा ’’ असा पाठ घेऊन

कित्येक , पेरी जड होणे व मांड्या व पिंढर्‍या , ह्यांच्या मुळाच्याय ठिकाणी स्थूलता असा अर्थ करितात .), डोळे येणे (डोळ्यातून पाणी गळणे ) हे विकार मज्जादोषामुळे होतात . नपुंसकत्व , कामवासना न होणे , शुक्राश्मरी , शुक्रमेह , आणि शुक्रदोषांसंबंधी इतर रोग हे शुक्र दूषित झाल्यामुळे होतात .

त्वचेचे रोग , मलमूत्रादिकाचा अवरोध , किंवा त्यांची अतिप्रवृत्ति , किंवा यथायोग्य प्रवृत्ति न होणे हे विकारा मलस्थाने दूषित झाल्यामुळे होतात .

डोळे , कान वगैरे इंद्रियांना त्यांची कामे करिता न येणे , किंवा योग्य रीतीने ती न होणे हे विकार इंद्रियांची स्थाने दूषित झाल्यामुळे होतात . याप्रमाणे हे रसादि धातूचे वगैरे रोग संक्षेपाने सांगितले . ह्यांची कारणे व सविस्तर लक्षण त्या त्या रोगनिदानप्रकरणात सांगू .

कुपित झालेले दोष शरीरातून जोराने संचार करीत असताना स्रोतसांच्या वैगुण्यामुळे (बिघाडामुळे ) ते जेथे अडून राहतात त्या ठिकाणी रोग उत्पन्न होतो ॥१०॥

पुनः या दोषांच्या व रोगांच्या संबंधात असे एक कळले पाहिजे की , वातादी दोष व ज्वरादि रोग ह्यांचा नित्य संबंध आहे की , त्यांच्यामध्ये नित्य निराळेपणा आहे ? जर त्यांचा नित्य संबंध असेल तर सर्व प्राणी सर्वकाळ रोगपीडितच राहातील . आणि ह्याच्या उलट ते वातादि दोष व ज्वरादिरोग नित्य व पृथक (निरनिराळ्या स्थानी ) असतील तर त्यांची निरनिराळ्या ठिकाणी चिन्हे (लक्षणे ) होणार नाहीत असे होईल . व त्यामुळे वर जे सांगितले आहे की , वातादि दोष हे ज्वरादि रोगाला मूळ कारण आहेत ते बरोबर होणार नाही . यासाठी त्याचे समाधान सांगतो . दोषांना सोडून ज्वरादि रोग होत नाहीत . तथापि त्यांचा नित्य संबंधही नाही जसे विजांचा गडगडाट , वारा सुटणे , वीज पडणे व पाऊस ह्या गोष्टी आकाशाला सोडून होत नाहीत व आकाश सतत आहे म्हणून त्या नेहमी सारख्या होतात असेही नाही . त्यांना काही निमित्त झाले म्हणजे मात्र त्या होतात . याच गोष्टीप्रमाणे वातादि दोष व ज्वरादि रोग यांचा नित्य संबंधही नाही व नित्यपृथक्पणाही नाही . पण पाण्यावर येणार्‍या लाटा व बुडबुडे यांना ज्याप्रमाणे वार्‍याचे वगैरे निमित्त झाले म्हणजे त्या उत्पन्न होतात , त्याप्रमाणे आहारविहारादिकांच्या अनियमितपणाचे निमित्त झाले म्हणजे मात्र त्यांची उत्पत्ति होते .

सर्व रोगांची परिगणना व प्रत्येक रोगाची संख्या वगैरे सर्व माहिती व त्याचे उपद्रव हे पुढे वातादि काही रोगांची माहिती निदानस्थानात व बाकीच्या ज्वरादि रोगांची माहिती उत्तरतंत्रात याप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : August 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP